बापूंचे पंचगुरु
श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् हे परब्रह्म परमेश्वर दत्तगुरुंच्या आज्ञेचे क्षेत्र आहे, तसेच सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या म्हणजेच बापूंच्या पंचगुरुंचे क्षेत्र आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमपुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खंड 'प्रेमप्रवास'मध्ये त्यांच्या पंचगुरुंचे वर्णन केले आहे.
- दत्तगुरु (परमेश्वर) - करविता गुरु
- श्रीगायत्रीमाता (आदिमाता) - वात्सल्यगुरु
- श्रीराम - कर्ता गुरु
- श्रीहनुमंत - रक्षक गुरु
- श्रीसाईनाथ - दिग्दर्शक गुरु

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् चे आध्यात्मिक महत्त्व
दत्तगुरु, परमेश्वर म्हणजेच परब्रह्म हे विश्वव्यापक, विश्वातीत, अनिर्वचनीय व सर्वसमर्थ अनादि अनंत अस्तित्व. परमेश्वर दत्तगुरुंच्या ‘एकोऽस्मि बहुस्याम्’ ह्या आद्य स्फुरणातून म्हणजेच इच्छेतून हे विश्व उत्पन्न होते (तो एकमेव परमेश्वर संपूर्ण सृष्टीरूपाने स्वतःला प्रकट करतो). या संकल्पाबरोबर सक्रिय झालेल्या परमेश्वर-स्वरूपास ‘महादुर्गेश्वर’ असे म्हणतात; तर परमेश्वराच्या इच्छेला, स्पंदशक्तिला ‘गायत्रीमाता’ (म्हणजेच आदिमाता चण्डिका, जगदंबा, दुर्गा, अनसूया, श्रीविद्या) असे म्हणतात. या आदिमाता जगदंबेचे अनसूया हे स्थूल स्तरावरील शुभंकरा स्वरूप आहे; तर महिषासुरमर्दिनी हे आदिमाता जगदंबेचे सूक्ष्म स्तरावरील अशुभनाशिनी स्वरूप आहे.
दत्तगुरु, महादुर्गेश्वर, आदिमाता चण्डिकेचे शुभंकरा स्वरूप अनसूया, आदिमाता चण्डिकेचे अशुभनाशिनी स्वरूप महिषासुरमर्दिनी आणि धर्मासनाधिष्ठित श्रीत्रिविक्रमलिंग या सर्वांचे म्हणजेच त्रिनाथ आणि त्रिविक्रम यांचे एकत्रित क्षेत्र म्हणजे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्.
अशा ह्या श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्ची स्थापना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने गोकुळाष्टमीच्या मंगलदिनी दि. ३ सप्टेंबर २००७ रोजी झाली.
दत्तगुरूंची पवित्र तसबीर
श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् च्या गर्भगृहात मध्यभागी दत्तगुरुंची एक दुर्मिळ तसबीर पहायला मिळते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे पणजोबा श्री. गोपीनाथशास्त्री पाध्ये हे स्वतः अक्कलकोटच्या श्रीस्वामीसमर्थांचे परमभक्त होते. तसेच ते विठ्ठलभक्तही होते. त्यांच्या कठोर तपश्चर्येचे व उपासनेचे फलित म्हणून त्यांना दत्तगुरुंचे चित्ररूप मिळाले.
श्री. गोपीनाथशास्त्री पाध्येंच्या पत्नी द्वारकामाई पाध्येंनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांना (बापूंना) त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी दत्तगुरुंचे हे मूळ चित्र दिले. त्या मूळ चित्रावरून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ही तसबीर बनवून घेतली. सोमवार दि. ३ सप्टेंबर २००७ रोजी (गोकुळाष्टमी) श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्ची स्थापना झाल्यापासून सर्व श्रद्धावान या तसबिरीचे दर्शन घेऊ लागले.

माता अनसूया
दत्तगुरुंच्या तसबीरीच्या डाव्या बाजूला अनसूयामातेची तसबीर आहे. आदिमाता चण्डिकेने मातृवात्सल्याचा प्रत्यक्ष वर्षाव ह्या संपूर्ण विश्वावर करण्यासाठीच स्थूल भौतिक स्तरावर आपले अनसूया रूपाने रूप प्रकट केले होते. श्रीअनिरुद्धग्ररुक्षेत्रम् मधील आदिमाता अनसूयेच्या तसबिरीकडे पाहताना त्या मातृवात्सल्याची जाणीव होते.

