विठ्ठलाचे आध्यात्मिक महत्त्व आणि स्वरूप
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्या अनेक प्रवचनांमधून, अग्रलेखांमधून त्यांच्या कुटुंबात पूर्वापार चालत आलेली विठ्ठलभक्ती व विठ्ठलाची वारी तसेच संतांबद्दल, त्यांच्या अभंगांबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल अनेकवेळा सांगितले आहे. भक्त या विठ्ठलाला आपला ‘कैवारी’ व ‘मायबाप’ मानतात. संत ज्ञानेश्वर विठ्ठलाचा उल्लेख ’बापरखुमादेवीवरू’ असा करतात आणि संत जनाबाई विठ्ठलाला प्रेमाने ’विठू माझा लेकुरवाळा’ असेही म्हणतात.
’विठो वाही शिरी कैलासीचा राणा’ या उक्तीनुसार विठ्ठल म्हणजेच ’हरी’चे एक रूप आपल्या मस्तकावर शिवलिंग म्हणजेच ’हर’ धारण करते.
म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथील श्रीत्रिविक्रम लिंगावर भक्तीभावाने श्रीविठ्ठलाला प्रिय असलेले तुळशीपत्र अर्पण करतात.
२०१३ मधील अविस्मरणीय अनुभव
२०१३ मध्ये आषाढी एकादशीच्या पावन दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांना मुंबईतील वडाळा येथील जुन्या आणि प्रसिद्ध श्रीविठ्ठल मंदिरात श्रीविठ्ठल आणि श्रीरखुमाईच्या पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
लहाणपणी परळ येथे रहात असताना या मंदिरात बापू आपल्या आजीबरोबर अनेकदा यायचे. येथेच वयाच्या आठव्या वर्षी बापूंची भेट साधनाताई उपाध्ये यांच्याशी झाली. तेव्हा बापूंनी त्यांना एक मोरपीस दिले होते. यासंबंधीचा साधनाताई उपाध्ये यांच्या मुलाने सांगितलेला अनुभव आपण साईनिवासवरील चित्रफितीमध्ये पाहू शकतो.
पंढरपूर भावयात्रा २००१
चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले श्री क्षेत्र पंढरपूर हे असे ठिकाण आहे जिथे भगवंत स्वतः आपल्या निस्सीम भक्त पुंडलिकाला भेटायला आले होते. ’आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी’ अशी पंढरीची ख्याती आहे. अशा या पंढरपूरच्या पावन नगरीत २००१ साली सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी भावयात्रेचे आयोजन केले होते. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि गोवा येथील मंगेशशांतादुर्गा अशा चार रसयात्रा झाज्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी या भावयात्रेची घोषणा केली होती.
“पंढरपूर येथे विठ्ठलाबरोबर आपल्याला मिळणारे सोळावे ऐश्वर्य म्हणजे भक्ती होय. संतांचे असे मानणे आहे की पंढरपूर हे त्यांचे माहेर आहे, चंद्रभागा ही त्यांची बहीण आहे आणि पांडुरंगाचा परमभक्त पुंडलिक हा त्यांचा बंधू आहे. भक्त पंढरीच्या वाटेवर चालतो तो केवळ माहेरी पोहोचण्यासाठी म्हणजेच भक्ती या सोळाव्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी. परमेश्वर आणि भक्त यांच्यामधील एकमेव दुवा भक्ती आहे, याशिवाय दुसरे काहीही नाही.” असे बापूंनी पंढरपूर भावयात्रेचे वैशिष्ट्य सांगताना म्हटले होते.

निःस्वार्थ सेवाभाव म्हणून भक्ती
बापूंनी आपल्या सत्यप्रवेश या पहिल्या ग्रंथात लिहिले आहे की,
“भक्ती ही ‘भाव’ हे हृदय असणारी, नित्य वाढत असणारी अंतरंगी प्रेमशक्ती आणि सस्नेह सेवा आहे.”
म्हणून भगवंताचे भजन, कीर्तन, नामस्मरण करण्यासोबतच श्रद्धावान प्रेमाने भक्ती सेवेत सहभागी होतात.
आपत्ती व्यवस्थापन सेवा (AADM)
पोलीस आणि प्रशासनाच्या विनंतीवरून, 'अनिरुद्धाज्अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट'चे (AADM) आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक (DMVs) पंढरपुरात निरपेक्ष भावनेने आषाढी एकादशीसाठी चोवीस तास लोकसमूहाच्या व्यवस्थापनाची सेवा देतात. हा उपक्रम सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार राबवला जातो. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांची गर्दी व्यवस्थित आणि सुरक्षितपणे नियंत्रित करून, येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन सहज व सुलभ करून देण्याचे कार्य आपले स्वयंसेवक भक्तिभावाने पार पाडतात.
या सेवेमुळे केवळ भाविकांचाच नव्हे, तर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि मंदिर व्यवस्थापनाचाही मोठा भार हलका होतो. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिएमव्हिज्च्या भक्तिमय व शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले आहे. सद्गुरु अनिरुद्धांच्या भक्तीप्रेमाखातर या सेवेत सहभागी होणाऱ्या श्रद्धावानांसाठी ही सेवा म्हणजे भक्तिभाव चैतन्याचा (Devotion Sentience) एक आविष्कार आहे, अशी प्रत्येकाची भावना आहे.
अनेक श्रद्धावान या दिवशी प्रेमाने व भक्तिभावाने स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाच्या सार्वभौम मंत्रगजराच्या १६ माळा करतात व ही उपासना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी अर्पण करतात.
रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था
सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामाRama Rama Atmarama Trivikrama Sadgurusamartha
Sadgurusamartha Trivikrama Atmarama Rama Rama





















