दर गुरुवारी असंख्य श्रद्धावान आपल्या लाडक्या सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या आगमनाची श्रीहरिगुरुग्राम या पवित्र स्थानी आतुरतेने वाट पाहतात. सर्वात महत्वाचे म्हणजे बापू श्रद्धावानांना फक्त आणि फक्त श्रीहरिगुरुग्राम येथेच भेटतात. येथे भक्तगण आपल्या सद्गुरूंच्या स्वागतासाठी एकत्र येतात आणि त्यांच्या दर्शनाचा, त्यांच्या अमूल्य प्रवचनांचा तसेच त्यांच्या दिव्य सान्निध्यातील असंख्य अनमोल क्षणांचा लाभ घेतात. या जपून ठेवलेल्या आठवणी आणि अनुभव संपूर्ण जीवनभर श्रद्धावानांना सामर्थ्य, आनंद आणि प्रेरणा देत राहतात.

श्री हरिगुरुग्राम हे असे पवित्र स्थान आहे, जिथे सद्गुरु बापूंच्या पवित्र संकल्पानुसार दर गुरुवारी सामूहिक उपासना केली जाते. ही सामूहिक उपासना करण्यासाठी श्रद्धावान येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाने भरून जाते

श्रीहरिगुरुग्राम येथे भक्ती-सेवेसाठी येणारा प्रत्येक श्रद्धावान प्रवेशद्वाराशी असणारी उदी आपल्या कपाळास लावून श्रीहरीगुरुग्राममध्ये प्रवेश करतो. तसेच सद्गुरूंच्या संकल्पानुसार श्रीहरिगुरुग्राम येथील स्वयंसेवकाने आपल्या सेवेचा बॅज घेतल्यावर त्याच्या कपाळास दत्तयंत्राचा स्पर्श केला जातो त्यानंतर तो आपल्या सेवेस प्रारंभ करतो.

श्री हरिगुरुग्राम येथे प्रवचन देताना सद्गुरू अनिरुद्ध बापू

श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी होणारे उपक्रम

1. श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराज आगमन

सर्वप्रथम सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराजाच्या म्हणजेच सत्यप्रवेश, प्रेमप्रवास आणि आनंदसाधना या तीनही खंडांच्या मूळ हस्तलिखितांचे दर गुरुवारी श्रीहरीगुरुग्राम येथे आगमन होते.

ग्रंथराजास प्रवेशद्वारापासून मुख्य व्यासपीठाशेजारील मेघडंबरीपर्यंत पालखीतून दिंडी मिरवणुकीद्वारे ’जय जय अनिरुद्ध हरी’ च्या नामघोषात नेले जाते. यावेळी श्रद्धावान ग्रंथराजावर पुष्पवृष्टी करतात. मुख्य व्यासपीठाशेजारील मेघडंबरीत ग्रंथराज विराजमान होतात. दर्शनाच्या वेळेस ग्रंथराजाजवळ चवर्‍या ढाळण्याची सेवाही श्रद्धावान भक्तीभावाने करतात.

Arrival of the Shreemadpurushartha Grantharaj at Shree Harigurugram
सद्गुरू अनिरुद्धांनी लिहिलेल्या मूळ 'श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराज'चे श्री हरिगुरुग्राम येथे आगमन

2. श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीचे आगमन

सद्गुरु बापूंच्या निवासस्थानी देवघरात पूजेला जाणार्‍या श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीचे आगमन श्रीहरीगुरुग्राम येथे उपासनेच्या आधी होते. शंख आणि घंटानादाच्या निनादात श्रीदत्तात्रेयांची मूर्ती प्रवेशद्वारापासून मुख्य व्यासपीठावर जाईपर्यंत श्रद्धावान मूर्तीवर पुष्पवृष्टी करतात. ही मूर्तीही मुख्य व्यासपीठावरील उपासनेच्या मांडणीत विराजमान होते.

गुरुवारची सामुहिक उपासना सुरू होण्यापूर्वी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या निवासस्थानाहून आलेली श्रीसाईसच्चरित्राची पोथी व रुद्राक्ष माळही मुख्य व्यासपीठावरील उपासना मांडणीत ठेवली जाते.