श्री महिषासूरमर्दिनी
दत्तगुरुंच्या तसबीरीच्या उजव्या बाजूला श्रीमहिषासूरमर्दिनी मातेची प्रतिमा आहे. आदिमातेचे सूक्ष्मस्तरावरील स्वरूप म्हणजेच श्रीदत्तगुरुंची इच्छाशक्ति अर्थात् अशुभनाशिनी महिषासुरमर्दिनी चण्डिका. हे महिषासुरमर्दिनी स्वरूप जन्म घेत नाही, तर दिव्यतेजाच्या कार्यानुसार उचित आकृती घेऊन प्रगट होते व कार्य संपन्न होताच अंतर्धान पावते.’
श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे स्थापन करण्यात आलेले, महिषासुराचा वध करणारे हे महिषासुरमर्दिनी स्वरूप म्हणजे महिषासुरमर्दिनीची तसबीर ही आदिमातेची केवळ प्रतिमा नसून, ती साक्षात् महिषासुरमर्दिनीच आहे असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.
श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे श्री आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची स्थापना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी रविवार ९ ऑगस्ट २००९ या दिवशी श्रावण महिन्यात केली. या स्थापनेच्या वेळी नऊ दिवस आदिमाता महिषासुरमर्दिनीचे ’श्रीवज्रमंडलपीठपूजन’ करण्यात आले.

श्रीमहादुर्गेश्वर लिंग
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार नर्मदोत्पन्न स्वयंभू श्रीमहादुर्गेश्वर लिंग श्रीशैलम् येथील गुरुजींकडून आपल्या येथे आणले गेले. महादुर्गेश्वर म्हणजेच मूळ पवित्र अग्नि.
ह्या श्रीमहादुर्गेश्वर लिंगाचा स्थापना विधी होत असताना ह्या लिंगाचे तेज अत्यंत पवित्र व प्रखर असल्यामुळे, स्थापनेच्या वेळेस आजुबाजूला कुठलाही दीप प्रज्वलीत केला गेला नव्हता, अथवा सूर्यकिरणही या ठिकाणी येऊ नयेत अशी व्यवस्था केली गेली होती. पूजनाच्या ठिकाणी पूर्ण शीतलता राहील याची काळजी घेतली गेली होती.
हा प्रसंग त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी, गुरुजींनी व उपस्थितांनीदेखील अनुभवला.

धर्मासन व श्रीत्रिविक्रम लिंग
दत्तगुरुंच्या तसबीरीसमोर एक शिळा आहे, ज्यास ‘धर्मासन’ असे म्हणतात. ज्याने कधीही धर्माला सोडून आचरण केले नाही, तोच फक्त ह्या धर्मासनावर बसू शकतो. २०१८ साली सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार ह्या धर्मासनावर पंचधातुनिर्मित श्रीत्रिविक्रमलिंगाची स्थापना करण्यात आली. श्रद्धावानांचा असा विश्वास आहे की आपले सद्गुरु या धर्मासनावर निरंतर विराजित आहेत.
त्रिविक्रम या शब्दातील विक्रम याचा अर्थ आहे पाऊल-चरण. हा स्वयंभगवान श्रीत्रिविक्रम श्रद्धावानाच्या जीवनात एकाच वेळी तीन पावले टाकतो. म्हणजेच जेव्हा हा श्रद्धावानाच्या जीवनात प्रवेश करतो तेव्हा तो त्या श्रद्धावानाच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळात एकाच वेळी प्रवेश करतो. त्याच्या या प्रवेशामुळे तो श्रद्धावानाच्या तीनही काळातील चुकांही त्या श्रद्धावानालाच लाभदायक ठरतील अशा प्रकारे दुरुस्ती करतो. जे मानवी पातळीवर कोणत्याही मानवाला शक्य नाही.
कोदंड धनुष्य व अक्षय भाता धारण केलेले श्रीराम, तसेच शंख व चक्र धारण केलेले श्रीकृष्ण ह्या दोघांचेही एकत्र रूप असणारे, पवित्र पीतांबर व अभयमुद्रा धारण केलेल्या या स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या एकमुखी व चतुर्भुज स्वरूपाची तसबीर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणमुद्रांजवळ लावलेली आहे.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणमुद्रा
गुरुगीतेत शिव पार्वतीस सांगतात:
“सर्व तीर्थाश्रयं देवि पादाङ्गुष्ठेच वर्तते”
म्हणजेच, “सर्व तीर्थे सद्गुरुंच्या चरणांगुष्ठात राहतात.”
