भगवान श्रीकिरातरुद्र

११ डिसेंबर २०११ रोजी रात्री ८.०० वाजता सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी भगवान श्रीकिरातरुद्रांची स्थापना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये केली. त्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्याच संकल्पाने ह्या श्रीकिरातरुद्रांची पुनर्स्थापना श्रीअतुलित बलधाम, रत्नागिरी येथे बुधवार, दि. २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.
परब्रह्माची ‘आपण परमेश्वर आहोत' ही जाणीव अर्थात स्पंदशक्ती (स्वभाव) म्हणजेच आत्मरूपी चित्कला अर्थात परमेश्वरी, आदिमाता. हिलाच वेदांनी ‘गायत्रीमाता' हे नामाभिधान दिलेले आहे.
या आदिमाता चण्डिकेच्या प्रथम स्पन्दातून प्रकटलेला दिव्य शुभ व शुभ्र प्रकाश (मूळ प्रकाश) म्हणजेच आदिमातेचा ज्येष्ठ पुत्र दिगंबर दत्तात्रेय अर्थात् अवधूत आहे. याच स्पन्दातून प्रकटलेला मूळ अग्नि अर्थात महावैश्वानर हा तिचा द्वितीय पुत्र किरातरुद्र आहे आणि याच स्पन्दातून प्रकटलेला मूळ ध्वनि अर्थात ॐकार हा तिचा तृतीय पुत्र परमात्मा (महाविष्णू/परमशिव/प्रजापतिब्रह्मा) आहे.
आदिमाता चण्डिकेचा द्वितीय पुत्र असणारा किरातरुद्र हा शिवाचाच, भोलेनाथाचाच सूक्ष्म स्तरावर असणारा आविष्कार आहे. किरातरुद्राला पशुपतीनाथ म्हणूनही ओळखले जाते. ह्या किरातरुद्राची सहधर्मचारिणी शिवगंगागौरी आहे.
मानवाचे मन - अगदी प्रत्येकाचे - हे अत्यंत घनदाट आणि निबीड असे अरण्यच असते, असंख्य वासनारूपी हिंस्त्र श्वापदांनी भरलेले, अनेक स्पर्धक व शत्रुरूपी इतर मानवांच्या विषारी नागांच्या विषांनी भारलेले, स्वतःच्याच कामक्रोधादि सहा दरोडेखोरांनी (षड्रिपू) थैमान घातलेले.
ह्या जंगलातील झाडे सतत तयार होतात, वाढतात व विस्तारतात - हे वृक्ष म्हणजे त्याची पूर्वजन्मांतील व ह्या जन्मातील कर्मे - चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारची.
या जंगलातील दर्याखोर्या म्हणजेच मनुष्याने आपल्या सर्व जन्मांमध्ये स्वतःच स्वतःसाठी खणून ठेवलेले खड्डे - अर्थात सज्जनांचे केलेले अनहित
ह्या जंगलातील पर्वतशिखरे म्हणजे मनुष्याने त्याच्या क्षणिक मोहांवर मिळवलेले विजय.
.... आणि म्हणूनच हा किरातरुद्र रहातो, तो पर्वताच्या शिखरावरच.
हा आतुर असतो शिकारीसाठी.
मनोरूपी अरण्यातील हिंस्त्र श्वापदांची शिकार हा त्याचा छंदच आहे. विषारी नागांना स्वतंच्या अंगाखांद्यावर खेळवून श्रद्धावानांना अभय देणे, ही त्याची सहजलीला आहे.
पशु व पक्षी खरे असोत, खोटे असोत किंवा कुणाचे मायावी रूप असोत - त्यांच्यावर अधिपत्य असते, ते या पशुपतिनाथ किरातरुद्राचेच.
हा किरातरुद्र एकच - जो विश्वातील अणु-रेणुमध्ये ठासून भरलेल्या व प्रत्येक अणु-रेणुच्या सभोवती असणाऱ्या अवकाशामध्ये आपला निश्चित प्रभाव गाजवणाऱ्या विद्युत्-तत्त्वाचा स्वामी आहे आणि त्याला हे स्वामित्व बहाल करणारी व स्वतःच सदैव सूक्ष्म स्तरावर तेजाचीच आकृती असणारी म्हणजेच महिषासुरमर्दिनी आदिमाता - अर्थात विद्युत्-तत्त्वाचेही मूळ कारण.
किरातरुद्र म्हणूनच सदैव, अगदी प्रत्येक क्षणाला विश्वातील प्रत्येक अणुवर, प्रत्येक पदार्थावर, प्रत्येक जिवावर, प्रत्येक अजीव वस्तूवर व अवकाशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवत असतो.
हा किरातरुद्र आपल्या प्रत्येकाला सदैव यशाची दिशा दाखविणारा. कारण सर्व पातळ्यांवरील ऊर्जाकणांना दिशा व गति देणारा आहे. हा ज्याच्यावर जाळे टाकतो, तो स्वतंत्र होतो व हा स्वतः त्या भक्ताच्या अधीन होतो आणि म्हणूनच हा किरात.
कठोरता आणि कोमलता, उग्रत्व आणि सौम्यत्व, पराक्रम आणि क्षमा, उदारता आणि न्यायनिष्ठुरता, भद्रत्व आणि रुद्रत्व ह्या सर्वांचा महन्मंगल आणि अतीव सुंदर आविष्कार फक्त ह्या एकाच्याच किरातरुद्राच्याच ठायी असतो.
