सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू हे मूलतः श्रीअवधूत दत्तात्रेयांचे निस्सीम आणि निष्ठावान भक्त आहेत. श्रीअवधूत दत्तात्रेयांवरील त्यांची गाढ आणि अढळ भक्ती त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान राखून आहे. बापूंची उपासना, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी आपल्या श्रद्धावानांसाठी प्रेमाने आखून दिलेला भक्तिमार्ग या सर्वांत त्यांची दत्तभक्ती सातत्याने प्रकट होताना दिसते.

बापूंसाठी श्रीअवधूत दत्तात्रेय हे केवळ उपासनेचे दैवत नाहीत. बापू अत्यंत आदराने श्रीअवधूत दत्तात्रेयांचा उल्लेख कलियुगाचा नियंता म्हणून करतात. बापूंनी आरंभ केलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक कार्यामागे श्रीदत्तगुरु परमेश्वरांचा कृपाशीर्वाद सूक्ष्म रूपाने सदैव कार्यरत असतो. त्यामुळेच बापूंच्या नित्य, नैमित्तिक आणि विशेष उपासनेत श्रीअवधूत दत्तात्रेयांच्या उपासनेला अविभाज्य स्थान आहे.

श्रीदत्तगुरुंविषयीचा बापूंचा हा परम आदरभाव केवळ त्यांच्या व्यक्तिगत उपासनेपुरता मर्यादित राहत नाही; तर त्यांनी प्रत्येक श्रद्धावानाला सांगितलेल्या भक्ती आणि उपासनेच्या मार्गातही तो ठायी ठायी प्रकट होतो. याचे सुंदर दर्शन गुरुवारच्या उपासनेत घडते. या उपासनेच्या मांडणीत श्रीअवधूत दत्तात्रेयांची पवित्र मूर्ती आणि प्रतिमा यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. दर गुरुवारी हजारो श्रद्धावान एकत्र येऊन श्रीदत्तगुरुंची उपासना करतात आणि पवित्र ‘श्रीदत्तस्तवस्तोत्राचे' पठण करून त्यांची कृपा, संरक्षण आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करतात. अशा प्रकारे बापूंच्या जीवनात खोलवर रुजलेली दत्तभक्ती, त्यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक श्रद्धावानाच्या भक्ती आणि उपासनेच्या प्रवासाचाही अविभाज्य भाग बनते.

श्रद्धावानांची दत्तभक्ती अधिक दृढ व्हावी, यासाठी बापूंनी विविध पवित्र उपासनांबाबत मार्गदर्शनही केले आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात बापूंच्या मार्गदर्शनानुसार जगभरातील श्रद्धावान ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्रा’चे दररोज १०८ वेळा सामूहिक पठण करतात आणि श्रीगुरुदत्तांच्या असीम कृपेने आपल्या जीवनातील संकटे व अडचणी दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे प्रत्येक श्रद्धावानाने ‘श्रीगुरुचरित्रा’तील १४वा आणि १८वा अध्याय नियमितपणे वाचावा, असे मार्गदर्शनही बापूंनी केले आहे. श्रद्धावानाचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी, त्याचा आध्यात्मिक संकल्प बळकट करण्यासाठी आणि श्रीदत्तगुरुंशी असलेले त्याचे नाते अधिक दृढ करण्यासाठी या दोन अध्यायांचे पठण विशेष महत्त्वाचे असल्याचे बापूंनी सांगितले आहे.

बापूंनी अनेक प्रसंगी श्रीअवधूत दत्तात्रेयांची उपासना आणि भक्ती यांचे अनन्यसाधारण महत्त्व श्रद्धावानांना समजावून सांगितले आहे.

श्रीअवधूत दत्तात्रेयांवरील बापूंची ही गाढ आणि अखंड भक्ती आणि त्याचबरोबर दत्तोपासनेच्या कृपेने घडणारे परिवर्तन प्रत्येक श्रद्धावानाला अनुभवता यावे, ही त्यांच्या मनातील उत्कट इच्छा—यातूनच एका अनोख्या आणि विलक्षण आध्यात्मिक उत्सवाचा संकल्प साकार झाला—‘श्रीअवधूतचिंतन उत्सव’.