Arrival of the idol of Shree Dattatreya
श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीचे आगमन

3. मुख्य व्यासपीठावरील उपासना मांडणी

मुख्य व्यासपीठावर डावीकडील मांडणीमध्ये श्री दत्तात्रेयांची मोठी तसबीर मधोमध विराजमान असते आणि तिच्या उजवीकडे अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ व डावीकडे श्रीसाईनाथ यांची लहान तसबीर विराजमान असते. या उपासना मांडणीत आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या अनेक पवित्र वस्तूंचा समावेश असतो. ज्यामध्ये सप्तशृंग गडावरील पवित्र विष्णुपाद पाषाण, रुद्राक्षमाला, शालिग्राम, त्रिशूळ या हेमाडपंतांना श्री साईनाथांकडून प्राप्त झालेले पवित्र वस्तू, दोन नाणी आणि श्रीसाईनाथांची भिक्षेसाठी निघालेल्या स्वरूपात असलेली तसबीर यांचा समावेश आहे. श्रद्धावानांना दर गुरुवारी या सर्वांचे दर्शन घेता येते.

1) पवित्र विष्णुपाद पाषाणाचे महत्त्व

डॉ. सुचितदादा हे एम.बी.बी.एस शिकत असतानाच्या काळात डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (बापू) यांच्या सहवासात आले. बापूंचे असामान्य दिव्यत्व अनुभवताना त्यांच्या मनात जे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यांची उत्तरे त्यांना मंगळवार दि १६ फेब्रुवारी १९९४ रोजीच्या हनुमान पौर्णिमेच्या ब्राह्ममुहूर्तावर मिळाली.

“या ब्राह्ममुहूर्तावर बापूच्या सांगण्याप्रमाणे १०८ वेळा श्रीहनुमानच‌लीसाचे पाठ केल्यानंतर त्यांना श्रीसाईनाथांनी प्रत्यक्ष दिव्य दर्शन देऊन ’आजपासून श्रीअनिरुध्दासोबतच तू कायम रहा’ असे सांगीतले.

यानंतर श्रीसप्तशृंग गडावर सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सुचितदादांना श्रीविष्णुसहस्त्रनामातील 'श्रीनरसिंह’ या नामाचे संकिर्तन करत असताना तेथेच शेजारी असलेल्या पाषाणावर शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या स्वरुपात श्रीमहाविष्णूचे दर्शन झाले. या पाषाणाचे पावित्र्य ओळखून सुचितदादा तो पवित्र पाषाण श्रीसप्तश्रृंग गडावरून मुंबईला घेऊन आले.

बुधवार दि. २५ फेब्रुवारी १९९८ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी या विष्णूपादपाषाणाची विधीपूर्वक स्थापना साईनिवास वांद्रे येथे केली. यावेळी येथे तीन दिवसांची एक विशेष उपासना करण्यात आली. या उपासनेपश्चात विष्णुपादपाषाणावर श्री महाविष्णूची पावले स्वतः सद्गुरु श्रीअनिरुध्दांनी कोरली.

साईनिवास येथील ज्या डेस्कवर हेमाडपंतानी श्रीसाईसत्‌चरिताचे लेखन केले त्यावर हा श्रीविष्णूपादपाषाण स्थापित केला गेलेला आहे. श्रीहरिगुरुग्राम वांद्रे येथे दर गुरुवारी पितृवचनाच्या वेळेस तसेच श्रीसाइनिवास वांद्रे येथे इतर दिवशी आपण या विष्णुपादपाषाणाचे दर्शन घेता येते.

2) दोन नाण्यांचे महत्त्व

१८७८ मध्ये बापूंचे खापरपणजोबा श्री. जगन्नाथराव पाध्ये श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार अक्कलकोट येथे आले. त्यांच्यावर दिव्य कृपावर्षाव केल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी त्यांना शिर्डी येथे त्यांची भेट घेण्यास सांगितले आणि त्यांना दोन चांदीची नाणी आशीर्वादरूपाने दिली.

त्यानंतर जगन्नाथरावांचे पुत्र श्री. गोपीनाथशास्त्री पाध्ये शिर्डीला गेले असता, श्री साईनाथांनी आपल्या झोळीतून दोन चांदीची नाणी काढून ती गोपीनाथशास्त्रींच्या हातात ठेवली आणि पहिल्याच भेटीत प्रेमाने विचारले, “आता तरी खूण पटली का?” ही नाणी देऊन साईनाथांनी श्री गोपीनाथशास्त्री पाध्येंवर कृपा केली.

बापूंचे खापरपणजोबा श्री. जगन्नाथराव पाध्ये यांना श्री स्वामी समर्थांकडून प्राप्त झालेली दोन चांदीची नाणी आणि बापूंचे पणजोबा श्री. विद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये (१८६६–१९३८) श्री साईनाथांकडून प्राप्त झालेले दोन चांदीची नाणी अशा चार पवित्र नाण्यांपैकी श्री स्वामी समर्थांनी दिलेले एक नाणे आणि श्री साईनाथांनी दिलेले एक नाणे दर गुरुवारी वांद्रे येथील श्री हरिगुरुग्रामच्या मुख्य व्यासपीठावर ठेवले जाते.

