दर गुरुवारी समाजातील विविध स्तरांतील हजारो लोक एकाच उद्देशाने एकत्र येतात — ज्यांना ते प्रेमाने “बापू” म्हणजेच “अनिरुद्ध बापू” म्हणतात, त्यांच्या सान्निध्यात काही काळ घालवण्यासाठी.

काही जण मनातील असे ओझे घेऊन येतात, ज्यांची जाणीव इतर कुणालाही नसते. काही जण वर्षानुवर्षे मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी येतात. तर काही जण केवळ ऐकण्यासाठी येतात. त्यांपैकी अनेक जण हलके झालेले मन, नवचैतन्य आणि आपण आता एकटे नाही, या विश्वासाने व शांत चित्ताने परत जातात.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांचे वेगळेपण केवळ त्यांच्या कार्याच्या व्यापकतेत नाही, तर आध्यात्मिकता, विज्ञान, कौटुंबिक जीवन, सामाजिक जबाबदारी आणि भक्ती यांचा त्यांनी साधलेला विलक्षण समन्वय यात आहे. भगवंताच्या शोधासाठी जगापासून दूर जाण्याचा ते पुरस्कार करत नाहीत. उलट आपल्या कुटुंबात, व्यवसायात आणि जबाबदार्‍यांमध्ये राहूनही आध्यात्मिक जीवन जगता येते, अशी शिकवण ते देतात.

प्रत्येकजण त्यांना “बापू” का म्हणतो?

हजारो लोकांनी त्यांना “बापू” म्हणून हाक मारण्यास सुरुवात करण्याच्या खूप आधी, हे नाव त्यांच्या आजीने त्यांना प्रेमाने दिले होते. वयाच्या आठव्या वर्षी, मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले असताना, त्यांच्या आजीने त्यांना प्रेमाने “बापू” अशी हाक मारली. ते नाव त्यांच्यासोबत कायम राहिले आणि तेव्हापासून प्रत्येकजण त्यांना स्वाभाविकपणे ’बापू’ याच नावाने संबोधू लागला.

भक्तीच्या संस्कारांत रुजलेले बालपण

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणजेच अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५६ रोजी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगल दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी झाला.

अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला, जिथे भक्ती ही केवळ कर्मकांडांपुरती मर्यादित नव्हती, तर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होती. त्यांचे वडील डॉ. धैर्यधर हरेश्वर जोशी हे एक प्रतिष्ठित डॉक्टर होते, जे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्राविण्याबरोबरच रुग्णांप्रती असलेल्या अनुकंपेबाबतसुद्धा तितकेच परिचित होते. त्यांच्या आई श्रीमती अरुंधती जोशी या इंग्रजीच्या विद्वान प्राध्यापिका होत्या. ज्यांच्या विद्वत्तेने आणि शिस्तीने कुटुंबाच्या जडणघडणीला आकार दिला.

तथापि, त्यांचे बहुतांश संगोपन त्यांच्या आजी (आईची आई), श्रीमती शकुंतला नरेंद्र पंडित (पूर्वाश्रमीच्या मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये) यांच्या प्रेमळ देखरेखीखाली झाले. आजीच्या प्रेमाचा आणि गाढ आध्यात्मिक संस्कारांचा बापूंवर खोल ठसा उमटला. बापूंच्या पणजी श्रीमती द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये, ज्यांना प्रेमाने “माई” म्हणून संबोधले जात असे, यांचाही बापूंच्या जडणघडणीवर मोठा आध्यात्मिक प्रभाव होता.

ज्या वातावरणात त्यांचे बालपण गेले, तेथे नित्य आध्यात्मिक वाचन होत असे, परमेश्वराचे निरंतर नामस्मरण केले जात असे, ज्यामुळे भक्ती ही स्वाभाविकपणे दैनंदिन जीवनाशी एकरूप झाली होती. पुढे बापूंच्या स्वतःच्या विचारसरणीला बहरण्यासाठी ही समृद्ध आध्यात्मिक परंपरा पायाभूत ठरली.

एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेले असूनही, त्यांच्या आजीने जाणीवपूर्वक त्यांना एखाद्या उच्चभ्रू शाळेत न घालता परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सामान्य मुलांसोबत वाढावे, अपुऱ्या सोयी-सुविधा, असलेल्या घटकांना जीवनात सामोरे जाव्या लागणार्‍या वास्तवाची त्यांना जाणीव असावी आणि समाजाशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली रहावी, अशी बापूंच्या आजीची इच्छा होती. या निर्णयामुळे त्यांच्या दृष्टिकोनाला एक सखोल आकार मिळाला ज्यामुळे त्यांच्यातील नम्रता आणि साधेपणा अधिक जोपासला गेला, जो आजही त्यांच्या विलक्षण स्वभावाचे वेगळेपण अधोरेखित करतो.

एक अत्यंत हुशार व बहुआयामी असलेला विद्यार्थी अशी ओळख असलेल्या बापूंनी १९७२ मध्ये आपली अकरावी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयातून फर्स्ट-इयर सायन्स आणि इंटरसायन्सचे शिक्षण घेतले. १९७४ मध्ये ते पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर रुग्णालयात प्रवेश घेतला. १९७८ साली त्यांनी एम.बी.बी.एस. (M.B.B.S.) ही पदवी संपादन केली. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही महिने ग्रामीण महाराष्ट्रात सेवा केली, जिथे अपुऱ्या सोयी-सुविधा असलेल्या भागातील रुग्णांवर उपचार करताना त्यांना अत्यंत मोलाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यानंतर १९८२ मध्ये त्यांनी 'संधिवात-शास्त्र' (Rheumatology) या विषयात विशेष प्राविण्य मिळवत मेडिसिनमध्ये एम.डी. (M.D.) पूर्ण केले.

Child Aniruddha Joshi
अनिरुद्ध जोशी

केवळ शरीरावरच नव्हे, तर मनावरही उपचार करणारे डॉक्टर

आपल्या आध्यात्मिक कार्याने असंख्य व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श करण्यापूर्वी, डॉ. अनिरुद्ध जोशी हे एक प्रख्यात संधीवात-तज्ञ म्हणून सर्वत्र आदराने ओळखले जात होते. दादर आणि परळ येथे स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, १९८५ पर्यंत ते नायर रुग्णालयात लेक्चरर म्हणून कार्यरत होते. बापूंची ख्याती केवळ वैद्यकीय प्रावीण्यामुळे नव्हे, तर प्रत्येक रुग्णाशी विलक्षण आपुलकीने वागणे आणि त्यांना व त्यांच्या परिजनांना आधार देणे यासाठीही होती.

उपचारांचा खर्च पेलू न शकणार्‍या असंख्य रुग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाविषयी त्यांना असलेला कळवळा त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाला करुणेची आणि सेवाभावाची जोड देत होता.

एक डॉक्टर म्हणून मानवी दुःख समजून घेण्यात व्यतीत केलेली वर्षे पुढे त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचे एक प्रमुख बलस्थान बनली. त्यांच्या प्रवचनांमधून आजही मानवी मन, नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनात माणसाला भेडसावणार्‍या भावनिक संघर्षांची त्यांना असलेली विलक्षण जाण प्रकर्षाने दिसून येते.

The Physician Who Healed More Than the Body
केवळ शरीरावरच नव्हे, तर मनावरही उपचार करणारे डॉक्टर

आध्यात्मिक कार्याचा प्रारंभ

आध्यात्मिकता त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू पूर्वीपासूनच होती; मात्र सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी आपल्या सार्वजनिक आध्यात्मिक कार्याचा औपचारिक प्रारंभ १९९५ मध्ये केला. त्यानंतरच्या वर्षी मुंबईतील दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात दर गुरुवारी बापूंच्या प्रवचनांची सुरुवात झाली. त्यांच्या शिकवणीतील साधेपणा, स्पष्टता आणि व्यावहारिकता यांमुळे समाजाच्या विविध स्तरातील अधिकाधिक व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागल्या. उपस्थितांची संख्या वाढत गेल्याने प्रवचनांचे ठिकाण डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल येथे आणि त्यानंतर मुंबईतील वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे हलवण्यात आले, जिथे आजही गुरुवारची प्रवचने सुरू आहेत.