वैदिकांचे प्रमुख अन्न असणारा यव हाच किरातरुद्राचा प्रमुख नैवेद्य असतो.
हाच किरातरुद्र अर्जुनासारख्या श्रेष्ठ व देवयानपंथीय योद्ध्यालाच भेटला. भगवान किरातरुद्रांनी प्रथम अर्जुनाशी युद्धही केले आणि मग अत्यंत उदार अंतःकरणाने त्या महान योद्ध्याला सर्वश्रेष्ठ शस्त्र व अस्त्र भेट म्हणून देऊनही टाकले.
किरातरुद्राला परमशिवाप्रमाणेच तीन नेत्र आहेत. परमशिवाचा तृतीय नेत्र प्रलयाग्नीचा वर्षाव करणारा, तर किरातरुद्राचा तृतीय नेत्र म्हणजे सुधाब्धि - अर्थात अमृताचा अनंत अर्णव म्हणजेच अमृताचा अखंड सागर. ही शिवगंगागौरी राहते व असते, ती किरातरुद्राच्या कपाळावरील तृतीय नेत्रात.
हा किरातरुद्रच परमशिवाकडून जे नको ते भस्मसात करवून घेतो किंवा प्रलयही घडवून आणतो व मग त्याच परमशिवाच्या त्याच्या भक्तांवरील प्रेमाने संतुष्ट होऊन तो प्रलय आटोपता घेतो स्वतःच्या तृतीय नेत्रात रिचवून,
हा किरातरुद्रच परमशिवाच्या तृतीय नेत्रातून निघालेल्या प्रलयाग्निला शांत करतो, ते परमशिवाच्या सहधर्मचारिणी पार्वतीला लास्य करण्यासाठी स्वतःच्या सुधाब्धितील सुधारसाने समर्थ व उद्युक्त करूनच.
लक्षात घ्या, परमशिवाचे तांडव आणि पार्वतीचे लास्य ह्या दोन्हींचा करविताही हा किरातरुद्रच व लास्यातून तांडव शांत करणाराही हा किरातरुद्रच
आणि ह्या दोन्ही कार्यांत अर्थातच स्तंभनाची नितांत आवश्यकता असते व ते कार्य शिवगंगागौरीचे.
आदिमाता चण्डिकेच्या आज्ञेनुसार किरातरुद्र आणि शिवगंगागौरी परमात्म्याने विश्व उत्पन्न केल्यानंतर त्याचा समतोल सांभाळण्याचे कार्य करीत असतात व तेही शिव आणि पार्वतीच्या माध्यमातून.
गंगा व पार्वती परमशिवाच्या पत्नी आहेत व ह्या परमशिवाचा सद्गुरु दत्तात्रेयस्वामी आहे व ह्या परमशिवाचे दत्तात्रेयकवचरूपी प्रभामंडल असणारे अद्वितीय व शिव-दत्त सेतु असणारे स्वरूप म्हणजे किरातरुद्र. तर गंगा व पार्वती दोघी एकत्र एकरूप म्हणजे किरातरुद्राची सहधर्मचारिणी - शिवगंगागौरी.
प्रत्येक मानवाने निष्काम भावनेने केलेली परमात्म्याची भक्ती दत्तगुरुंच्या चरणी पोहोचविणे हे कार्य परमात्म्याचे, आह्लादिनीचे व महाशेषाचे आहे; आणि मानवाच्या त्या भक्तीविषयीची परमात्म्याची प्रसन्नता किंवा मानवाच्या अपवित्र कर्मांविषयीची परमात्म्याची अप्रसन्नता आदिमातेच्या चरणी सोपविणे, हे कार्य किरातरुद्र व शिवगंगागौरीचे आहे.
बाह्य आणि अंत:सृष्टीचे संतुलन उचित बिंदुवर सांभाळणे हे किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांचे महत्त्वाचे कार्य आहे.
हा किरातरुद्र चतुर्हस्त आहे. त्याचा पुढील उजवा हात हा वरदहस्त आहे तर मागील उजव्या हातात त्याने त्रिशूल धारण केले आहे. पुढील डाव्या हातात एक बलशाली व दणकट धनुष्य सतत सज्ज अवस्थेत धरलेले असणार्या या पिनाकपाणिने मागील डाव्या हातात शृंगी धारण केली आहे.
स्वतः सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी किरातरुद्रांचे २०११ च्या त्रिपुरारी पौणिमेस विधीवत पूजन केले व सर्व श्रद्धावान त्रिपुरारी पौणिमेस म्हणजेच अनिरुद्ध पौर्णिमेस ’श्रीकिरातरुद्र पूजना’त त्यांच्या शृंगी, धनुष्य व त्रिशूळ या तीनही आयुधांचे पूजन करतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना श्रीकिरातरुद्र गायत्री मंत्र दिला आहे.
ॐ महावैश्वानराय विद्महे । राघवेन्द्राय धीमहि । तन्नो किरातरुद्रः प्रचोदयात्।।
’श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत नामावली’ व ’किरातरुद्रसूक्त’ यांचे पठण तांत्रिक कुविद्या व वाईट शक्तींचे भक्तांवरील प्रभाव कमी करतात आणि ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार अशा विद्यांचा व कुकर्माचा नाशही करतात.