माता शिवगंगागौरी

माता शिवगंगागौरी


श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवात जान्हवी स्थानम्‌ येथे गंगा सप्तमीच्या शुभमुहुर्तावर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) माता शिवगंगागौरीचे विधीवत पूजन केले व नंतर तिचे दर्शन सर्वांसाठी खुले केले. सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी ह्या उत्सवात शिवगंगागौरी मातेबरोबरच शिवगंगाध्वजाचीही स्थापना केली; त्यावर मगरीचे (मकराचे) चिन्ह आहे. हाच ध्वज शिवगंगागौरी मातेच्या मागे विराजमान आहे.


शिवगंगागौरी मातेची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०११ साली झाली. त्यानंतर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने ह्या शिवगंगागौरी मातेची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम रत्नागिरी येथे मंगळवार, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.


आदिमाता चण्डिकेची संपूर्ण विश्वाला व्यापणारी स्तंभनशक्ति म्हणजेच शिवगंगागौरी. गंगा आणि पार्वती एकत्र व एकरूप म्हणजेच चण्डिकापुत्र किरातरुद्राची सहधर्मचारिणी शिवगंगागौरी'. या शिवगंगागौरीमुळेच वैश्विक नियमांचे पालन नीट होत राहते.


माता शिवगंगागौरी म्हणजे पार्वतीचे (पार्वतीमातेचे) पृथ्वीतत्त्व, गंगेचे जलतत्त्व, यज्ञाची - यज्ञपुरुषाची अर्थात महाविष्णूची असुरांनाही सुधारण्याची संधी देणारी शक्ति अर्थात पातालगंगा, हिचे तेजतत्त्व (अग्नि पावकः) - ह्या तीन तत्त्वांचे समान सन्मीलन. सोम व अमृत निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे असुरांपासून रक्षण करण्यासाठी.


निसर्गात, तसेच मानावाच्या त्रिविध देहात घडणारी कुठलीही चूक दुरुस्त करण्याची शक्ती, प्रणाली व पद्धति म्हणजेच शिवगंगागौरी. मनालाही आवर घालण्याची ताकद पुरविते ती हिचीच स्तंभनशक्ति.


कुठलीही चुकीची गोष्ट कुठेही घडत असताना ती दुरुस्त करण्यासाठी आधी ती घडण्याची थांबवावी लागते - अर्थात त्या चुकीचे, त्या अशुभाचे, त्या अमंगलाचे, त्या अभावाचे, त्या दुर्बलतेचे स्तंभन व्हावे लागते.


तसेच समजा, एखादी चुकीची गोष्ट आधीच घडलेली आहे व तिचे दुष्परिणाम सुरूही झालेले आहेत; अशा वेळेस प्रथम ती चूक दुरुस्त करण्याआधी तिच्या दुष्परिणामांचे स्तंभन करावे लागते.


एवढेच नव्हे तर, कुठलीही गोष्ट चुकीच्या दिशेने, चुकीच्या हेतूने किंवा चुकीच्या साधनांनी (सहाय्याने) होऊच नये म्हणून ती सुरू होण्याआधीच तिचे स्तंभन करणे, हे मानवाच्या कल्याणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते.


अशी ही आदिमाता चण्डिकेची संपूर्ण विश्वाला व्यापणारी स्तंभनशक्ति.


किरातरुद्र तेजस शक्ती, उष्णता अर्थात कार्यशक्ती व गती उत्पन्न करणारा आहे आणि शिवगंगागौरी सर्व शांत करणारी, शांती राखणारी व जलात्मिका म्हणून प्रवाहीदेखील आहे.


जल स्वत: वाहते आणि अग्निला शांत करते, त्यामुळेच कोप पावलेल्या एकरुद्राला शांत करणारी फक्त हीच.


किरातरुद्राची पत्नी शिवगंगागौरी ही यह्वशक्ति अर्थात उचित ठिकाणी प्रवाह व उचित ठिकाणी स्तंभन करणारी प्रेरणाशक्ति आहे.


