गुरूपौर्णिमेचे महत्त्व
भारतातील या सणाची परंपरा एका पवित्र कथेपासून सुरू होते.
अठरा पुराणे आणि 'महाभारत' सारखे महान महाकाव्य रचूनही ब्रह्मर्षी वेदव्यास यांना समाधान किंवा पूर्णत्वाची भावना लाभली नाही; त्यांचे मन अस्वस्थ आणि अशांतच राहिले. अशा वेळी, महर्षि वेदव्यासांचे गुरू नारद मुनी त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना असा एक ग्रंथ रचण्याचा उपदेश केला, ज्यामध्ये श्रीकृष्णाच्या दिव्य गुणांचे गुणगान केले जाईल. ब्रह्मर्षी वेदव्यासांनी ही आज्ञा शिरोधार्य मानून त्याचे तंतोतंत पालन केले व त्यांना गुरुवचनाची विलक्षण अनुभूती आली. 'गुरुंचे आज्ञापालन केल्यानेच शांती, तृप्ती व समाधान मिळते.'
'खरी शांती, परिपूर्णता आणि समाधान फक्त गुरूंच्या आज्ञेचे पालन केल्यानेच प्राप्त होतात. जेव्हा एखादी व्यक्ती गुरूंची आज्ञा हाच आपला संकल्प मानते आणि त्यानुसार आचरण करते, तेव्हाच मानवी जीवनाला त्याचे खरे सार्थक लाभते', हा बोध महर्षि वेदव्यासांच्या या कथेने आपल्याला मिळतो. महर्षि वेदव्यासांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतात 'गुरूपौर्णिमा' साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.
आपल्यासारख्या श्रद्धावानांसाठी गुरुपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक विधी किंवा उपचार नाही, तर तो एक अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक असा विशेष दिवस आहे. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने आमची हृदये या दिवशी ओतप्रोत भरलेली असतात; कारण त्यांचे असीम प्रेम, मार्गदर्शन आणि कृपा यांचा आपल्या जीवनावर अनेकविध प्रकारे प्रभाव पडत असतो आणि त्याद्वारे आपले जीवन घडत असते. बापूंच्या प्रवचनांतून, शिकवणुकीतून आणि त्यांच्या करुणामय सान्निध्यातून, श्रद्धा, जबाबदारी आणि आंतरिक बळ यांवर आधारित जीवन कसे जगावे, हे त्यांनी आपल्याला दाखवून दिले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, सर्व श्रद्धावान अत्यंत भक्तीभावाने एकत्र येतात आणि आपल्या सद्गुरूंच्या चरणकमलांशी आपली हृदयस्थ प्रार्थना अर्पण करतात.
गुरूपौर्णिमा उत्सव
'सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट', 'श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन' आणि संलग्न संस्थांमार्फत दरवर्षी गुरूपौर्णिमा अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते. या भव्य उत्सवात लाखो श्रद्धावान सहभागी होतात. १९९६ साली दादर येथे संस्थेने आयोजित केलेला पहिला गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता; तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जात असून, सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या प्रती कृतज्ञता, भक्ती आणि आदर व्यक्त करण्यासाठी यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
गुरु पादुका आणि श्रीगुरु दत्तात्रेय मूर्तीचे आगमन
गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) यांच्या निवासस्थानापासून पवित्र गुरु पादुकांच्या विधीवत आगमनाने होते. या पादुका दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वतीच्या पादुका म्हणून पूज्य आहेत. त्यांच्यासोबत सद्गुरू श्रीअनिरुद्ध यांच्या घराच्या देव्हाऱ्यातील श्रीगुरुदत्तात्रेयांची मूर्तीही उत्सवस्थळी आणली जाते.
उत्सवस्थळी, श्रीनृसिंहसरस्वती यांच्या पादुकांची पारंपरिक ‘षोडशोपचार पूजा’ आणि त्यानंतर ‘जलाभिषेक’ केला जातो. त्यानंतर, श्रद्धावानांना या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभते.
