विज्ञान आणि भक्ती : दोन मार्ग, एकच सत्य
अनेकांना विज्ञान आणि अध्यात्म दोन वेगळ्या विश्वांशी संबंधित असल्यासारखे वाटते. विज्ञानाचा संबंध तर्क, पुरावे आणि निरीक्षणाशी जोडला जातो, तर भक्तीचा अनेकदा अंधश्रद्धा मानण्याची चूक केली जाते. १६ डिसेंबर २००५ रोजी दैनिक प्रत्यक्षमध्ये प्रकाशित झालेल्या ’आजची गरज’ या संपादकीयात बापूंनी लिहिले होते :
"विज्ञान व भक्ती एकमेकाला कधीही मारक तर ठरणार नाहीतच, उलट विज्ञानाच्या समृद्धीने भक्तिवैभवात भरच पडेल आणि भक्तिसामर्थ्याने विज्ञानाची संहारक शक्ती दुर्बळ होऊन विधायक आविष्कार अधिकाधिक बलवान होईल."
हीच विचारधारा त्यांच्या संपूर्ण जीवनातून प्रतिबिंबित होते. बापूंच्या मते विज्ञान अध्यात्माचे अंधश्रद्धा आणि तर्कहीनतेपासून रक्षण करते, तर भक्ती विज्ञानाचे स्वार्थ आणि विध्वंसक गैरवापरापासून रक्षण करते. विज्ञान व अध्यात्म एकत्रितपणे मानवतेच्या कल्याणाची साधने बनतात. बापूंनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या काळात स्वतःला भगवंतापासून कधीही दूर केले नाही. उलटपक्षी, सृष्टीमध्ये व्यापून असलेली सुव्यवस्था, अचूकता आणि बुद्धिमत्ता यांची त्यांना अधिकाधिक जाणीव होत गेली. त्याचप्रमाणे, त्यांच्या अध्यात्माने वैज्ञानिक विचारसरणीला कधीही नाकारले नाही. या अनुभवातून त्यांच्या मनात नम्रतेची भावना अधिक खोलवर रुजली. मानवी ज्ञान कितीही विशाल झाले, तरी ते त्याहूनही श्रेष्ठ अशा वैश्विक बुद्धिमत्तेसमोर सदैव खुजे ठरते, याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली.
सद्गुरू: एक शाश्वत भक्त
लाखो लोक बापूंना आपले सद्गुरु मानत असले, तरी बापूंनी ’मी एक शिष्य आणि एक भक्त आहे’ ही जाणीव कधीही सोडली नाही. बापूंनी लिहिलेल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज अर्थात् सत्यस्मृतीच्या दुसर्या खंडात ’प्रेमप्रवास’ मध्ये त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या पंचगुरुंचा परिचय करून दिला आहे. हे पंचगुरु केवळ त्यांचे उपास्यदैवत नसून, त्यांच्या जीवनाचा आध्यात्मिक पाया आहेत. बापूंचे जीवन हे त्यांच्या पंचगुरूंप्रती असलेल्या अढळ गुरुभक्ती आणि संपूर्ण समर्पणाचे मूर्तिमंत रूप आहे, ; या पंचगुरूंचे पुढीलप्रमाणे वर्णन त्यांनी प्रेमप्रवास ग्रंथात केले आहे.
- १. श्री दत्तगुरु - हे बापूंचे करविता गुरु आहेत.
- २. श्री गायत्रीमाता - ही बापूंची वात्सल्यगुरु आहेत.
- ३. श्रीराम - हे बापूंचे कर्ता गुरु आहेत.
- ४. महाप्राण हनुमंत - हे बापूंचे रक्षक गुरु आहेत.
- ५. श्री साईबाबा - हे बापूंचे दिग्दर्शक गुरु आहेत.
हे पंचगुरु एकत्रितपणे बापूंच्या जीवनाची आध्यात्मिक रचना उलगडून दाखवतात आणि हे त्यांच्या शिकवणुकीमधील भक्ती, शिस्त, नम्रता, करुणा आणि व्यावहारिक जीवन यांच्या सुंदर समन्वयाचे स्पष्टीकरण आहे.

आई जगदंबेप्रती असणारी निःसीम भक्ती
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या आध्यात्मिक जीवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आदिमाता महिषासुरमर्दिनीप्रती असलेली निःसीम भक्ती. बापू आदिमाता महिषासुरमर्दिनीला केवळ शक्तीस्वरूप न मानता तिची आपल्या मातेच्या स्वरूपात उपासना करतात. ते स्वतःला प्रेमाने तिचा पुत्र म्हणवून घेतात. हे नाते पूर्ण विश्वास, बिन:शर्त प्रेम आणि संपूर्ण शरणागतीवर आधारलेले आहे. बापूंसाठी आदिमाता म्हणजे सदैव प्रेम करणारी अशी माता, जिच्या अमर्याद मायेच्या आणि संरक्षणाच्या छायेत ते तिचे बालक म्हणून वावरतात. ही साधीशी अभिव्यक्ती एक सखोल आध्यात्मिक दृष्टिकोन प्रकट करते. एका गुरुची भूमिका स्वीकारण्यापूर्वी ते स्वतःला एका बालकाच्या भूमिकेत ठेवतात, ज्या बालकाचा त्याच्या दिव्य मातेच्या असीम प्रेमावर आणि संरक्षणावर पूर्ण विश्वास आहे.