Photograph of Shree Dattatreya at Shree Avdhoot Chintan Utsav
श्रीअवधूतचिंतन उत्सवातील श्रीदत्तात्रेयांची प्रतिमा

श्रीदत्तयाग

दत्तयाग हा श्रीअवधूतचिंतन उत्सवातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता आणि त्याची पूर्वतयारी तब्बल तीन वर्षे सुरू होती. या पवित्र यागासाठी अकरा श्रद्धावान विशिष्ट अनुष्ठान करीत होते. नियोजित कालावधीत हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतरच श्रीदत्तयागाला प्रारंभ झाला. या श्रीदत्तयागात सहभागी झाल्याने श्रद्धावानाच्या शरीराला, मनाला, बुद्धीला आणि प्राणाला सुरक्षाकवच प्राप्त झाले.

श्रीदत्तयागात शुद्ध वैदिक मंत्रांचा समावेश होता. या मंत्रांमागील भाव व विचार हे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी रचलेल्या पवित्र ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजा’तील मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत होते. या श्रीदत्तयागाचे आणखी एक पवित्र फलित म्हणजे ‘नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा’. वर्तमानकाळात अथवा भविष्यात श्रद्धावानाच्या जीवनात येऊ शकणारी संकटे, प्रतिकूल परिस्थिती किंवा क्लेश यांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी ही प्रदक्षिणा एखाद्या रोगप्रतिबंधक लसीप्रमाणे आध्यात्मिक संरक्षण प्रदान करणारी होती.

नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा

‘नियतिचक्र’ म्हणजे ‘नियतीचे चक्र’. प्रत्येक व्यक्ती या नियतिचक्रात गुंतलेली असते आणि नियतीने निर्माण केलेल्या विविध घटना, परिस्थिती आणि त्यातून आकाराला येणाऱ्या जीवनक्रमाला सामोरी जात असते.

माझ्या स्वतःच्या नियतिचक्रात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी, सामर्थ्य, क्षमता आणि कर्तृत्व माझ्यातच आहे. मी माझी नियती आणि त्यायोगे माझ्या आजूबाजूची परिस्थितीही निश्चितच बदलू शकतो. माझ्या नियतिचक्राला सामोरे जाऊन त्यावर मात करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त होऊ शकते ; मात्र त्यासाठी माझा माझ्या सद्गुरुंवर प्रचंड विश्वास असणे आवश्यक आहे. स्वतःच्या नियतिचक्रात परिवर्तन घडवून आणण्याचे हेच सामर्थ्य श्रद्धावानाला या प्रदक्षिणेतून प्राप्त होत होते. म्हणूनच या विलक्षण प्रदक्षिणेला ‘नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा’ असे नाव देण्यात आले होते.

Sadguru Aniruddha Bapu performing Shree Dattatreya 24 Guru Poojan
अवधूतचिंतन उत्सव २००९ मध्ये श्रीदत्तात्रेयांच्या २४ गुरूंचे पूजन करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रा

‘श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रा’ म्हणजे श्रद्धावानाचे आणि समग्र समाजाचे सर्वतोपरी कल्याण करणारी यात्रा. हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनात काशीयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पारंपरिक यात्रेत काशीला जाऊन तेथील पवित्र गंगाजल कावडीत भरून रामेश्वरम्‌ला नेले जाते आणि त्या जलाने भगवान रामेश्वराच्या शिवलिंगावर अभिषेक केला जातो. त्यानंतर तीन समुद्रांचा संगम असलेल्या कन्याकुमारी येथील जल कावडीत भरून काशीला आणले जाते आणि ते श्रीकाशीविश्वेश्वराला अर्पण केले जाते. ही पवित्र यात्रा म्हणजेच जीव आणि शिव यांच्या मिलनाचे प्रतीक—जीवा-शिवाची भेट. याच यात्रेला ‘श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रा’ असे म्हटले जाते. भगवान विश्वनाथ आणि भगवान रामेश्वर ही दोन्ही भगवान शिवाचीच रूपे आहेत. काशीविश्वेश्वरातील भगवान विश्वनाथ हे प्रतिपाळ करणारे शिवस्वरूप, तर भगवान रामेश्वर हे शत्रू आणि विघ्नांचा नाश करणारे शिवस्वरूप आहेत.

श्रीअवधूतचिंतन उत्सवातील श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रेसाठी एका बाजूला श्रीकाशीविश्वेश्वर येथील गंगाजलाचा जलाशय तयार करण्यात आला होता. त्याच्या शेजारी श्रीकाशीविश्वेश्वरांची प्रतिमा आणि त्यांच्यासमोर प्रतीकात्मक शिवलिंग ठेवण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला श्रीरामेश्वरम् येथील पवित्र जलाचा जलाशय होता आणि त्याच्या शेजारी भगवान रामेश्वरांची प्रतिमा व त्यांचे प्रतीकात्मक शिवलिंग ठेवण्यात आले होते.