श्रीरामांच्या चरणांच्या केवळ स्पर्शानेच शिळा झालेल्या अहल्येचा उद्धार झाला. दासगणु महाराजांनी साईनाथांच्या चरणांतून प्रकटलेल्या गंगा-यमुना स्वत: पाहिल्या आणि अनुभवल्याही. असा हा सद्गुरु चरणांचा महिमा अपार आणि अनंत आहे. त्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील.
या सद्गुरु चरणांच्या दर्शनाने आणि त्यांच्यावर मस्तक नमविल्याने श्रद्धावानांना सद्गुरुंच्या असीम कृपेची प्राप्ती होते आणि समस्त तीर्थांमध्ये अवगाहन केल्याचे पुण्यही लाभते. त्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाला सद्गुरु चरणांच्या दर्शनाची ओढ असतेच व त्यावर माथा टेकवावा अशी प्रत्येक श्रद्धावानाची इच्छा असते.
श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे श्रद्धावान परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणमुद्रांचे दर्शन घेऊ शकतात. या चरणमुद्रा म्हणजे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणांचे प्रत्यक्ष ठसे (Impressions) आहेत. ज्याचे दर्शन श्रद्धावानांना निरंतर मिळत रहाणार आहे.

श्रीचण्डिकाकुलाची तसबीर
या चरणमुंद्रांच्या समोर श्रीचण्डिकाकुलाची तसबीर लावण्यात आलेली आहे. या तसबिरीमध्ये पुढील देवता आहेत:
- आदिमाता चण्डिका
- जेष्ठ चण्डिकापुत्र श्रीदत्तात्रेय
- महाप्राण श्रीहनुमंत
- द्बितीय चण्डिकापुत्र श्रीकिरातरुद्र
- माता शिवगंगागौरी
- देविसिंहस्वरूप परमात्मा
अशुभनाशिनी नवरात्र २०११ ते शुभंकरा नवरात्र २०१२ या कालावधीत बापूंनी स्वस्तिक्षेम तपश्चर्या केली होती. त्यावेळी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्च्या प्राकारात श्रीचण्डिकाकुलाच्या तसबिरीसमोर तयार केलेल्या विषम-अष्टास्त्रम् कुण्डामध्ये बापूंनी कुण्डपाय्य यज्ञ केला होता.
अनुचिताचा नाश करणारे 'सर्वांग ब्रह्मास्त्र' आणि जो भारतावर, देवयान पथाच्या पवित्र मूल्यांवर प्रेम करतो त्याच्यासाठी 'सर्वांग करुणाश्रय'. यामुळे प्रत्येक श्रद्धावानाला प्रार्थना करण्याचे बळ प्राप्त होणार होते आणि त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळविण्याचे बळही प्राप्त होणार होते म्हणजेच चण्डिकाकुलाची कृपा स्वीकारण्याची त्याची क्षमता वाढत रहाणार होती. या तपश्चर्येतून फलस्वरूप प्राप्त झालेल्या या दोन्ही गोष्टी बापूंनी 'श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्' येथे अर्पण केल्या.

श्रीमूलार्क गणेश
श्रीचण्डिकाकुलाच्या तसबिरीजवळ बापूंच्या संकल्पानुसार श्रीमूलार्क गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
श्रीमूलार्कगणेश म्हणजे एखाद्या विशिष्ट वृक्षाच्या मूळापासून स्वयंभू प्रगट झालेला गणपति. सृष्टीमध्ये श्वेतमांदार व नीलमांदार असे दोन प्रकारचे वृक्ष आहेत. नीलमांदार वृक्षाची फुले हनुमंताला प्रिय असतात आणि श्वेतमांदार वृक्षाची फुले शंकराला प्रिय असतात. ह्या श्वेतमांदार वृक्षाच्या मुळापासून श्रीमूलार्कगणेश प्रगट होतो. म्हणून याला मांदार गणपति किंवा श्वेतार्क गणपति असेही म्हणतात. या गणपतिच्या शोधासाठी काही जाणकार व्यक्तींना बापूंनी पाठवले होते व त्यांना हे स्थान कसे असेल हे ओळखण्यासाठी काही सूचनाही दिल्या होत्या.
