त्रिविक्रम भक्तीभाव चैतन्य म्हणजे काय?
मुखात त्रिविक्रमाचा मंत्रगजर, हृदयात सद्गुरु त्रिविक्रमाविषयी सतत वृद्धिंगत होणारे प्रेम आणि त्यांच्या चरणकमलांची अखंड ओढ अर्थात त्याची सेवा करण्याची निरंतर तळमळ, यालाच ‘त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य’ असे म्हणतात.
बापू पुढे सांगतात:
कितीही बौद्धिक चिंतन किंवा सखोल अभ्यास केला, तरी त्याद्वारे त्रिविक्रमाला खऱ्या अर्थाने जाणून घेणे शक्य नाही. त्याला केवळ प्रेमाद्वारेच म्हणजेच त्याच्यावर आणि त्याच्या चरणकमलांवर प्रेम करूनच जाणता येते; आणि त्याच्याविषयी सतत वृद्धिंगत होणाऱ्या प्रेमाचे संवर्धन करीत राहणे, हेच ‘भक्तिभाव चैतन्य’ आहे. ज्याच्याकडे असा भक्तिभाव चैतन्य आहे, त्याच्या हृदयातच हा त्रिविक्रम वास करतो.
आयुष्यात इतर सर्व काही मिळाले तरी, जोपर्यंत ‘भक्तीभाव चैतन्य’ प्राप्त होत नाही, तोपर्यंत मिळालेल्या त्या गोष्टींचा खरा आनंद उपभोगता येत नाही. दुसरीकडे, जर एखाद्याकडे ‘भक्तीभाव चैतन्य’ असेल, तर ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, त्या देखील समाधान आणि आनंदाचे स्रोत बनतात.
दास्यत्व आणि सख्यत्व - खरी गुरूकिल्ली
स्वयंभगवान त्रिविक्रम हा भक्तीभाव चैतन्याचे सगुण साकार चिरंतन स्वरूप आहे.
जेव्हा एखादा भक्त ‘त्रिविक्रम हाच माझा देवाधिदेव, परमेश्वर आहे आणि मी त्याच्या चरणांचा दास आहे’, अशा अवस्थेत जगतो, तेव्हा त्या भक्ताचा प्रत्येक विचार, शब्द आणि कृती हे ‘भक्तिभाव चैतन्या’चेच मूर्तरुप असते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ‘हाच माझा इष्टदेव, माझा देवाधिदेव आणि माझा जन्मनायक आहे’, अशा अढळ श्रद्धेने ‘स्वयंभगवान त्रिविक्रमा’ला अर्पण केलेली नवविधा भक्तीपैकी कोणतीही एक, दोन, तीन, चार किंवा सर्वच्या सर्व रुपे म्हणजेच ‘भक्तीभाव चैतन्य’ होय.
खरोखर, केवळ ‘स्वयंभगवान त्रिविक्रम’ याच्याप्रती असलेले भक्तीभाव चैतन्य हेच एकमेव शाश्वत सत्य आहे; कारण आपल्या संपूर्ण जीवनाचा भार पेलण्याचे सामर्थ्य केवळ याच भावनेत आहे.
भक्तीभाव चैतन्याचा सार
ज्याप्रमाणे पवित्र गंगा नदीच्या तीरावर काशी, प्रयाग आणि हरिद्वार ही अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, त्याचप्रमाणे ‘भक्तिभाव चैतन्या’च्या गंगेच्या तीरावर ‘रामनाम’, ‘पंचाक्षरी शिवमंत्र’ (ॐ नमः शिवाय) आणि ‘सद्गुरूंच्या पवित्र चरणी पूर्ण शरणागती’ ही तीन पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत.
भक्तिभाव चैतन्यात आपल्याला फक्त जास्तीत जास्त मंत्रगजर करीत राहायचे असते आणि ‘त्या’चे प्रेम स्वीकारायचे असते.
भक्तीभाव चैतन्यात आपण ‘स्वयंभगवाना’चे दास म्हणून राहतो; आणि त्याचवेळी, अफाट सामर्थ्य असलेला व ‘अनिरुद्ध गती’ने (अखंड आणि न थांबणाऱ्या गतीने) संचार करणारा हा स्वयंभगवान आपला दास व आपला प्रिय सखा बनून राहतो.
