अगाध शक्ती अघटित लीला, तव सद्‌गुरुराया – करते जीवनाची रसयात्रा | Aniruddha Bapu

Tue Dec 16 2025
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 27th November 2025)

अगाध शक्ती अघटित लीला, तव सद्‌गुरुराया – करते जीवनाची रसयात्रा | Aniruddha Bapu Pravachan | 27th November 2025

 

सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या, गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ च्या पितृवचनाअगोदर 'अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी - जुने व जाणते' ह्या मालिकेचा पुढील भाग दाखविण्यात आला, ज्यात १९९६ साली संस्थेने आयोजित केलेल्या 'शिरडी रसयात्रे'बद्दल जुन्या श्रद्धावानांनी आपल्या मधुर आठवणी जागविल्या होत्या. नंतर सद्गुरु बापूंनी पितृवचनादरम्यान तोच धागा पकडून ‘रसयात्रा’ ह्या संकल्पनेबद्दल माहिती दिली व ह्या अनुषंगाने, १९९८ साली ‘आळंदी’ येथे नेलेल्या रसयात्रेतील सत्संगात श्रद्धावान तल्लीन होऊन नाचतानाचा एक व्हिडिओ त्यांनी दाखवला. तसेच त्यांच्या आईने बापूंच्या ४१व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर केलेली भावपूर्ण कविताही वाचून दाखवली. ती वाचताना आईच्या आठवणीने त्यांना भरून आले होते.

 

पुढे बोलताना सद्गुरु बापूंनी सांगितले की त्या सर्व विश्वाची आई असणार्‍या आदिमातेने आपल्याला सर्वांना ह्या जगात पाठविले आहे, म्हणजे ‘शाळेत’ पाठविले आहे - ‘गुरुच्या शाळेत’ - आपला विकास साधण्यासाठी. आणि श्रद्धावानाला हा विकास साधता यावा ह्याकरिता तो सद्गुरु कसा काहीही करण्यास तत्पर असतो, फक्त आपण आपला भार त्याच्या खांद्यावर कसा टाकला पाहिजे, हे बापूंनी समजावून सांगितले व त्या अनुषंगाने ‘काय गोड गुरुची शाळा’ व ‘अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया’ ह्या दोन अतिशय अर्थगर्भ रचना ऐकविण्यास सांगितले. एकदा का गुरुच्या प्रेमळ बंधनात स्वत:ला अडकवून घेतले की बाकी जीवनाचे पाश, बंधने आपोआप कशी तुटत जातात व जीवन हे ‘बंदीशाळा’ न बनता ‘रसयात्रा’ कसे बनते हे समजावून सांगितले व हे स्पष्ट करणारा ‘अजून का रे एकलाच मी, तुरुंगात बंदी’ हा अभंग ऐकवण्यास सांगितला.


आता दत्तजयंतीपासून 'वर्धमान व्रताधिराज' सुरू होत आहे. यंदा ह्या व्रताकरिता 'व्रतपुष्प' म्हणून सद्‌गुरु बापूंनी 'दुर्गे दुर्घट भारी' ही आदिमाता महिषासुरमर्दिनीची आरती व त्यानंतर 'ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नमः' (१ वेळा) हा जप घेण्यास सुचविले.