'अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी' ही अनिरुद्ध बापू अँड ऑल (मराठी) या यु-ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेली व्हिडिओ मालिका आहे. ही व्हिडिओ मालिका म्हणजे गोड आठवणी, जिव्हाळा आणि निरंतन भक्तीचा एक अविस्मरणीय प्रवास आहे. या मालिकेच्या माध्यमातून सद्‍गुरु अनिरुद्ध बापूंच्या कार्याच्या सुरुवातीच्या काळातील गोड आठवणी पुन्हा जाग्या होतात. १९९६ पासून सुरू झालेल्या त्यांच्या कार्याच्या या जडणघडणीच्या काळात बापूंचा जवळून अनुभव घेतलेल्या श्रद्धावानांच्या शब्दांतून आणि भावनांतून हा प्रवास उलगडत जातो.

काळ जसजसा पुढे गेला, तसतशी बापूंच्या श्रद्धावान मित्रांची संख्या अनेक पटींनी वाढत गेली. सुरुवातीच्या त्या काळाचा अनुभव घेतलेले श्रद्धावान या अद्भुत विस्ताराचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. सुरुवातीच्या काळात 'श्रीसमर्थ व्यायाम मंदीर' येथे मोजकेच श्रद्धावान प्रवचनांना उपस्थित राहत असत. तेथून आज बापूंचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार्‍या श्रद्धावानांच्या अथांग सागरापर्यंतचा हा प्रवास त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर घडताना अनुभवला आहे. त्या काळातील तरुण श्रद्धावान आता वयाने मोठे झाले आहेत आणि आज त्यांच्याकडून बापूंबद्दल अधिक जाणून घेणे खरोखरच आपले जीवनही समृद्ध करणारे आहे.

या श्रद्धावानांचे आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे, कारण बापूंची प्रवचने सर्वप्रथम ऐकणार्‍या आणि बापूंवर पूर्णपणे व कोणत्याही शंकेविना विश्वास ठेवणार्‍या पहिल्या काही श्रद्धावानांपैकी हे होत. याच श्रद्धावानांनी १९९६ मध्ये सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या कृपाशीर्वादांचे आपले अनुभव प्रेमाने संकलित करून एका विशेष प्रकाशनाच्या रूपाने प्रसिद्ध करण्याचा पुढाकार घेतला. हे सर्व अनुभव एकत्रितपणे सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या अगाध कृपेच्या वैभवाचा एक प्रत्ययकारी पुरावा बनले. बापूंचे अकारण कारुण्य, असीम कृपा आणि लाभेवीण प्रेमाने परिवर्तीत झालेल्या असंख्य श्रद्धावानांचा हा अनमोल खजिना आहे.

'अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी'च्या माध्यमातून आपण त्या समर्पित श्रद्धावानांना भेटतो, जे बापूंच्या कार्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या सोबत होते आणि ज्यांचा हा प्रवास आजही बापूंसोबत आनंदाने सुरू आहे. ते बोलू लागतात आणि आठवणी उलगडत जातात, ते जादुई क्षण पुन्हा जिवंत होतात, तरल भावना पुन्हा जाग्या होतात आणि त्यांचं मौनच खूप काही बोलून जातं. त्यांचा आवाज कातर होतो, डोळ्यांत अश्रू तरळतात कारण हृदयाने ते त्या काळात हरवून गेलेले दिसतात. त्याकाळी बापूंच्या भोवती फारच मोजकी मंडळी असत आणि बापूंभोवती घोळका करून बापूंशी सहज संवाद साधू शकत.

अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी

पहिला भाग - प्रथम पाहिले तुला

मालिकेमधील पहिला भाग गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे प्रदर्शित करण्यात आला. या भागाचा विषय होता "प्रथम पाहिले तुला".

या भागामध्ये जुन्या, जाणत्या आणि निष्ठावान श्रद्धावानांनी त्यांच्या अनमोल आठवणी, विशेषतः बापूंशी झालेली त्यांची पहिली भेट सांगितली आहे. काही जणांची बापूंशी प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांचा संवाद झाला; काहींना दर्शनातून त्यांचा अनुभव आला; काहींनी त्यांना फोटोच्या माध्यमातून प्रथम पाहिले; तर काहींच्या जीवनाला एका विलक्षण अनुभवाने वेगळे वळण मिळाले. अशा सर्व अंतःकरणाला स्पर्श करणार्‍या कथनांना या व्हिडीओमध्ये एकत्र आणण्यात आले आहे आणि त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत ऐकतांना आपणही भावविभोर होऊन जातो. त्यांचे हे कथन केवळ एखादी कथा सांगणे नाही; तर ती प्रेम, कृतज्ञता आणि आदराने आनंदाने ओतप्रोत भरलेली आठवण आहे.