उन्नतीचा मार्ग
‘भक्तीभाव चैतन्या’मुळे सांसारिक जीवन (worldly life) सुखाचा होतो, असंख्य अडथळे दूर होतात आणि आयुष्यात आपल्याला अनेक संधी व यश प्राप्त होते. भक्तिभाव चैतन्य हेच सर्वश्रेष्ठ तप आहे आणि याच्याच माध्यमातून ‘स्वयंभगवान’ आपल्या श्रद्धावानांच्या प्रेमापोटी आनंदाने जिंकले जाणे स्वीकारतो.
स्वयंभगवान त्रिविक्रम हा फक्त ‘भक्तिभाव चैतन्या’तच लिप्त होतो. तो पापाचे ‘पापत्व’ आणि पुण्याचे ‘पुण्यत्व’ या दोन्ही गोष्टींपासून अलिप्त असतो. जो कोणी भक्तिभाव चैतन्यात स्थीर असतो, त्याच्यासाठी उद्धाराचा मार्ग खुला होतो. सबुरीने प्रतीक्षा केल्यानंतर, स्वयंभगवान स्वतःच अशा भक्ताला पापमुक्त करतो. अशाप्रकारे कर्माच्या अटळ सिद्धांताचा प्रभाव क्षीण होतो आणि अखेरीस तो पूर्णपणे नाहीसा होतो.
ज्ञान, योग आणि कर्म
‘भक्तिभाव चैतन्य’ हे केवळ याच जन्माचे नव्हे, तर पुढील सर्व जन्म आनंदाने भरून टाकणारे सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे. हा जीवनाचा अत्यंत उदात्त आणि पवित्र मार्ग आहे. ही अशी एक पवित्र वृत्ती आहे जी योग, ज्ञान आणि कर्म या तीनही अत्यंत कठीण मार्गांना सुलभ करते आणि प्रत्येक ‘श्रद्धावाना’च्या जीवनात त्या सर्वशक्तिमान ईश्वराचे शाश्वत अस्तित्व प्रस्थापित करते. हाच ‘सच्चिदानंद धर्म’ आहे. म्हणजेच सत्य, चैतन्य आणि परमानंद यांवर अधिष्ठित असलेला जीवनमार्ग आहे.
‘मी त्या सर्व शक्तिमान भगवंताचा एक अंश आहे आणि तरीही कधीही वेगळा नाही’, हे सत्य आपल्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवण्याचा सर्वोच्च, अत्यंत सुलभ आणि सहज मार्ग म्हणजे भक्तीभाव चैतन्य.
आणि म्हणूनच, सर्व मानवांसाठी ‘स्वयंभगवाना’च्या दिव्य लीला हेच खरे ‘ज्ञान’ आहे; ‘भक्तीभाव चैतन्या’च्या मंत्रगजराने स्वतःला भगवंताशी जोडणे हाच खरा ‘योग’ आहे; आणि त्याच्यावर निरंतर प्रेम करत असतानाच आपली सर्व चांगली-वाईट कर्मे त्यांच्या चरणकमलांशी अर्पण करणे हेच खरे ‘कर्म’ आहे. या तीन सूत्रांनी समृद्ध असलेला ‘भक्तीभाव चैतन्य’ हा खरोखरच सर्व वृत्तीच्या मानवांसाठी, सर्व स्वभावाच्या व्यक्तींसाठी निश्चितपणे जीवन सुखी करणारा अद्वितीय मार्ग आहे.
मनुष्यामधील प्रत्येक प्रकारच्या उत्तम क्षमता आणि कौशल्य विकसित करणारे एकमेव अमृत (जीवनदायी रस) म्हणजे ‘भक्तिभाव चैतन्य’ होय.
स्वयंभगवान त्रिविक्रम, खरा स्वामी
‘‘सर्वव्यापी आकाशाच्या रूपात ‘स्वयंभगवान’ सर्वत्र आहेत; तो माझ्या आतही आहे आणि बाहेरही आहे’’ ही भावना जपणे म्हणजेच ‘भक्तिभाव चैतन्य’.
‘स्वयंभगवान त्रिविक्रम’ माझ्यावर जेवढे प्रेम करतो, त्याच्या एक दशांशही प्रेम, माझ्या असंख्य जन्मांतील सर्व आप्तांनी मिळून दिलेले नसते, हे जाणून ‘त्या’च्यावर भरपूर प्रेम करत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.
