श्री हनुमान पौर्णिमा उत्सव

Fri Apr 12 2024
Annual Events

 

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने मंगळवार, 23 एप्रिल 2024 रोजी 'सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट' तर्फे श्री हनुमान पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सव स्थळ : अतुलितबलधाम, सह्याद्रीनगर, टी. आर. पी.

नाचणे, रत्नागिरी - 229 292

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी हनुमान चलिसेमध्ये ग्वाही देतात,

सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रच्छक काहू को डर ना ॥22॥

संकटमोचन हनुमानाष्टकही आपल्याला हेच सांगतं,

को नहिं जानत है जगमें कपि संकटमोचन नाम तिहारो ॥

भक्तांच्या जीवनातील संकट निवारण्यासाठी श्रीहनुमंत योग्य शक्ती व युक्ती प्रवाहित करतात; पापमोचनाचा व संकटविमोचनाचा मार्ग प्राप्त करून देतात. शारीरिक व मानसिक क्लेशांचा ताप नाहीसा करतात. मानसिक व शारीरिक सामर्थ्य प्राप्त करून देतात. सर्व संकटांवर मात करणारा व वेळ आल्यावर प्रत्यक्ष श्रीराम, लक्ष्मणालाही संकटातून बाहेर काढणारा असा हा हनुमंत अतुलितबलधाम येथे स्थानापन्न आहे. समर्थ श्री रामदास स्वामीही मारुती स्तोत्रामध्ये म्हणतात,

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही। नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।

म्हणजेच हा हनुमंत सर्वप्रकारच्या संकटांचा नाश करणारा आहे. अशोकवनात बंदीवान असणाऱ्या सीतेचेही शोक विनाश करणाऱ्या ह्या सीताशोकविनाशक हनुमंताला, परमपूज्य श्रीअनिरुद्ध त्यांचे 'रक्षक गुरु' मानतात. बापूंच्या देवघरातील पंचमुखी हनुमंताची मूर्ती अतुलितबलधाम येथे स्थानापन्न आहे. अतुलितबलधाम येथे साजरा होणाऱ्या श्रीहनुमान पौर्णिमेच्या उत्सवात श्रीपंचमुखहनुमत्कवच स्तोत्राचे पठण होत असताना या मूर्तीचे दर्शन श्रद्धावान घेऊ शकतात.

श्रीपंचमुखहनुमत्कवच हे श्रद्धावानांचे शारीरिक, मानसिक व प्राणिक (प्राणमय) स्तरावर सर्वप्रकारे रक्षण करणारी सर्वश्रेष्ठ महाविद्या आहे. संकट कोणतेही असो, कितीही मोठे असो, कोणत्याही पातळीवर असो श्रीहनुमंत सगळी संकटे दूर करतातच असा जनमानसाचा विश्वास आहे. अशा ह्या संकटमोचन हनुमंताची कृपा संपादन करण्यासाठी हनुमान पौर्णिमेसारखा दिवस नाही.

 

कार्यक्रमाची रूपरेषा

सकाळी 10.00 वा. अश्वत्थासहित श्रीहनुमंत शिळेचे पूजन.

सकाळी 11.00 वा. पंचमुखी श्रीहनुमंतासमोर अखंड पठण

1) श्रीहनुमंत तारक मंत्र - 54 वेळा

(ॐ श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः)

2) पंचमुख-हनुमत्कवच

3) संकटमोचन श्रीहनुमान स्तोत्र

सकाळी 11.30 ते रात्रौ 8.30 पर्यंत पंचकुंभाभिषेक.रात्रौ 10.00 वा. पूर्णाहुती.