आपल्या पवित्र सनातन धर्मातील विविध संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांमध्ये, भगवंताशी असलेल्या आंतरिक बंधाचे वा नात्याचे दृश्य प्रकट स्वरूप म्हणून भक्त पवित्र लॉकेट, ताईत किंवा पदक आपल्या गळ्यात घालतात. त्यावर आपल्या इष्टदेवतेची किंवा सद्‍गुरुंची प्रतिमा असते किंवा एखादे पवित्र चिन्ह असते. अशी लॉकेट्स ही केवळ आभूषणे नसून ती श्रद्धा, भक्ती आणि आपलेपणाचे द्योतक आहे.

आध्यात्मिक लॉकेट परिधान करणं कोणावरही लादले जाऊ शकत नाही; तो स्वेच्छेने स्वीकारलेला एक बंध आहे. हे भक्ताने ईश्वरावर विश्वास ठेवण्याच्या आणि गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याच्या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचे द्योतक आहे. ज्याप्रमाणे लग्नाची अंगठी एका पवित्र नात्याचे प्रतीक असते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक लॉकेट हे भक्ताच्या ईश्वराशी असलेल्या चिरंतन नात्याचे प्रतीक असते.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या श्रद्धावानासाठी, हा पवित्र बंध इतर गोष्टींबरोबरच या त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेटमधूनही व्यक्त होतो. त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे केवळ एक पवित्र आभूषण नाही, तर ते भगवंताप्रती व सद्‍गुरुंप्रती असलेले प्रेम आणि विश्वास, सबुरी आणि निष्ठा, अनन्य भाव आणि समर्पण अशा विविध भावनांचे प्रतीक आहे. असंख्य श्रद्धावान आपल्या गळ्यात घातलेले हे लॉकेट अत्यंत दृढ श्रद्धा, आदर आणि भक्तीने जपतात, कारण ते त्यांना सतत आठवण करून देते की सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू नेहमी त्यांच्या पाठीशी आहेत आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे संरक्षण करत आहेत.

हे लॉकेट म्हणजे प्रत्यक्षात त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आहे, ज्याचे आध्यात्मिक महत्त्व विस्तृतपणे श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराज अर्थात सत्यस्मृती यांच्या पहिल्या खंडात म्हणजे 'सत्यप्रवेश' मध्ये स्पष्ट केले आहे. हे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह; मन, प्राण आणि प्रज्ञा या मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी निगडित असणार्‍या तीन मूलभूत तत्त्वांच्या सुंदर समन्वयाचे प्रतिनिधित्व करते. मनात निर्माण होणार्‍या आपल्‍या विचारांवर विवेकबुद्धीने घेतले जातात आणि प्राणशक्तीच्या आधारे कृती घडतात. या तिन्हींच्या समन्वयानेच आपले जीवन संतुलित व अर्थपूर्ण होते.

The Tripurari Trivikram Emblem
त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह

त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेटचे महत्त्व

आदर्श आध्यात्मिक स्थितीत मनः, प्राण आणि प्रज्ञा यांच्यात पूर्ण एकतानता/ एकात्मकता असते. मात्र, मनुष्य जेव्हा अहंकार, नकारात्मकता, भीती, इच्छा आणि भगवंताचे विस्मरण यांमध्ये भरकटतो, तेव्हा ही एकतानता बिघडते. मन अस्वस्थ होते, विवेकबुद्धी क्षीण होते आणि प्राणशक्तीचा र्‍हास होतो. या असंतुलनातून दुःख, संभ्रम, चिंता आणि आध्यात्मिक बळ कमी होते आणि अखेरीस जीवनातील अडथळ्यांचे/ संकटांचे ते मूळ कारण ठरते.

त्रिपुरारी त्रिविक्रमचे चिन्ह आपल्याला हा हरवलेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याची सतत आठवण करून देते. ते आपले मन शुद्ध करण्यासाठी, योग्य आकलनाने बुद्धीला अधिक प्रगल्भ व सामर्थ्यवान बनविण्यासाठी तसेच भक्ती, सदाचरण व सद्‌गुरुकृपेच्या माध्यमातून प्राणशक्तीला ऊर्जावान करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देते. म्हणूनच हे लॉकेट केवळ धारण करण्याचे प्रतीक नसून जीवनात आचरणात आणण्याचा एक आध्यात्मिक आदर्श आहे.

त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट धारण करून श्रद्धावान हे सामंजस्य टिकवून ठेवण्याचा आणि या तीनही गोष्टी सद्‌गुरुंच्या चरणकमलांवर अर्पण करण्याचा मनोमन संकल्प करतो. माझे मन, प्राण आणि प्रज्ञा हे माझ्या सद्‍गुरुंच्या चरणकमलांवर समर्पित आहेत, हा श्रद्धावानांच्या अंतर्मनातील भाव व्यक्त करणारे ते एक प्रतीक आहे.

केवळ चिन्ह म्हणून परिधान करण्यापेक्षाही अधिक हा शरणागतीचा भाव आहे. सद्‍गुरुंच्या चरणकमलांवर केलेले पूर्ण समर्पण आणि आपले जीवन त्यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली आणि प्रेमळ अधिकाराखाली स्वेच्छेने सोपवणे, सद्‍गुरु हेच माझे एकमेव आश्रयस्थान आणि रक्षक म्हणून मनापासून स्वीकारणे, हे श्रद्धावानाचा शारण्यभाव प्रतिबिंबित करते. समर्पणाच्या याच भावनेने, श्रद्धावान दैनंदिन जीवनात बापूंच्या आश्वासक अस्तित्वाची अनुभूती घेतो, आणि बापूंशी असलेल्या अतूट नात्यातून श्रद्धावानाला सामर्थ्य, धैर्य आणि स्थैर्य प्राप्त होते.

त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट परिधान करणे म्हणजे सद्‍गुरुंचे अस्तित्व हृदयाजवळ बाळगणे होय. हे प्रत्येक श्रद्धावानाला आश्वस्त करते की जीवन कुठेही घेऊन गेले तरी बापू, बापू आपल्या सोबतच असतात, आपले रक्षण करण्यासाठी, उचित मार्गदर्शन करण्यासाठी, बळ देण्यासाठी आणि प्रेमाने मला परमेश्वरी मार्गावर घेऊन जाण्यासाठी!

अनिरुद्ध बापू : अनुभवाचे कथन - कांचन मोरे

त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेटचे सर्व अनुभव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Tripurari Trivikram Locket
Tripurari Trivikram Locket