भक्तीमधील तल्लीनता
बापूंची पुस्तके आणि प्रवचने त्यांच्या भक्तीच्या तत्त्वज्ञानाचे विवेचन करतात; मात्र त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये भक्ती किती खोलवर रुजली आहे, हे खऱ्या अर्थाने श्रीहरिगुरुग्राम येथे अनुभवता येते. तेथील मंचच (मुख्य स्टेज) त्यांच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब दर्शवतो.
मंचाच्या मध्यभागी सर्वोच्च आदराचे स्थान असलेले श्री दत्तगुरु विराजमान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्री स्वामी समर्थ व श्री साईनाथ आहेत. ही रचना एका महत्त्वाच्या सत्याची मूकपणे जाणीव करून देते: हजारो लोकांसमोर त्यांचे सद्गुरु म्हणून उभे राहण्यापूर्वी, बापू प्रथम परमेश्वरासमोर एक भक्त म्हणून उभे राहतात. एकही शब्द न बोलता ते शिकवतात की, मान-सन्मान मिळण्यापूर्वी आदर असला पाहिजे; मार्गदर्शन करण्यापूर्वी कृतज्ञता असली पाहिजे; आणि समर्पण हाच नेतृत्वाचा भक्कम पाया असला पाहिजे.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे जीवन शिस्तबद्ध आणि अत्यंत समृद्ध करणाऱ्या उपासनेच्या परंपरेशी घट्टपणे जोडलेले आहे. त्यांच्या आध्यात्मिक साधनेमध्ये नित्य, नैमित्तिक आणि विशेष उपासनांचा समावेश आहे आणि प्रत्येक उपासना ते नित्यनेमाने व भक्तीने करतात.
आपल्या नित्य उपासनेचा भाग म्हणून बापू श्री हनुमान चलीसा, सुंदरकांड, श्री रामरक्षा स्तोत्र, घोरकष्टोद्धारण स्तोत्र, दत्तमाला मंत्र, श्री दत्तबावनी, देवी अपराधक्षमापन स्तोत्र, शुभंकरा आणि अशुभनाशिनी स्तोत्र यांचे पठण करतात. तसेच, या पवित्र ग्रंथांतील शाश्वत ज्ञानाप्रती असलेली त्यांची श्रद्धा दर्शवत ते नियमितपणे श्रीरामचरितमानसचा अभ्यास करतात आणि श्री साईसच्चरित्रातील एका अध्यायाचे पठण करतात. ज्यामुळे अशा पवित्र ग्रंथांतील शाश्वत ज्ञानाप्रती असलेली त्यांची आदरभावना जाणवते.
याशिवाय, बापू नियमितपणे मासिक आणि वार्षिक उपासना करतात. दरवर्षी ते एका विशिष्ट कालावधीत आपल्या सांगली येथील निवासस्थानी आध्यात्मिक उपासनेसाठी जातात. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीही दरवर्षी दोन दत्तयाग केले जातात. नवरात्रीतील परांबा पूजन, श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्तची उपासना आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांकडून केले जाणारे पूजन यांसारख्या विशेष उपासनांमधूनही त्यांच्या कुटुंबातील भक्तीची अखंड परंपरा आणि समृद्धी दिसून येते. वेद आणि त्यांच्या परंपरांचे सखोल ज्ञान असलेले बापू प्रत्येक उपासना सखोल शास्त्रोक्त जाणिवेने, काटेकोर शिस्तीने आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनःपूर्वक भक्तीने करतात. त्यांच्या जीवनात उपासना हे केवळ एखादे नैमित्तिक आचरण नसून, ते परमेश्वराप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि संपूर्ण समर्पणाचे एक निरंतर प्राकट्य आहे.
