पवित्र ग्रंथांची दिंडी
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्वांना रसयात्रेचे आणि पवित्र ग्रंथ अत्यंत श्रद्धाभावाने वाहून नेणाऱ्या दिंडीचेही सखोल आध्यात्मिक महत्त्व सांगितले. महान संतांनी रचलेले पवित्र ग्रंथ हे निव्वळ धर्मग्रंथ नसून, त्यांच्या भक्ती, आध्यात्मिक अनुभवाचा आणि दिव्य ज्ञानाचा जणू साक्षात् सजीव आविष्कार आहेत, याची त्यांनी श्रद्धावंतांना जाणीव करून दिली. श्रीविठ्ठलाच्या भक्तीत जीवन समर्पित करणार्या संतांद्वारे विरचित ग्रंथ हे केवळ ग्रंथ नसून श्रद्धावानाच्या जीवनात गुरुस्थानी असणारे आहेत. स्वत: सद्गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या लेखनात, प्रवचनात अनेक संतवचनांचा उल्लेख करत असतात .या संतविरचित ग्रंथांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, साईसच्चरित, एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथांची दिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत सहभागी झालेले श्रद्धावान भक्त ‘जय जय रामकृष्ण हरि’, ‘ज्ञानोबा माऊली... तुकाराम’ यांसारखे गजर करत पालखीसह चालत होते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या सहभागाने सार्या भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. या दिंडीला पंढरपूरच्या वारीचे स्वरूप आले होते. प्रत्येक पाऊल हे संतांच्या चरणी अर्पण केल्यासारखे वाटत होते आणि त्यांच्या वचनांनी साधकांना परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखविला आहे, या भावनेने श्रद्धावान भक्तीने नाचत होते.
भक्तिरसाने भरलेली संध्याकाळ
संध्याकाळी सर्वांना ओली चिकणमाती दिली गेली. त्यापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका श्रद्धावानांनी बनविल्या. माती हळूहळू ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे रूप घेत असताना प्रत्येक श्रद्धावानाला संतांच्या विनम्रता, ज्ञान आणि अखंड भक्तीमय जीवनाशी एक व्यक्तिगत नाते जोडल्याची अनुभूती होत होती.
त्याच वेळी श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंत (श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर) यांचे नातू श्री. अप्पासाहेब दाभोलकर यांनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या आज्ञेनुसार त्याच पवित्र मातीपासून मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन केले. प्रत्येक श्रद्धावानाने स्वत: बनविलेल्या श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे अर्चनद्रव्याने पूजन केल्यानंतर त्या पादुका शिवलिंगावर अर्पण करण्यात आल्या. या पादुकांचे शिवलिंगावर अर्पण होणे हे भक्ती, ज्ञान आणि समर्पण यांच्या एकत्वाचे प्रतीक ठरले.
त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या गायत्री जपाचे सर्वांनी पठण केले. या पवित्र उपासनेदरम्यान सभागृह संत ज्ञानेश्वर गायत्री मंत्राच्या सामूहिक जपाने निनादून गेले. त्या जपाच्या स्पंदनांनी सर्वांच्या अंत:करणात शांतता आणि भक्तिभाव निर्माण झाला.
रात्री सत्संग झाला. हा सत्संग संपूर्ण रात्रभर रंगला होता. सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे मार्गदर्शन आणि त्यांचे सान्निध्य यांमध्ये सर्वजण इतके तल्लीन झाले होते की, जणू काळ थांबून राहिला होता. पहाटेच्या किरणांनी नव्या दिवसाची चाहूल दिली तेव्हाच हा सत्संग संपला.

आळंदी : भक्तीचा अखंड प्रवाह
रसयात्रेच्या दुसर्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, अजानवृक्ष, हैबतबाबांची समाधी ह्यांचे दर्शन घेण्यात आले. ही सर्व स्थळे संतांच्या चिरंतन वारशाची आणि वारकरी परंपरेची साक्ष देणारी होती.
यावेळी आळंदी संस्थानाकडून परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी अतिशय हृद्य आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या चारही भावंडांनी जगत्कल्याणासाठी वेचलेल्या कष्टांच्या व त्यांच्या भगवद्भक्तीच्या कथा सांगितल्या. त्यांच्या भक्ती, निःस्वार्थ सेवा, करुणा आणि आध्यात्मिक ज्ञानाने भरलेल्या जीवनातून भक्तीचा मार्ग पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतो.
संध्याकाळी अमृतमंथन उपासना झाल्यावर सर्वजण इंद्रायणी नदीच्या काठी गंगापूजन करण्यासाठी एकत्र जमले. इंद्रायणी म्हणजे आळंदीची गंगाच. येथे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वत: इंद्रायणीमातेचे पूजन करून दीपदान केले. त्यांनी प्रवाहित पाण्यात पहिला प्रज्वलित दीप अर्पण केला आणि त्यानंतर सर्व भक्तांनी इंद्रायणीच्या प्रवाहात प्रज्वलित दीप अर्पण केले.
असंख्य दीप इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगू लागले आणि संपूर्ण नदीकाठ भक्तीच्या सुंदर दृश्याने उजळून निघाला. जणू प्रत्येक दीप एक मूक प्रार्थना घेऊन प्रवाहित होत होता, प्रत्येक लाटेत दैवी कृपेचे प्रतिबिंब दिसत होते आणि प्रत्येक अंत:करण सद्गुरुंच्या प्रेमात व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादात न्हाऊन निघाले होते.
