१९९९ पासून वार्षिक महारक्तदान शिबीर
१९९९ पासून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट आणि त्यांच्याशी संलग्न संस्था मिळून महारक्तदान शिबीराचे आयोजन करीत आहेत. दरवर्षी ही मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत काटेकोरपणे नियोजन केलेली शिबिरे न्यू इंग्लिश स्कूल (श्री हरिगुरुग्राम), वांद्रे येथे मध्यवर्ती पातळीवर तसेच विविध ठिकाणी असलेल्या ‘सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवर’ स्थानिक पातळीवर आयोजित केली जातात.
एप्रिल व मे महिन्यांत अनेकदा जाणवणारी रक्त पुरवठ्याची हंगामी कमतरता भरून काढण्याच्या प्रमुख उद्देशाने महारक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी एप्रिल महिन्यात केले जाते. दरवर्षी उन्हाळ्याच्या महिन्यांत अनेक लोक सुट्टीसाठी आपल्या गावी किंवा बाहेरगावी जात असल्याने रक्तपेढ्या आणि रुग्णालयांमध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी होते. परिणामी, सुट्टीच्या काळात नियोजित शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज वाढत असतानाच रक्ताची उपलब्धता कमी होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने रक्ताची उपलब्धता आणि वाढती गरज यांतील ही तफावत भरून काढण्यास मदत होते आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अत्यंत गरजेच्या वेळी वेळेवर महत्त्वपूर्ण सहाय्य मिळते.
या प्रवासाची सुरुवात २१ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली, जेव्हा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे पहिले रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. एका छोट्या उपक्रमाच्या रूपात सुरू झालेल्या या प्रयत्नाचे पुढे एका महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण सेवाकार्यात रूपांतर झाले आणि प्रत्येक वर्षागणिक त्याची व्याप्ती आणि प्रभाव सातत्याने वाढतच आहे.

एका शिबिरापासून देशव्यापी चळवळीपर्यंत
गेल्या २५ वर्षांत या रक्तदान चळवळीची सुरुवात १९९९ मध्ये १५४ रक्तपिशव्यांपासून झाली आणि आज समर्पितपणे कार्य करणाऱ्या सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवरील स्वयंसेवकांच्या प्रयत्नांमुळे तसेच हजारो रक्तदात्यांच्या निःस्वार्थ सहभागामुळे ह्या लहान चळवळीचे एका मोठ्या मानवहितकारी उपक्रमात रूपांतर झाले आहे. सातत्याने राबविण्यात आलेल्या जनजागृती आणि लोकसंपर्क उपक्रमांमुळे स्वेच्छा-रक्तदानाची एक सशक्त संस्कृती रुजण्यास मदत झाली असून, वर्षागणिक रक्तदात्यांचा सहभाग सातत्याने वाढत आहे.
मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी करण्यामध्ये AADM ने विकसित केलेल्या विशेष कौशल्याची आणि प्रावीण्याची ओळख फक्त संस्थेच्या स्वतःच्या उपक्रमांपर्यंतच मर्यादित न रहाता इतर संस्थांनी देखील त्याची दखल घेतली आहे.
२०१० मध्ये महाराष्ट्रातील एका प्रमुख राजकीय पक्षाने आयोजित केलेली विशेष रक्तदान मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फाउंडेशनला मदत करण्याचे आमंत्रण दिले आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या बळाचा आणि सुस्थापित कार्यप्रणालीचा प्रभावी उपयोग करून फाउंडेशनने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या मोहिमेत एकाच दिवसात २५,००० हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले—हा आकडा त्या काळात विक्रमी मानला गेला होता. हे यश म्हणजे , रक्तदानाच्या क्षेत्रात अनेक वर्षांच्या समर्पित सेवेतून फाउंडेशन आणि AADM यांनी संपादन केलेली संघटनक्षमता, विश्वासार्हता आणि जनमानसातील विश्वास यांचे द्योतक होते.
महारक्तदान शिबीरासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेली तयारी
महारक्तदान शिबिराची पूर्वतयारी जवळपास तीन महिने आधीपासूनच सुरू होते. शिबिराचे आयोजन सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी स्वयंसेवक, विविध समित्या आणि स्थानिक ‘सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रे’ परस्पर समन्वयाने कार्य करतात. रक्तपेढ्यांशी समन्वय साधणे, रक्तदात्यांची नोंदणी करणे, आवश्यक व्यवस्थापन व नियोजन करणे आणि रक्तदानाबाबत जनजागृती करणे अशा विविध जबाबदाऱ्या या पूर्वतयारीचा भाग असतात. त्यामुळे शिबिर सुरळीतपणे आणि यशस्वीरीत्या पार पडते.