3) जपमाळ, शालिग्राम आणि त्रिशूळ

साई निवास हे हेमाडपंत, श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर (निवृत्त दंडाधिकारी) यांचे निवासस्थान आहे, जिथे १९२१ ते १९२९ या काळात श्रीसाईसत्‌चरित या पवित्र अपौरुषेय ग्रंथाचे लेखन झाले. १९१८ मध्ये समाधी घेण्यापूर्वी, श्री साईनाथांनी हेमाडपंतांकडे पुढील तीन पवित्र वस्तू सोपवल्या होत्या: एक छोटा त्रिशूळ, एक जपमाळ आणि एक शालिग्राम. २८ मे १९९६ रोजी, सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी खूणेचे शब्द उच्चारले आणि हेमाडपंतांचे नातू श्री. आप्पासाहेब दाभोलकर यांच्याकडून या पवित्र वस्तू मागून घेतल्या.

या तीनही पवित्र वस्तू दर गुरुवारी वांद्रे येथील श्रीहरिगुरुग्राममध्ये श्रद्धावानांच्या दर्शनासाठी ठेवल्या जातात.

उपासना सुरू होण्यापूर्वी, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मधील पवित्र जल असलेला कलश आणून व्यासपीठवर उपासना मांडणीमध्ये ठेवला जातो आणि उपासना पूर्ण झाल्यावर, तो तीर्थ-प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो. सर्व श्रद्धावानांचे प्रतिनिधित्व करणारा एक नियुक्त उपासक या पवित्र मांडणीसमोर बसतो आणि सर्व श्रद्धावानांच्या वतीने उपासना करतो.

आर्थिक अडचणीत बापूंची कृपा कशी लाभली?

4. मुख्य व्यासपीठ

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू या व्यासपीठावरून दर गुरुवारी श्रद्धावानांशी संवाद साधतात. व्यासपीठाच्या उजवीकडे सद्‌गुरुंचे आसन (सोफा) असून त्यामागे बापूंचे रक्षकगुरु श्रीहनुमंत यांची प्रतिमा असते. मुख्य व्यासपीठाच्या मधोमध आदिमाता जगदंबा महिषासुरमर्दिनीची प्रतिमा (‌द्विमितीय मूर्ती) विराजमान असून, तिच्या व उपासना मांडणीच्या मध्ये माता शिवगंगागौरीची तसबीर विराजमान असते.

मुख्य उपासनेस प्रारंभ होण्यापूर्वी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथून आणले गेलेले एक श्रीफळ आदिमाता महिषासुरमर्दिनी समोर आणि एक श्रीफळ माता शिवगंगागौरीसमोर ठेवले जाते व उपासनेच्या वेळी या दोन्ही श्रीफळांवर पूजन-उपचार अर्पण केले जातात.

ही दोन श्रीफळं आणि श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथील आदिमाता महिषासुरमर्दिनीस अर्पण केली गेलेली तीन श्रीफळं अशा एकूण पाच श्रीफळांतील खोबरे प्रसाद काउंटरवरील कुरमुर्‍यांच्या प्रसादात मिसळून हा प्रसाद श्रद्धावानांना दर्शनानंतर तीर्थाबरोबर देण्यात येतो.

5. सामूहिक उपासना

दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे श्रद्धावान पवित्र जप, श्लोक, आणि स्तोत्रांचे पठण करत सामूहिक उपासना करतात. प्रत्येक पवित्र नामोच्चार हृदयात गुंजत राहतो आणि भक्ताचे परमेश्वराशी असलेले नाते अधिक दृढ करत जातो.

6. श्री स्वस्तिक्षेम संवाद

श्री स्वस्तिक्षेम संवाद हा एक आगळा आणि विलक्षण आध्यात्मिक अनुभव आहे. श्री स्वस्तिक्षेम संवादामध्ये प्रत्येक श्रद्धावान डोळे मिटून मोकळेपणाने चण्डिकाकुलातील कुठल्याही देवतेशी संवाद साधतो. सुमारे पाच मिनिटे चालणारा हा पवित्र संवाद आदिमाता, सद्गुरु आणि चंडिकाकु्लातील प्रत्येक सदस्याशी प्रत्यक्ष आणि थेट संपर्क प्रस्थापित करतो, अशी श्रद्धावानांची भावना आहे. श्रीहरिगुरुग्राम येथील संवाद किंवा कोणत्याही अधिकृत उपासना केंद्रावर केला जाणारा संवाद यांची आध्यात्मिक फलश्रुती ही एकसमानच असते.

