असामान्य बालप्रतिभा : ‘हिमालयाची हाक’
परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना, बापूंनी ‘हिमालयाची हाक’ हा लिहिलेला निबंध शाळेच्या ‘विकास’ या वार्षिक अंकात प्रकाशित झाला होता. चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, त्या बालवयातही बापूंनी आपल्या वयाच्या कितीतरी पलीकडचा विचार व्यक्त करणारा प्रश्न उपस्थित केला होता :
“माझ्या तरुण मित्रांनो, आपण सर्वच बाबतीत आपण इतके लहान आणि बालवयात असताना भारताचे रक्षण कसे करू शकतो?”
एवढ्या लहान वयात व्यक्त झालेली ही देशभक्ती आणि राष्ट्रीय जाणीव इतकी विलक्षण होती की त्यांचे शिक्षक आणि सहाध्यायीही आश्चर्यचकित झाले. हा उल्लेखनीय निबंध पुढे ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकात जतन करण्यात आला आहे.

दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका : भारतीय संसदेवरील हल्ला
१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर, २० डिसेंबर रोजी सद्गुरु बापूंनी अत्यंत दृढ संकल्प व्यक्त करणारे प्रवचन केले. त्यांनी आपल्या श्रद्धावान मित्रांना आपापल्या क्षमतेनुसार राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन केले. ‘भक्ती’, आंतरिक सामर्थ्याचा स्रोत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर दुर्बलांना सक्षम करण्याची तसेच भाषिक आणि प्रादेशिक भेदांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. एवढेच नाही तर , भारतीय सशस्त्र दलांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रसेवा करावी, यासाठीही बापूंनी युवकांना प्रेरित केले.
आर्थिक दहशतवादाचे वास्तव उलगडताना
२२ ऑगस्ट २००३ रोजी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी मराठी साप्ताहिक ‘लोकप्रभा’ साठी ‘आर्थिक दहशतवाद’ (Financial Terrorism) हा लेख लिहिला. ‘कर्जाधारित डॉलर’ (‘Debt Dollars’) आणि ‘तूट वित्तपुरवठा’ (Deficit Finance) या संकल्पनांचा वेध घेत, या लेखामध्ये (अमेरिकेच्या नेतृत्वाखालील) जागतिकीकरणाचे पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम यांचे विश्लेषण करण्यात आले.
१९७१ मधील ‘निक्सन शॉक’ (Nixon Shock) चा संदर्भ देत बापूंनी स्पष्ट केले की, अमेरिकेने अमेरिकी डॉलर आणि सोन्याचा साठा यांच्यातील संबंध तोडला. त्यामुळे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या माध्यमातून चलननिर्मितीचा मार्ग मोकळा झाला.
बापूंनी या व्यवस्थेचे वर्णन एका दुष्टचक्राच्या रूपात केले. या दुष्टचक्रामुळे जागतिक चलनव्यवस्था कमकुवत झाली आणि अमेरिकेबरोबर व्यापार करणाऱ्या देशांना आपल्या चलनविषयक धोरणांमध्ये त्यानुसार बदल करणे भाग पडले.
अनिरुद्धाज् ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट
आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय (भू-राजकीय) उलथापालथ आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात सामान्य नागरिकांना निर्माण होणारे धोके आणि त्यांची असुरक्षितता लक्षात घेऊन, बापूंनी १४ मार्च २००२ रोजी ‘अनिरुद्धाज् ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (AADM) ची स्थापना केली.
AADMच्या माध्यमातून स्वयंसेवकांना प्रथमोपचार, CPCR, बचावकार्य, ट्रायेज (Triage) आणि गर्दीचे व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर आण्विक, रासायनिक आणि जैविक युद्धामुळे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांविषयीही त्यांना प्रशिक्षित व जागरूक केले जाते.
जून २०२६ पर्यंत AADMने ८७,००० हून अधिक आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांना (Disaster Management Volunteers) प्रशिक्षण दिले होते. तसेच, भारतातील आपत्ती व्यवस्थापनावरील सुरुवातीच्या पाठ्यपुस्तकांपैकी एक महत्त्वपूर्ण पाठ्यपुस्तक AADMने प्रकाशित केले आहे.
दैनिक प्रत्यक्ष : जागतिक घडामोडींचा दैनंदिन वेध
१५ डिसेंबर २००५ रोजी डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी ‘दैनिक प्रत्यक्ष’ या कोणत्याही राजकीय विचारसरणीशी बांधील नसलेल्या मराठी दैनिकाची सुरुवात केली आणि त्याचे कार्यकारी संपादक म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक अर्थकारण या विषयांवर विशेष भर देणाऱ्या ‘दैनिक प्रत्यक्ष’ने गेल्या दोन दशकांहून अधिक काळातील महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल, नेमके आणि मर्मभेदी विश्लेषण सातत्याने वाचकांसमोर मांडले आहे.