“मी केवळ माझ्या जीवनाच्या शेताची मशागत करणारा शेतकरी आहे आणि ‘स्वयंभगवान’ हाच त्याचा खरा स्वामी आहे,” अशी दृढ श्रद्धा हृदयात बाळगून मंत्रगजर चालू ठेवणे, हीच ‘भक्तिभाव-चैतन्य’ अवस्था होय.
हे ‘त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य’ म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाने भरभरून लुटून न्यावा, असा कधीही न संपणारा अक्षय्य खजिना आहे. हा खजिना मनसोक्तपणे लुटण्याचे स्वातंत्र्य आणि अनुज्ञा/परवानगी/मुभा स्वत: त्रिविक्रमानेच देऊनही ठेवलेली आहे.
श्रद्धावानांच्या जीवनात भगवंताचे पडणारे पाऊल म्हणजे ‘स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर’.
‘स्वयंभगवाना’चे जे रूप आपल्या हृदयाला सर्वाधिक प्रिय असते, तेच आपल्यासाठी त्याचे सर्वात सत्य रूप असते.
आपल्याला अत्यंत प्रिय असलेले ‘स्वयंभगवान त्रिविक्रमा’चे रूप, नाम आणि दिव्य लीला आपण आपल्या हृदयात साठवून ठेवल्या पाहिजेत आणि असीम भक्तीने त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. मात्र त्यासाठी, ‘त्या’ने दाखवलेल्या मार्गाचेच अनुसरण करत आपण त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालत राहिले पाहिजे.
जिज्ञासू ते श्रद्धावान
आदिमाता आणि दत्तगुरूंप्रती स्वयंभगवानाची भक्ती हीच मूळ भक्ती असल्याने, प्रत्येक भक्त कुठल्याही देवतेला अर्पण करतो, ती भक्ती शेवटी भक्तिभाव चैतन्यामध्येच विलीन होते.
जेव्हा भक्ताच्या हृदयात दास्य, सख्य आणि शरणागतीचे भाव - मग ते अधूनमधून का असेना - जागृत होऊ लागतात, तेव्हा स्वयंभगवान स्वतः त्या साधकाला भक्तीच्या मार्गावर वेगाने पुढे नेतो. तो अल्प-स्वल्प सेवा दशगुणे करून स्वीकारीत राहतो आणि त्यानंतर, अत्यंत कोमल हातांनी तो त्या साधकाला ‘श्रद्धावान’ बनवून, त्याला स्वत:चा मित्र बनवून अलगदपणे ‘भक्तीभाव चैतन्या’त आणून सोडतो.
श्रद्धावान बनण्यासाठी गरज असते फक्त एकच गोष्ट जाणण्याची - खरेखुरे १०८% प्रेम फक्त ‘स्वयंभगवाना’कडूनच मिळू शकते आणि हा स्वयंभगवान तसे प्रेम करण्यास सदैव आतुर असतो.
एकदा का हे सत्य उमजले की, मग तो भक्त ‘श्रद्धावान’ बनतो व ‘भक्तिभाव चैतन्या’त अर्थात आनंदसरोवरात निवास करू लागतो.
भक्तिभाव चैतन्य म्हणजे साक्षात स्वयंभगवानच आणि त्या भक्तिभाव चैतन्यात मग्न होऊन वास्तव्य करणे म्हणजे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या अनंत स्वरुपात वास्तव्य करणे होय. खरे तर, ही प्रत्येक जीवाची नैसर्गिक अवस्था आहे, कारण स्वयंभगवानाने सर्व विश्व व त्यातील अणूरेणूंमध्ये आधीच प्रवेश केला आहे आणि म्हणूनच त्याला ‘महाविष्णू’ म्हणतात. (संस्कृतमधील ‘विश्’ या धातूचा अर्थ ‘प्रवेश करणे’ किंवा ‘व्यापून राहणे’ असा होतो.)
संपूर्ण भगवद्गीता आणि संपूर्ण रामायण हे मूलतः ‘भक्तिभाव-चैतन्याचे’ म्हणजेच साक्षात ‘स्वयंभगवाना’चे ग्रंथस्वरुप आहे.
स्पंद शक्ती
या विश्वातील प्रत्येक देहाचे व प्रत्येक पदार्थाचे मूलभूत स्वरूप शक्तिमय अर्थात ‘स्पंद’रूपच आहे. त्यामुळे ह्या विश्वातील सर्व व्यवहार आणि सर्व कर्मे हीसुद्धा ‘स्पंद’रूपच आहेत.