गुरुगीतेत असे सांगितले आहे की, सद्गुरूंचे चरणकमल हे सर्व पवित्र तीर्थे आणि तीर्थक्षेत्रांचे स्वरूप आहेत. म्हणूनच, श्री नृसिंहसरस्वतींच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यासाठी वापरलेले जल नंतर 'तीर्थ' म्हणून श्रद्धावानांना वितरित केले जाते.
सोबतच श्रीगुरुदत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:|’ या मंत्राचा अखंड जप केला जातो. द्राम हा श्रीगुरुदत्तात्रेयांचा बीज मंत्र आहे आणि दत्तमाला मंत्रात त्याचा उल्लेख आहे. या अखंड पठणाने संपूर्ण वातावरण भक्ती आणि श्रीगुरुदत्तात्रेयांच्या दिव्य स्पंदनांनी भरून जाते.
कृपाचैतन्य पादुका
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, उत्सवस्थळी ‘कृपाचैतन्य पादुकां’चे दर्शन घेण्याचे भाग्य श्रद्धावानांना लाभते. या पादुका केवळ पवित्र पादत्राणे नाहीत, तर त्या साक्षात प्रत्यक्ष सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूच आहेत; या पादुका बापूंच्या प्रत्यक्ष आणि परिपूर्ण अस्तित्वाचे मूर्त रूप आहेत.
'कृपाचैतन्य पादुकां' विषयी बोलताना बापू अत्यंत प्रेमाने म्हणाले होते, 'या पादुका म्हणजे समग्र अनिरुद्धच आहेत. (सर्व सामर्थ्ये आणि सर्व ऊर्जांसह) आई जगदंबा आणि सद्गुरू दत्तात्रेय यांच्या आशीर्वादाने व कृपेने, सर्व शक्ती, सर्व ऊर्जा आणि सर्व क्षमता या पादुकांमध्ये प्रतिष्ठित करण्यात आल्या आहेत.'
या पवित्र दिवशी, मूळ 'सद्गुरूतत्त्व' असलेल्या श्री त्रिविक्रमाची उत्सवाच्या निमित्ताने पूजा केली जाते; यामुळे गुरुपौर्णिमा हा सद्गुरूंच्या जिवंत अस्तित्वाचा आणि अमर्याद कृपेचा एक अद्वितीय उत्सव ठरतो.
त्रिविक्रम पूजनाचे महत्त्व
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पानुसार श्रद्धावान 'श्री त्रिविक्रम पूजन' करतात.
'दैनिक प्रत्यक्ष' मध्ये प्रकाशित होणाऱ्या 'सुंदरकांड' वर आधारित 'तुलसीपत्र' या संपादकीय मालिकेच्या १४८३ व्या भागात सद्गुरु श्री अनिरुद्ध लिहितात, 'खरोखरच, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बुद्धीला, मनाला किंवा शरीराला त्रिविक्रमाचा स्पर्श एकदा तरी झाला आणि ती व्यक्ती तो दैवी स्पर्श भक्ती, पश्चात्ताप किंवा आपल्या चुका सुधारून स्वीकारते, तेव्हा त्या भक्ताचे जीवन सौंदर्याची एक साक्षात खाणच बनते.'
'तुलसीपत्र' या संपादकीय मालिकेतील १४६३ व्या भागात, 'मूळ सद्गुरूतत्त्व' असलेल्या त्रिविक्रमाविषयी बापू लिहितात, 'श्रद्धावानाच्या आयुष्यातील संकटकाळात, मूळ सद्गुरूतत्त्व म्हणजेच त्रिविक्रम त्या श्रद्धावानाला स्वतःशी जोडून ठेवतो आणि खऱ्या भक्ताचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतो. त्रिविक्रम कोणत्या प्रकारे मदतीला धावून येतो, हे श्रद्धावान कधीच पूर्णपणे समजू शकत नाही.'