या उपक्रमाच्या उल्लेखनीय विस्तारामागील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘रक्तदानाचे महत्त्व आणि त्याची सुरक्षितता’ याबाबत सातत्याने करण्यात येणारे जनजागृतीचे प्रयास. गैरसमज किंवा भीतीमुळे अनेक जण सुरुवातीला रक्तदान करण्यास संकोच करतात. परंतु, नियमित संवाद, मार्गदर्शन आणि समुपदेशनाच्या माध्यमातून श्रद्धावानांना ‘रक्तदान ही सुरक्षित प्रक्रिया आहे’ आणि ‘रक्तदान केलेल्या रक्ताच्या अल्प प्रमाणातूनही एखाद्या मौल्यवान मानवी जीवाचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते’, याची जाणीव करून दिली जाते.
स्वतः डॉक्टर असलेल्या सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्या प्रवचनांमधून रक्तदानाचे आध्यात्मिक महत्त्व आणि मानवी जीवन वाचविण्यातील त्याची महत्त्वपूर्ण भूमिका वारंवार अधोरेखित केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने हजारो श्रद्धावानांना या उदात्त सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे.
अनेक श्रद्धावानांसाठी रक्तदान हे इतरांच्या सेवेसाठी योगदान देण्याची एक अर्थपूर्ण संधी बनले आहे. आपली परिस्थिती कशीही असली तरी,
“मी निरुपयोगी नाही; मी किमान रक्तदान तरी करू शकतो”
हा विश्वास त्यांच्या मनात दृढ होतो आणि ही साधी कृतीदेखील एखाद्याच्या जीवनात फरक घडवून आणू शकते, याची जाणीव होते.
महारक्तदान शिबिराचे आयोजन ‘महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद’ (SBTC) मान्यताप्राप्त शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांच्या निकट समन्वयाने केले जाते. या रक्तपेढ्यांतील डॉक्टर, तंत्रज्ञ आणि निमवैद्यकीय कर्मचारी यांची पथके फाउंडेशन आणि त्याच्या संलग्न संस्थांतील श्रद्धावान कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्य करतात. संपूर्ण शिबिरादरम्यान दिसून येणारा उत्तम समन्वय, शिस्तबद्धता आणि सांघिक कार्यभावना यांमुळे प्रत्येक रक्तदात्याची आवश्यक ती काळजी घेतली जाते आणि रक्तदान प्रक्रियेत सुरक्षिततेच्या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केले जाते.
प्राण वाचविण्याची सामूहिक जबाबदारी
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या शिकवणुकीतून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक उपासना केंद्रांवर नियमितपणे आयोजित करण्यात येणारी रक्तदान शिबिरे आणि २०२६ मध्ये आयोजित महारक्तदान शिबिर यांनी पुन्हा एकदा भक्ती, शिस्त आणि मानवहितकारी सेवेचा एक उल्लेखनीय आदर्श घालून दिला.
या शिबिरामध्ये SBTC तसेच अन्य मान्यता प्राप्त अश्या एकूण १७६ शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांनी, AADM च्या प्रशिक्षित श्रद्धावान स्वयंसेवकांशी निकट समन्वय साधून कार्य केले. या प्रभावी समन्वयामुळे शिबिराचे संपूर्ण आयोजन सुरळीत, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम रीतीने पार पडले.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या चरणी असलेल्या दृढ श्रद्धेने आणि आदराने प्रेरित होऊन, मोठ्या संख्येने श्रद्धावान रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे आले. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातील अन्य भागांतील एकूण १२७ केंद्रांवर तसेच दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक येथील केंद्रांवर देखील रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या व्यापक सहभागातून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या या सेवाकार्याची सातत्याने विस्तारत जाणारी केवळ व्याप्तीच दिसून आली नाही, तर या सेवाकार्याप्रती हजारो रक्तदात्यांची सामूहिक बांधिलकी आणि समर्पणभावनाही प्रकर्षाने दिसून आली.
रक्ताची गरज ही सातत्याने कायम असून दिवसेंदिवस वाढतच आहे. दान केलेली प्रत्येक रक्तपिशवी एखाद्या व्यक्तीचे अमूल्य जीवन वाचवू शकते आणि संकटात असलेल्या कुटुंबाच्या मनात आशेचा किरण निर्माण करू शकते. रक्तदान हे आपल्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची संधी देते.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्याला शिकवले आहे की, प्रेम, श्रद्धा आणि निःस्वार्थ भावनेने अर्पण केलेले काही पवित्र थेंब परमेश्वराला प्रिय असतात. हाच भाव मनात ठेवून, कोणत्याही अपेक्षेशिवाय एखाद्या मानवी जीवाचे प्राण वाचविण्यासाठी आपण जेंव्हा रक्ताचे काही थेंब दान करतो, तेव्हा ते परमेश्वराला केलेल्या अर्पणापेक्षा कमी नाही.












