श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज
आपल्यापैकी बहुतेक जणांचा अध्यात्माकडे कल असतो. केवळ कल असतो असे नाही, तर अनेकांना अध्यात्मात खरोखरच रस असतो. मात्र आपल्यापैकी बहुतेकांना काही मूलभूत प्रश्न समजत नाहीत आणि जर ते प्रश्न आपल्याला समजलेचं नाहीत, तर आपण त्यांची उत्तरे कशी शोधणार आणि त्याच बरोबरीने अनेक ग्रंथ असा दावा करतात की त्यांनी स्वतः मांडलेले सत्य हेच केवळ एकमेव सत्य आहे. असे ग्रंथ आपला आध्यात्मिक मार्ग अधिकच कठीण करतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिखीत ’श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’चे तीन खंड आपल्याला केवळ मार्गदर्शनच करत नाहीत, तर धैर्य, सामर्थ्य आणि भगवंताला शोधण्याचा सुस्पष्ट नकाशा आपल्या हातात देतात, आपल्या जीवनात शांती व आनंद प्रदान करतात आणि त्याचबरोबर आपल्या बहुतेक प्रश्नांची सोप्या आणि सुंदर भाषेत उत्तरे देतात.
“मधमाशी जशी विविध फुलांमधील मध पोळ्यात साठवते, त्याप्रमाणे अनेक ऋषी, मुनी, आचार्य, संत, तत्वज्ञानी महापुरुष व सामान्य जनांच्या चिंतनपुष्पातून मी हा मध गोळा केला व ह्या 'श्रीमद्पुरुषार्थः (अर्थात् 'सत्यस्मृतीः)' पोळ्यात एकजीव केला" असे सद्गुरु अनिरुद्ध बापू या ग्रंथात लिहीतात.
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज — प्रथम खंड — ‘सत्यप्रवेश’
या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजातील हा पहिला खंड 'सत्यप्रवेश', आपल्या जीवनप्रवासात निर्मळ शांती आणि निर्भेळ आनंद साध्य करून घेण्यासाठी जरूरी असणारी मूलभूत व आवश्यक तत्त्वे, पद्धती आणि शुद्ध व प्रगल्भ ज्ञान याबद्दल अधिक सविस्तर विवरण करून सांगतो आणि त्याच वेळी आपल्याला आपल्या इष्ट देवतेच्या (म्हणजेच आपल्या लाडक्या भगवंताच्या) अस्तित्वाची जाणीव करून देतो.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज — द्वितीय खंड — ‘प्रेमप्रवास’
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’च्या तीन खंडांमधीलल दुसरा खंड, ‘प्रेमप्रवास’, म्हणजे दत्तगुरू आणि परांबा परमेश्वरी यांच्याकडून प्रत्यक्ष लाभलेल्या आणि अविरतपणे प्रवाहित होणाऱ्या निरपेक्ष, निर्मळ आणि दिव्य प्रेमाची एक पवित्र नदी आणि अथांग महासागर आहे. दत्तगुरूंच्या आज्ञेने आणि परांबा परमेश्वरीच्या इच्छेने हेच पवित्र प्रेमजल आता सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध आणि सहज साध्य झाले आहे, जेणेकरून प्रत्येक खरा श्रद्धावान या कामधेनूच्या सर्वोच्च क्षीरसागरात (कामधेनूच्या दुधाच्या महासागरात अर्थात् भक्तिभाव चैतन्याच्या या महासागरात) स्वतःला पूर्णपणे चिंब भिजवून घेऊ शकेल.
तुम्ही हा ग्रंथ वाचा आणि तुम्हाला हे प्राप्त होईल.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज — तिसरा खंड — ‘आनंदसाधना’
प्रत्येक जन्मातील आपले संपूर्ण जीवन हे प्रत्यक्षात, म्हणजेच खऱ्या अर्थाने आपली साधनाच आहे; म्हणजेच आदिमाता आणि तिचा पुत्र यांच्या चरणकमलांशी एकरूप होण्याचा आपला आध्यात्मिक प्रवास आहे.
’श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’च्या तीन खंडांमधील तिसरा खंड ‘आनन्दसाधना’ हा परमानंद प्राप्त करण्यासाठी, जीवन सुंदर बनविण्यासाठी आणि आपल्या विश्वाला अधिक मंगलमय करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पद्धती, मार्ग आणि साधनांचा अमूल्य खजिना आहे.
आनंदसाधनाच्या प्रत्येक पानामध्ये दत्तगुरू, परांबा परमेश्वरी आणि स्वयंभगवान यांची कृपा, आशीर्वाद आणि अगणित वरदानांचा दिव्य खजिना भरून राहिला आहे.
आनन्दसाधना हा सर्वांसाठी एक दिव्य वृक्ष आहे – आपल्या स्वतःच्या अंगणात किंवा बागेत उभा असलेला एक कल्पतरू आहे.
उपासना अर्थात् साधना हा असा वृक्ष आहे, ज्यावर चढणे अत्यंत सोपे आहे आणि त्याचे फळ म्हणजे आनंद. श्रीहरिगुरूंच्या प्रेमाने आणि आधाराने परिपूर्ण असलेला निर्मळ, शुद्ध आणि परिपूर्ण आनंद.

