दरवर्षी, मार्गशीर्ष या अत्यंत पवित्र आणि मंगल महिन्यात देश-विदेशातील श्रद्धावान श्री सच्चिदानंदोत्सव अत्यंत श्रद्धेने, आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरा करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील दुसऱ्या शनिवारपासून या उत्सवाला प्रारंभ होतो.

या कालावधीत श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या सच्चिदानंद पादुका प्रेमभावाने आपल्या घरी आणतात आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांचे पूजन करतात. असंख्य श्रद्धावानांनी भावभक्तीने लिहिलेल्या आणि ’अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम'मध्ये जमा केलेल्या पवित्र रामनाम वह्यांच्या पानांच्या लगद्यापासून या पादुका बनवल्या जातात. बापूंच्या चरणांच्या आकाराच्या या पादुका असल्यामुळे सद्गुरूंच्या प्रत्यक्ष चरणकमलांचे ज्या प्रेमाने, भक्तिभावाने आणि आदराने पूजन केले जाते, त्याच भावाने प्रत्येक श्रद्धावानाला या सच्चिदानंद पादुकांचे आपल्या घरी पूजन करण्याची संधी मिळते.

सच्चिदानंद पादुकांचे आपल्या घरी स्वागत करणे म्हणजे प्रत्येक भक्तासाठी प्रत्यक्ष बापूंचेच आपल्या घरी स्वागत करण्यासारखे आहे. त्यांच्या पवित्र उपस्थितीने घर प्रेम, शांती, धैर्य आणि आध्यात्मिक सामर्थ्याने भरून जाते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना त्यांच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभते.

श्री सच्चिदानंदोत्सवात ’सच्चिदानंदोत्सव उपासना पुस्तिके’त दिलेल्या पूजन पद्धतीनुसार श्रद्धावान पादुकांचे प्रेमाने आणि भक्तिभावाने पूजन करतात. या पुस्तिकेत उत्सवासाठी विहित केलेल्या प्रार्थनांसोबतच श्रीअनिरुद्ध अथर्वस्तोत्र आणि श्रीअनिरुद्ध अष्टोत्तरशतनामावली यांचाही समावेश आहे.

श्रद्धावान आपापल्या सोयीनुसार पादुका आपल्या घरी दीड दिवस किंवा पाच दिवस ठेवतात. या दिवसांमध्ये घर हे एक पवित्र धाम बनते आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध स्वतः आपल्या अकारण कारुण्याचा वर्षाव करण्यासाठी आपल्या घरी आले आहेत, याची जाणीव प्रत्येक क्षणी श्रद्धावानांच्या मनात असते.

श्री सच्चिदानंदोत्सवाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ’पुनर्मिलाप आवाहन’ करून पादुकांचा आदरपूर्वक पुनर्मिलाप केला जातो. भौतिक स्वरूपातील पादुकांचा पुनर्मिलाप होत असला, तरी श्रद्धावानाची प्रामाणिकपणे केलेली प्रार्थना मात्र कायम रहाते की सच्चिदानंद असणार्‍या सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंची कृपा, त्यांचा अधिकार, प्रेमळ उपस्थिती आणि सामिप्य सदैव आपल्या जीवनात राहावे.

सच्चिदानंद पादुकांचे पूजन हा श्रद्धावानांसाठी केवळ एक पूजनविधी नाही तर हा सद्गुरू श्री अनिरुद्ध आणि श्रद्धावानांमधील प्रेमळ नात्याचा, अतूट बंधाचा उत्सव आहे. असा उत्सव, ज्याकाळात विविध ठिकाणी राहणारे असंख्य श्रद्धावान एक कुटुंब, एक हृदय होऊन पादुकांचे प्रार्थनापूर्वक पूजन-अर्चन करतात आणि आपल्या लाडक्या सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या चिरंतन अस्तित्वाचा एकत्र आनंदोत्सव साजरा करतात.

Poojan of Sacchidananda Paduka during Shree Sacchidananda Utsav
श्री सच्चिदानंद उत्सवातील सच्चिदानंद पादुकांचे पूजन