या प्रक्षेपणाचा उपस्थित श्रद्धावानांवर खूप खोल प्रभाव पडला. श्रीहरिगुरुग्राम येथील सभागृह नि:शब्द, साश्रू आणि प्रेमाच्या उत्कट भावनेने भरून गेले होते. उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे अंतःकरण बापूंसोबतच्या त्यांच्या स्वतःच्या पहिल्या भेटीच्या क्षणात परत गेले. जणू काही प्रत्येक व्यक्ती तो दिवस पुन्हा जगत होती जेव्हा बापूंनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि नकळतपणे सर्वकाही बदलून टाकले.

ही भावना केवळ श्रीहरिगुरुग्रामपुरती मर्यादित राहिली नाही. सोशल मिडीयावर श्रद्धावान #Pratham Pahile Tula या हॅशटॅगखाली एकत्र आले आणि बापूंशी पहिल्यांदा झालेल्या आपल्या भेटीच्या आठवणी सांगू लागले. एखाद्या फोटोच्या माध्यमातून, बापूंच्या अलौकिक दर्शनातून किंवा त्यांच्या उपस्थितीचा जाणवलेला, पण दिसून न येणारा तरीही स्पष्ट असा अनुभव असो, प्रत्येकाच्या कथनात कृतज्ञता, विस्मय आणि प्रेमाचीच भावना उमटलेली होती. कारण बापू जेव्हा एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतात, तेव्हा त्याचे स्वरूप (प्रत्यक्ष दर्शन, फोटो किंवा अनुभव.....) वेगवेगळे असू शकते; पण त्यातून आपल्या आयुष्याला निश्चितच कलाटणी मिळते.

बापूंसोबत शिर्डी रसयात्रा - १९९६

मालिकेतील अलीकडील भागांमध्ये १९९६ मध्ये झालेल्या शिर्डी रसयात्रेला उजाळा देण्यात आला. त्या वेळी केवळ सुमारे शंभर श्रद्धावान बापूंसोबत शिर्डीला गेले होते. जे या रसयात्रेचे साक्षीदार होते त्यांच्यासाठी हा अनुभव खरोखरच अनोखा होता. बापू स्वतः पुढे चालत त्यांना मार्गदर्शन करत शिर्डीच्या पवित्र स्थळांचे दर्शन घडवत होते. बापूंच्या निकट, त्यांच्या सान्निध्यात रहाण्याचा तो अनुभव होता. आज अशा अनुभवाची केवळ कल्पनाच करता येते; आता तसे पुन्हा घडणे अशक्य वाटते.

या व्हिडिओमध्ये त्यांच्या आठवणी अत्यंत मनाला भिडतील अशा पद्धतीने उलगडल्या आहेत. त्यांचे अनुभव, हृदयाला भिडणारी कथनं, बापूंसोबतचा त्यांचा संवाद आणि बापूंचा त्यांच्याशी झालेला संवाद - प्रत्येक क्षण ऐकण्यासारखा आणि मनात जपून ठेवण्यासारखा आहे. येणार्‍या काळात ही मालिका अधिकाधिक विस्तारत जाईल आणि अशा अनेक अज्ञात, परंतु अत्यंत मौल्यवान क्षणांना समोर आणत राहील. ज्यांच्याबद्दल कदाचित आपल्याला माहितही नसेल; पण या आठवणींच्या माध्यमातून ते अनुभवायला आपल्याला नक्कीच आवडेल.

ही मालिका आपल्याला खात्री देते की काळ बदलला, वय वाढले आणि श्रद्धावानांचा परिवार वाढू लागला तरीही बापूंचे त्यांच्या श्रद्धावानांवरील प्रेम हे निरंतर, शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी त्या मोजक्या श्रद्धावानांवर जो प्रेमाचा वर्षाव केला तेच प्रेम आजही आपण सर्वजण अनुभवत आहोत.

'अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी' हा बापू आणि त्यांचे श्रद्धावान यांच्यातील चिरंतन बंधाचा एक हृदयस्पर्शी गौरव आहे तसेच बापूंचे स्मरण करण्याचे, त्यांना अनुभवण्याचे आणि आजही आपल्याला बापूंकडे खेचून नेणार्‍या त्या भावनांशी पुन्हा जोडले जाण्यासाठी एक हळुवार निमंत्रण आहे.

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंसाठी हे श्रद्धावान केवळ सुरुवातीच्या काळातील अनुयायी नव्हते; तर बापूंसोबत सोबत चालणार्‍या आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणार्‍या मोजक्या व्यक्तींमधील ते होते. बापूंचे कार्य असंख्य हृदयांपर्यंत पोहोचण्यापूर्वी या श्रद्धावानांनी बापूंवर अढळ विश्वास ठेवला. त्या जडणघडणीच्या काळात त्यांची अविचल भक्ती, विश्वास आणि खंबीर साथ यांमुळे बापूंच्या हृदयात त्यांना एक आगळे आणि जिव्हाळ्याचे स्थान प्राप्त झाले आहे.