श्रीदत्त स्थान
’दत्तगुरु’ हे बापूंचे ,करविता’ गुरु व अन्नमय कोशाचे स्वामी आहेत. बापूंच्या संकल्पानुसार २००८ साली ’अवधूत चिंतन’ हा अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी उत्सव साजरा केला गेला.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनात आणि कार्यात भगवान श्रीदत्तात्रेयांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे श्रीगोविद्यापीठम् येथे भगवान श्रीदत्तात्रेयांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. श्रीदत्त सभामंडपात भगवान श्रीदत्तात्रेय आणि श्रीहनुमंत यांच्या पवित्र प्रतिमांसह अनेक पूजनीय ऋषी-मुनी व संतांच्या तसबिरी आहेत. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दहा स्तंभ असून प्रत्येक स्तंभावर एका ऋषी अथवा संताची तसबीर आहे. यांतील पहिली तसबीर भक्तिपीठाचे आद्य आचार्य देवर्षि नारद यांची आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘प्रेमप्रवास’ या ग्रंथामधील पूर्वसुरींमध्ये केलेला आहे. या सभामंडपातील त्यांचे नित्य सान्निध्य श्रद्धावानांना भक्तिमार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि त्यांचा भक्तिभाव अधिक दृढ करते.
या सभामंडपाला भिंती नाहीत. चारही बाजूंनी खुला असल्यामुळे हा सभामंडप सभोवतालच्या निसर्गाशी थेट जोडला गेला आहे. अशा निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणात श्रीदत्तात्रेयांची केलेली कुठलीही उपासना, साधना किंवा प्रार्थना आपल्या मनाला उन्नत करते आणि सद्गुरुतत्त्वाशी अनुसंधान साधण्यास साहाय्य करते.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रांतर्फे दर शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या श्रमदान सेवेत सहभागी झाल्यानंतर श्रद्धावान या सभामंडपात एकत्र येऊन सत्संग आणि भक्तिभावपूर्ण आनंदोत्सव साजरा करतात. चार तासांची निःस्वार्थ सेवा पूर्ण केल्यानंतर श्रद्धावानांना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या प्रत्यक्ष हस्तमुद्रा असलेल्या ‘हस्तमुद्रे’चा लाभ घेण्याची संधी मिळते. ही हस्तमुद्रा श्रद्धापूर्वक मस्तकी धारण करून ‘चक्रपाणि अनिरुद्ध...’ असा गजर करत श्रद्धावान गर्भगृहाला तीन प्रदक्षिणा घालतात.

गोशाळा
भारतातील पूजनीय देशी गोवंशांपैकी गीर गोवंशाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गोमातेचे दूध, गोमूत्र, गोमय एवढेच नव्हे, तर तिचे सान्निध्यही पवित्र आणि अत्यंत कल्याणकारी मानले जाते. ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ तृतीय खंड — ‘आनन्दसाधना’मध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रद्धावानांसाठी सांगितलेल्या ‘नऊ समान व अनन्य निष्ठां’मध्ये गंगामाता आणि गोमाता यांच्याविषयीची निष्ठाही अधोरेखित केली आहे.
याच पवित्र भावनेतून १८ नोव्हेंबर २००१ रोजी, सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जन्मदिनाच्या शुभदिनी पहाटे, श्रीगोविद्यापीठम्च्या गोशाळेत १५ गीर गायींचे आगमन झाले. त्यांचे औक्षण करून त्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करण्यात आले. बापूंच्या मार्गदर्शनाखाली या गायींचे प्रेमाने संगोपन आणि संवर्धन करण्यात आले. सुरुवातीच्या या १५ गायींचा गोवंश कालांतराने वाढत गेला आणि आज श्रीगोविद्यापीठम्च्या गोशाळेत १०० हून अधिक देशी गायी आहेत. येथे श्रद्धावानांना गायींना चारा अर्पण करण्याच्या ‘गोग्रास सेवे’द्वारे गोमातेची सेवा करण्याची पवित्र संधी मिळते.
२०२३ साली गुढीपाडव्याच्या शुभदिनी श्रीगोविद्यापीठम्मध्ये पुंगनूर गायींचे आगमन झाले. या वैशिष्ट्यपूर्ण देशी गोवंशाविषयी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दैनिक ‘प्रत्यक्ष’मधील ‘कथामंजिरी’ (क्र. २-४८) या अग्रलेखात लिहिले आहे. बापू लिहितात :
"प्रज्ञा जातीच्या गायी ह्या (पंगानुरु गायी) केवळ गुरुकुलांमध्येच पाळल्या जात असत. ह्या प्रज्ञा गायी नेहमीच्या गायींच्या वासरांच्या आकाराच्या असत व प्रज्ञा गायींची वासरे बकरीच्या पिल्लांसारखी असत. ह्या प्रज्ञा गायी संपूर्ण भारतवर्षामध्ये अत्यंत पवित्र मानल्या जात. गुरुकुले व ऋषिंचे आश्रम ह्याव्यतिरिक्त नागर व ग्रामीण जनांकडेही ह्या प्रज्ञा गायी पाळल्या जात असत. परंतु त्यासाठी, पाळू इच्छिणार्या कुटुंबप्रमुखास गुरुकुलाकडून प्रमाणपत्र मिळवावे लागे व प्रतिज्ञापत्रक द्यावे लागे की ’तो व त्याचे कुटुंबिय त्या लहानशा प्रज्ञा गायींना नाजूकपणे व प्रेमाने वागवेल.’ अनेक वैष्णव व दत्तभक्तांच्या घरी प्रज्ञा गायी पाळल्या जात असत.”
आज श्रीगोविद्यापीठम्मध्ये आठ ते नऊ पुंगनूर गायी असून, त्यांच्याद्वारे भारताच्या पवित्र आणि मौल्यवान देशी गोवंशपरंपरेचे जतन व संवर्धन केले जात आहे.

