श्रेष्ठ भक्त पुंडलिकाची कथा आणि विठ्ठलाच्या विलक्षण पादुका | Aniruddha Bapu
Aniruddha Bapu Pravachan
(Thursday 18th September 2025)
श्रेष्ठ भक्त पुंडलिकाची कथा आणि विठ्ठलाच्या विलक्षण पादुका | Aniruddha Bapu | 18th September 2025
सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरतील अशा श्रेष्ठ भक्तांच्या कथांच्या शृंखलेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात, भक्त पुंडलिकाची कथा सांगितली.
सध्या पितृपक्ष अर्थात श्राद्धपक्ष चालू आहे. सगळीकडे दिवंगत पितरांकरिता श्राद्धे घातली जात आहेत. पण अनेकदा असे आढळून येते की आईबाप जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते व त्यांच्या मृत्यूनंतर मोठमोठी श्राद्धे घातली जातात. ह्या प्रवृत्तीवर प्रहार करताना, सद्गुरु बापूंनी त्या अनुषंगाने भक्त पुंडलिकाची कथा सांगितली.
हा असा एक भक्त आहे, ज्याच्यामुळे आम्हाला 'विठ्ठल'रूपातला स्वयंभगवान प्राप्त झाला. पुंडलिक हा इतका मातृपितृभक्त होता की आईवडिलांची सेवा करत असताना जेव्हा प्रत्यक्ष भगवान 'विठ्ठल' त्याला भेटायला आला तेव्हा त्यालाही पुंडलिकाने थांबण्यास सांगितले, ज्याचा फायदा आम्हां सगळ्यांना झाला. तो विठ्ठल भगवान गेली २८ युगे भक्तांसाठी उभा आहे आणि त्याला उभे राहण्यासाठी जी वीट भक्त पुंडलिकाने दिली होती, ती म्हणजे त्या विठ्ठलाच्या 'विलक्षण पादुका'च आहेत, असेही सद्गुरु बापूंनी सांगितले.
'भक्तांच्या अनेक पिढ्यांना भक्तीचा मळा फुलवण्याची संधी ह्या भक्त पुंडलिकामुळेच प्राप्त झाली', हे सांगून सद्गुरु अनिरुद्धांनी त्या अनुषंगाने 'पळभर थांब जरा रे विठू' हे एक जुने सुंदर भक्तिगीत ऐकवण्यास सांगितले. तसेच 'आपण देवाची सेवा जितकी करत नाही, इतकी सेवा तो आपली करत असतो', हे ठामपणे प्रतिपादित करताना, त्यांनी 'विठूमाऊली तू, माऊली जगाची' हे भक्तिगीतही लावण्यास सांगितले. मुख्य म्हणजे, 'श्रद्धावानाने कधीच स्वतःला अनाथ समजू नये कारण तो स्वयंभगवान श्रद्धावानाचा मायबाप असतो', असे श्रद्धावानांना आश्वस्त करून त्यांनी, त्या अनुषंगाने - 'माझे माहेर पंढरी' हा अभंग ऐकवण्यास सांगितला.