या रसयात्रेतील एक विलक्षण प्रसंग आजही त्या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या श्रद्धावानांच्या स्मरणात आहे. त्यामध्ये चौबळ आजोबा हे एक असे भाग्यवान भक्त होते, ज्यांना बालपणी श्रीसाईनाथांचा सहवास लाभला होता आणि त्यांच्या मांडीवर खेळण्याचेही भाग्य लाभले होते.
सर्व श्रद्धावानांनी आपापले प्रज्वलित दीप इंद्रायणीच्या प्रवाहात अर्पण केले. सर्व दीप नदीच्या प्रवाहाबरोबर सहजपणे वाहत गेले. मात्र चौबळ आजोबांनी अर्पण केलेला दीप एकटाच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हळूहळू जाऊ लागला, जणू एखाद्या अदृश्य दैवी शक्तीने तो ओढला जात होता.
हा प्रसंग तेथे उपस्थित असणार्यांसाठी केवळ एक विलक्षण दृश्य नव्हता; तो चौबळ आजोबांच्या अढळ श्रद्धेचा, निर्मळ भक्तीचा आणि श्रीसाईनाथांच्या अगाध कृपेचा हृदयस्पर्शी प्रत्यय होता.
भक्तीच्या वाटेवर - देहू
रसयात्रेच्या तिसर्या दिवशी सकाळी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची महती सांगितली व त्यानंतर तेथून सर्वजण देहूला निघाले. देहूला जाऊन सर्वांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मंदिर, वैकुंठगमनवृक्ष आदि स्थानांचे दर्शन घेतले. देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी. तेथील प्रत्येक स्थळ संत तुकाराम महाराजांच्या चिरंतन वारशाची आठवण करून देत होते. त्यांच्या अढळ श्रद्धेचे, लीनतेचे आणि श्रीविठ्ठलाच्या चरणी केलेल्या पूर्ण समर्पणाचे स्मरण श्रद्धावानांना होत होते. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी रसयात्रेचे महत्त्व नेमक्या शब्दात सांगितले.
‘रसयात्रा सुरू झाल्या. दरवर्षी एकेका ठिकाणी. पण आपल्या आयुष्यात रसयात्रा सतत नव्याने सुरू होते व चालूच राहते.’
या शब्दांत त्यांनी बाह्य तीर्थयात्रेपासून प्रत्येक साधकाने आयुष्यभर करावयाच्या अंतर्मुख प्रवासाकडे लक्ष वळवले. पुढे भक्तीचं महत्त्व सांगताना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘ज्ञान-विज्ञानकारिणी भक्ती’ असा अनोखा शब्दप्रयोग केला.
‘ज्ञान व विज्ञान एकत्र येणं आवश्यक आहे, म्हणजेच मला जे आवडते ते आणि जे सत्य आहे ते असं दोन्ही एकत्र यावं. वास्तव व इच्छा यांच्या द्वंद्वांमधून भय निर्माण होतं; तसं होऊ नये म्हणून ज्ञान व विज्ञान एकत्र यायला हवं आणि ते फक्त भक्तीनेच शक्य होतं.’
अशा शब्दांत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘ज्ञान-विज्ञानकारिणी भक्ती’ उलगडून दाखविली. याचा रसयात्रेशी असलेला संबंध सांगताना ते म्हणाले,
‘अशा भक्तिरसाची अखंड गंगोत्री म्हणजे ज्ञानदेव! संत ज्ञानेश्वरांनी समाजात भक्तिप्रेमाची ज्योत प्रकटविली. कर्मकांडात अडकलेल्या समाजाला एक लहानसा सूक्ष्म धक्का देऊन त्यांनी प्रत्येकाच्या अंतरंगात पवित्र स्पंदने निर्माण केली, ती आजही ही यात्रा करताना आपल्याला मिळालेलीच आहेत आणि आपण ती स्पंदनेबरोबर घेऊन जाणार आहोत.’
अशा शब्दांत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी या रसयात्रेच्या माध्यमातून भक्तांच्या जीवनात होणार्या सकारात्मक बदलाची जाणीव करून दिली. यानंतर परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी संत मुक्ताबाईंच्या ‘मुंगी उडाली आकाशी’ ह्या अभंगाचे निरूपण करताना सांगितले की,
‘मुंगी म्हणजे आपली श्रद्धा. जेव्हा ही श्रद्धा आपल्या अंतरंगात पूर्णत्वाला जाते, तेव्हा तिचे सामर्थ्य खूप मोठे होते.’
शेवटी त्यांनी आपल्या आवडत्या काव्याच्या दोन ओळी म्हटल्या,
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेणार्याने एक दिवस देणार्याचे हात घ्यावे.’
याचे स्पष्टीकरण करताना त्यांनी सांगितले की, दान देणार्याप्रमाणेच घेणार्याचे हातही दानी व्हावेत. म्हणजे ज्याला मिळाले आहे त्यानेही एक दिवस देणार्याप्रमाणे देण्यासाठी आपले हात योग्य बनवावेत.