पारंपरिक धार्मिक प्रवचनांपेक्षा त्यांची प्रवचनं आधुनिक जीवनातील आव्हानांवर थेट भाष्य करतात. गहन आध्यात्मिक तत्त्वं ते स्पष्ट आणि सहज समजणार्‍या भाषेत समजावून सांगतात. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय हे समजण्याबरोबरच दैनंदिन जीवनातील जबाबदार्‍या पार पाडत असताना ते कसे आचरणात आणावे, हेही श्रोत्यांना समजते. अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील अर्थपूर्ण संबंध स्पष्ट करून सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध सनातन धर्मातील शाश्वत सत्ये ही अंधश्रद्धा नसून तर्कसंगत, विवेकपूर्ण आणि मानवी जीवनाशी अत्यंत सुसंगत असलेली तत्त्वं आहेत, हे दाखवून देतात.

या प्रवचनांदरम्यान मनात नकळतपणे निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे ते प्रश्न कधी विचारलेले नसतानाही जणू मिळून जातात, असा विलक्षण अनुभव अनेक श्रद्धावान सांगतात. तर काही जण प्रवचनातून नव्याने मिळालेला आत्मविश्वास, मानसिक स्पष्टता आणि जीवनातील आव्हानांना अधिक धैर्याने सामोरे जाण्याचे बळ घेऊन परततात.

गेल्या अनेक वर्षांत सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी विष्णुसहस्रनाम, ललितासहस्रनाम, राधासहस्रनाम, श्रीसाईसच्चरित, रामरक्षा, बीजमंत्र, नारदीय भक्तिसूत्र आणि इतर अनेक पवित्र ग्रंथांवर व अनेक विषयांवर विस्तृत प्रवचनं दिली आहेत, ज्यातून त्यांनी हे शाश्वत ज्ञान आजच्या जीवनाशी अत्यंत सुसंगत अशा प्रकारे मांडले आहे.

Sadguru Shree Aniruddha Bapu delivering a pravachan

दैनंदिन जीवनातील अध्यात्म

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन. ज्यामध्ये ते आध्यात्मिक ज्ञान दैनंदिन जीवनात व्यावहारिक मार्गदर्शन कसं करू शकत ते सांगतात.

ते अध्यात्माला आपल्या दैनंदिन जीवनापासून वेगळे करत नाहीत. उलट आई-वडील, पती-पत्नी, व्यावसायिक, नागरिक आणि एक माणूस म्हणून आपली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याचे सामर्थ्य भक्तीने वाढवले पाहिजे, अशी ते शिकवण देतात.

ते वारंवार यावर भर देतात की खर्‍या अध्यात्माची पारख बाह्य देखावे, कर्मकांडे किंवा समाजापासून दूर जाण्याने होत नाही. ते स्पष्ट करतात की, आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुटुंबाचा किंवा सांसारिक जबाबदार्‍यांचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. जगापासून दूर पळून जाण्यात आध्यात्मिक प्रगती नसून, भगवंताने सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीची पूर्तता प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि भक्तीने करत स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आहे असे सद्‌गुरु श्री अनिरुद्ध सांगतात.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे मनाला सामर्थ्यवान बनवणे आणि दृढ, सकारात्मक मनोवृत्ती विकसित करणे यांवर त्यांनी दिलेला भर. बापूंच्या मते, जीवनातील सगळ्यात मोठे विजय प्रथम स्वतःच्या मनात प्राप्त केले जातात. याच कारणासाठी श्रद्धावान बापूंच्या तारक-मंत्राचा जप करतात:

। ॐ मनःसामर्थ्यदाताश्रीअनिरुद्धाय नमः ।

मनाला सामर्थ्य, धैर्य आणि सक्षमता प्रदान करणारे सद्‍गुरु म्हणून श्रद्धावान बापूंना मानतात.

बापूंचे मार्गदर्शन श्रद्धावानांना विवेकाची कास न सोडता श्रद्धा, अंधश्रद्धेचा लवलेशही नसलेली भक्ती, अहंकार विरहीत धैर्य आणि मनातील करुणा कायम ठेवून यश प्राप्त करण्याची निरंतर प्रेरणा देते.