डिसेंबर २०१३ पासून ‘प्रत्यक्ष’ दरवर्षी आपल्या वर्धापनदिनानिमित्त ‘विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त’ हा विशेषांक प्रकाशित करत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि तंत्रज्ञानापासून ते संस्कृती, चित्रपट, निसर्ग आणि अंतराळापर्यंत विविध विषयांचा मागोवा घेणारे हे विशेषांक त्यांच्या सखोल अभ्यासपूर्ण मांडणीसाठी आणि विषयवैविध्यासाठी ओळखले जातात.
२०२५च्या विशेषांकात ‘इराणमध्ये शिरलेली ’क्विन ऑफ डेथ’ हा इराणमधील इस्रायलची गुप्तहेर कॅथरीन पेरेझ-शकदम’ यांच्यावरील लेख तसेच ‘अफगाणिस्तानात पालटलेला गेम’, ‘अॅस्ट्रॉईड की परग्रहवासीयांचे स्पेस शिप?’ आणि ‘एल लोको : जॅवियर मिलेई’ यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा समावेश होता.
सद्गुरु बापूंनी वास्तव इतिहासाचा आधुनिक राष्ट्रनीतीशी संबंध उलगडून दाखवणाऱ्या अनेक संपादकीय लेखमालाही लिहिल्या आहेत. त्यामध्ये ‘जागतिक गुप्तचर यंत्रणा’, ‘समर्थ इतिहास’ यांसारख्या अनेक उल्लेखनीय लेखमालांचा समावेश आहे.
तिसरे महायुद्ध
४ डिसेंबर २००६ रोजी सद्गुरु बापूंनी ‘तिसरे महायुद्ध’ हे पुस्तक प्रकाशित केले. ‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ऐतिहासिक घटना आणि आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वास्तव यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवत, बापूंनी या पुस्तकात अशी अनेक विश्लेषणे मांडली आहेत, जी काळाच्या ओघातही तितकीच प्रासंगिक ठरली आहेत.
या पुस्तकातील उल्लेखनीय विश्लेषणांपैकी एक म्हणजे तत्कालीन जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्याविषयी बापूंनी केलेले विश्लेषण. जर्मनीचे नेतृत्व करण्याची आवश्यक क्षमता त्यांच्यात नसल्याचे बापूंनी नमूद केले होते. त्याचबरोबर, भविष्यात जर्मनी हे जागतिक स्तरावर समस्या निर्माण करणारे राष्ट्र ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला होता. युरोपमध्ये पुढे उद्भवलेल्या स्थलांतरितांच्या संकटाच्या (Migrant Crisis) पार्श्वभूमीवर या निरीक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या पुस्तकात चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या तीन देशांचा ‘भयप्रद त्रिकूट’ किंवा ‘अभद्र त्रिकूट’ असाही उल्लेख करण्यात आला आहे.
‘तिसरे महायुद्ध’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही सद्गुरु बापूंनी आपल्या संपादकीय लेखांमधून आणि प्रवचनांमधून आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत श्रद्धावानांना सातत्याने सजग केले आहे.
पाकिस्तानचा विनाश होवो
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांनंतर, सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी अत्यंत परखड संपादकीय लेख लिहिले. तसेच, जनतेतील असंतोष शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारताने ‘टेररिस्तान पाकिस्तान’वर हल्ला करून त्याचा नाश करण्याची आवश्यकता ठामपणे मांडण्यासाठी त्यांनी ‘सहकार करून सत्याग्रह’ ही संकल्पना मांडली.
या आंदोलनाचा प्रभाव इतका व्यापक होता की, २६/११च्या हल्ल्यानंतर भारतीय संसदेत झालेल्या चर्चांमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला.
काश्मिरी पंडितांसाठी आश्वासक संदेश
२६/११च्या हल्ल्यानंतर काही महिन्यांनी, ५ फेब्रुवारी २००९ रोजी पुण्यातील ब्राह्मण संमेलनाला संबोधित करताना, सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी काश्मिरी पंडितांना विशेष आश्वासन दिले की, ते एकटे नाहीत आणि लवकरच त्यांचे आपल्याच काश्मीरमध्ये पुनर्वसन होईल. आजच्या परिस्थितीत बापूंच्या त्या शब्दांचे औचित्य आणि महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते.
