दसऱ्याचे (विजयादशमीचे) सखोल महत्त्व
आपल्या एका प्रवचनात सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी विजयादशमी, म्हणजेच दसऱ्याचे खरे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले आहे.
त्यांनी सांगितले की, हा पवित्र दिवस ‘सीमोल्लंघन’ दर्शवतो—म्हणजेच सीमारेषा ओलांडणे. मात्र सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी स्पष्ट केले की, याचा अर्थ नैतिक किंवा सदाचाराच्या मर्यादा ओलांडणे असा नाही. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मर्यादांचा विस्तार करणे, भीती, शंका आणि न्यूनगंडाने स्वत:च स्वतःभोवती उत्पन्न केलेल्या अडथळ्यांच्या पलीकडे जाणे आणि त्याचबरोबर आपल्या क्षमता व कौशल्यामध्ये सातत्याने वाढ करणे. अशी वाढ - प्रगती आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.
सीमोल्लंघनाबरोबरच सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी दसऱ्याच्या दिवशी ‘सिंहावलोकन’ करण्याचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. ‘सिंहावलोकन’ या शब्दाचा सरलार्थ आहे—‘सिंहाने मागे वळून पाहणे’. सिंह पुढे जात असताना अधूनमधून थांबून मागे वळून पाहतो; ते भीती किंवा अनिश्चिततेमुळे नव्हे, तर आपल्या मार्गाची पूर्ण जाणीव, आत्मविश्वास आणि मार्गावरील प्रभुत्व असल्यामुळे.
त्याचप्रमाणे, सिंहावलोकन म्हणजे जागरूकता, प्रामाणिकपणा आणि विवेकाने आपल्या भूतकाळाकडे पाहणे. आपल्या जीवनप्रवासाचा आढावा घेणे, पूर्वानुभवांतून शिकणे, आपली सामर्थ्यस्थाने आणि उणिवा ओळखणे आणि आपली प्रगती तपासणे, यासाठी ही एक संधी असते. हे करताना इतरांशी स्वतःची तुलना न करता, आपल्या स्वतःच्या वास्तविक क्षमतेच्या तुलनेत आपण स्वतःचे मूल्यमापन करावे.
दसरा उत्सव - शक्ती आणि भक्तीचा उत्सव
श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनतर्फे दरवर्षी श्री हरिगुरुग्राम येथे भक्तिमय वातावरणात ‘दसरा उत्सव’ साजरा केला जातो. या पवित्र दिवशी आध्यात्मिक आणि सांसारिक जीवनातील यश व संतुलन प्राप्त करण्यासाठी श्रद्धावान ‘विजयोपासना’ करतात. या उपासनेदरम्यान सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी पुनरुज्जीवित केलेल्या ‘प्राचीन भारतीय युद्धकलां’मधील शस्त्रांचे पूजन केले जाते. यांमध्ये मुद्गल, फरी, गदा, जोडकाठी, लाठी आणि काठी आदींचा समावेश असतो.
दसरा उपासनेदरम्यान
“ॐ सामर्थ्यसिंधु महाबलोत्कट श्री अनिरुद्धाय नमः”
या मंत्राचा श्रद्धापूर्वक उत्कटतेने जप केला जातो. त्याचबरोबर
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”
या गजराने आणि इतर पवित्र स्तोत्रांनी वातावरण भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरून जाते.
दसरा (विजयादशमी) - घरी करावयाचे पूजन
दसरा किंवा विजयादशमीच्या दिवशी श्रद्धावान, सद्गुरु बापूंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार ‘श्री महासरस्वती’ माता आणि ‘श्री सरस्वती’ माता यांचेही पूजन करतात.
दोन्ही देवतांची प्रातिनिधिक चिन्हे दगडी पाटीवर एकमेकांशेजारी काढली जातात. (आजच्या काळात ते व्हाईटबोर्डवर, मोबाईल फोनवर किंवा टॅबलेटवरही काढता येते.) त्यानंतर फुले व ‘आपट्याच्या झाडाची’ पाने अर्पण करून भक्तिभावाने त्यांची पूजा केली जाते. ही दोन्ही चिन्हे प्रेम आणि ज्ञान, भक्ती आणि प्रज्ञा यांच्या दिव्य संयोगाचे प्रतीक आहेत आणि संतुलित व परिपूर्ण जीवनासाठी या दोन्हींचे महत्त्व आहे.
सद्गुरु बापू सांगतात की, आपण आपले स्वतःचे भाग्य घडवतो आणि या सर्जनशील प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा याच चिन्हांमधून निर्माण होते.
त्यामुळे दसरा हा केवळ बाह्य विजयाचा उत्सव न राहता, अंतर्मनामध्ये श्रद्धेचा भीतीवर, ज्ञानाचा संभ्रमावर आणि शारण्याचा अहंकारावर अंतर्मनातील विजय साजरा करणारा उत्सव ठरतो.