या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानाला एक कावड देण्यात आली होती. प्रथम श्रद्धावान त्या कावडीत गंगाजल भरून नामप्रदक्षिणा करीत भगवान रामेश्वरापर्यंत जात आणि त्या गंगाजलाने त्यांच्यावर अभिषेक करीत. त्यानंतर श्रीरामेश्वरम्‌च्या जलाशयातील पाणी कावडीत भरून पुन्हा नामप्रदक्षिणा करीत श्रीकाशीविश्वेश्वरापर्यंत जात आणि त्या जलाने त्यांच्यावर अभिषेक करीत. हा अभिषेक करताना श्रद्धावानांच्या ‘पार्वतीपते हर हर महादेव!’ या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जात असे.

Sadguru Aniruddha Bapu performing 'Kashi Rameshwar Kaavad yatra'
‘काशी-रामेश्वर कावडयात्रा’ करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

श्रीद्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजन

द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनात बारा प्रतीकात्मक ज्योतिर्लिंगांची वर्तुळाकार रचना करण्यात आली होती. या रचनेच्या मध्यभागी एका ताम्हणात नंदादीप अखंड तेवत होता. या बारा ज्योतिर्लिंगांची रचना, त्यांचा आकार आणि रंग यांमध्येही एक विलक्षण वैशिष्ट्य होते.

यातील पहिले ज्योतिर्लिंग करांगुलीप्रमाण, म्हणजेच करंगळीएवढे होते आणि त्याचा रंग पूर्णपणे काळा होता. त्यानंतर प्रत्येक ज्योतिर्लिंगाची उंची क्रमाक्रमाने वाढत जात होती. बारावे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग ‘पूर्णपाणि’, म्हणजे खांद्यापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या पूर्ण हाताएवढे होते आणि त्याचा रंग करडा होता. या ज्योतिर्लिंगांच्या रंगांची रचनाही काळा, स्फटिक आणि करडा अशा क्रमाने करण्यात आली होती.

या महापूजनात श्रद्धावान हातात डमरू घेऊन तो वाजवत एक विलक्षण आणि प्रभावी ‘डिंडीम आरती’ म्हणत आणि बारा ज्योतिर्लिंगांच्या वर्तुळाकार रचनेभोवती प्रदक्षिणा घालत. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने आणि पवित्र स्पंदनांनी भारून जात असे.

श्रीद्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनातून श्रद्धावानाला स्वतःमधील वाईट गोष्टी, वासना आणि दुष्प्रवृत्तींचा लय करण्याची; तसेच स्वतःमधील चांगल्या, शुभ आणि हितकारक गोष्टींचा प्रतिपाळ करण्याची संधी प्राप्त झाली. जीवनाचा विकास करणाऱ्या सद्गुणांचे संवर्धन करणे आणि त्या विकासात अडथळा ठरणाऱ्या दुष्प्रवृत्तींचा लय करणे—अर्थात शुभाचा प्रतिपाळ आणि अशुभाचा लय करण्याचे शिवशक्तीचे सामर्थ्य प्राप्त करण्याची संधी या महापूजनातून श्रद्धावानांना मिळाली.

Sadguru Aniruddha Bapu performing '12 Jyotirlinga poojan'
‘१२ ज्योतिर्लिंग पूजना’तील ‘डिंडीम आरती’च्या वेळी सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू

नव-अंकुर-ऐश्वर्य प्राप्तीचा श्रीअवधूतचिंतन उत्सव

“या उत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या चार पवित्र उपासनांमुळे श्रद्धावानांना बळ प्राप्त करून करून घेण्याची संधी मिळाली म्हणजे श्रीदत्तयागातून सुरक्षा कवच आणि आध्यात्मिक संरक्षण, नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणेतून स्वतःच्या नियतिचक्रात परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य, श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रेतून ‘जीवा-शिवाच्या भेटी’चा भाव आणि श्रीद्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनातून ‘अशुभाचा लय आणि शुभाचा प्रतिपाळ’ करण्याचे शिवशक्तीचे सामर्थ्य. अशा या चार पवित्र उपासना म्हणजे श्रद्धावानाच्या प्रत्येक प्रयासाला सद्गुरुतत्त्वाचे बळ देणाऱ्या चार आध्यात्मिक पायऱ्या अर्थात ‘चतुर्वर्ग उपासना’ होत्या.”

Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav
Devata's at Shree Avdhoot Chintan Utsav