सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू श्रीहरिगुरुग्राम येथे २०१६ पर्यंत मुख्य प्रवेशद्वारापासून गुरुवारच्या प्रवचनापूर्वी मुख्य मंचापर्यंत चालत येत असतं व प्रवचनानंतर परत जाताना मुख्य मंचापासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत चालत जात असत.
या पावलांच्या ठश्यांना ’प्रत्यक्ष पादुका’ हे नाव चौबळ आजोबांनी दिले आहे. चौबळ आजोबांना त्यांच्या बालपणी प्रत्यक्ष श्रीसाईनाथांच्या दर्शनाचे भाग्य लाभले होते. कालांतराने ह्याच चौबळ आजोबांच्या घरी जेव्हा बापू म्हणजेच डॉ. अनिरुद्ध जोशी गेले होते, तेव्हाच चौबळ आजोबांनी या सद्गुरुतत्त्वाला बरोबर ओळखले होते.
"हे पाय पुरातन फार....... हे पाय पुराणपुरुषाचे आहेत. हे पाय माझ्या ओळखीचे आहेत. हे पाय जिथे कुठे असतील तिथे डोकं टेक.", असे बापूंच्या चरणांना बघून चौबळ आजोबा महेशसिंह गडकरी यांना (चौबळ आजी यांच्या बहिणीच्या मुलाला) म्हणाले होते.
आज बापू गाडीने श्रीहरिगुरुग्राम येथे येतात व जातात आणि श्रद्धावानांच्या मनातील बापूंबद्दलचे प्रेम आणि भक्ती मात्र आजही पूर्वीप्रमाणेच आहे. त्यामुळे श्रद्धावान पूर्वीच्याच भावाने गाडीच्या टायरखालची माती घेऊन जातात. त्यांच्या दृष्टीने बापू ज्या ठिकाणी चरण ठेवतात, तेथील मातीचा प्रत्येक कण त्यांच्या पवित्र उपस्थितीने पावन झालेला असतो. म्हणूनच त्यांच्यासाठी ती माती म्हणजे बापूंची चरणधूळ आहे, बापूंच्या ’प्रत्यक्ष पादुका’ आहेत.
बापूंनी एका प्रवचनात सांगितले होते की, भरत हा वंदन-भक्तीचा आचार्य आहे. ’भरत-भेट’ हा शब्द आम्ही अनेकदा ऐकतो. ’भरत-भेट’ म्हणजे काय?
श्रीसाईसच्चरित्रामध्ये हेमाडपंत एक सुंदर शब्द वापरतात. पहिलं साईंचं दर्शन कसं झालं? ‘धूळभेट’ झाली.
हेमाडपंत पहिल्यांदाच शिरडीला गेले. वाड्यामध्ये जाऊन बसले होते, तेवढ्यांत कोणीतरी सांगितलं,
‘चला चला, लवकर चला, बाबा वाड्याच्या कोपर्यापाशी आलेले आहेत.’
सगळी मंडळी धावत जातात. आम्ही वर्णन वाचलेलं आहे आणि तिकडेच हेमाडपंत बाबांचं रूप बघून आश्चर्यचकित होतात.
"अरे, ज्याला शोधत होतो तो भगवंत माझ्यासमोर उभा आहे. माझा परमात्मा माझ्यासमोर उभा आहे."
आणि त्या धुळीमध्ये स्वतःच्या प्रतिष्ठेची, सोवळ्याची, मॅजिस्ट्रेट असल्याची, न्यायाधीश असल्याची कसलीही लाज व तमा न बाळगता त्या धुळीमध्ये बाबांच्या पायावर लोळण घेतात. सगळं अंग त्या पायधुळीने माखून घेतात.