एक कुटुंबवत्सल व्यक्ती आणि आध्यात्मिक मार्गदर्शक

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे स्वतःचे जीवन हे एक जिवंत उदाहरण आहे की खर्‍या अध्यात्माला कौटुंबिक आणि सांसारिक जीवनापासून वेगळे करण्याची गरज नसते. ते आपली पत्नी, मुले आणि नातवंडांसह एक आदर्श कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून जीवन व्यतीत करत आहेत. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, जे त्यांच्या कुटुंबाच्या निःस्वार्थ सेवाव्रताची प्रदीर्घ परंपरा पुढे नेत आहेत.

बापू आपल्या स्वतःच्या जीवनातून हे दाखवून देतात की, आपल्या सांसारिक जबाबदार्‍या न सोडता सर्वोच्च आध्यात्मिक आदर्श कसा साध्य करता येतो. बापू असंख्य श्रद्धावानांना उत्तम पालक, पती-पत्नी, व्यावसायिक आणि नागरिक बनत आध्यात्मिक मार्गावर सातत्याने पुढे जाण्यास प्रेरणा देतात.

विज्ञान आणि अध्यात्म — दोन मार्ग, एकच सत्य

सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या प्रवचन तसेच लिखाणाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंपैकी एक म्हणजे त्यांनी विज्ञान आणि अध्यात्माची घातलेली सुंदर सांगड होय. श्रद्धा आणि विज्ञान हे परस्परविरोधी आहेत, ही धारणा ते ठामपणे नाकारतात.

ते लिहितात:

"विज्ञान व भक्ती एकमेकाला कधीही मारक तर ठरणार नाहीतच, उलट विज्ञानाच्या समृद्धीने भक्तिवैभवात भरच पडेल आणि भक्तिसामर्थ्याने विज्ञानाची संहारक शक्ती दुर्बळ होऊन विधायक आविष्कार अधिकाधिक बलवान होतील."

आपल्या प्रवचनांमधून आणि लेखनातून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी श्रद्धावानांना विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, नॅनोटेक्नोलॉजी आणि जागतिक घडामोडींमधील प्रगतीशी सातत्याने जोडून राहण्याचे आवाहन केले आहे. वेगाने बदलणारे जग समजून घेणे महत्त्वाचे आहे, हे ओळखून त्यांनी या विषयांवर परिसंवाद (सेमीनार्स) ही घेतले आहेत. श्रद्धावानांनी माहितीच्या दृष्टीने अद्ययावत, बौद्धिकदृष्ट्या जागरूक आणि भविष्याचा सामना करण्यास सज्ज राहावे, यासाठी बापूंनी त्यांना प्रोत्साहित केले आहे.

बापूंनी निकोल टेस्ला आणि अल्बर्ट श्वाइत्झर यांसारख्या शास्त्रज्ञांच्या आणि द्रष्ट्या व्यक्तींच्या कार्याची ओळख श्रोत्यांना अनेकदा करून दिली आहे आणि त्याच वेळी सनातन धर्मात रुजलेली शाश्वत आध्यात्मिक तत्त्वेही समजावून सांगितली आहेत.

आधुनिक ज्ञान आणि प्राचीन ज्ञानपरंपरा या मानवजातीच्या कल्याणासाठी एकमेकांना पूरक ठराव्यात, असा त्यांचा दृष्टीकोन आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू डॉ. निकोला टेस्ला यांच्याबद्दल माहिती देताना

लेखक, विचारवंत आणि संपादक

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या विपुल आणि समृद्ध साहित्याच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक ज्ञान श्रद्धावानांना मुक्तहस्ते दिले आहे, जे भक्तिमार्गावर चालणार्‍या असंख्य साधकांना आजही मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहे.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज

बापूंच्या महान ग्रंथसंपदेमधील एक म्हणजे ’श्रीमद्पुरुषार्थ अर्थात्‌ सत्यस्मृती’. हा तीन खंडांचा ग्रंथ आहे — सत्यप्रवेश, प्रेमप्रवास आणि आनंदसाधना. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, ब्रह्मसूत्रे, पुराणे आणि भारतातील महान संतांच्या शिकवणीतील शाश्वत ज्ञानाचा आधार घेत ही ग्रंथत्रयी गहन आध्यात्मिक सत्य आधुनिक साधकाला सहज समजतील व आचरणात आणता येतील अशा साध्या व सोप्या भाषेत मांडते.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हे ग्रंथ म्हणजे काही नवीन तत्त्वज्ञान नाही, तर भारताच्या सनातन आणि शाश्वत आध्यात्मिक ज्ञानाचे नम्र संकलन आहे, असे ज्ञान ज्याने युगानुयुगे साधकांचा मार्ग प्रकाशित केला आहे आणि आजही ते तितकेच मार्गदर्शक ठरत आहे.