भक्ती : जीवन जगण्याचा मार्ग
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंसाठी भक्ती ही केवळ कर्मकांडापुरती मर्यादित नाही. पूजन करणे असो, आरतीमध्ये सहभागी होणे असो, पवित्र मंत्रांचे पठण करणे असो, पुस्तके लिहिणे असो, 'दैनिक प्रत्यक्ष'साठी अग्रलेख लिहिणे असो किंवा प्रवचने देणे असो, त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तीचाच तोच भाव स्पष्टपणे दिसून येतो. धर्मग्रंथांविषयीही त्यांचा हाच दृष्टिकोन दिसून येतो. ते रामायण, महाभारत, भगवद्गीता, श्रीमद्भागवत, गुरुचरित्र, श्री साईसच्चरित्र आणि संतांचे चरित्रग्रंथ यांचा अभ्यास व निरूपण केवळ पवित्र साहित्य म्हणून करत नाहीत, तर श्रद्धावानांच्या दैनंदिन जीवनाला मार्गदर्शन करणारे जिवंत मार्गदर्शक म्हणून करतात.

दिव्य श्रद्धेच्या बळावर वाटचाल
बापू देत असलेल्या अत्यंत गहन शिकवणुकींपैकी एक आहे, देवावर विश्वास ठेवणे आणि देवासोबत जगणे, म्हणजेच श्रद्धेने मार्गक्रमण करणे यातील फरक होय. अनेकांच्या जीवनात श्रद्धा कठीण काळात येते. प्रार्थना ही मदतीची याचना बनते आणि भक्तीची पाळेमुळे आशेमध्ये रूजलेली असतात. बापू साधकांना या अवस्थेच्या पलीकडे जाण्यासाठी प्रेमाने प्रोत्साहित करतात.
भगवंत हा भविष्यात कधीतरी येणारा नसून तो तर जीवनात आधीपासूनच उपस्थित असतो, जो प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो, रक्षण करतो, बळ देतो आणि सोबत करतो. ही जाणीव संकटांचा सामना करण्याची आपली दृष्टी बदलते. “हे माझ्याच बाबतीत का घडले?” असा प्रश्न विचारण्याऐवजी “या अनुभवातून परमेश्वर मला काय शिकवत आहे?” असे भक्त विचारू लागतो. अशा प्रकारे श्रद्धा ही केवळ प्रसंगी मिळणारा आधार न राहता, ती एक निरंतर सोबती बनते.
समाजसेवेला समर्पित भक्ती
बापूंची शिकवण अध्यात्माला प्रापंचिक जबाबदाऱ्यांपासून कधीही वेगळे करत नाही. त्यांच्या मते, खरी भक्ती व्यक्तीला अधिक सत्यनिष्ठ, करुणामय, शिस्तबद्ध, विश्वासार्ह आणि इतरांची सेवा करण्यास तत्पर बनवणारी असली पाहिजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केल्या जाणार्या असंख्य निःस्वार्थ सेवा या याच विचारधारेचे मूर्त स्वरूप आहेत. यामध्ये आरोग्यविषयक उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक प्रकल्प आणि इतर विविध समाजसेवांचा समावेश आहे. बापूंसाठी या गोष्टी भक्तीपासून वेगळ्या नाहीत—ती कृतीतून व्यक्त होणारी भक्तीच आहे.
करुणेविना प्रार्थना अपूर्ण राहते.
सेवेविना उपासना अपूर्ण राहते.
नम्रतेविना ज्ञान अपूर्ण राहते.
त्यांचे जीवन हे दर्शवते की, परमेश्वरावरील प्रेम हे स्वाभाविकपणे मानवतेवरील प्रेमाच्या रूपाने व्यक्त होते.
आजच्या अशा काळात, जिथे चारित्र्यापेक्षा कर्तृत्वाचा आणि आदरापेक्षा प्रसिद्धीचा अधिक गौरव केला जातो, तिथे सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू एक वेगळा आदर्श आपल्यासमोर ठेवतात. त्यांचे जीवन हे दर्शवते की वैज्ञानिक प्रावीण्य आणि गाढ अध्यात्म एकत्र नांदू शकतात आणि खऱ्या ज्ञानाचा सर्वोच्च आविष्कार नम्रतेच्या गुणामध्येच पाहायला मिळतो, त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी अंबज्ञ (Ambadnya) राहण्याचे तत्त्व आहे. अंबज्ञ हा मराठी शब्द आदिमाता महिषासुरमर्दिनी, या दिव्य मातेच्या चरणकमलांवर असलेल्या अपार आणि अढळ कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो. बापू स्वतः या कृतज्ञतेच्या भावात जगतातच; त्याचबरोबर प्रत्येक श्रद्धावानाला जीवनातील प्रत्येक परिस्थितीत अंबज्ञ राहण्यासाठी ते सातत्याने प्रोत्साहित करतात.
म्हणूनच, डॉक्टर, विद्वान, यशस्वी लेखक आणि लाखो लोकांचे सद्गुरु या सर्व ओळखींपलीकडे त्यांची सर्वांत चिरस्थायी ओळख मात्र सर्वांत साधी—आणि कदाचित सर्वांत महान अशीच आहे.






