7. माता शिवगंगागौरी आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी उपासना व पूजन

श्रीशिवगंगागौरी गदास्तोत्रा‌चे पठण करीत शिवगंगागौरीसमोरील श्रीफळावर आर्द्र हरिद्रा (ओली हळद), हरिद्रा, कुंकुम, चन्दन, उदी, हरिद्रा-अक्षता, कुंकुम-अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे आणि पुष्पे अर्पण केली जातात.

त्यानंतर सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या आवाजातील 'जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॥' या श्लोकाची ३६ आवर्तने होत असताना आदिमाता महिषासुरमर्दिनीसमोरील श्रीफळावर हरिद्रा, कुंकुम, चन्दन, उदी, हरिद्रा-अक्षता, कुंकुम-अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे आणि पुष्पे अर्पण करून, आदिमाता महिषासुरमर्दिनीचे पूजन केले जाते.

8. सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपेचे भक्तांना आलेले अनुभव आणि भक्तिरचना

'जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।'

श्रद्धावानांना बापूंची कृपा वारंवार अनुभवण्याचा लाभ मिळतो. जीवनातील अडचणी दूर करणारे किंवा संकटांपासून त्यांचे रक्षण करणारे अनेक आश्चर्यकारक अनुभव त्यांना येतात. असे अनुभव लाभलेले श्रद्धावान ते इतरांबरोबर सांगण्यास स्वाभाविकपणे प्रेरित होतात आणि इतर श्रद्धावान सद्गुरूंच्या कृपेच्या या विस्मयकारक अनुभवांचे आतुरतेने श्रवण करतात. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजामध्ये अशा दैवी अनुभवांच्या कथनांचे ‘संकीर्तन’ असे वर्णन केले आहे, जे नवविधा भक्तीचे दुसरे रूप आहे.

भक्तांना आलेल्या अनुभवांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दर गुरुवारी श्री हरिगुरुग्राम येथे दाखवले जाते. सहश्रद्धावानांनी अनुभवलेल्या सद्गुरुलीलांचे श्रवण केल्याने उपस्थित सर्वांच्या हृदयात भक्ती आणि कृतज्ञता अधिक दृढ होते. प्रत्येक अनुभवकथनानंतर अभंग आणि इतर भक्तिरचना सादर केल्या जातात. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंवरील अमर्याद प्रेम आणि भक्तीने प्रेरित झालेल्या या भावपूर्ण रचना प्रेम, शरणागती आणि कृतज्ञतेच्या भावनांना जागृत करतात आणि प्रत्येक भक्ताला भक्तीभाव चैतन्याच्या आनंदात तल्लीन करतात.

9. सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांचे श्रीहरिगुरुग्राम येथे आगमन

दर गुरुवारी सर्वच भक्तगण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात असतात, तो क्षण म्हणजे सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या आगमनाचा क्षण. ’आला रे हरि आला रे’ या गजरात सद्‌गुरु बापूंचे आगमन होते. श्री हरिगुरुग्राम येथे बापूंचे पहिले दर्शन होताच प्रत्येकाचे हृदय प्रेम, कृतार्थता आणि उत्साहाने भरून जाते आणि संपूर्ण वातावरण आनंदाच्या सागरात रूपांतरित होते. बापूंनी हाताची केलेली साधीशी हालचालही कृपेचा वर्षाव बनते आणि त्यांच्या उपस्थितीने प्रत्येकाचे अंतःकरण प्रफुल्लित होते.

सद्गुरू अनिरुद्ध बापू यांचे श्री हरिशुरूग्राम येथे आगमन

10. आरती

बापूंच्या आगमनानंतर, बापू मुख्य व्यासपीठावर येण्याअगोदर आरती होते. मुख्य व्यासपीठावरील देवता आणि श्रीग्रंथराज यांच्यासमोर आरती करण्याची सुवर्णीसंधी श्रद्धावान स्वयंसेवकांना लाभते. या पवित्र विधीत सहभागी होताना श्रद्धावान भगवंताच्या चरणकमलांवर आपल्या अंतःकरणातील कृतज्ञता अर्पण करतात.