मातृवात्सल्यविंदानम् (श्री जगदंबा चरित्र)
मातृवात्सल्यविंदानम् हा सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला एक अमोल आध्यात्मिक ग्रंथ आहे. आदिमाता महिषासुरमर्दिनी चंडिकेच्या अमर्याद मातृप्रेमाचे मूर्तिमंत स्वरूप आहे. भक्तांना तिच्या दिव्य कार्याची, स्वरूपाची आणि अवतार उद्देशाची केवळ ओळख करून देत नाही तर त्यापलिकडेही हा ग्रंथ श्रद्धावानांना तिच्या निरपेक्ष प्रेमाचा अनुभव घेण्यास आणि तिच्या मातृमय मायेच्या आधाराशी दृढपणे जोडून राहण्यास शिकवतो. तो प्रत्येक भक्ताला तिच्या संरक्षणाची, मार्गदर्शनाची आणि भक्कम आधाराची खात्री देतो.
बापू स्पष्ट करतात की आदिमातेचे प्रेम हे उचित गोष्ट स्वीकारण्यासाठी, अनुचित गोष्टींचा त्याग करण्यासाठी आणि आपली भक्ती व नैतिक मूल्ये दृढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामर्थ्याचा स्रोत आहे; आणि या प्रेमामुळेच आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकतो. आदिमाता आपल्या सौम्य किंवा उग्र अशा कोणत्याही रूपात प्रकट झाली, तरी तिचे प्रत्येक रूप केवळ आपल्या भक्तांवरील प्रेमातून आणि त्यांच्या कल्याणासाठीच प्रकट होते; ज्यातून नेहमीच सत्य आणि मांगल्याचाच विजय होतो.

मातृवात्सल्य उपनिषद् (श्री जगदंबा लीला प्रसंग)
मातृवात्सल्य उपनिषद् ही सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनाला योग्य दिशा मिळावी या त्यांच्या उत्कट कळकळीतून आदिमातेच्या अमर्याद प्रेमाची आणि कृपेची आपल्या श्रद्धावानांना मनापासून दिलेली खात्री आहे. या पवित्र ग्रंथातून बापू आदिमातेची क्षमा, संरक्षण आणि भक्कम आधार यांचे वचन देतात. त्यातून भक्तांना भयावर मात करण्यास, मनाला सतावणाऱ्या शंकांचे निरसन करण्यास आणि आपली भक्ती व मनोनिग्रह दृढ करण्यास मदत होते. हा ग्रंथ केवळ मार्गदर्शक न राहता आध्यात्मिक सामर्थ्याचा स्रोत बनतो आणि चंडिकाकुलाच्या प्रेमातून भक्तांना आदिमातेच्या दिशेने वाटचाल करण्याचे बळ देतो. प्रेम आणि श्रद्धेने आदिमातेकडे येणाऱ्या कोणासाठीही तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सदैव खुला आहे आणि तिची दारे कधीही कोणासाठी बंद होत नाहीत, याची जाणीव था ग्रंथ जागृत करतो.

श्री रामरसायन
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या अनेक अमूल्य ग्रंथांमध्ये श्री रामरसायनला श्रद्धावानांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हा केवळ रामायणातील महत्त्वपूर्ण घटनांचा आविष्कार नाही; तर हे एक आध्यात्मिक रसायन आहे, ज्यामुळे भगवान श्रीरामांचे चिरंतन जीवन आणि आदर्श प्रत्येक भक्ताला आपल्या जीवनात प्रत्यक्षपणे उतरवता येतो.
सोप्या आणि सुंदर भाषेत लिहिलेला आणि रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंग चित्रीत करणाऱ्या चित्रांनी समृद्ध असलेला श्री रामरसायन भगवान श्रीरामांच्या जीवनातील शिकवण सर्व वयोगटातील लोकांना सहज समजण्याजोगी आणि आचरणात आणण्याजोगी बनवतो.
यातील व्यक्तिरेखांच्या प्रेरणादायी जीवनातून हा ग्रंथ वाचकांना उदात्त मूल्ये, धर्माचरण, आंतरिक सामर्थ्य आणि अढळ भक्ती जोपासण्याच्या दिशेने हळुवारपणे मार्गदर्शन करतो.
बापू या ग्रंथाबद्दल सांगतात,
“या ग्रंथातील प्रत्येक अक्षर, शब्द आणि या अक्षरांमधील प्रत्येक जागा या सगळ्या गोष्टी मंत्रमय असल्यामुळे जेव्हा आम्ही हे मनापासून, प्रेमाने वाचू तेव्हा ही अख्खीच्या अख्खी रामकथा रामरसायन बनून आमच्या जीवनात उतरणार आहे. हा ग्रंथ आम्ही घरी, प्रवासात, गाडीत कुठेही वाचू शकतो. कारण हा ग्रंथ श्रद्धेने, प्रेमाने वाचताना आमच्या समोर ती रामकथा साकारणार आहे, तो राम आमच्या जीवनामध्ये, मनामध्ये आणि प्राणामध्ये पूर्णपणे उतरणार आहे.

