हरि ओम,
Aniruddha Devotion Sentience ही आपली वेबसाईट नव्या रूपात, नव्या आकर्षक मांडणीसह आपल्या भेटीला येत आहे, असा परमपूज्य समीरदादांचा मेसेज पाहिला. त्या मेसेजमधील माहितीनेच वेबसाईटला भेट देण्याची उत्सुकता इतकी वाढली की क्षणाचाही विलंब न करता मी लगेच aniruddhabapu.in वर लॉग-इन केलं आणि समोर उलगडत जाणारा प्रत्येक विभाग, प्रत्येक छायाचित्र, प्रत्येक व्हिडिओ आणि त्याची आकर्षक मांडणी मनाला इतकी भावली, की त्याबद्दल भरभरून लिहावंसं वाटलं... म्हणून हा लेखनप्रपंच.
aniruddhabapu.in असे टाईप करताच सर्वप्रथम नजरेस पडले पंचपुरुषार्थ उपासनेच्या छायाचित्रातील निळेशार आकाश आणि त्या आकाशातून चराचरात प्रकट झालेलं बापूंचं प्रसन्न, हसरं रूप. उसीबरोबर झळकलेले शब्द - "ANIRUDDHA DEVOTION SENTIENCE - ANIRUDDHA HIMSELF."
"ANIRUDDHA HIMSELF" हे शब्दच जणू एक आश्वासन देत होते, की ही वेबसाईट केवळ माहिती देणारी नसून, प्रत्येक पानागणिक बापूंच्या सहवासाची अनुभूती देणारी असणार आहे आणि खरंच पुढे वेबसाईट पाहत जाताना त्या आश्वासनाची प्रचिती क्षणोक्षणी येत गेली.
बापूंची पितृवचनं, मानसपूजा ऐकण्यासाठीची लिंक, बापूंचा जीवनप्रवास, विविध छायाचित्रं, व्हिडिओ अशा अनेक गोष्टी एकामागोमाग एक उलगडत गेल्या. आजवर साजऱ्या झालेल्या विविध उत्सवांची माहिती, त्यामागील बापूंची भूमिका आणि योजना वाचताना, त्यांचे सुंदर फोटो व व्हिडिओ पाहताना ते सारे उत्सव पुन्हा एकदा अनुभवत असल्याची अनुभूती आली. क्षणभरासाठी अनेक आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आणि मन नकळत त्या आनंदमयी वातावरणात हरवून गेलं.
हे सारे अनुभव मनात साठवत असतानाच नजरेस पडले पुढचे शब्द - "CONNECT WITH BAPU." त्याखाली लिहिलेलं होतं "Once With Bapu, Always With Bapu."
मंडळी, या शब्दांखाली दिसला पहिलाच व्हिडिओ ज्यात बापू श्रद्धावानांना स्वतःच्या हातांनी भरभरून उदी देत होते... आहाहा... त्या व्हिडिओतील उदी देतानाचा बापूंचा तो प्रसन्न, हसरा चेहरा... बघता क्षणीच मनात किती साठवून घेऊ आणि किती नको असं झालं !! व्हिडिओ पाहूनच मन इतकं प्रसन्न झालं, तर त्या क्षणी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या प्रत्येक श्रद्धावानाला काय अनुभूती आली असेल !! "रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी" याचा प्रत्ययच जणू त्यांना आला असेल... ही कल्पनाच मनाला रोमांचित करून गेली. गुरुपौर्णिमा उत्सवात श्री हरिगुरुग्राममध्ये मिळालेली प्रसादरूपी उदी आता मला अधिकच जिव्हाळ्याची वाटू लागली.
उदीचं महत्त्व, तिच्याविषयीची माहिती आणि श्रद्धावानांना आलेले अनुभव इतक्या सुंदर, सुबक आणि आटोपशीर पद्धतीने मांडलेले दिसले की, ही माहिती आणि हे व्हिडिओ सुद्धा प्रत्येक श्रद्धावानाची श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी नक्कीच मदतीचे ठरतील, असं मनापासून वाटलं.
उदीप्रमाणेच पवित्र असणारी हरिद्रा, गुरुक्षेत्रम मंत्र, त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दलची सगळी माहिती, छायाचित्रं आणि व्हिडिओंच्या माध्यमातून खरंच अतिशय आकर्षक पद्धतीने मांडलेली दिसली. प्रत्येक छायाचित्र आणि व्हिडिओ बापूंच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाणारा आणि त्यांच्याशी असलेली नाळ अधिक दृढ करणारा वाटला.