ही शिवगंगागौरी राहते व असते, ती किरातरुद्राच्या कपाळावरील तृतीय नेत्रात. किरातरुद्राचा तृतीय नेत्र म्हणजे सुधाब्धि - अर्थात अमृताचा अनंत अर्णव म्हणजेच अमृताचा अखंड सागर. सुधाब्धि सागरात ही शिवगंगागौरी मकरवाहनावर कमलासनात बसलेली आहे. ही पीतवर्णा आहे. हिची वस्त्रेही पितवर्णा आहेत. हिच्या दिव्य चक्षुंची वरची पापणी ही तिच्या स्तंभन शक्तिचे स्वरूप व कार्य आहे (मानवासाठीसुध्दा वरची पापणी मिटली की दृष्टीचे स्तंभनच होते), आणि हिच्या दिव्य चक्षुंची खालची पापणी ही तिच्या प्रवाहशक्तिचे स्वरूप व कार्य आहे (मानवासाठीसुद्धा खालची पापणी स्थिरच असते व प्रकाशाचा प्रवाह डोळ्यात वाहू देते आणि मानवाच्या अश्रुंनासुद्धा हीच प्रवाहित होऊ देते). शिवगंगागौरीचा तृतीय नेत्र म्हणजे विश्वाच्या विषारी जंगलातील न्यग्रोधभूम अरण्य - अर्थात्‌ वाईटाचे चांगल्यात रूपांतर करण्याचे सामर्थ्य.


माता शिवगंगागौरीने आतापर्यंत विश्वरक्षणासाठी सात वेळा अवतार धारण केले आहेत व त्या प्रत्येक वेळी भगवान किरातरुद्रही तिच्यासह आलेला आहे.


प्रथम अवतार - माता जातवेदमुखी व श्रीकल्पान्तभैरव


द्वितीय अवतार - माता दण्डनाथा अर्थात् चक्रवातस्तम्भिनी आणि श्रीत्र्यम्बकानन्दभैरव अर्थात् आधाररुद्र


तृतीय अवतार - माता स्थिरावती अर्थात् अभीष्टा आणि श्रीनिश्चयभैरव अर्थात् अक्षोभ्यरुद्र


चतुर्थ अवतार - माता वरुणालया अर्थात् दुष्टकृत्याविनाशिनी अरुणि श्रीकपिलाम्बर अर्थात् प्रचण्डविज्ञानभैरव


पंचम अवतार - माता वडवानला अर्थात् ज्वालामुखीदेवी आणि श्रीसमशीतोष्णभैरव अर्थात्


गुणेन्द्रवल्लभ


षष्ठ अवतार - माता चम्पावती अर्थात् अरविन्दहस्ता आणि श्रीरसायनेश्वरभैरव अर्थात् निर्मलरुद्र


सप्तम अवतार - मातेश्वरी अर्थात् रेणुका आणि श्रीतपोभैरव अर्थात् जमदग्नि


तुलसीपत्र ७६९ - भगवान किरातरुद्र व शिवगंगागौरी परशुरामाचे पिता व माता बनून अवतीर्ण झाले. किरातरुद्र जमदग्नि ऋषिच्या स्वरूपात धर्माचा व तपाचा अधिष्ठाता होता आणि शिवगंगागौरी रेणुकेच्या स्वरूपात धर्मपालनाची व पराक्रमाची उत्पत्ती करणारी होती आणि तो पराक्रम म्हणजेच त्यांचा पुत्र परशुराम.


या आदिमातेच्या अत्रिस्वरूपाकडील अग्नि जमदग्निकडे पवित्र क्रोध म्हणून आला तर आदिमातेच्या अनसूयास्वरूपातील धर्माचरण रेणुकेकडे पातिव्रत्य व पराक्रमविद्या म्हणून आली.


पिता जमदग्नि ऋषिंच्या मृतदेहाच्या व त्याबरोबर सती जाणाऱ्या माता रेणुकेच्या अग्नीत विलीन होण्यानंतर परशुरामाला तीव्र दुःख झाले होते, त्या शोकाने परशुराम 'माते माते' असा दारुण टाहो फोडत व साश्रुलोचनांनी धरणीवर लोळू लागला. त्यावेळेस तेथे उपस्थित असलेल्या श्रीगुरुदत्तात्रेयांना त्याने विनवणी केली, "हे श्रीगुरु ! माझ्या रेणुकामातेने मला तुमच्या पदरात घातले आहे व आपले दोघांचे सद्गुरु-शिष्याचे नातेही तिने आपल्याकडून संमत करून घेतले आहे. मग आपण माझी उपेक्षा करू नका. मला माझ्या रेणुकामातेचे फक्त एकवार सदेह स्थूलरूपात दर्शन घडवा."