तसेच, 'तुलसीपत्र' भाग ५२०मध्ये बापू लिहितात: "श्री त्रिविक्रमांची केलेली पूजा, उपासना आणि भक्ती हा श्रद्धावानांसाठी कोणत्याही स्तरावरील अभाव, दारिद्य्र, वंचना आणि दुर्बलता यांवर मात करण्याचा एक निश्चित मंगलदायीमार्ग आहे; कारण त्रिविक्रम हा स्वतः 'सगुण' आहे आणि 'नव-अंकुर-ऐश्वर्यां'नी (नव्याने बहरणाऱ्या नऊ प्रकारच्या दैवी संपत्तींनी) खच्चून भरलेला आहे. हा त्रिविक्रम आपल्या भक्तांना, त्यांच्या त्रिविक्रमावरील ठेवलेल्या श्रद्धेपेक्षा आणि विश्वासापेक्षा चारपट अधिक फल सतत प्रदान करत राहतो. हा त्रिविक्रम या त्रिमितीय जगात केवळ श्रद्धावानांसाठी अस्तित्वात असलेला 'त्रिविध आधार' आहे."
या उत्सवादरम्यान ज्या 'स्वयंभगवान त्रिविक्रमा'ची उपासना करण्याची संधी श्रद्धावानांना लाभते, तो हाच त्रिविक्रम आहे.
त्रिविक्रमाची उपासना म्हणजे केवळ एखाद्या 'साकाराची' किंवा पवित्र मूर्तीची प्रार्थना व पूजा नव्हे; तर ती अत्यंत पवित्र आणि महादिव्य अशा ‘सगुण तत्त्वाची’ उपासना आहे. म्हणजेच ती साक्षात दैवी गुणांचीच उपासना आहे. उत्सवाच्या ठिकाणी पूजेच्या जागेच्या मध्यभागी 'त्रिविक्रम लिंग' स्थापित केलेले असते, तर सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानाला एक तबक दिले जाते; ज्यामध्ये भगवान श्री त्रिविक्रमांच्या तीन पावलांचे प्रतीक असलेली तीन पावले असतात.
त्रिविक्रमाची ही तीन पावले म्हणजे अकारण कारुण्य, क्षमाशीलता व भक्तीचा स्वीकार यांचे प्रतीक आहेत. याच तीन पावलांच्या माध्यमातून त्रिविक्रम श्रद्धावानाच्या आयुष्यातील दुष्टप्रारब्ध नष्ट करत असतो आणि श्रद्धावानाचे आयुष्य आनंद व मांगल्याने भरून टाकतो. या तीन पावलांचे पूजन म्हणजे मूलतः श्रद्धावानाची एक प्रार्थनाच असते; ज्याद्वारे त्रिविक्रमाने आपल्या दिव्य गुणांच्या माध्यमातून आमचे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकावे आणि आपल्या कृपेने त्यात परिवर्तन घडवून आणावे, अशी प्रार्थना केली जाते.

भक्तीस्तंभाभोवती प्रदक्षिणा
गुरुपौर्णिमा उत्सवातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हणजे 'भक्तिस्तंभा'ची प्रदक्षिणा.
कार्यक्रमाच्या स्थळाच्या मध्यभागी उभारलेल्या या भक्तिस्तंभावर सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या 'नित्यगुरुं'च्या पादुका ठेवल्या जातात. त्यासोबतच, 'अवधूत चिंतन उत्सवा'तील दोन 'अवधूत कुंभ' देखील तिथे ठेवले जातात.
श्रद्धावानांना 'रामनाम इष्टिका' (रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून बनवलेली वीट) डोक्यावर घेऊन, गजराच्या तालावर भक्तिस्तंभाची प्रदक्षिणा करण्याची संधी मिळते. या दिव्य वातावरणात, परिसरातील पवित्र स्पंदनांचा अनुभव श्रद्धावानांना खऱ्या अर्थाने घेता येतो. ही प्रदक्षिणा करताना प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात अशी भावना असते की, 'माझी सद्गुरु माऊली या इष्टिकेवर विराजमान आहे; ही इष्टिका म्हणजे सद्गुरूंवरील माझ्या श्रद्धेचे प्रतीक आहे. जेव्हा मी ही इष्टिका डोक्यावर घेऊन सद्गुरु प्रदक्षिणा करतो, तेव्हा माझ्या सद्गुरूंचे चरणकमल माझ्या हृदयात कायमची कोरली जातात.'