मानव जे पुण्य करतो किंवा पाप करतो, ते पाप किंवा पुण्य हेसुद्धा स्पंदमयच असते आणि त्या पापाचे किंवा पुण्याचे फल अर्थात परिणामसुद्धा मूलतः ‘स्पंद’रूपच असतात.
एखाद्याच्या कर्मांच्या परिणामांतून निर्माण होणारे स्पंद प्रामुख्याने मनाद्वारे त्या व्यक्तीच्या ‘त्रिविध शरीरांमध्ये’ प्रवेश करून कार्यरत होतात किंवा त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या परिस्थितींत शिरून कार्य करतात. पापकर्मांचे स्पंद (पाप-स्पंद) विनाशकारी व हानिकारक परिणाम घडवून आणतात, तर पुण्यकर्मांचे स्पंद (पुण्य-स्पंद) विधायक, कल्याणकारी आणि फलदायी परिणाम करतात.
त्यामुळे पापकर्मांचा व त्यांच्या परिणामांचा नाश करण्यासाठी सुद्धा विशिष्ट स्पंदांचीच (Vibrations) आवश्यकता असते; फक्त सत्कर्मांतून निर्माण होणारी कंपने हे साध्य करू शकत नाहीत.
मात्र त्यासाठी भक्तिभाव चैतन्यात रहावे लागते व जेवढे गतजन्मींचे व ह्या जन्माचे पाप मोठे, तेवढे भक्तिभाव चैतन्यात राहणे कठीण बनते.
आणि नेमके याच ठिकाणी ‘स्वयंभगवान’ हस्तक्षेप करतो; पण कोणासाठी? केवळ अशा व्यक्तीसाठी, जी सर्व तर्क-कुतर्क बाजूला सारून स्वयंभगवानाला किंवा त्याच्या कोणत्याही रूपाला प्रेमाने शरण जातो.
म्हणूनच, साक्षात प्रेमस्वरूप ‘स्वयंभगवान’ आपल्या ‘भक्तिभाव चैतन्या’मध्ये सतत पवित्र स्पंद अखंड प्रवाहित करत असतो, जेणेकरून या भक्तिभाव चैतन्यात राहणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानासाठी या पवित्र स्पंदाची अक्षय समृद्धी सदैव उपलब्ध होऊ शकेल.
भक्तीभाव चैतन्याचा उगम
आता प्रश्न उरतो, या स्वयंभगवानाचे हे ‘भक्तिभाव-चैतन्य’ कसे निर्माण होते?
मनुष्य शोक कधी करतो? जेव्हा तो असहाय्यपणे दुःखाला सामोरा जातो तेव्हाच; आणि ही असहाय्यताच गतजन्मीच्या संचित पापांमुळे निर्माण होते.
मग शोक कधी नाहीसा होतो? जेव्हा एखादी व्यक्ती सामर्थ्य आणि दृढतेने संकटांना वा दुःखांना सामोरे जाण्यास सक्षम बनते, तेव्हा त्याचा शोक नाहीसा होतो. असे सामर्थ्य फक्त ‘भक्तीभाव चैतन्या’तून निर्माण होणाऱ्या शुद्ध आणि पवित्र स्पंदनांतूनच प्राप्त होऊ शकते.
सर्व मार्ग त्रिविक्रमामध्ये विलीन होतात
बापू पुढे लिहितात:
एखाद्याने राम, कृष्ण, विष्णू, शिव किंवा इतर कोणत्याही दैवी रूपाची पूजा करायची निवड केली तरी काहीच हरकत नाही. कारण परमात्म्याच्या व परमेष्टीच्या कुठल्याही रूपाचे भजन, पूजन, नमन, वंदन, तप, चिंतन, ध्यान, यज्ञ असे सर्वकाही दत्तगुरु, आदिपिता सहजशिव नारायण, आदिमाता जगदंबा नारायणी ह्या त्रि-नाथांनाच जाऊन पोहोचते.
परंतु कसे?
प्रत्येक भक्ताचे आणि त्याच्या इष्टदैवताचे वृद्धिंगत होत जाणारे नाते आणि त्या भक्ताचे वरील सर्व प्रयास हे शेवटी एकमेव ‘अंतिम सेतू’ असणाऱ्या स्वयंभगवान श्री त्रिविक्रमामध्येच विलीन होतात; आणि मग तो त्रिविक्रमच त्रि-नाथांना भक्ताचे सर्व प्रयास अर्पण करीत असतो.