- या श्वेतमांदार वृक्षाच्या बाजूला झुळझुळ वाहते पाणी म्हणजे नदी किंवा ओढा असावा.
- याच्यापासून काही अंतरावर जिवंतमुंग्यांचे वारूळ असावे.
- हा वृक्ष २० ते २५ वर्षे जुना असावा.
- हा वृक्ष नेहमी ताज्या टवटवीत आणि सुगंधी फुलांनी बहरलेला असावा.
असा वृक्ष सापडल्यास त्या वृक्षाचे परीक्षण करून व काही विशिष्ट विधी संपन्न करून मगच पौर्णिमा वा मंगळवार किंवा गुरुवार या दिवशी येणार्या संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रप्रकाशात चंद्रोदयानंतर तीन घटिकांच्या (म्हणजेच ७२ मिनिटांच्या) आत चांदीच्या अस्त्राने हा स्वयंभू मूलार्कगणेश त्या वृक्षापासून वेगळा केला जातो. वर्ष-दीड वर्ष शोध घेतल्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार असा वृक्ष परळी-वैजनाथ येथे सापडला.
बापूंनी ज्या जाणकार व्यक्तींना पाठवले होते त्यांना २१ दिवस आधी ’दिग्बंधन’ व ’आवाहन’ ही उपासना दिली होती.
हा मूलार्कगणेश श्री दत्त निवास येथे आणल्यावर श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये त्याची स्थापना करण्यापूर्वी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी नऊ श्रद्धावानांकडून काही विशिष्ट नियम पाळून घेऊन २१ दिवस २१ वेळा अथर्वशीर्षपठणाची उपासना करून घेतली. या मूलार्कगणेशास तिळाच्या तेलात अष्टगंध मिसळून त्याचे लेपन केले गेले. तसेच स्थापनेआधी तीन दिवस बापूंनी त्या स्वयंभू मूलार्कगणेशाचे स्वतः पूजन केले. त्यावेळेस एक लक्ष दुर्वा अर्पण केल्या गेल्या.
त्याच बरोबर बापूंच्या राहत्या घरातील ब्रह्मणस्पतीच्या मूर्तीला रोज सकाळी आठ ते रात्री नऊवाजेपर्यंत अभिषेक व पूजन केले गेले. हे पूजन दहा गुरुजींनी केले व अकरा गुरुजी स्तोत्रांचे पठण करीत होते.

श्रीमद्पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र (क्षमा यंत्र)
श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज तृतीय खण्ड, आनन्दसाधना मध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी "श्रीमद्पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्रा"चा उल्लेख केला आहे. श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे श्रीमद्पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्राची स्थापना ३ सप्टेंबर २००७ रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी केली.
हे यंत्र श्रीअनिरुद्धांच्या पंचगुरुंचे स्थान आहे. हे पंचगुरु - दत्तगुरु, श्रीगायत्रीमाता, श्रीराम, श्रीहनुमंत व श्रीसाईनाथ. ह्या यंत्राच्या केन्द्रस्थानी भक्तश्रेष्ठ, महाबली, महापराक्रमी व भक्तकृपाळू पंचमुखी हनुमंत आहे. तो अधर्माच्या नाशाकरिता आणि धर्माची वृद्धी करण्यासाठी तत्परतेने उभाच आहे.
कळत नकळत मनुष्यांकडून अनेक चुका, पापे तसेच अपराधही घडतात. अशा सगळ्या गोष्टींची क्षमा मिळण्याबरोबरच, ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्याची संधीही या यंत्रासमोर केलेल्या प्रार्थनेने मिळते. अर्थात ज्याच्याकडे अकारण कारुण्य आहे, फक्त त्याच्याकडेच अगदी प्रत्येकासाठी क्षमा असू शकते आणि हे केवळ सद्गुरुतत्त्वच करू शकते.
