श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथील महाशिवरात्री उत्सव
महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्, खार येथे ‘हरिहर’स्वरूप श्रीत्रिविक्रमास श्रद्धावान बेल अर्पण करतात व सुगंधित जलाने अभिषेकही करतात.
तसेच श्रीमहादुर्गेश्वराचे म्हणजेच नर्मदोत्पन्न स्वयंभू नित्यरसेश्वर सदाशिवलिंगाच्या दर्शनाचाही लाभ घेतात. श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे श्रीमहादुर्गेश्वराची स्थापना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दिनांक १२ डिसेंबर २०११ रोजी ब्राह्ममुहूर्तावर केली. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे ह्या नित्यरसेश्वर श्रीमहादुर्गेश्वराचे दर्शन घेणे ही श्रद्धावानांसाठी एक मोठी पर्वणी असते.
श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथील मासिक शिवरात्रपूजन
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्र येते आणि प्रत्येक मासिक शिवरात्रीला श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे श्रीमहादुर्गेश्वर लिंगाबरोबरच तेथेच विरामजमान असलेल्या बारा बाणलिंगांचे विशेष विधिवत् पूजन केले जाते. ही बारा बाणलिंगे बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधित्व करतात. या वेळी श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे उपस्थित असणारे श्रद्धावान तेथे बसून पूजनात सहभागी होऊ शकतात तसेच याच वेळी श्रद्धावानांना श्रीमहादुर्गेश्वर लिंगाचे व बारा बाणलिंगांचे जवळून दर्शन होते.
स्फटिक हे पावित्र्य, पारदर्शकता आणि तेजाचे प्रतीक मानले जाते. स्फटिक लिंगाचे पूजन श्रीमहादुर्गेश्वराच्या उपासनेला पूरक ठरून श्रद्धावानाचे मन शिवाच्या शुद्ध, शांत आणि स्वयंप्रकाशी तत्त्वाकडे वळवते. अशाप्रकारे प्रत्येक मासिक शिवरात्र श्रद्धावानांना आपल्या भक्तीची वृद्धी करण्याची, मन शुद्ध करण्याची आणि भगवान शिवाचे स्मरण अधिक दृढ करण्याची पवित्र संधी प्रदान करते.
ह्या शिवाय श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन दर रोज तीन वेळा केले जाते.
श्रीहरिगुरुग्राम येथील महाशिवरात्री उत्सव
महाशिवरात्रीच्या आधीचा एक आठवडा आणि नंतरचा एक आठवडा या दोन आठवड्यांना म्हणजेच एका पक्षाला (१५ दिवसांना) ‘नंदि पक्ष’ (नंदि पंधरवडा) असे म्हटले जाते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पाने आणि मार्गदर्शनाने या नंदि पक्षातील तीन गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे येथे मागील अनेक वर्षांपासून सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत ‘शिवपंचाक्षर स्तोत्रा’ने भगवान शिवाची उपासना केली जाते. या तीनही गुरुवारी श्रीवालुकेश्वरलिंग (वाळूपासून निर्मित शिवलिंग) तयार केले जाते आणि यावर शिवपंचाक्षर स्तोत्राच्या पठणाने बिल्व पत्र (बेलाची पाने) आणि श्वेत पुष्प अर्पण केली जातात. या तीनही गुरुवारी श्रद्धावान या श्रीवालुकेश्वर लिंगाचे दर्शन घेऊ शकतात. तिसर्या गुरुवारी श्रीशिवपंचाक्षर स्तोत्राने श्रीवालुकेश्वर लिंगाला बिल्व पत्र आणि श्वेत पुष्प अर्पण केल्यानंतर याच श्रीवालुकेश्वर लिंगावर सर्व श्रद्धावान बिल्व पत्र अर्पण करू शकतात. या वेळी ‘ॐ नम: शिवाय’चा अखंड जप केला जात असताना श्रद्धावान या श्रीवालुकेश्वर लिंगाला बिल्व पत्र अर्पण करतात. श्रद्धावान खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अत्यंत पवित्र सुसंधीचा लाभ घेतात.
परमशिवाच्या अशा भक्तिगंगेमध्ये सामील होताक्षणीच मानवाच्या पापांचा नाश होऊन त्याचे दुष्प्रारब्ध संपून त्याचे कल्याण होते. दुष्प्रारब्धरूपी विषाला पिऊन, पचवून जो भक्तांना शुद्ध करतो, आनंदरूपी अमृत प्रदान करतो असा हा परमशिव. परमशिवाचे नामस्मरण मानवाला 'संयम' हा महत्त्वाचा गुण प्रदान करते.
पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री उत्सव कसा साजरा केला जातो?
संपूर्ण भारतवर्षात माघ कृष्ण त्रयोदशीची रात्र महाशिवरात्री म्हणून विख्यात आहे. भारतात बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी भगवान शिवाचा महाशिवरात्री महोत्सव साजरा केला जातो. ह्या दिवशी सर्वत्र भगवान शिवाच्या मूर्तीचे किंवा शिवलिंगाचे बिल्व पत्र (बेल) वाहून पूजन केले जाते. शिवलिंगावर अभिषेक केला जातो. अशा रीतीने शिवलिंगाचे मनोभावे पूजन केले असता शिवभक्तांना शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. ह्या दिवशी आपल्या परंपरेप्रमाणे उपवास केला जातो व शिवमंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घेतले जाते. ॐनमःशिवाय, शिवपंचाक्षर स्तोत्र तसेच श्रीशिवलीलामृत या ग्रंथाचे पठण केले जाते. शिवाला शरण जाऊन बिल्वपत्रेही अर्पण केली जातात.
