श्री त्रिपदा गायत्री महोत्सव – सामूहिक उपासना
अशा या गायत्रीमातेच्या उपासनेसाठी ’श्री त्रिपदा गायत्री महोत्सव’ सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे २००४ ते १७ मे २००४ या कालावधीत मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेत अखंडपणे गायत्री मंत्रजप करण्यात आला आणि तीन दिवसांत एकूण ३७,१२,४७० वेळा मंत्रोच्चार झाले. लाखो श्रद्धावानांनी या गायत्री पुरश्चरण यागामध्ये भक्तीभावाने सहभाग घेतला.
मुख्य व्यासपीठावर गायत्रीमातेच्या पंचमुखी स्वरूपाच्या तसबिरीची स्थापना सद्गुरु बापूंनी केली होती व महोत्सवाच्या तिनही दिवसांत बापूंनी गायत्रीमातेची आरतीही केली.

त्रिपदा गायत्री मंत्र
महोत्सवात प्रत्येक जपकाला गायत्रीमातेच्या मूर्तीचे पूजन करण्याचा लाभ मिळाला. श्री गायत्री पुरश्चरण यागादरम्यान तीनही दिवस ‘त्रिपदा गायत्री मंत्रा’चा जप करण्यात आला.
त्रिपदा गायत्री मंत्र :
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं |
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥प्रणवोत्पन्न पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग ह्यांच्याही पलीकडे असणार्या ह्या सवितृदेवाच्या श्रेष्ठ पापदाहक तेजाचे आम्ही ध्यान करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरित करो.
गायत्रीमातेची स्थूल कृपा मानवाच्या अभ्यास, परिश्रम आणि चिकाटी ह्या गुणांमुळेच होत असली, तरीही त्या त्या क्षेत्रातील 'ध्रुवस्थिती' अर्थात अढळपद देणारी गायत्रीमातेची सूक्ष्म कृपा मानवाच्या वरील गुणांबरोबरच श्रद्धा असल्यासच प्राप्त होते व ही श्रद्धा त्या मनुष्यास जसजशी पवित्र करत जाते, तसतशी गायत्रीमातेची तरल कृपा त्या मनुष्यास दैवी गुणांनी सहाय्य करते.

गायत्री मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी तीन साधना
गायत्रीमातेची कृपा पुढील तीन साधनांनी मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो:
- १) श्रीगायत्रीमंत्राचे ब्राह्ममुहूर्तास १०८ वेळा अखंड पठण
- २) श्रीगायत्रीमंत्राचे त्रिकाल स्नानोत्तर प्रत्येकी २४ वेळा पठण
- ३) श्रीगायत्रीमातेच्या पुत्राची निश्चल भक्ती.
त्रिपदा गायत्री मंत्र प्रेमाने व पवित्र हेतूने शुचिर्भूत होऊन नित्य जपणे, हीच गायत्रीस्वरूपाची सर्वश्रेष्ठ उपासना आहे. गायत्री मंत्राच्या जपामुळे अगदी सामान्य मनुष्याची सामान्य बुद्धीही उत्तरोत्तर प्रगत होत जाते व तोच कल्याणाचा मार्ग आहे."

सद्गुरूंचा पवित्र मंत्र
उत्सवात दुसर्या बाजूला सद्गुरु गायत्री मंत्राचे पठण सुरू होते. हा सद्गुरु गायत्री मंत्र पुढीलप्रमाणे आहे:
ॐ मनः प्राणः प्रज्ञा ।
ॐ तत्गुरुदत्तस्य सौम्यं स्निग्धं गुरुर्तेजो धीमहि ।
रामे चित्तलयः भवन्तु नः ओजः अनिरुद्धरामः प्रचोदयात् ॐ ॥
श्रद्धावान त्रिपदा गायत्री मंत्र पठणानंतर येथे येऊन आपल्या सद्गुरुंच्या गायत्री मंत्राचेही अत्यंत भक्तीभावाने पठण करत होते.