घंटा
मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आदिमातेच्या हातातील घंटा या आयुधाबद्दल म्हटले आहे:
“ज्ञानपूर्णा श्रीसरस्वतीने घंटा भगवतीच्या चरणी अर्पण केली. ” (संदर्भ - अध्याय ९)
दीप ज्याप्रमाणे त्यांच्या ज्योतीकडे पतंग – किड्यांना आकर्षुन घेतो व मग त्यांना जाळुन टाकतो, त्याचप्रमाणे महिषासुरमर्दिनीचा घंटानाद अशुभाला मोहून टाकतो, भयाने व्याप्त करतो व भगवतीच्या चरणांशी खेचून आणतो आणि मग ते अशुभ नष्ट होतेच. (संदर्भ - अध्याय १०)
घंटामंत्र
हिनस्ति दैत्यतेजांसि स्वनेनापूर्य या जगत्।
सा घण्टा पातु नो देवि पापेभ्यो नः सुतानिव॥
सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी ३१ डिसेंबर २००९ रोजी वरील मंत्राचा जप करून श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्मध्ये घंटेची स्थापना केली.
दर महिन्याच्या १७ तारखेला श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्मध्ये सकाळी११.३० वाजता घंटा-पूजन केले जाते.
कूर्म
कूर्म म्हणजे कासव. वसुन्धरेला आपल्या पाठीवर धारण करणारा हरिकूर्म म्हणजेच महाविष्णुचा द्वितीय अवतार - "कूर्मावतार". महाविष्णुच्या दोन पत्नी मानल्या जातात. एक "श्रीदेवी" जी सतत त्याच्याबरोबर असते व दुसरी भूदेवी, म्हणजेच आपली पृथ्वी-वसुन्धरा. महाविष्णुने आपल्या पत्नीकर्तव्यपालनासाठी कूर्मरूप धारण केले होते आणि तेव्हा पृथ्वीला आपल्या पाठीवर घेतले होते.
उदीकुंभ
कोठिंबे येथील गोविद्यापीठम् येथे सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंच्या संकल्पानुसार अखंड धुनी जळत असते. त्यामध्ये काष्ठ, शेणी व तूस अर्पण करून तयार होणारी उदी, गुरुकुल (जुईनगर) येथील याग, हवन, मन्नत धूप ह्यापासून तयार होणारी उदी व श्रीहरिगुरुग्राम येथील उत्सवांत होणार्या यज्ञांमधील उदी तसेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंच्या निवासस्थानी होणार्या दोन वार्षिक दत्तयागांमध्ये तयार होणारी उदी अशाप्रकारे ह्या सर्व स्थानांतील उदी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथील उदीकुंभामध्ये एकत्र केली जाते.
तसेच श्रीअनिरुद्धधामाच्या स्थापनेच्या पूर्वरंगाच्या दोन्ही सत्रांमध्ये (२०२५ आणि २०२६ मध्ये) जे याग, हवन केले गेले, त्यात तयार झालेली उदीही त्यानंतर या उदीकुंभातच मिसळली गेली.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या शिकवणीनुसार श्रद्धावान सकाळी स्नान केल्यावर व घरातून कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना आपल्या कपाळाला (आज्ञाचक्रावर) व गळ्याला (विशुद्धचक्रावर) श्रद्धेने उदी लावतात व थोडी उदी प्राशनही करतात. तसेच घरात शिजवलेल्या अन्नामध्ये व कुठलीही नवीन गोष्ट घरात आणल्यावर श्रद्धावान त्याला उदी लावतात. एक संरक्षक कवच म्हणून श्रद्धावान अत्यंत श्रद्धेने ही उदी प्रवासामध्ये तसेच नेहमी स्वत:जवळ ठेवतात.

नारिकेलबलिदानम् शिळा
परंपरागत भारतीय रुढींनुसार पवित्र क्षेत्री श्रीफळ अर्पण करण्याची वा नारळ फोडण्याची प्रथा आहे. याने अशा पवित्र क्षेत्राची यात्रा सफळ-संपूर्ण होते असे मानले जाते. श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथेही नारिकेल बलिदानम् केले जाते. श्रद्धावानांच्या दृष्टीने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथामध्ये १६ व्या अध्यायात चण्ड-मुण्डाच्या वधाची कथा येते. त्यामध्ये काली(माता) श्रीमहासरस्वतीस सांगते:
"माते, तुला त्रास देऊ पाहणारे हे चण्ड-मुण्ड नामक महाप्रचंड ’पशु’ मी तुझ्यासमोर ’बली’ दिले आहेत. ह्या बलींचा तू स्वीकार कर."