द्वारकामाई (ध्यान कक्ष – Meditation Hall)
शिर्डीत श्रीसाईनाथ हयात असताना त्यांचे अखंड वास्तव्य द्वारकामाईत होते. याच द्वारकामाईत त्यांनी पवित्र धुनी प्रज्वलित केली, भक्तांना त्यांच्या लीलांद्वारे असंख्य अनुभवांची प्रचिती दिली व दिव्य दर्शन दिले.
कालांतराने शिर्डीला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे द्वारकामाईत निवांतपणे काही काळ बसणे, श्रीसाईनाथांच्या पवित्र तसबिरीचे मनसोक्त दर्शन घेणे किंवा शांतपणे पठण अथवा जप करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन श्रीगोविद्यापीठम्मध्ये म्हणूनच गोविद्यापीठम् येथे द्वारकामाई (ध्यान कक्षाची) स्थापना करण्यात आली आहे.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंच्या संकल्पानुसार स्थापन झालेली ही वास्तू आपल्याला शिर्डीमधील बाबांचे वास्तव्य असलेल्या द्वारकामाईची आठवण करून देते. या वास्तूच्या आतील आणि बाहेरील भिंतींना उदीचा रंग देण्यात आला आहे. श्रद्धावानांसाठी उदी म्हणजे सद्गुरुंच्या चरणांची पवित्र धूळ. त्यामुळे या वास्तूचा कण न् कण त्याच पावित्र्याने भारलेला असल्याची श्रद्धावानांची भावना आहे.
या ध्यानकक्षाच्या आतील छताला विविध होम-हवन आणि यज्ञांमधून संकलित केलेल्या पवित्र काजळीचा लेप देण्यात आला आहे. त्यामुळे या पवित्र वास्तूत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी हे स्थान दैवी संरक्षण देणारे स्थान मानले जाते.
ध्यान आणि साधनेसाठी असलेला हा पवित्र व मंगलमय ध्यानकक्ष २००५ साली कोजागिरी पौर्णिमेच्या शुभदिनी सर्व श्रद्धावानांसाठी खुला करण्यात आला.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या संकल्पानुसार या ध्यानकक्षात श्रद्धावान श्रीसाईनाथांच्या तसबिरीसमोर बसून पठण करू शकतात. या पवित्र वास्तूत उपासना, नामस्मरण, सद्गुरुंचे ध्यान तसेच पवित्र आध्यात्मिक ग्रंथांचे पठण करता येते. या पवित्र स्थानी केलेले पठण अथवा जप विशेष फलदायी ठरतो आणि त्यामुळे भक्तिभाव अधिक दृढ होतो, अशी श्रद्धावानांची श्रद्धा आहे. ब्रह्ममुहूर्तावर या ध्यानकक्षात पठण अथवा जप करताना, तसेच शांतपणे बसून श्रीसाईनाथांच्या पवित्र तसबिरीला प्रेमाने न्याहाळत असतानाही अनेक श्रद्धावानांना गहन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त झाल्या आहेत.
या ध्यानकक्षात भक्तांना उदी प्रदान करणाऱ्या श्रीसाईनाथांची संगमरवरी मूर्तीही आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचा ५०वा वाढदिवस त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी, ७ नोव्हेंबर २००६ रोजी साजरा करण्यात आला. या मंगल प्रसंगी, श्रीसाईनाथांच्या या मूर्तीवर हरिद्रा मिश्रित जलाचा अखंड अभिषेक करण्यात आला. त्यानंतर साईसच्चरित्रकार हेमाडपंत यांचे नातू अप्पासाहेब दाभोलकर यांच्या हस्ते या पवित्र ध्यानकक्षात श्रीसाईनाथांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली

