भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा

Tue Jan 13 2026
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 8th January 2026)


भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu | Aniruddha Bapu Pravachan | 8th January 2026

 

एकदा का सद्‌गुरुंवर विश्वास बसला की मग - ‘माझ्या आयुष्यात जे काही बरेवाईट होईल, ते फक्त आणि फक्त सद्‌गुरुंच्याच इच्छेने होईल व सद्‌गुरुंच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी नि:संशय आज्ञाच असेल’ हा दृढनिश्चय मनात बाळगून सद्गुरुंचा मार्ग चालू लागलो की सद्‌गुरु आपला योगक्षेम तर चालवतातच, पण आपली वेडीवाकडी, चुकलेली भक्तीसुद्धा प्रेमाने स्वीकारतात व आपल्या भक्तीचा पाया मजबूत करत राहतात, हे अधोरेखित करणारी, स्वामीभक्त जगन्नाथराव पाध्येंची कथा सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या पितृवचनात सांगितली.

स्वामींविषयी त्यापूर्वी कधीही न ऐकलेले, अतिशय संपन्न घराण्यात जन्म झालेले जगन्नाथशास्त्री अक्कलकोटला गेले, ते त्यांच्या एका स्नेह्यांच्या सांगण्यावरून, त्यांना जडलेल्या एका दुर्धर व्याधीतून मुक्तता मिळविण्यासाठी. पण पहिल्याच दर्शनात त्यांची व त्यांच्या कुटुंबाची स्वामींवर अशी दृढ श्रद्धा बसली की त्यांनी त्यांच्या जीवनाची सारी सूत्रे स्वामींच्या हाती सोपविली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल होत गेले, त्याविषयी सद्‌गुरु बापूंनी ह्या कथेतून सांगितले. अशा भक्तांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, ‘शेंडी तुटो वा पारंबी’ अशा निग्रहाने भक्ती करा कारण सद्‌गुरुला भक्ताचे कधीच ओझे होत नाही, असे बापूंनी शेवटी सांगितले.

तसेच ह्या कथेच्या ओघातच बापूंनी श्रद्धावानांकडून - ‘गुरुमहाराज गुरु जय जय स्वामीराज सद्‌गुरु’ आणि ‘चोळप्पाचे प्रेम हवे मज, बाळप्पाची भक्ती हवी। विभक्तीचा अंश नको मज, स्वामी तुमची कृपा हवी॥’ हे गजर करून घेतले. त्याचबरोबर त्यांनी कथेच्या अनुषंगाने, बापूंचे खापरपणजोबा असलेल्या ह्या जगन्नाथशास्त्रींकडून बापूंकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या अक्कलकोट स्वामींच्या एका सुंदर रेखाचित्राविषयीही सांगितले. बापूंनी त्यावरून स्वत: पेंटिंग करून व आजच्या आधुनिक ए.आय. टेक्नॉलॉजीचा यथोचित वापर करून स्वामींची तसबीर बनवली. ह्या अक्कलकोट स्वामींच्या अनोख्या तसबिरीची, आळंदीमधील डुडुळगाव येथे उभारलेल्या ‘श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धामामध्ये’ शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२५ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

सर्वात शेवटी सद्‌गुरु बापूंनी आई जगदंबेच्या साडेतीन शक्तिपीठांमधील स्वरूपांचा - महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुकामाता व सप्तशृंगीमाता ह्यांचा सुंदर गजर श्रद्धावानांकडून करून घेतला.