त्यानंतर या सगळ्या आनंदात आणखी आनंदाची भर घालणारा विभाग समोर आला आणि तो म्हणजे 'अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी' या शीर्षकाखाली असलेला प्रत्येक व्हिडिओ म्हणजे भक्ती आणि श्रद्धारूपी भावनांचा एक अमूल्य ठेवा !! या व्हिडिओंबद्दल मी काय लिहिणार? हे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायचे... मनात साठवून ठेवायचे आणि त्या व्हिडिओंमधून व्यक्त होणारं बापूंचं श्रध्दावानांवरील अपरंपार प्रेम पुन्हा पुन्हा अनुभवायचं... एवढंच !
१९९६-९७ सालापासूनचे बापूंचे श्रद्धावानांसोबतचे अनेक व्हिडिओ पाहताना त्या यात्रांमध्ये बापू, नंदाई आणि दादा सर्वांबरोबर अगदी सहजपणे सहभागी झालेले दिसले. ते सारे क्षण ज्यांनी याची देही, याची डोळा अनुभवले, त्यांना त्या वेळी किती कृतार्थ वाटलं असेल, याची जाणीव मनाला झाली.
आणि त्याच क्षणी आपण त्या वेळेला बापूंबरोबर नव्हतो हे ही आठवलं पण आपल्या मनात त्यावेळी बापू नव्हते तरी बापूंच्या संकल्पात, त्यांच्या प्रेमाच्या यादीत मात्र आपण नक्की होतो, म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री हरिगुरुग्राममध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं, याचीही जाणीव झाली. गुरुपौर्णिमेबरोबरच बापूंबरोबरच्या चिरंतन मैत्रीचा जणू मैत्रीदिनच साजरा झाल्याचा आनंद मनात दाटून आला.
आणि मग या सगळ्या आनंदाचा कळस ठरणारा विभाग समोर आला... 'My Bapu's - Photo of the Day !! आहाहा... हा तर प्रत्येक दिवसाची आतुरता वाढविणारा विभाग ! आज बापूंचं कोणतं प्रसन्न रूप दर्शन देणार, ही उत्सुकता कायम जिवंत ठेवणारा आणि त्यामुळे दररोज प्रेमाने या वेबसाईटकडे पावलं वळवणारा !!
अरे हो ... आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आगळावेगळा अनुभव देणारा विभाग सांगायचा राहिलाच .... पण त्याच्याबद्दल इथे वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वेबसाईटवर जाऊन Meditate With Bapu - Roop Dhyan इथे क्लीक करा आणि स्वतःच अनुभूती घ्या, कारण काही अनुभव शब्दांत व्यक्त करताच येत नाहीत, ते फक्त मनाने अनुभवायचे असतात.
आता मला सांगा, वेबसाईटवरचा हा सगळा अनुभव घेतल्यानंतर एखाद्या नव्या श्रद्धावानाला उपासना केंद्रात जावंसं वाटलं, तर त्यात नवल ते काय? त्या ओढीला योग्य दिशा मिळावी म्हणून सर्व देश-विदेशातील उपासना केंद्रांची नावं, पत्ते आणि आवश्यक माहितीही या वेबसाईटवर सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खरंच, ही वेबसाईट म्हणजे "ANIRUDDHA HIMSELF" या शब्दांची अक्षरशः प्रचिती आहे. ही केवळ माहिती देणारी वेबसाईट नाही, तर प्रत्येक श्रद्धावानाला बापूंशी, आपल्या संस्थेशी अधिकाधिक जोडणारी, त्यांच्याशी मनानं कनेक्ट करणारी एक सुंदर अनुभूती आहे.
समस्त श्रद्धावानांना ही अमूल्य भेट मिळावी यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या परमपूज्य समीरदादांना मनापासून अंबज्ञ. त्याचबरोबर बापूंबरोबरचे हे अनमोल क्षण, सुंदर छायाचित्रं आणि व्हिडिओंच्या माध्यमातून जतन करणाऱ्या तसेच ही वेबसाईट साकारण्यासाठी अथक मेहनत घेतलेल्या आयटी टीममधील प्रत्येक श्रद्धावान सेवकाचंही मनःपूर्वक कौतुक.
आणि अर्थातच या संपूर्ण कार्यामागील कर्ते-करविते असणाऱ्या परमपूज्य आई, बापू आणि दादा यांच्याप्रती तर सदैव मनःपूर्वक अंबज्ञताच !!
हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध
श्वेतावीरा लोटलीकर, ठाणे.