धुनी माता
गोशाळेपासून काही अंतरावर पुढे श्रीधुनीमाता आहे. ८ एप्रिल २००२ रोजी परमपूज्य सुचितदादांनी विधिवत अग्नी प्रज्वलित करून या पवित्र धुनीची स्थापना केली. त्या वेळी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी स्वतः विहित मंत्रांचे पठण केले. या अखंड प्रज्वलित धुनीतून प्राप्त होणारी पवित्र उदी काळजीपूर्वक गोळा करून बारीक चाळली जाते आणि त्यानंतर मुंबईतील श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे पाठवली जाते. तेथील उदीकुंडातून ही उदी श्रद्धावानांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. या पवित्र उदीच्या माध्यमातून लाभलेल्या कृपेचे असंख्य अनुभव श्रद्धावानांनी घेतले आहेत, वाचले आहेत आणि इतरांनाही सांगितले आहेत. ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ तृतीय खंड — ‘आनन्दसाधना’मध्ये श्रद्धावानांसाठी सांगितलेल्या ‘नऊ समान निष्ठां’चे विवेचन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘गोवर्धन उदी’चाही उल्लेख केला आहे.
गोविद्यापिठम येथे होणार्या चार उपचार-विधीमधील काष्ट-गोवर्या हा उपचार श्रीधुनीमातेजवळ केला जातो. तसेच ज्यांना फक्त काष्ट अपर्ण करावयाचे असल्यास ती सोयही येथे केलेली आहे.

गरुडहनुमंत स्तंभ
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या संकल्पानुसार २००५ साली कोजागिरी पौर्णिमेच्या शुभदिनी श्रीदत्त सभामंडपाजवळ ‘गरुड-हनुमान स्तंभा’ची स्थापना करण्यात आली. हा पवित्र स्तंभ ‘पापविमोचक स्तंभ’ या नावानेही ओळखला जातो.
या स्तंभाच्या चौथऱ्याच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या छोट्या देवळीत, आद्यपिपा सुरेशचंद्र दत्तोपाध्ये यांनी सर्वप्रथम ‘पापमोचक विधी’ करताना वापरलेला पवित्र कुंभ ठेवण्यात आला आहे. पापक्षालनाच्या या पवित्र विधीची सुरुवात आद्यपिपांनीच केली.
जीवनाच्या वाटचालीत प्रत्येक व्यक्तीकडून कळत-नकळत चुका घडतात आणि त्यातून पापाचे ओझेही साचत जाते. या ओझ्यातून मुक्त होण्याची अनेकांची मनापासून इच्छा असते; परंतु त्यासाठी नेमके काय करावे, हे त्यांना माहीत नसते. श्रद्धावानांविषयीच्या अपार करुणेतून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी हे पापाचे ओझे कमी करण्यासाठी आणि जीवनातील प्रतिकूल परिस्थितींपासून संरक्षण मिळविण्यासाठी हा साधा-सोपा, पण अत्यंत मोलाचा आध्यात्मिक उपाय श्रद्धावानांना सांगितला आहे.
ह्याबद्दल अधिक समजावून सांगताना बापू म्हणतात,
“क्षालन म्हणजे शुद्धीकरण. पापक्षालन म्हणजे पापांपासून शुद्धीकरण. अर्थात, या जन्मात किंवा पूर्वजन्मांत घडलेल्या पापांचा प्रभाव कमी करण्यासाठी केला जाणारा हा विधी आहे.”
हा विधी २००६ सालच्या गुरुपौर्णिमेपासून सुरू करण्यात आला. या विधीत श्रद्धावान षड्रिपूंचे प्रतीक असलेला, सहा घटांनी बनविलेला हिरव्या रंगाचा कुंभ मस्तकी धारण करून गरुड-हनुमान स्तंभाला किमान ५ प्रदक्षिणा घालतात. इच्छेनुसार जास्तीत जास्त १०८ प्रदक्षिणाही घालता येतात. या प्रदक्षिणा घालताना श्रद्धावान प्रेमाने
“कलियुग में एक ही त्राता अनिरुद्धराम रे, मेरे संग चले बोले मेरा जगजेठी रे”
असा गजर करतात.
गरुड-हनुमान स्तंभाच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर श्रद्धावान पुष्करणी तीर्थाला एक प्रदक्षिणा घालतो. त्यानंतर स्तंभाच्या मागील बाजूस असलेल्या कमळाच्या आकारातील हवनकुंडाजवळ, म्हणजेच ‘पापदाहन अग्निहोत्रा’जवळ जाऊन मस्तकी धारण केलेला कुंभ पवित्र अग्नीत अर्पण करतो. त्यानंतर श्रीद्वारकामाईत श्रीसाईनाथांना प्रार्थना करून या पापमोचक विधीची सांगता होते.
ज्या श्रद्धावानांना श्रीगोविद्यापीठम् येथे प्रत्यक्ष येणे शक्य नसेल, त्यांनाही ‘श्रद्धावान सेवा’च्या माध्यमातून या पापमोचक विधीचा लाभ घेता येतो. त्यासाठी मुंबईत अथवा ऑनलाइन पद्धतीने (https://poojanarchanseva.shreemadpurushartha.com/ या साइटवरूनही) निर्धारित देणगी मूल्य भरून या सेवेत सहभागी होता येते.
पाप विमोचक विधीचा घट १, ५, किंवा ११ या पटीतही घेऊ शकता. १६ वर्षावरील कोणीही हा विधी स्वतः साठी किंवा आप्त-मित्र परिवराच्यावतीने सुद्धा करू शकतात.