‘कीजै नाथ हृदय महँ डेरा’
दिंडी - कृपेची पालखी
या उत्सवातील आणखी एक मंगलमय सोहळा म्हणजे 'दिंडी'. यामध्ये सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांची 'पदचिन्हे' (म्हणजेच त्यांच्या चरणकमलांचे पवित्र ठसे) असलेली पालखी भक्तीपूर्ण नामघोष, गजर आणि आनंदाच्या जयघोषासह उत्सवस्थळी मिरवली जाते. ही पालखी मिरवणूक संपूर्ण उत्सव परिसरातून मार्गक्रमण करते.
प्रत्येक श्रद्धावानाला बापूंच्या या पवित्र पदचिन्हांवर आपले मस्तक ठेवून दर्शन घेण्याची संधी मिळते. या पवित्र पदचिन्हांवर मस्तक ठेवणे म्हणजे आपल्या प्रिय सद्गुरूंच्या प्रत्यक्ष चरणकमलांना नमन करण्यासारखेच आहे, अशी श्रद्धावानांची दृढ भावना असते.
अग्निहोत्र, अनिरुद्ध चलीसा पठण आणि उदी प्रसाद
गुरुपौर्णिमेच्या उत्सवस्थळी दिवसभर अग्निहोत्र अखंड प्रज्वलित असते. सर्व श्रद्धावानांना या पवित्र अग्निहोत्रात ऊद अर्पण करण्याची आणि स्वतःचे कल्याण, संरक्षण व सर्वांगीण हितासाठी प्रार्थना करण्याची संधी मिळते.
श्रद्धावानांचे ज्याच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रिय नाते आहे, अशा ‘श्री अनिरुद्ध चलीसा’चे दर तासाला अत्यंत भावपूर्णरीत्या पठण केले जाते. त्याचा लाभ सर्व श्रद्धावान अत्यंत आनंदाने घेतात.
या पवित्र दिवशी, सद्गुरु श्री अनिरुद्ध यांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली उदी श्रद्धावानांना प्रसाद म्हणून दिली जाते. रात्रौ साधारणपणे ९:३० वाजता महाआरतीने या उत्सवाची सांगता होते.
सद्गुरुंचा साधेपणा आणि गुरुपौर्णिमेचे सार
सद्गुरु श्री अनिरुद्ध श्रद्धावानांकडून कोणत्याही स्वरूपाची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, शुभेच्छापत्रे, फळे, हार, मिठाई, पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गोष्टी कधीही स्वीकारत नाहीत. बापू म्हणतात, ‘जर तुम्हाला मला काही द्यायचेच असेल, तर तुमची अर्धी पापे मला द्या, जेणेकरून तुमचे ओझे हलके होईल. तसेच, वर्षभरात तुम्ही केलेले नामस्मरण आणि पठण मला द्या, जेणेकरून उचित वेळी त्याचा उपयोग तुमच्याच हितासाठी होऊ शकेल.’
गुरुपौर्णिमा हा दिवस सद्गुरुंची कृपा आणि गुरुभक्तीचा आनंद लुटण्याचा दिवस आहे. सद्गुरुंप्रती मनापासून कृतज्ञता आणि अढळ श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सद्गुरु श्री अनिरुद्ध यांच्याप्रती प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, श्रद्धावान आपल्या लाडक्या सद्गुरूंच्या पवित्र सान्निध्यात गुरुपौर्णिमा साजरी करतात.
अशा प्रकारे, ऋणज्ञापक स्तोत्रातील "अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो" या भावनेला वाट करून देण्याचा आणि सद्गुरूंच्या कृपेखाली भक्तीच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करण्याचा एक प्रसंग म्हणजे गुरुपौर्णिमा होय.





