२००५ पासून सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू ’दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणूनही कार्यरत आहेत. या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते अध्यात्माव्यतिरिक्त विविध विषयांवर वाचकांशी नियमितपणे संवाद साधतात. त्यांचे अग्रलेख समकालीन जागतिक घडामोडी, इतिहास, पर्यावरणविषयक प्रश्न, अर्थव्यवस्था आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांवर भाष्य करतात, जे आध्यात्मिक आकलनासोबतच विचारपूर्वक विश्लेषणाला नेहमीच प्रोत्साहन देतात.

ShreemadPurushartha Grantharaj authored by Sadguru Shree Aniruddha Bapu

निस्वार्थ सेवेतून व्यक्त होणारी भक्ती

सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंच्या मते, भक्ती ही निस्वार्थ सेवेतून स्वाभाविकपणे व्यक्त होते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संस्थांनी राबवलेल्या, मानवतेला सहाय्यक असलेल्या अनेक उपक्रमांना या विचारधारेतून प्रेरणा मिळाली आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणावरील रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय शिबिरे, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (AADM) द्वारे आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी कार्यक्रम, अन्नपूर्णा प्रसादम, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यासारखे पर्यावरणीय उपक्रम आणि इतर अनेक समाजकल्याण प्रकल्पांचा समावेश आहे.

बलविद्येच्या माध्यमातून त्यांनी प्राचीन भारतीय बलविद्येचे पुनरुज्जीवन केले आहे आणि महिलांना स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन यांचे प्रशिक्षण देण्यासाठी अहिल्या संघाची स्थापना केली आहे.

२००५ मध्ये, बापूंनी 'अनिरुद्धाज युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम'ची स्थापना करून श्रद्धावानांना नित्यनेमाने भगवंताच्या नामस्मरणाची सवय अंगी बाणवण्यासाठी प्रोत्साहित केले. काळानुसार जसजसे डिजिटल तंत्रज्ञान प्रगत झाले, तसतसा हा उपक्रमही काळाच्या ओघात डिजिटल रामनाम वह्यांच्या माध्यमातून विकसित झाला आहे, ज्यामुळे ही आध्यात्मिक उपासना पूर्वीपेक्षा अधिक सोपी झाली आहे.

'अनिरुध्दाज् युनिवर्सल बँक ऑफ रामनाम' जप की जानकारी एवं रामनाम की महिमा

बापूंचे पंचगुरु

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू स्वतःची ओळख मुख्यतः एक भक्त म्हणून करून देतात. त्यांचे स्वतःचे जीवन हे अढळ व दृढ गुरुभक्तीचे आणि आपल्या पंचगुरूंच्या चरणी केलेल्या संपूर्ण शरणागतीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या पंचगुरुंचे वर्णन बापू श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजमध्ये पुढीलप्रमाणे करतात:

  1. श्री दत्तगुरु हे बापूंचे करविता गुरू आहेत.
  2. श्री गायत्रीमाता ही बापूंची वात्सल्यगुरू आहे.
  3. श्रीराम हे बापूंचे कर्ता गुरू आहेत.
  4. महाप्राण हनुमंत हे बापूंचे रक्षक गुरू आहेत.
  5. श्री साईबाबा हे बापूंचे दिग्दर्शक गुरू आहेत.

या पंचगुरूंच्या चरणी असलेले त्यांचे असीम प्रेम, अविचल श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा मूळ पाया आहे. याच अढळ गुरुभक्तीतून त्यांची शिकवण, लेखन आणि निस्वार्थ सेवा सहजपणे प्रवाहित होते, जी श्रद्धावानांना ईश्वर आणि गुरूंप्रती त्यांची भक्ती अधिक दृढ करण्याची प्रेरणा देते.