जागतिक ध्रुवीकरणाचे वर्ष
१७ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या एका प्रवचनात सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी २०१६ हे वर्ष जागतिक ध्रुवीकरणाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे ठरेल आणि त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाकडे होणारी वाटचाल अधिक वेगवान होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
त्यानंतर २०१६ या वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारण, राजकीय व्यवस्था, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांत अनेक मोठ्या उलथापालथी घडल्या. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीतील विजय, ब्रेक्झिट, ब्राझीलमधील राजकीय सत्तांतर, उरी हल्ल्यानंतर भारताने केलेले सर्जिकल स्ट्राइक्स, झिका विषाणूमुळे निर्माण झालेली आरोग्यविषयक आणीबाणी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) मुख्य प्रवाहात झालेला उदय यांचा समावेश होता.
रशिया - भारताचा अत्यंत जुना व जाणता मित्र
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध झपाट्याने दृढ होत असताना, दुसरीकडे भारत–रशिया संबंध काहीसे कमकुवत होत होते. या पार्श्वभूमीवर सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी १३ डिसेंबर २०१६ रोजी ‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये सर्व भारतवर्षाला एक नम्र आवाहन केले होते. भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्री जपण्याची आणि ती अधिक दृढ करण्याची आवश्यकता त्यांनी या आवाहनातून अधोरेखित केली. अमेरिकेबरोबर व्यावहारिक संबंध विकसित करण्याचे समर्थन करतानाच, रशियाशी असलेल्या दीर्घकालीन मैत्रीला बाधा पोहोचू नये, याबाबतही त्यांनी सावध केले. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात झालेल्या बदलांमुळे बापूंनी मांडलेल्या या भूमिकेचे महत्त्व अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाले.
इस्रायलवरील लेखमाला आणि पुस्तक
२०१७ मध्ये भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ‘दैनिक प्रत्यक्ष’ने भारतीय-इस्रायली ज्यू लेखिका शुलामिथ पेणकर-निग्रेकर यांची ‘इस्रायल : एक प्रदीर्घ प्रवास, पण यशस्वी!’ ही लेखमाला सुरू केली. या लेखमालेच्या प्रस्तावनेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी भारत–इस्रायल संबंधांचे सामरिक महत्त्व अधोरेखित करत लिहिले होते,
“भविष्यकाळात सर्व जगभरात जो युद्धाचा, वैमनस्याचा व मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तींचा भडका उडणार आहे व जो हळूहळू जगभर पसरू शकतो, त्या सर्वांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य, इस्रायल व भारत घट्टपणे एकत्रित राहिल्यास नक्कीच तयार होऊ शकेल."
७ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलेल्या घटना आणि त्यानंतर इस्रायलशी संबंधित संघर्षांच्या पार्श्वभूमीवर बापूंच्या या शब्दांचे महत्त्व प्रत्ययास आले.
अमेरिकेविषयीचे भाष्य
जून २०२५ मधील आपल्या प्रवचनांमध्ये सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अमेरिकेचे परराष्ट्र धोरण पुन्हा एकदा ‘टेररिस्तान पाकिस्तान’च्या बाजूने झुकल्याबद्दल अमेरिकेवर टीका केली. या संदर्भात बापूंनी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे विधान उद्धृत केले :
“अमेरिकेचा शत्रू असणे अत्यंत धोकादायक आहे; पण अमेरिकेचा मित्र असणे सर्वाधिक घातक आहे.”
या विधानाचा संदर्भ देत बापूंनी अमेरिका खऱ्या अर्थाने कधीही कोणाचेही मित्रराष्ट्र होऊ शकत नाही, असे ठामपणे नमूद केले. तसेच मातृभाषा, मातृभूमी आणि स्वधर्म यांच्या महत्त्वावर भर देत बापूंनी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना आणि भारतीय स्थलांतरितांना अत्यंत स्पष्ट आणि नेमके मार्गदर्शन केले.
‘हिमालयाची हाक’ पासून ‘आर्थिक दहशतवाद’ पर्यंतच्या लेखांमधून, आपत्ती व्यवस्थापनापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंतच्या विविध विषयांवरील आपल्या कार्यातून, सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी आपल्या कार्यातून सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर आणि संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सज्ज करण्यावर सातत्याने भर दिला आहे.
आपली पुस्तके, संपादकीय लेख, प्रवचने आणि विविध उपक्रमांमधून बापूंनी आंतरराष्ट्रीय राजकारणासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयांवर केलेल्या विश्लेषणातून, विविध विषयांबाबतची त्यांची सखोल जाण आणि व्यापक अभ्यास तर प्रत्ययास येतोच; त्याचबरोबर, या ज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाला जागतिक घडामोडी समजून घेण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज करण्याचा त्यांचा व्यापक दृष्टिकोनही स्पष्ट होतो.
