श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सवातील पुरी आणि धाम
श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सवात श्रीजगन्नाथ क्षेत्र यांसह श्रीसंतपुरी, यज्ञपुरी व मोक्षपुरी अशा तीन पुरी आणि श्रीपतितपावन धाम, श्रीहयग्रीव धाम, श्रीसावित्री धाम, पितृधाम आणि अनिरुद्धधाम असे पाच धाम बनविण्यात आले होते. आता आपण या प्रत्येक धामाची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
श्रीसंतपुरी
’श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा राधे...’या नामसंकिर्तनात पूर्णपणे तल्लीन होण्याचा अनुभव केवळ श्री संतपुरीमध्येच घेता आला. श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा अखंड जप सुरू असल्यामुळे संतपुरीचे रूप जणू सर्व संतांचे निवासस्थानच झाले होते. भक्तिभावाने ओथंबलेल्या ह्या वातावरणात प्रत्येक श्रद्धावानाला **श्री गौरांगचैतन्य महाप्रभूंची साक्षात् चैतन्यमय उपस्थिती* जाणवत होती.
यज्ञपुरी
अग्नी, दीप, आरती, धुनी आणि पवित्र ज्योती हे यज्ञपुरुषाचे पाच मूलभूत घटक मानले जातात. यज्ञ आचारसंहितेनुसार यज्ञपुरीमध्ये पाच प्रकारचे यज्ञ पार पडत होते. श्रीदत्तगुरु, श्रीजगन्नाथ, श्रीराम, श्रीपरब्रह्म आणि श्रीचतुर्व्यूह ह्यांच्या मंत्रांचे पठण तेथे सतत चालू होते.
मोक्षपुरी
मोक्षप्राप्तीची संकल्पना भारतीय मनाला सदैव विशेष आकर्षित करत आली आहे. मोक्षपुरीमध्ये जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. त्यांना भगवान विष्णूंचा अवतार म्हणूनही मानले जाते. येथे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी एक कोटी नवकार मंत्रजपाचा संकल्प केला होता. मात्र, श्रद्धावानांच्या भक्ती आणि उत्साहामुळे करण्यात आलेल्या मंत्रजपाची एकूण संख्या या पवित्र संकल्पापेक्षाही अधिक झाली. नवकार मंत्र हा अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र मंत्रांपैकी एक मानला जातो आणि त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे अत्यंत पूजनीय मानला जातो.
श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सवादरम्यान मोक्षपुरी येथील भगवान ऋषभनाथांची मूर्ती

‘श्रीहयग्रीव’ धाम
‘हयग्रीव’ म्हणजे अश्वाचे मुख असलेला महाविष्णूचा अवतार. शक्तीचे प्रतीक असलेल्या हयग्रीवाबरोबर नेहमीच ‘बला’ व ‘अतिबला’ ह्या देवता असतात. जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी ह्या धामामध्ये फक्त पुरुषभक्तांनाच प्रवेश होता. यातून पुरुषभक्तांना स्व-कर्तव्याची, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी हा त्यामागचा उद्देशही होता. चाव्यमुनी, पराशर ऋषी, अगस्त्य ऋषी व अर्जुन हे हयग्रीव ह्या महाविष्णूच्या अवताराचे कडवे भक्त होते.
श्री हयग्रीव धामातील महाविष्णूंचा अश्वमुखी अवतार श्री हयग्रीव

‘श्रीसावित्री’ धाम
आदिमाता सावित्री ही स्त्रियांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. सत्यवान राजाची पत्नी सावित्री ही सुलक्षणा सावित्री ही भक्ती आणि निष्ठेचे प्रतिक मानले जाते. ‘आदिमाता सावित्री’ आणि ‘सुलक्षणा सावित्री’ ह्या दोन्ही मूर्ती सावित्रीधामामध्ये प्रतिष्ठित होत्या. माता व पत्नी ह्या दोन्ही रुपांच्या जबाबदार्या स्त्रीला सशक्तपणे पार पाडता येण्यासाठी भक्ती, शक्ती आणि निष्ठा तिच्याठायी रूजाव्यात हा सावित्रीधाम उभारण्यामागील उद्देश्य होता. ज्या सावित्रीने मृत्युच्या जबड्यातून पतीचे प्राण खेचून आणले तिचे पूजन रोज ह्या धामामध्ये केले जात होते. इथे कुमारिका, विवाहित, अविवाहित, ज्यांचे पती निधन पावले आहेत अशा व वृद्ध अशा सर्व स्त्रियांना ह्या धामामध्ये प्रवेश होता.
पितृधाम
पूर्वजांसाठी काही क्रियाकर्मे करण्याची, कर्तव्य पालनाची प्रत्येकाचीच इच्छा असते. श्रीशंकराचे ‘परमहंस बाणलिंग’ रुप जे मृत्युनंतर आत्म्याला शांति देते, त्या रुपाच्या प्रतिकात्मक मूर्तीला बिल्वपत्र अर्पण करण्याची संधी प्रत्येक श्रद्धावानाला ह्या धामामध्ये मिळत होती. तेथे सतत मंत्रपठण चालू होते.
अनिरुद्धधाम
नववे धाम हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या श्रद्धावानांनी त्यांच्या सद्गुरुप्रती असलेल्या प्रेमापोटी उभारले होते. इथे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार चालणार्या ज्या भक्तीसेवा ’श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ तर्फे दिल्या जातात त्याबद्दलची सर्व माहिती व सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या विविध कार्यांबद्दलची माहिती श्रद्धावानांना दिली जात होती.
‘श्रीपतितपावन’ धाम
ह्या धामामध्ये एका भव्य जलकुंडात सात पवित्र नद्यांमधील जल साठविले होते. आतील बाजूला वड, पिंपळ व औदुंबर ह्या तीन वृक्षांच्या फांद्यांचे रोपण केले होते. गंगोत्री व जमनोत्री येथील पवित्र मृत्तिका व गंगा-यमुना नद्यांचे पाणी यांचा वापर करून बनविलेली श्रीदत्तदिगंबरांची मूर्ती ह्या जलकुंडात प्रतिष्ठित होती. या जलकुंडाभोवती सर्व श्रद्धावान प्रदक्षिणा घालत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या सूचनेनुसार ह्या पवित्र धामाचे स्थान व रचना अतिशय सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यात आली होती आणि तेथील वातावरण अतिशय पवित्र व मनाला स्फूर्ती देणारे होते.
शुद्ध भक्तीचा महोत्सव : श्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव
या उत्सवात रोज श्रीजगन्नाथाला महाभोग चढविण्यात येत होता व तो प्रसाद वृद्धाश्रम, अनाथालय येथे वाटण्यात येत होता. या उत्सवातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दर्शन विनामूल्य होते. देणगीसाठी दानपेट्या किंवा तत्सम काहीही नव्हते. फुले, मिठाई वगैरे काहीही स्वीकारले जात नव्हते. श्रीजगन्नाथाला फक्त नारळ व तुलसीपत्र अर्पण करण्यास परवानगी होती.











