स्वत: जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत:
मासानां मार्गशीर्षोऽहम्
अर्थात् सर्व मासांमध्ये (महिन्यांमध्ये) 'मी मार्गशीर्ष महिना आहे' असे म्हटले आहे.
ज्या गीतेमध्ये भगवंताने हे म्हटले आहे, ती गीता भगवंताने अर्जुनास मार्गशीर्ष शुक्ल एकादशीस सांगितली अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष शुक्ल पंचमीस राम-जानकीचा विवाह झाला अशी मान्यता असल्यामुळे हा दिवस 'विवाहपंचमी', तसेच 'रामविवाहोत्सव' म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष मासाच्या पौर्णिमेस अत्रि-अनसूयेचा पुत्र म्हणून स्वत: श्रीगुरु दत्तात्रेय अवतरित झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेस माता अन्नपूर्णेचे अवतरण झाल्याचेही मानले जाते. हा मार्गशीर्ष मास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
चंचल मनाच्या कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि निर्णयशक्ती ह्या तीनही शक्ती उचितपणे कार्य करू शकत नाहीत. चंचल मनाच्या कल्पना वास्तवाला सोडून असतात, निरीक्षणही वास्तवाला धरून नसते आणि चंचल मन नीटपणे निर्णयही घेऊ शकत नाही. चुकीच्या कल्पना, चुकीचे निरीक्षण आणि अनुचित निर्णय यांमुळे आमचे जीवन क्लेशमय बनते, आम्ही आनंदाला पारखे होतो.
सच्चिदानंदोत्सवात श्रद्धावान अनिरुद्ध-अथर्वस्तोत्र आणि अनिरुद्ध अष्टोत्तरशत-नामावलि यांसह सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करून उचितत्व साध्य करतात.
त्रिताप म्हणजेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक ताप मानवाचे जीवन तापदायक करतात म्हणजेच त्याच्या जीवनातून आनंद हिरावून घेतात. सच्चिदानन्द सद्गुरुतत्त्वास जो शरण जातो, त्या श्रद्धावानास ह्या त्रिविध तापांमधून मुक्त करून सद्गुरुतत्त्व त्याचे जीवन आनंदाने भरून टाकते.
देवयान मार्गावरील आमचा प्रवास आनंदमय व्हावा आणि ह्या मार्गावरील सर्वोच्च ध्येय प्राप्त व्हावे अर्थात् सच्चिदानन्द सद्गुरुचे सामीप्य लाभावे ह्याच उद्देशाने श्रद्धावान दर वर्षी सच्चिदानन्दोत्सव भक्तिभावाने, मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
सच्चिदानन्द सद्गुरुंच्या चरणी श्रद्धावान प्रार्थना करतात:
प्रेमस्वरूपा तव शरणम् । पुरुषार्थरूपा तव शरणम् ।
शरणागतत्रितापहरा । सच्चिदानन्दा तव शरणम् ॥हे प्रेमस्वरूप, पुरुषार्थस्वरूप सद्गुरुराया, शरणागताचे त्रिताप हरण करणार्या सद्गुरुराया, हे सच्चिदानन्दा, तुला आम्ही शरण आहोत