मानवाच्या मनातील मोठ्यात मोठी पशुवृत्ती म्हणजे काय? तर ’अहंकार’. श्रीफळ हे मस्तकाचे प्रतीक आहे. आपण दैवतासमोर श्रीफळ अर्पण करतो वा फोडतो म्हणजे आपल्या मस्तकातील पशुववृत्तीचा आणि अहंकाराचा बळी देतो. आपली बुद्धी त्याच्या चरणी वाहतो.
अहंकाराबरोबरच इतरही अनेक दुर्गुण असतात आणि प्रत्येक श्रद्धावानाची इच्छा असते की आपल्यातले हे दुर्गुण कमी व्हावेत. श्रद्धावान श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे नारिकेल बलिदानम् स्थानी श्रीफळ फोडतात. ज्या स्थानी श्रीफळ फोडले जाते, त्याला "नारिकेल बलिदानम् शिळा” असे संबोधले जाते. या श्रीफळाचा अर्धा भाग तिथे अर्पण केला जातो आणि उरलेला अर्धा भाग श्रद्धावान प्रसादरूपाने घरी घेऊन जातात.
पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र उत्सव – श्रीहनुमान चलिसा पठण
श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे असलेल्या पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्राचा (क्षमायंत्र) दरवर्षी साजरा होणारा उत्सव म्हणजे "श्री हनुमान चलिसा पठण". हे पठण ७ दिवस असते. दरवर्षी मे महिन्यातील एखाद्या आठवड्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो.
प्रत्येक दिवशी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० असे १२ तास, १०८ पेक्षा जास्त जपक दोन बॅचेसमध्ये विभागले जाऊन, एकेक तासाच्या अंतराने श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्च्या प्राकारात बसून हनुमानचलिसेची आवर्तनं करतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने स्थापन झालेले हे गुरुक्षेत्रम् म्हणजे संपूर्ण विश्वाला आध्यात्मिक ऊर्जा पुरविणारे स्थान आहे. येथे येणार्या प्रत्येक श्रद्धावानाचे सर्वार्थाने कल्याण करणारे हे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् आहे.
श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् - दिवसभरातील महत्वाचे उपचार
सकाळी ८:३० प्रातःपूजन
जगदंबा महिषासुरमर्दिनीचे प्रातःपूजन संपन्न होते. यामध्ये महिषासुरमर्दिनीसह श्रीदत्तगुरु व आदिमाता अनसूया यांना दूध-साखरेचा नैवेद्य व धूप अर्पण केला जातो.
सकाळी ९:०० ते १०:२० (साधारण ३ घटिका – सुमारे ७२ मिनीटे)श्रीचण्डिका हवन
प्राकारात आदिमाता शुभंकरा स्तवन व आदिमाता अशुभनाशिनी स्तवन ह्यांच्य अखंड पठणाने श्रीचण्डिका हवन केले जाते.
दुपारी १२:३० ते १:४५ माध्याह्न पूजन
सर्व दैवतांचे पूजन, नैवेद्य व आरती केली जाते व औदुंबर वृक्षाचे पूजन केले जाते.
दुपारी २:०० नंतर श्रीमूलार्क गणेश पूजन
श्रीमूलार्क गणेशाए पूजन केले जाते व २१ वेळा श्रीमूलार्क गणेश मंत्र म्हटला जातो.
रात्री ८:३० नैवेद्य व सायंआरती
गोमुख, दत्तगुरु, आदिमाता अनसूया व महिषासूरमर्दिनी यांना नैवेद्य अर्पण केला जातो व आरती केली जाते.
रात्री १०:०० ते सकाळी ६:०० श्रीरामरसायन पठण
श्रद्धावान प्राकारात बसून श्रीरामरसायन गंथाचे पठण करून त्यानंतर स्वेच्छेने इतर उपासना / स्तोत्र पठण / ग्रंथवाचन करतात.
विशेष पूजन
- दर महिन्याच्या शिवरात्रीला श्रीमहादुर्गेश्वर लिंगाचे पूजन केले जाते.
- चैत्र नवरात्र उत्सव (शुभंकरा नवरात्र)
- अश्विन नवरात्र उत्सव (अशुभनाशिनी नवरात्र)
पत्ता
५५१, श्री दत्त निवास, टी.पी.एस. ३, जुना ८ वा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०००५२
Open in Google Maps