पंचाक्षरी मंत्र 'नमः शिवाय'
Om Namah Shivaaya
'नमः शिवाय' हा पंचाक्षरी मंत्र आहे. ह्या मंत्राचा कंपनसमुदाय शिवाप्रमाणेच कार्य करतो. सर्व अशुभतत्त्व काढून टाकणारा हा मंत्र आहे म्हणूनच नंदि ऋषींनी ह्या मंत्राच्या आधाराने शिवपंचाक्षर स्तोत्राची रचना केली.
शिवपंचाक्षर स्तोत्र
शिवाच्या चिंतनातून मार्कण्डेय ऋषींना जे ज्ञान झाले ते त्यांनी शिवाचा श्रेष्ठ भक्त नंदि ऋषिला दिले. त्यानंतर नंदि ऋषींनी हे स्तोत्र रचले. त्यांनी शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी, शिवाचे वाहन बनण्यासाठी ज्या मंत्राने तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येचा हा मंत्र आहे. हे स्तोत्र शिवाचे अप्रतिम गुण, रूपवर्णन व गुणसंकीर्तन करणारे आहे. शिवपंचाक्षर स्तोत्रामध्ये 'ॐ नमः शिवाय' ह्या मंत्राचे सर्व सामर्थ्य व रहस्ये प्रगट करण्यात आलेली आहेत. ते सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून ह्या स्तोत्रातील प्रत्येक कडव्याचा आरंभ 'नमः शिवाय' ह्या शिवपंचाक्षरी मंत्रातील एकेका अक्षराने होतो. आपल्याला अर्थ कळो अथवा न कळो, जो भावाने, श्रद्धेने हे स्तोत्र म्हणतो त्याला 'ॐ नमः शिवाय' ह्या जपाचे खरे सामर्थ्य प्राप्त होते अशी मान्यता आहे.
भगवान शिवाचे वाहन - नंदि
नंदि पक्ष
महाशिवरात्रीला येणार्या नंदि पक्षामध्ये भगवान शिवाचा श्रेष्ठ भक्त नंदि ऋषीने भगवान शिवाचे वाहन बनण्यासाठी स्वत:च रचलेल्या शिवपंचाक्षर स्तोत्राने भगवान शिवाची तपश्चर्या केली. महाशिवरात्री अगोदरचा एक आठवडा व नंतरचा एक आठवडा मिळून जो पंधरवडा (पक्ष) होतो, त्याला ‘नंदि पक्ष’ म्हटले जाते.
भगवान शिवाला अर्पण केल्या जाणार्या बिल्वपत्रामागील भावार्थ
वाळुने तयार केल्या जाणार्या ‘वालुकेश्वर' शिवलिंगाचे माहात्म्य
समुद्राच्या लाटा दगडावर आपटून आपटून त्याचा झालेला भुगा म्हणजे वाळू. वर्षानुवर्षे अव्याहतपणे आपटणार्या लाटा पाषाणाची वाळू बनवतात म्हणून वाळू हे कठोर परिश्रमांचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रक्रियेत परस्पर विरोधी गुणधर्मही सुंदररीत्या दिसून येतात. पाणी, द्रव, मऊ व कोमल असे असूनही कठेरातल्या कठोर पाषाणाचा भुगा करते. तर पाषाण अत्यंत कठोर असूनही मऊ पाण्यासमोर स्वतःचा भुगा करून घेतो म्हणून वाळूपासून बनविलेले शिवलिंग हेच शिवाच्या परस्परविरोधी सामर्थ्यांचे खरे प्रतीक बनले. दोन टोकाचे प्रभाव एकाच शक्तीने साधणे हे शिवाचे खरे कार्य आहे.
महाशिवरात्रीसार
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी अनेक वेळा
‘शिवं ज्ञानोपदेष्टारम्’
हा सिद्धांत आपल्या प्रवचनांमध्ये सांगितला आहे. भगवान शिव हा ज्ञानोपदेष्टा आहे म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा आहे, अज्ञानाचा नाश करणारा आहे. महाशिवरात्री म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अशुद्धतेकडून पावित्र्याकडे नेणारा पवित्र प्रवास आहे. ‘शिवं ज्ञानोपदेष्टारम्’ या तत्त्वाचे स्मरण, ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप, शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण आणि प्रेमपूर्वक केलेले बिल्वपत्रांचे अर्पण याद्वारे श्रद्धावान केवळ शिवकृपेची प्रार्थना करीत नाहीत, तर आपल्या अंतःकरणाच्या परिवर्तनासाठीही प्रयत्नशील राहतो.
श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे श्रीत्रिविक्रम आणि श्रीमहादुर्गेश्वर यांच्या दर्शनाने श्रद्धावान सद्गुरुतत्त्वाची सक्रिय कृपा अधिक जवळून अनुभवतात. नंदि पक्षाचे पालन आणि श्रीवालुकेश्वराचे पूजन त्याला अविरत परिश्रम, सबुरी, समर्पण आणि अविचलभक्ती आणि विश्वास यांचे महत्त्व शिकवते.
महाशिवरात्री व प्रदोषकाळ:
- महाशिवरात्री व प्रदोषकाळ
महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो - महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशिवशंकराला काय सांगावे:
महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशिवशंकराला काय सांगावे: - सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी घेतलेले शिवशंकराचे गजर:
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी घेतलेले शिवशंकराचे गजर:





