Sadguru Shree Aniruddha Bapu with his Panchaguru
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू आपल्या पंचगुरूंसोबत

“मी तुमचा मित्र आहे”

सद्गुरु अनिरुद्ध बापू आणि त्यांच्या श्रद्धावानांमधील नात्याचा सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे स्वतःची ओळख करून देताना बापू म्हणतात-

“मी तुमचा मित्र आहे.”

ते पुढे स्पष्ट करतात:

"मी कोणाचाही अवतार नाही. मी आधीही अनिरुध्द‌च होतो आजही अनिरुद्धच आहे आणि उद्याही अनिरुध्द‌च असेन."

ते आपल्या श्रद्धावानांना पुन्हा पुन्हा आश्वस्त करतात:

बापूंचे मार्गदर्शन होण्याची इच्छा असणाऱ्यांशी बापूंच्या असलेल्या नात्याचे मर्मच ह्या शब्दांमधून उलगडते.

Sadguru Aniruddha Bapu blessing Shraddhavans at Shree Harigurugram during his Thursday pravachans
सद्गुरु अनिरुद्ध बापू गुरुवारच्या प्रवचनादरम्यान श्री हरिगुरुग्राम येथे श्रद्धावानांना आशीर्वाद देताना

मर्यादा पुरुषार्थ

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संस्थांची उभारणी अध्यात्म, आधार आणि आपुलकी या तीन स्तंभांवर झाली आहे. या आणि इतर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची दृष्टी केवळ व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि हितासाठी विस्तारलेली आहे.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू स्वतःची ओळख नेहमी एक प्रेमळ मित्र अशी करून देतात. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजमध्ये ते म्हणतात की मानवजातीला मर्यादा पुरुषार्थाचा आदर्श समजावून देणे, ते आचरणात आणण्यास सहाय्य करणे आणि मर्यादा पुरुषार्थाची दृढ स्थाना करणे हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील ओवीमध्ये या संकल्पनेचे सुंदर प्रतिबिंब उमटते:

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥”

ही केवळ त्यांनी अंगीकारलेली ओवी नाही; तर तो त्यांचा प्रत्यक्ष जीवनसंकल्प आहे, ज्यानुसार ते जगतात.

त्यांचे प्रत्येक प्रवचन, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक आध्यात्मिक उपक्रम, प्रत्येक सेवाकार्य आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली प्रत्येक संस्था, दुर्बळांना बळ, दुःखितांना आशेचा किरण, साधकांना ज्ञान आणि मानवजातीला शाश्वत आनंद प्रदान करण्याच्या पवित्र संकल्पाची साक्ष देते.

Photo of Sadguru Shree Aniruddha Bapu from his earlier days
Photo of Sadguru Shree Aniruddha Bapu from his earlier days
Sadguru Shree Aniruddha Bapu with his Panchaguru
Sadguru Shree Aniruddha Bapu with his Panchaguru
Sadguru Aniruddha Bapu delivering a Pravachan
Sadguru Aniruddha Bapu delivering a Pravachan
Himalayachi haak written by Aniruddha Bapu in 3rd std
Himalayachi haak written by Aniruddha Bapu in 3rd std
Aniruddha Bapu with Paradkar teacher
Aniruddha Bapu with Paradkar teacher
Bapu's school Dr. Shirodkar High School in Parel, Mumbai
Bapu's school Dr. Shirodkar High School in Parel, Mumbai
School photo of Bapu
School photo of Bapu
Photo of baby Aniruddha (Sadguru Shree Aniruddha Bapu) when He was 7 months old
Photo of baby Aniruddha (Sadguru Shree Aniruddha Bapu) when He was 7 months old
Bapu riding a bicycle
Bapu riding a bicycle
Sadguru Aniruddha Bapu's photo during his wedding
Sadguru Aniruddha Bapu's photo during his wedding
Sadguru Aniruddha Bapu
Sadguru Aniruddha Bapu
Sadguru Aniruddha Bapu
Sadguru Aniruddha Bapu