तसेच ज्या श्रद्धावान स्वयंसेवकांचा वाढदिवस त्या आठवड्‌यात असतो, त्यांना मुख्य व्यासपीठासमोर उभे राहून आरती करण्याची संधी मिळते; त्याचप्रमाणे 'अनिरुद्धाज युनिव्हर्सल बैंक ऑफ रामनाम' च्या रामनाम वह्या लिहिण्याची विशिष्ट संख्या पूर्ण करणार्‍या श्रद्धावानांनाही त्याचा लाभ (बेनिफिट) म्हणून मुख्य व्यासपीठासमोर उभे राहून आरती करण्याची संधी मिळते.

सर्वप्रथम 'दुर्गे दुर्घट भारी’ ही आदिमाता जगदंबेची आरती आणि त्यानंतर 'आरती साईबाबा' ही सद्‌गुरु श्रीसाईनाथांची आरती केली जाते.

सद्गुरू अनिरुद्ध बापू श्रद्धावानांसोबत आरती करताना

11. सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंचा श्रद्धावानांशी संवाद - बापूंचे पितृवचन

बापू श्रद्धावानांशी संवाद साधतात तेव्हा ते केवळ एखादे भाषण किंवा प्रवचन नसते. ते एका प्रेमळ पित्याचे मार्गदर्शन, त्यांचे पितृवचन असते. असंख्य श्रद्धावानांना बापूंच्या चैतन्यमय वाणीतून त्यांच्या मनात असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात. पहिल्या मराठीमधील आणि नंतर इंग्रजीतील प्रवचनांद्वारे बापू लौकिक तसेच आध्यात्मिक पैलूंवर मार्गदर्शन करतात आणि जीवनाला स्पष्टता, बळ आणि दिशा देतात. बापूंच्या या प्रवचनांना विशेषतः तरुण पिढीमध्ये मोठे स्थान आहे. त्यांचे प्रत्येक मार्गदर्शक शब्द आत्मसात करण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या आतुरतेने आणि ओढीने एकत्र येतो.

Sadguru Aniruddha Bapu delivering pravachan at Shree Harigurugram
सद्गुरू अनिरुद्ध बापू यांचे श्री हरिगुरुग्राम येथील प्रवचन

१९९५ पासून आजपर्यंत बापूंनी दिलेली प्रवचने पुढील विषयांवर झाली आहेत:

  1. सद्‌गुरु श्रीसाईनाथांची ११ वचने
  2. विष्णुसहस्रनामावलि
  3. संसदेवरील हल्ला, मला पडलेले स्वप्न, Self Health अशी विशेष प्रवचनं
  4. ललितासहस्रनामावलि (हिंदी)
  5. राधासहस्रनामावलि (हिंदी)
  6. महासंकटमोचन महापापनिवारक दिव्यप्रकाश आराधनाज्योति या पुस्तकातील मंत्र व स्तोत्र
  7. श्रीरामरक्षा स्तोत्र
  8. श्रीगुरुक्षेत्रम् मन्त्र
  9. त्रिविक्रमाचे अल्गोरिदम्स (Algorithms)
  10. श्रीशब्दध्यानयोग
  11. श्रीसाईसच्चरित (हिन्दी)
  12. पंचमुखहनुमत्-कवच
  13. श्रीसूक्त
  14. स्वयंभगवान त्रिविक्रम (हरिहर) अनंत-नामावलि
  15. नारदीय भक्तिसूत्रं (इंग्रजी)
  16. विविध भक्तांच्या कथा (मराठी आणि हिंदी)

12. सद्‌गुरु वंदन, प्रदक्षिणा, दर्शन आणि ’झाल’ महत्व

पितृवचन झाल्यावर श्रद्धावान 'ॐ अनिरुद्धाय श्रीसप्तचक्रनिवासिनीपुत्राय दत्तपौत्राय नमः' या मन्त्रोच्चारासह सद्‌गुरूसमोर नतमस्तक होतात आणि मग स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करतात. त्यानंतर सर्वजण मिळून 'जय जगदंब जय दुर्गे' असा त्रिवार जयघोष करतात व 'नाथसंविध्'चे त्रिवार उच्चारण करून पुन्हा सद्‌गुरुंना वन्दन करतात.

यानंतर श्रद्धावानांना भक्तीगंगेतून पुढे सरकत सद्‌गुरुंचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळते. सद्‌गुरुंचे दर्शन घेतानाचा आनंद, सद्‌गुरुप्रती असणारे प्रेम, कृतज्ञता श्रद्धावानांच्या चेह-यावर झळकत असते. ’भरल्या डोळ्यांनी मी घेतो दर्शन वारंवार। बापू रे जासी हृदयापार ॥’ या आद्यपिपांच्या अंतःकरणातून उमटलेल्या शब्दाचे स्मरण यावेळी दर्शनार्थी श्रद्धावानांना साहजिकच होते.