आवाहनं न जानामि आणि तदात्मानं सृजाम्यहम्
मानवास त्याच्या जीवनात संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाशिवाय विकास होऊ शकत नाही. जीवनपथावर अनेक चढ उतार असतात, कधी सुखाची छाया असते, तर कधी प्रारब्धाचे चटके सोसावे लागते. या जीवनप्रवासात श्रद्धावान मानवास अनेकदा जाणवते की माझ्या संकटात मला आधार देणारा, दु:खात माझे अश्रू पुसणारा, माझ्या परिश्रमांना दाद देण्यासाठी माझ्या पाठीवर फिरणारा आणि आशीर्वादाच्या रूपात सदैव माझ्या डोक्यावर असणारा एक कृपेचा हात सतत माझ्याबरोबर आहे. हा ‘त्या’चा हात, हा त्याचा आधार, हा त्याचा हस्तक्षेप हे सर्व त्या भगवंताचे, त्या सद्गुरुतत्त्वाचे माझ्यावर असणारे लाभेवीण प्रेम आहे, त्याची अकारण करुणा आहे आणि त्याची अपरंपार क्षमा आहे. मी जशी जमेल तशी भक्ती करतो, माझे आचार, विचार, आहार, विहार नेहमीच अचूक असतात असेही नाही, मी त्याचे सदैव स्मरण राखतो असेही नाही; पण तरीही तो मला विसरत नाही, त्याचे प्रेम, त्याची कृपा, त्याची सहाय्यता यांसह तो अखंड माझ्या पाठीशी असतो. पण त्या भगवंताशी कसे बोलावे, त्याला आवाहन कसे करावे, त्याचे पूजन कसे करावे, त्याला प्राप्त कसे करावे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या चरणी कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे भक्ताला ठाऊक नसते आणि इथेच भक्ताचा संवाद सुरू होतो, त्या भगवंताशी, त्या सद्गुरुतत्त्वाशी.
‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक वाचताना प्रत्येक भक्ताला जाणवते की ही तर माझीच सध्याची स्थिती आहे, ह्या माझ्याच भावना आहेत, हेच तर माझ्या मनातले विचार आहेत. प्रत्येक भक्ताला आपल्या मनातील भावना व्यक्त करून आपल्या भगवंताशी संवाद साधण्याची इच्छा असते आणि ‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक हाच भाव उघड करतो. त्याचप्रमाणे सध्याच्या माझ्या स्थितीतून पुढे जात राहून त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची आणि त्यासाठी त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत, त्याच्यावर प्रेम करत प्रवास कसा करायचा हेदेखील ‘आवाहनं न जानामि’ स्पष्ट करते. आणि म्हणूनच ‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक हा भक्ताचा त्या भगवंताशी, स्वयंभगवानाशी होणारा संवाद आहे, त्याचबरोबर भक्ताच्या त्याच्या ‘स्व’शी होणारा संवाद आहे. ‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक भक्ताला त्याच्या भक्तिमार्गावरील प्रवासासाठी आश्वासन देते, आधार देते, दिशा देते, गती देते आणि प्रवासासाठीची शिदोरीही देते.
भक्त जेव्हा त्या भगवंताला ‘आवाहनं न जानामि’ या भूमिकेतून सप्रेम साद घालतो, त्याच्याशी प्रेमाने संवाद साधत कृतज्ञ राहतो, तेव्हा त्या भक्ताचा समग्र जीवनविकास करण्यासाठी, भक्ताच्या जीवनातील दुष्प्रारब्धाचा नाश करण्यासाठी, त्याला आपल्या कृपेच्या पंखाखाली घेण्यासाठी भगवंत त्या भक्ताच्या जीवनात कसा अवतरित होतो, हे आम्ही वाचतो, ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ या पुस्तकामध्ये. ‘आवाहनं न जानामि’ म्हणणार्या भक्ताच्या प्रेमळ सादेस भगवंताने दिलेला प्रतिसाद म्हणजे, ‘तदात्मानं सृजाम्यहम्’. ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ हा त्या भगवंताचा आवाज आहे, हा त्या भगवंताने आपल्या भक्ताशी साधलेला प्रेमसंवाद आहे, भक्ताच्या हाकेला दिलेला ‘ओ’ आहे, ही त्या भगवंताने भक्ताचा केलेला स्वीकार आहे. ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ हे पुस्तक आम्हाला सांगते की अनंतकोटी ब्रह्माण्डांचा संचालक असणारा तो भगवंत सर्वव्यापक असूनही त्याच वेळेस सर्वहृदयस्थही आहे. तो सर्वांचा आत्मा आहे आणि श्रद्धावानांचा आत्माराम आहे आणि म्हणूनच त्याला आवाहन कसे करावे हा भाव भक्ताच्या मनात दाटतो आणि त्यातूनच भक्ताचा आवाज उमटतो, ‘आवाहनं न जानामि’.