पुष्करणी तिर्थ
श्रीदत्त स्थानाच्या समोर पवित्र ‘पुष्करणी तीर्थ’ आहे. श्रीमहाविष्णूंना प्रिय मानल्या जाणाऱ्या मुचकुंद वृक्षाभोवती या तीर्थाची निर्मिती करण्यात आली आहे. पौराणिक मान्यतेनुसार, मुचकुंद आणि कदंब हे ऋषी श्रीकृष्णाच्या पृथ्वीवरील अवतारापूर्वीपासूनच त्यांचे परमभक्त होते. श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतार घेणार असल्याचे समजल्यावर, त्याला आपल्या छायेत प्रेमाने विसावा देता यावा या उत्कट भावनेतून या दोन्ही ऋषींनी यमुनेच्या तीरावर वृक्षरूपात जन्म घेतला. श्रद्धावान मुचकुंद वृक्षाला प्रदक्षिणा घालताना प्रेमाने पुढील गजर करतात :
“श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव राधे।”

ध्यान कुटीर
पुष्करणी तीर्थाच्या मागील बाजूस पाच ध्यानकुटी आहेत. विशिष्ट वास्तुरचनेनुसार उभारण्यात आलेल्या या शांत आणि प्रसन्न ध्यानकुटी ध्यान, चिंतन आणि पठणासाठी अत्यंत अनुकूल वातावरण प्रदान करतात. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्या प्रवचनांमधून ध्यानाचे अनन्यसाधारण महत्त्व वारंवार समजावून सांगितले आहे. बापूंनी शिकविलेल्या पद्धतीने ध्यान करण्याची संधी श्रद्धावानांना या ध्यानकुटींमध्ये मिळते. त्यामुळे ध्यानाचा योग्य प्रकारे सराव करून ही साधना अधिकाधिक सखोल करण्यास आणि पुढे आपल्या घरीही नियमितपणे करण्यास श्रद्धावानांना मदत होते.

चरईक्षेत्र- पवित्र वटवृक्ष
गोशाळेलगतच गायींसाठी चरई क्षेत्र आहे. याच परिसरात सुमारे ७५० वर्षे जुना असल्याचे मानले जाणारा एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याला पारंब्या नाहीत. त्याचे पाच स्वतंत्र खोड एकत्र येऊन हा एकच विशाल आणि भव्य वटवृक्ष बनला आहे.
दररोज संध्याकाळी या वटवृक्षाभोवती असलेल्या पारावर पवित्र दीप प्रज्वलित केला जातो. श्रद्धावानांना या पारावर बसण्याची परवानगी नाही; मात्र चरई क्षेत्रात गायी नसताना श्रद्धावानांना तेथे जाता येते. त्या वेळी पवित्र वटवृक्षासमोर गोशाळेकडे मुख करून ‘गोवर्धन मंत्रा’चे २७, ५४ किंवा १०८ वेळा पठण करता येते.
गोवर्धन मंत्र :-
“|| ॐ आदिगुरु गोपालक भगवान श्री दत्तात्रेय पाहि माम् ||”
अशा या शांत, प्रसन्न आणि पवित्र स्पंदनांनी भारलेल्या श्रीगोविद्यापीठम्चे द्वार सर्वांसाठी खुले आहे. श्रद्धावान जेव्हा येथे सेवा आणि भक्तीसाठी येतात, तेव्हा निसर्गाच्या शांत सान्निध्यात त्यांना मनःशांती, समाधान आणि कृतार्थतेची अनुभूती मिळते. येथील पवित्र स्पंदने आणि भक्तिमय वातावरण त्यांच्या अंतर्मनाला स्पर्श करतात.








