आपल्या जीवनात आपण अनेकदा 'भक्त' आणि 'श्रद्धावान' हे शब्द ऐकतो. पण खऱ्या अर्थाने श्रद्धावान कोण असतो? अगदी साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर भक्ती करतो तो 'भक्त' आणि भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात 'श्रद्धावान'.

भगवान श्रीकृष्णांचे शब्द

'श्रद्धावान' हा शब्द भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये पहिल्यांदा चतुर्थ अध्यायात आणि नंतर ६व्या व १८व्या अध्यायात, म्हणजेच तीन वेळा उच्चारला आहे

— श्रीमद्भगवद्गीता ४/३९

श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥

अर्थ - भगवंताशी एकनिष्ठ असून भक्तीत तत्पर असणारा, भक्तीद्वारे इन्द्रियांना संयमित ठेवणारा श्रद्धावान ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त करून तो तत्काळ भगवत्-प्राप्तिरूपी श्रेष्ठ (परम) शांती मिळवतो.

भक्ताच्या प्रवासातील टप्पे

  1. कनिष्ठ स्तरावरील भक्त:

    जो केवळ भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी भक्ती करतो; जो भौतिक सुख प्राप्त झाल्यावर परमात्म्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याला विसरतो आणि पुन्हा गरज भासल्यावर त्याचे स्मरण करतो, तो कनिष्ठ स्तरावरील भक्त मानला जातो.

  2. भक्त:

    भक्तिमार्गामध्ये भक्त फक्त स्वतःकडे असेल तेवढ्या व असेल तशा श्रद्धेतून सुरुवात करतो. जमेल तशी आपल्या इष्टदैवताची भक्ती करत राहतो आणि मुख्य म्हणजे सदैव भगवंताशी कृतज्ञ राहतो आणि 'हे भगवंता, तूच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहेस' असे भगवंताला वारंवार सांगत भजन, पूजन, अर्चन, पठण, ग्रंथपारायण, मंत्रजप, नामजप करीत राहतो.

    भक्तिमार्गामध्ये, तो भक्त, 'मी अल्प आहे, मी साधासुधा आहे; परंतु माझा भगवंत अनंत आहे आणि अपरंपार सामर्थ्याने युक्त आहे व माझा भगवंत प्रेमाला भुलतो' ही जाणीव मनात अधिकाधिक घट्ट करीत जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरा जातो.

    अशा भक्ताला एकच ध्येय असते - 'मला माझ्या भगवंताचा दास व सखा बनायचे आहे आणि त्याची भरपूर सेवा करायची आहे व त्याला शरण जाऊन रहायचे आहे.'

  3. श्रद्धावान:

    जेव्हा भक्ताच्या मनात दास्य, सख्य व शरणागती ह्या भावनांचा अधूनमधून का होईना, पण उच्चार होऊ लागतो, तेव्हा तेव्हा स्वयंभगवान स्वतः त्या भक्तिमार्गियाला वेगाने पुढे नेतो आणि त्याची अल्प-स्वल्प सेवा दशगुणे करून स्वीकारीत राहतो आणि अत्यंत हळुवार हाताने भक्तिमार्गियाला श्रद्धावान बनवून अर्थात स्वतःचा सखा बनवून भक्तिभाव चैतन्यात आणून सोडतो. भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात श्रद्धावान.

    भक्तिमार्गामध्ये स्वयंभगवान, श्रद्धावानाच्या जीवनात आदिमाता जगदंबेच्या आदेशानुसार कुठेही आणि कधीही हस्तक्षेप करत राहतो.

श्री हरिगुरुग्राम येथे श्रद्धावानांना आशीर्वाद देताना अनिरुद्ध बापू

सच्चा श्रद्धावान

जो श्रद्धावान स्वयंभगवानाची त्याच्याशी सदैव संलग्न असणारी शक्ती अर्थात दैवी प्रकृती अर्थात स्वयंभगवानाची प्रेमशक्ती हीचा आश्रय करतो, स्वयंभगवानाच्या चरणांवर शरणागत होतो, स्वयंभगवानाच्या चेहर्‍यावरील स्मिताने प्रसन्न होतो आणि स्वयंभगवानाच्या नजरेतील प्रेम स्वीकारतो तोच सच्चा श्रद्धावान; तोच स्वयंभगवानाचा निरंतर दास व सखा बनू शकतो.

Shraddhavans chant Mantragajar along with Sadguru Aniruddha Bapu at Shree Harigurugram
श्री हरिगुरुग्राम येथे सद्गुरु अनिरुद्ध बापूंसोबत मंत्रगजर करताना श्रद्धावान