तेव्हा श्रीगुरुदत्तात्रेय परशुरामास म्हणाले होते की 'हे परशुराम ! तुला मातेचे दर्शन अवश्य घडवीन. परंतु तू तिला स्पर्श मात्र करता कामा नये.' परशुरामाने ही अट मान्य करताच एकाएकी रेणुकामाता स्थूलस्वरूपात भूमीतून बाहेर येऊ लागली. तिला व मुख्य म्हणजे तिच्या वत्सल नयनांना पाहून परशुरामास तिच्या कुशीत शिरण्याचा अनिवार मोह झाला व तो नकळत मातेच्या बाहुपाशात शिरण्यासाठी धावला. त्याने रेणुकामातेचा उजवा हात पकडला. परंतु तत्क्षणी श्रीगुरुदत्तात्रेयांच्या अटीचा भंग झाल्यामुळे रेणुकामाता दिसेनाशी होऊ लागली. तेव्हा आपली चूक उमगलेल्या परशुरामाने श्रीदत्तात्रेयांकडे क्षमा मागितली. त्याबरोबर रेणुकामातेचे मस्तक तेवढे भूमींत जाण्यापासून थांबले व ते मूर्त मस्तक हीच विश्वातील साक्षात परमात्म्याने श्रीगुरुदत्तात्रेयांच्या कृपेने प्रकटविलेली भक्तमातेची आद्यमूर्ति झाली.


माता शिवगंगागौरी व भगवान किरातरुद्र ह्यांच्याकडे आदिमातेने तमाचारतांत्रिकांच्या दृष्ट प्रयोगांपासून श्रद्धावानांना वाचविण्याचे कार्य सोपविलेले आहे. माता शिवगंगागौरी ही विश्वातील सर्व वाईट गोष्टींचे व भक्तांच्या शत्रु शक्तींचे स्तंभन करणारी आहे व अत्यंत कृपाळुही आहे आणि म्हणूनच मानवाला मानवी शत्रुंपासून उद्‌भवणार्‍या संकटातून सुटका व्हावी म्हणून माता शिवगंगागौरीचे सहाय्य मिळणे अत्यंत आवश्यक असते.


माता शिवगंगागौरी चण्डिकाभक्तांच्या बाह्यशत्रुंच्या कटकारस्थानांचा जसा बिमोड करते, तशीच ती देवनिंदा, धर्मनिंदा व श्रद्धावाननिंदा करणार्‍यांना सजा देत रहाते व श्रद्धावानाच्या बुध्दीला भ्रमित करू पाहणार्‍या कुविद्यांचाही नाश करते.


माता शिवगंगागौरीचा पुढील उजवा हात हा अभयहस्त आहे व डावा हात हा वरदहस्त आहे आणि हीने ’गदा’ हे शस्त्र व अस्त्र म्हणून धारण केली आहे. माता शिवगंगागौरी सदैव आदिमातेच्या दशम मंगलस्थानी ब्राह्ममुहूर्तावर येऊन आदिमातेच्या ह्या हरिद्रामूर्तीचे पूजन करीत असते व त्याच वेळेस ’श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत -नामावली’ श्रद्धेने जपणार्‍या भक्तांसाठी आदिमाता चण्डिका तिच्या हातातील गदा शिवगंगागौरीस देते व मग ही शिवगंगागौरी ज्यांच्यावर प्रसन्न झाले आहे, त्या भक्तांच्या शत्रूंचा त्या गदेने बीमोड करून परत ती गदा आदिमातेकडे पोहोचविते.


सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना श्रीशिवगंगागौरी गायत्री मंत्र दिला आहे.


ॐ त्र्यम्बकायै च विद्महे । अरिष्टस्तम्भनकारिण्यै च धीमहि । तन्नो शिवगंगागौरी प्रचोदयात्‌ ।।


माता शिवगंगागौरी ही अल्पप्रयासांनीही संतुष्ट होते. श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत नामावली व शिवगंगागौरी गदास्तोत्राचे पठण तांत्रिक कुविद्या व वाईट शक्तिंचे भक्तांवरील प्रभाव कमी करण्याचे कार्य करते आणि ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार अशा विद्यांचा व कुकर्माचा नाशही करते.



Tags