"भरल्या डोळ्यांनी मी घेतो दर्शन वारंवार। बापू रे जासी हृदयापार ॥"

दर्शन म्हणजे तो पवित्र क्षण, जेव्हा प्रत्येक श्रद्धावानाला सद्गुरूंसमोर आपले अंतःकरण मोकळे करण्याची संधी मिळते. एक दृष्टिक्षेप, जोडलेले हात, अश्रूंनी भरलेले डोळे, एक स्मितहास्य किंवा अगदी मौनदेखील सद्गुरु आणि त्यांच्या भक्तामधील प्रेमाची भाषा बनते. दर्शन सभागृह भक्ती, प्रेम, कृतज्ञता आणि आनंदाने ओसंडून वाहणाऱ्या पवित्र स्थानात रूपांतरित होते, जिथे असंख्य हृदये आपापल्या अनोख्या पद्धतीने बापूंशी जोडली जातात.

श्रद्धावान सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे दर्शन घेताना

13. पवित्र झालीचे महत्त्व

दर्शन घेण्याआधी हॉलमधील दोन कमानींवर तसेच दर्शन घेतल्यावर बाहेर ग्राऊंडमधील दोन कमानींवर सद्‍गुरुंच्या संकल्पानुसार ’झाल’ लावली जाते. दि. २१ मे २०१५ रोजीच्या प्रवचनामध्ये बापूंनी झालीचे महत्व स्पष्ट करताना सांगितले:

"झाल ही आदिमातेच्या आशीर्वादाचे मूर्तस्वरूप आहे."

ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला प्रेमाने आपल्या साडीच्या पदराखाली आसरा देते, त्याचप्रमाणे आदिमातेची झाल तिच्या सर्व श्रद्धावान लेकरांना तेच प्रेमळ संरक्षण देते. सद्गुरु बापूंनी पुढे स्पष्ट केले आहे की, श्रद्धावान झालीखालून जात असताना त्यांच्या प्रभामंडलातील (ऑरामधील) अशुद्धता आणि कृतकर्मामधील दोषांचे परिणाम दूर होतातच, शिवाय त्यांच्यात ज्या आध्यात्मिक सामर्थ्याची कमतरता आहे, तेही त्यांना प्राप्त होते. श्रीहरिगुरुग्राम येथे लावाल्या जाणाऱ्या झालींना श्रीश्वासम् उत्सवाच्या वेळी अभिमंत्रित करण्यात आले होते, ही बाब या झालींचे पावित्र्य अधिकच वाढवते. आध्यात्मिक मार्गावरील प्रत्येक गोष्टीप्रमाणेच, या झालीच्या माध्यमातून भक्ताला प्राप्त होणारी कृपाही त्या त्या भक्ताच्या श्रद्धेच्या प्रमाणात असते.

श्रीहरिगुरुग्राम येथील भक्ती-उपक्रमांचे विविध मार्ग

1. सुदीप

सुदीप हा एक पवित्र दीप आहे, जो भक्तांच्या अंतःकरणातील प्रार्थना त्यांच्या सद्गुरूंपर्यंत प्रतीकात्मकरीत्या पोहोचवतो. श्रद्धावान इच्छापूर्ती, बाधानिवारक, पीडानाशक, जन्मदिवस आणि दर्शन (षड्रिपूंना दूर करून उचित ते प्राप्त करण्यासाठी आणि दैवी मार्गावर चालण्यासाठी) सुदीप प्रज्वलित करतात. प्रत्येक ज्योत एक मूक संदेशवाहक बनून भक्तांच्या प्रार्थना आणि अंतःकरणातील भावना चंडिकाकुलापर्यंत पोहोचवते.

काही काळापूर्वीपर्यंत सुदीप केवळ श्रीहरिगुरुग्राम येथेच प्रज्वलित करता येत होते. मात्र, प्रत्येक श्रद्धावानाला श्रीहरिगुरुग्राम येथे येणे नेहमी शक्य नसते हे लक्षात घेऊन सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रद्धावानांना आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा श्रद्धावानांना जिथे इच्छा असेल तिथे सुदीप प्रज्वलित करण्याची कृपापूर्वक अनुमती दिली आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या हितासाठी अध्यात्म सोपे, सुलभ आणि आचरणात सहजतेने आणण्याजोगे करण्याचा बापूंचा निरंतर प्रयत्न या करुणामय संकल्पातून दिसून येतो.

