










ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १५५व्या सूक्तामध्ये स्वयंभगवान त्रिविक्रमाचे वर्णन करताना म्हटले आहे –
“विशाल विश्वाच्या कल्याणासाठी तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य व्यापणार्या दयाळू, तारक, शत्रुरहित आणि उदार त्रिविक्रमाच्या पराक्रमाचे आम्ही पुन:पुन्हा स्तवन करतो.”
ह्या स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या तीन पावलांचे व तीन पराक्रमांचे (त्रिषु विक्रमणेषु) अत्यंत सुंदर वर्णन त्रिविक्रमविष्णुसूक्तामध्ये येते –
“आता मी विष्णूचे पराक्रम कितीतरी वर्णन केले तरी ते थोडेच. सर्व भुवने त्याने व्यापून टाकिली. इतकेच नाही, तर अत्युच्च देवलोक आहे, तोसुद्धा त्यानेच सावरून धरला आहे. निरनिराळी तीनच पावले टाकून त्याने सर्व व्यापून टाकले आहे.”
वेदांपासून पुराणांपर्यंत, अगदी उपनिषदांमध्येही रचयित्यांनी, कर्त्यांनी व भाष्यकार ब्रह्मर्षिंनी ‘त्रिविक्रमतत्त्व’ अत्यंत सुरेखपणे व सोप्या शब्दांत मांडले आहे. जसे ऋग्वेदातील त्रिविक्रमविष्णुसूक्ते, पुरुषसूक्त, बृहदारण्यक उपनिषद (प्रथम अध्याय, चतुर्थ ब्राह्मण), श्वेताश्वतर उपनिषद, छांदोग्य उपनिषद, मांडूक्य उपनिषद, नारद भक्तिसूत्र, विष्णुपुराण, भागवत महापुराण, नारदपुराण, तसेच ह्यानंतरच्या काळात महाभारत, हरिवंशम्, गीता, वाल्मीकिरामायण, आनंदरामायण, अद्भुतरामायण, अध्यात्मरामायण, रामरक्षा अशा विविध रचनांतूनही ‘त्रिविक्रमतत्त्व’ सुंदरपणे मांडलेले आढळून येते.
स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाबद्दल ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखांच्या मालिकेत सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणतात -
‘मूळ श्रीगुरु’ म्हणजेच भगवान श्रीदत्तात्रेय आणि ‘मूळ सद्गुरु’ म्हणजेच त्रिविक्रम.
ह्या स्वयंभगवान त्रिविक्रमाची तीन पावलांचे मानवांसाठी असणारे महत्त्व सांगताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध तुलसीपत्र ह्या अग्रलेखांच्या मालिकेत म्हणतात -
“हा स्वयंभगवान त्रिविक्रम फक्त तीन पावलांत काहीही उल्लंघू शकणारा आहे. फक्त तीन पावलांत हा श्रद्धावानाच्या हाकेसरशी धावत येणारा आहे अर्थात श्रद्धावानाच्या आसपास फक्त तीन पावलांवर असणारा व सतत तसाच राहणारा आहे. हा त्रिविक्रम फक्त तुमचाच आहे. तुमच्यासाठीच आला आहे. प्रत्येक क्षणाला तुमचा आधार बनण्यासाठी.
प्रत्येक मानवाचा अभ्युदय होत असताना तो प्रपंचात व अध्यात्मात सुखी व आनंदी बनत राहतो, तसेच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींच्या वेळेस सद्गुरुतत्त्व अर्थात भगवान त्रिविक्रम, त्याला आपल्याशी बांधून घेतो व सच्च्या श्रद्धावानाला कुठल्याही संकटापासून मुक्त करतो.
अशा ह्या स्वयंभगवानाच्या पूजनाचे, उपासनेचे महत्त्व वर्णन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणतात -
त्रिविक्रमाची पूजा, उपासना व कुठल्याही प्रकारची भक्ती म्हणजे श्रद्धावानांना कुठल्याही पातळीवरील व कुठल्याही प्रकारचे अभाव, दैन्य व दुर्बलता दूर करण्याचा निश्चित फलदायी मार्ग आहे.
हा त्रिविक्रम स्वत: ‘सगुण’ आहे व अर्थातच नव-अंकुर-ऐश्वर्यांनी खच्चून भरलेला आहे. हा त्रिविक्रम त्याच्या भक्तांना त्यांच्या त्रिविक्रमावरील श्रद्धेच्या व विश्वासाच्या चौपट फल देत राहतो व तरीही त्याच्याकडील नव-अंकुर-ऐश्वर्यांचा साठा सदैव अक्षय्यच राहतो.
त्रिविक्रमाची उपासना अथवा पूजा ही केवळ ‘साकाराची’ किंवा पवित्र आकृतीची उपासना नाही, तर ती पवित्रतम व महादिव्य ‘सगुणाची’ उपासना आहे - गुणांची उपासना आहे - त्या गुणांचा लाभ घेण्यासाठी.
त्रिविक्रमाचे भक्त स्वत:चे जीवन सुखी, तृप्त, समर्थ व मंगलमय तर करतातच, पण त्याचबरोबर ते श्रद्धावान इतरांचेही हितच करतात.
अकारण कारुण्य, क्षमा व भक्तीचा स्वीकार हीच आद्य तीन पावले असणारा हा त्रिविक्रम म्हणजे श्रद्धावानाच्या सुखी व समर्थ जीवनाची मंगलमय आकृती आहे. हा त्रिविक्रम म्हणजे ह्या त्रिमितीतील (थ्री-डायमेन्शनल) जगात केवळ श्रद्धावानांसाठीच असणारा त्रिविध आधार आहे. हा स्थूल, सूक्ष्म व तरल पातळीवरील आधार आहेच तसेच कुठल्याही लांबी, रुंदी व उंचीला गवसणी घालणारा म्हणजेच सगळ्याला व्यापून उरणारा आहे.
आपल्या भारतवर्षात सद्गुरुंच्या पादुका, त्यांचे चरण ह्यांचा महिमा आणि महत्त्व अपरंपार आहे आपल्या सद्गुरुंच्या चरणांचे पूजन करावे ही प्रत्येक सद्गुरुभक्ताची इच्छा असते आणि ‘गुरुपौर्णिमे’सारख्या अत्यंत पवित्र दिवशी तर सद्गुरुचरणांचे दर्शन, पूजन करणे ह्याला भक्तविश्वात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सद्गुरुंचे हे चरण माझ्या जीवनात कार्यकारी व्हावेत हाच या पूजनामागील भाव असतो.