Shraddhavans light Sudeep conveying their prayers to their Sadguru

2. ऊद (धूप)

गुरुवारी आणि उत्सवांच्या वेळी श्रद्धावान अनिरुद्ध अग्निहोत्राच्या पवित्र अग्नीमध्ये ऊद अर्पण करतात. देवयज्ञाचेच एक स्वरूप असलेली ही साधी कृती गृहस्थाश्रमींना सांसारिक क्लेश कमी करण्याची आणि कठीण काळात सद्गुरूंची कृपा आणि आधार मिळवण्याची संधी देते.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या तिसऱ्या खंडातील, आनंदसाधना या ग्रंथातील यज्ञावरील अध्यायात सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी धूप आणि ऊद यांना देवयज्ञात अर्पण करण्याची हवनद्रव्ये म्हणून सांगितले आहे. बापू लिहितात:

देवयज्ञामध्ये परमात्म्याच्या प्रतिमेसमोर प्रत्यक्ष अग्नीमध्ये धूप व ऊद हवन करावयाचे असतात व त्यावेळेस श्रीमदपुरुषार्थप्रणित भगवंताचे नाम, स्तोत्र किंवा मंत्र ह्यांचा उच्चार करावयाचा असतो. 'प्रत्यक्ष अग्नी' म्हणजे धातूच्या छोट्या होमकुंडात किंवा धूपदानात कापूर व निखाऱ्यांच्या सहाय्याने प्रज्वलित केलेला अग्नी. मात्र ह्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'आपण हा धूप किंवा ऊद प्रत्यक्ष परमात्म्याच्या समोर व परमात्म्यासाठी प्रत्यक्ष अग्नीत अर्पण करीत आहोत' ही भावना असावी.

श्रद्धावान अनिरुद्ध अग्निहोत्रात ऊद (धूप) अर्पण करताना

3. सत्संग

भक्तगण सद्‌गुरूंचे दर्शन घेत असताना, सत्संग गटातील श्रद्धावान संत श्रीतुलसीदासजी विरचित 'श्रीहनुमानचलिसा' व आद्यपिपा विरचित श्रीअनिरुद्ध चलिसाचे पठण करतात. तबला, हार्मोनियम (पेटी) आणि टाळ यांच्या तालबद्ध नादासह रंगणारे हे पवित्र नामगजर श्री हरिगुरुग्रामला दैवी स्पंदनांनी भरून टाकतात आणि प्रत्येकाचे अंतःकरण प्रफुल्लित करतात. तेथे उपस्थित श्रद्धावानही उत्साहाने या गायन आणि पठणात सहभागी होतात आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात सत्संगाचा आनंद व आशीर्वाद अनुभवतात.

4. प्रदक्षिणा-सूर प्रार्थना

श्री हरिगुरुग्रामच्या खुल्या मैदानात दर गुरुवारी होणारा हा आणखी एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे. गुरुवार, १० मार्च २०१६ रोजी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी प्रदक्षिणा-सूर-प्रार्थनेचे महत्त्व स्पष्ट केले:

"ही प्रार्थना ऐकताना आपोआपच आपल्या स्वतःच्या सप्तचक्रांची, त्याचबरोबर वसुंधरेच्या (पृथ्वीच्या) सप्तचक्रांची, तसेच त्रिविक्रम आणि आदिमाता जगदंबेचीसुद्धा प्रदक्षिणा घडत असते."

बापूंच्या पितृवचनानंतर लगेच प्रदक्षिणा-सूर-प्रार्थना सुरू होते आणि सद्गुरु दर्शनासोबत ती सुरू राहते. सर्व श्रद्धावानांसाठी खुल्या असलेल्या या भक्तीउपक्रमात श्री एकमुखी दत्तात्रेयांची पवित्र तसबीर आणि श्री त्रिविक्रमलिंग मैदानामधील व्यासपीठावर ठेवले जाते.

श्रद्धावान सामूहिक प्रदक्षिणा-सूर प्रार्थनेत सहभागी होताना

5. सद्गुरु चरणमुद्रा दर्शन आणि त्रिपुरारी त्रिविक्रम माला अर्पण

प्रत्येक गुरुभक्त आपल्या सद्गुरूंच्या चरणमुद्रांचे अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व जाणतो. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजामध्ये त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या दुसऱ्या खंडातील, प्रेमप्रवास या ग्रंथामध्ये आज्ञाचक्राचे विवेचन करताना बापू लिहितात:

"त्रिपुरारि त्रिविक्रम चिन्ह हे विशुद्ध चक्राचे चिन्ह आहे तर त्रिपुरासुर कलि चिन्ह हे पूर्ण अशुद्ध चक्राचे चिन्ह आहे."

सद्‌गुरुंच्या चरणांची भक्ती केल्याने माझे विशुद्ध चक्र अधिकाधिक शुद्ध होऊन माझ्या जीवनातून त्रिपुरासुर कलिचा नाश होतो हा श्रद्धावानांचा दृढ विश्वास आहे.

म्हणूनच सद्‌गुरुंचे चरण प्राप्त व्हावे, परमेश्वरी मार्गावरून यशस्वी प्रवास व्हावा आणि सद्‌गुरुचरणभक्ती वाढत राहून दुष्प्रारब्धामुळे जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखांची निवृत्ती व्हावी अशी ते प्रार्थना करतात व सद्गुरूंच्या चरणमुद्रांवर त्रिपुरारी त्रिविक्रम माला अर्पण करतात आणि त्यांच्यासमोर आदराने नतमस्तक होतात. या पवित्र कृतीमुळे सर्व प्रकारच्या दुःखांपासून आणि प्रतिकूल प्रारब्धाच्या प्रभावातून मुक्त होण्यास मदत होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. नमस्कार केल्यानंतर सद्‌गुरुंच्या संकल्पानुसार प्रत्येकाच्या कपाळावर कार्यकर्ता सेवकांमार्फत श्रीदत्तयंत्राचा स्पर्श केला जातो.

Shraddhavans at the Sadguru Charanmudras
श्रद्धावान सद्गुरूंच्या चरणमुद्रांवर आदराने मस्तक टेकवताना

6. रामनाम वह्या लिहिण्याचे लाभ

भगवंताचा नामजप लिहिण्याचा लाभ सर्वांना मिळावा ह्या तळमळीपोटीच सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी 'रामनाम वहीं' व 'अंजनामाता वहीं' सर्व श्रद्धावानांना उपलब्ध करून दिली. या पुस्तिका पूर्ण करून जमा करणारे श्रद्धावान ठरावीक टप्पे पूर्ण केल्यानंतर अनेक विशेष आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्यास पात्र ठरतात. यांपैकी सर्वोच्च लाभ म्हणजे सद्गुरूंचा चरणस्पर्श होय. १५१ रामनाम वह्या पूर्ण केल्यानंतर हा चरणस्पर्श लाभतो. श्रीहरिगुरुग्राम येथे दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी श्रद्धावानांना हे लाभ (बेनिफिट्स) प्रदान केले जातात.

श्री हरिगुरुग्राम येथे अनुभवली जाणारी कृपा

श्रीहरिगुरुग्रामच्या पवित्र परिसरात सद्गुरूंच्या कृपेमुळे भक्तांना आधार, सामर्थ्य, शांती, चिंतामुक्ती, निर्भयता, समाधान आणि अर्थपूर्ण व परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरोखर आवश्यक असलेले सर्व काही मिळते. दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम हे स्थान श्रद्धावानांना सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या अमर्याद प्रेमात आणि भक्तीत चिंब भिजवते. सद्गुरूंचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर भक्त दिलासा आणि शांती व समाधानाने भरलेल्या अंतःकरणाने परततात.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू प्रवचनानंतर श्रीहरिगुरुग्राममधून निघताना श्रद्धावान त्यांना प्रेमाने निरोप देतात. हा केवळ निरोप नसतो; तो प्रेम, भक्ती, कृतज्ञता आणि विरहाची अत्यंत भावस्पर्शी अभिव्यक्ती असते. हे दृश्य प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून जाते.

आपल्या लाडक्या बापूंना भेटल्याचा आनंद आणि भक्तीने ओथंबलेल्या त्या आठवणी हृदयात साठवून श्रद्धावान आपल्या घरी परततात. तरीही, परतीच्या वाटेवरच त्यांच्या मनात पुढील गुरुवारची आतुरतेने प्रतीक्षा सुरू झालेली असते; कारण आपल्या लाडक्या सद्गुरूंच्या प्रेमळ सान्निध्यात पुन्हा एकदा रमण्याची ही पवित्र संधी त्यांना मनापासून हवीहवीशी वाटत असते.

पत्ता

श्री हरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूल, गव्हर्नमेंट कॉलनी, खेरवाडी, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१

View on Map

उपासनेची वेळ:

(दर गुरुवारी) रात्री ८.०० वाजल्यापासून पुढे

Photo Gallery

Sadguru Shree Aniruddha Bapu delivering discourse on Thursdays at Shreeharigurugram.
Sadguru Shree Aniruddha Bapu delivering discourse on Thursdays at Shreeharigurugram.
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing Pradakshina Sur prarthana on Thursdays at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
Shraddhavans performing aarti with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram