श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये - भक्तीत रुजलेली विद्वत्ता
या परंपरेतील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणजे बापूंचे पणजोबा श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये.
वेद आणि शास्त्रांचे प्रकांड पंडित म्हणून त्यांची स्मृती आजही जपली जाते. त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये बुद्धिमत्तेचे तेज आणि गाढ भक्ती यांचा सुंदर संगम झाला होता. श्रीगोपीनाथशास्त्री यांना ओळखणाऱ्या जनमाणसांना त्यांच्यात केवळ एक विद्वान व्यक्ती दिसत नसे, तर या विद्वत्तेमुळे त्यांचा अहंकार वाढण्याऐवजी त्यांची विनम्रताच अधिक वृद्धिंगत झालेली दिसत असे.
ते श्रीस्वामी समर्थ आणि शिर्डीचे श्रीसाईबाबा यांचे निस्सीम भक्त होते. कौटुंबिक परंपरेनुसार त्यांच्याबद्दल एक गोष्ट ऐकावयास मिळते ती म्हणजे - श्रीसाईबाबांशी झालेल्या त्यांच्या पहिल्याच भेटीत बाबांनी त्यांच्याकडे पाहून एकच वाक्य उच्चारले :
“आता तरी खूण पटली ना?”
श्रीगोपीनाथशास्त्री पाध्ये यांच्यासाठी हे शब्द आयुष्यभराची आध्यात्मिक साधना बनले. त्यांनी हेच वाक्य आपले गुरुमंत्र म्हणून स्वीकारले आणि जीवनभर दररोज त्याचा १,००८ वेळा जप केला.
त्यांचे संपूर्ण दिवस दोन सखोल आध्यात्मिक ग्रंथांच्या अध्ययनात आणि निरूपणात व्यतीत होत असे, ते ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत आणि पंचदशी. या ग्रंथांवर प्रवचन करणे ही केवळ बौद्धिक कसरत नव्हती, तर त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे तेच सार होते. त्यांची विद्वत्ता त्यांच्या भक्तीपासून कधीही वेगळी नव्हती.
कुटुंबाच्या आध्यात्मिक वारशाचे आधारस्तंभ
या कुटुंबाची आध्यात्मिक संस्कृती घडविण्यात असामान्य स्त्रियांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा होता. त्यांचे शांत समर्पण शक्तीचा चिरस्थायी स्रोत बनले.
रमाबाई पाध्ये
श्रीगोपीनाथशास्त्री पाध्ये यांच्या प्रथम पत्नी रमाबाई पाध्ये यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून दररोज १,००८ वेळा ॐ गं गणपतये नमः या पवित्र मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. विवाहानंतर पतीच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गणेश गायत्रीचा जप स्वीकारला आणि शिस्त, अढळ श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असे जीवन जगणे सुरू ठेवले.
द्वारकाबाई पाध्ये (माई)
रमाबाईंच्या निधनानंतर श्रीगोपीनाथशास्त्री पाध्ये यांच्या द्वितीय पत्नी द्वारकाबाई पाध्ये, ज्यांना प्रेमाने ‘माई’ म्हणून ओळखले जात असे, या कुटुंबात आल्या. त्यांनी केवळ घरातील जबाबदाऱ्या स्वीकारल्या नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाला मातृवत् प्रेमाने आपलेसे केले. त्यांनी लहान वय असलेल्या मालती पाध्ये (बापूंच्या आजी) यांचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आणि आयुष्यभर भक्तीमार्गावर अढळ राहिल्या.
बापूंच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या आजी
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या बालपणावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी एक व्यक्ती जर कोणती असेल, तर ती म्हणजे बापूंच्या आजी शकुंतलाबाई पंडित अर्थात् माहेरच्या मालती पाध्ये.
त्यांचा प्रभाव केवळ एका पालकाच्या भूमिकेपुरता मर्यादित नव्हता. त्या त्यांच्या पहिल्या शिक्षिका, मार्गदर्शक आणि जीवनमूल्यांची दिशा देणाऱ्या व्यक्ती बनल्या.
बापूंच्या आजी स्वतः एक विद्वान स्त्री होत्या. त्यांच्यामध्ये विलक्षण आध्यात्मिक सामर्थ्याबरोबरच परिस्थितीशी खंबीरपणे सामना करण्याची असामान्य क्षमता होती. श्रीस्वामी समर्थ, श्रीविठ्ठल-रखुमाई आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या त्या निष्ठावान भक्त होत्या. त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडत त्या सेवाभक्तीने समृद्ध अशा जीवन जगल्या.
तरुण वयातच वैधव्य आले तरी त्यांनी अत्यंत धैर्याने संकटांचा सामना केला. ज्या काळात सामाजिक रूढींमुळे स्त्रियांना काही जबाबदाऱ्या स्वीकारण्याची क्वचितच परवानगी असे, त्या काळात त्यांनी स्वतः आपल्या पतीचे अंत्यसंस्कार केले आणि मंत्राग्नी दिला.
त्यांचे आध्यात्मिक जीवनही तितकेच विलक्षण होते.
त्यांचे सासरे श्री. अनंत वामन पंडित यांच्याकडून दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सलग त्रेसष्ट वर्षे दररोज १०८ वेळा रामरक्षा स्तोत्राचा जप करण्याचा नित्यक्रम अविरतपणे आणि दृढतेने पाळला.
मात्र, त्यांचे अध्यात्म पूजास्थळाच्या चार भिंतींपुरते कधीही मर्यादित राहिले नाही.
आयुष्यभर त्यांनी विधवा स्त्रिया, वंचित महिला आणि विविध सामाजिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांना शांतपणे आधार दिला आणि जात किंवा परिस्थिती यांना त्यांनी करुणेच्या आड कधीही येऊ दिले नाही.
अनेक वर्षांनंतर स्वतः बापूंनी त्यांच्याविषयी अतिशय प्रेमाने सांगितले होते :
“तिनेच माझे जीवन घडवले. तिने मला नेहमी आपल्या प्रेमाच्या संरक्षणाखाली ठेवले. मला जे काही बनवायचे होते, ते बनवणे हेच तिच्या जीवनाचे ध्येय झाले होते. ती माझी सर्वांत लाडकी आजी होती.”
कदाचित कोणत्याही चरित्रापेक्षा बापूंचे हे शब्दच त्यांच्या आजीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर झालेला प्रभाव अधिक स्पष्टपणे अधोरेखित करतात.
आईचे प्रेम
बापूंची आई सौं अरुंधती जोशी यांनी कुटुंबाची भक्तिमय वृत्ती आत्मसात केली होती.
त्या सप्तशृंगी माता, भगवान श्रीकृष्ण आणि श्रीदत्तगुरूंच्या अत्यंत निष्ठावान भक्त होत्या.
१९५६ मध्ये त्यांच्या गर्भावस्थेदरम्यान त्यांना काही विलक्षण आध्यात्मिक अनुभूती आल्याचे कौटुंबिक आठवणींत सांगितले जाते. त्यांना वारंवार एक मोठा नंदादीप तेवत असताना दिसत असे; त्या नंदादीपाची ज्योत त्यांच्या डोळ्यांसमोर अधिकाधिक तेजस्वी होत असल्याचे त्यांना जाणवत असे. तसेच, त्या जिथे बसत तिथे भिंतीवर श्रीसाईबाबांची प्रतिमा त्यांच्यासमोर प्रकट झाल्याचेही त्यांना वारंवार दिसत असे.
त्यांनी या अनुभूतींना दैवी आशीर्वाद मानले आणि या काळात त्यांना अनेक आध्यात्मिक दृष्टान्त प्राप्त झाले.
या अनुभूती वैयक्तिक अनुभव म्हणून पाहिल्या किंवा गाढ श्रद्धेची अभिव्यक्ती म्हणून, अनिरुद्ध बापूंच्या जन्माभोवतीच्या कौटुंबिक आख्यायिकेचा हा एक चिरंतन भाग बनला.
करुणेचे आचरण करणारे वडील
जर बापूंच्या आईच्या जीवनातून भक्ती प्रतिबिंबित होत असेल, तर त्यांच्या वडिलांच्या जीवनातून समाजाप्रतीची निःस्वार्थ सेवा दिसून येत असे.
डॉ. धैर्यधर हरेश्वर जोशी हे केवळ आपल्या वैद्यकीय ज्ञानासाठीच नव्हे, तर उपचारांचा खर्च परवडू न शकणाऱ्या रुग्णांप्रती असलेल्या त्यांच्या अढळ बांधिलकीसाठीही अत्यंत आदराने ओळखले जात असे.
अनेक दशके त्यांनी अनेक गरीब रुग्णांवर उपचार केले आणि त्यांच्याकडून अनेकदा केवळ नाममात्र शुल्क स्वीकारले. त्यांच्या दवाखान्यात आर्थिक परिस्थितीपेक्षा करुणेला अधिक महत्त्व दिले जात असे.
त्यांना ओळखणारे लोक अनेकदा सांगत असत की, त्यांनी “Service is Worship” (सेवा हीच ईश्वरभक्ती आहे) हे वाक्य केवळ म्हटले नाही; तर ते वाक्य बापूंचे वडिल अक्षरशः जगले.
कौटुंबिक इतिहासानुसार अशी गोष्ट समोर येते की त्यांना अवधूताच्या रूपात श्रीदत्तगुरूंचे दर्शन झाले होते. या अनुभूतीमुळे त्यांची भक्ती अधिक दृढ झाली आणि निःस्वार्थ सेवेप्रती त्यांची बांधिलकीही अधिक दृढ झाली.
आयुष्याच्या अखेरच्या काळापर्यंत गरजूंची सेवा करणे हे त्यांच्या जीवनाचे केंद्रस्थान राहिले.
मूल्यांचा वारसा
मागे वळून पाहताना एक विलक्षण क्रम आपल्या लक्षात येतो.
- पणजोबांकडून बापूंना सखोल आणि काटेकोर शास्त्राध्ययनाचा वारसा मिळाला.
- पणजीकडून बापूंना शिस्त आणि अढळ भक्तीचा वारसा मिळाला.
- आजीकडून बापूंना धैर्य, करुणा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.
- मातेकडून बापूंना निष्ठा मिळाली.
- आणि वडिलांकडून बापूंना निःस्वार्थ सेवावृत्ती आणि मानवतेप्रती आदरभाव मिळाला.
या थोर परंपरा लाभलेल्या कुटुंबात जन्मलेले हे बालक आपल्या घडणीच्या काळात समाजापासून दूर नव्हते, तर परळच्या गजबजलेल्या परिसरात वाढत होते. घरी सर्व सुखसोयी उपलब्ध असूनही, समाजातील मोठ्या वर्गाच्या जीवनाचे वास्तव असलेल्या गरिबी आणि संघर्षाचा जवळून अनुभव घेता यावा, यासाठी बापूंना आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील मुलांसाठी असलेल्या शाळेत दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्यांच्या जीवनप्रवासाचा पुढील अध्याय खऱ्या अर्थाने सुरू झाला.
वयाच्या पलीकडे विचार करणारे प्रगल्भ बालमन
अनिरुद्ध बापू शालेय जीवनात प्रवेश करेपर्यंत त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेली मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजण्यास सुरुवात झाली होती. मात्र, लवकरच त्यांच्या आसपासच्या लोकांच्या लक्षात आले की, त्यांच्यात केवळ शिस्त आणि करुणाच नव्हे, तर असामान्य बौद्धिक परिपक्वता आणि न संपणारी जिज्ञासाही होती. त्यांच्या शैक्षणिक कामगिरीमुळेच नव्हे, तर त्यांच्या विचारांची खोली आणि त्यांच्या आवडींची व्याप्ती यामुळेही त्यांचे शिक्षक आणि वर्गमित्र अनेकदा आश्चर्यचकित होत असत.
विचारांमधील स्पष्टता
अगदी लहानपणीसुद्धा अनिरुद्ध बापूंमध्ये त्यांच्या वयाकडून अपेक्षित असलेल्या पलीकडे विचार करण्याची क्षमता दिसून येत होती.
हिमालयाची हाक
बापू तिसरीत शिकत असताना त्यांनी शाळेच्या ‘विकास’ या मासिकासाठी “हिमालयाची हाक” या शीर्षकाचा निबंध लिहिला. भारतावरील चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या निबंधातून त्यांच्यातील असामान्य देशप्रेम आणि जबाबदारीची जाणीव दिसून आली.
भीती किंवा असहायता व्यक्त करण्याऐवजी, या बाल्यावस्थेतील विद्यार्थ्याने आपल्या वयाच्या मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करण्याचे आवाहन केले, जेणेकरून पुढे एक दिवस ते देशाची सेवा आणि संरक्षण करू शकतील. त्यांनी लिहिले की, सैन्यात सहभागी होण्यासाठी ते अद्याप खूप लहान असले तरी नियमित व्यायाम करणे, उत्तम आरोग्य राखणे आणि भावी सैनिकांकडून अपेक्षित असलेले सामर्थ्य विकसित करणे यांची ते त्याची तयारी सुरू करू शकतात.
अवघ्या सात-आठ वर्षांच्या बालकाच्या मनात असे विचार असणे ही उल्लेखनीय बाब होती. ज्या वयात बहुतेक मुले ऋतू, सण किंवा सुट्ट्यांवर निबंध लिहित असतात, त्या वयात अनिरुद्ध बापूंनी राष्ट्रीय कर्तव्य आणि सामूहिक जबाबदारी यांवर लिहिणे पसंत केले.
त्यांच्या पुढील शालेय जीवनातही त्यांची बौद्धिक परिपक्वता सातत्याने दिसून येत राहिली.
हे माझे मत
दहावीत शिकत असताना त्यांनी “हे माझे मत आहे” या शीर्षकाचा आणखी एक लेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी एका सर्वमान्य धारणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत विचारले:
“संन्यासाश्रमाचा अनुभव घेतल्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यात काय हरकत आहे?”
त्यांच्या शिक्षकांना केवळ हा प्रश्नच प्रभावी वाटला असे नाही, तर बापूंनी तो प्रश्न ज्या स्वतंत्र पद्धतीने मांडला ती बाबही त्यांना विशेष भावली. प्रचलित विचारांची केवळ पुनरावृत्ती करण्याऐवजी त्यांनी त्यांचा विचारपूर्वक अभ्यास केला आणि स्वतःचे निष्कर्ष काढले. किशोरवयात असतानाही त्यांनी परंपरेचा आदर राखून चिकित्सक विचार करण्याची तयारी दाखवली. हा समतोल पुढे त्यांच्या लेखनाचे आणि प्रवचनांचे एक वैशिष्ट्य ठरला.
इतक्या लहान वयात एखादी व्यक्ती एवढ्या स्पष्टतेने आणि प्रगल्भतेने कसा विचार करू शकते, याचे बापूंच्या शिक्षकांना अनेकदा आश्चर्य वाटत असे.
प्रतिभेची अभिव्यक्ती
शैक्षणिक प्रावीण्य हा अनिरुद्ध बापूंच्या शालेय जीवनाचा केवळ एक पैलू होता.
शाळेने उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक संधीमध्ये ते मनापासून सहभागी होत असत. निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, रंगमंचावरील सादरीकरण असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, ते उत्साहाने आणि निष्ठेने त्यात भाग घेत.
विविध क्षेत्रांमध्ये रुची जोपासतानाही त्यांनी सातत्याने शैक्षणिक दर्जाही उच्च राखला.
मराठी भाषा आणि साहित्यावरील त्यांचे प्रेम विशेषत्वाने दिसून येत असे.
शालेय जीवनातही त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि त्यांना नाट्यकलेची विशेष आवड निर्माण झाली होती. प्रख्यात रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर हे त्यांच्या आवडत्या कलाकारांपैकी एक होते. मोकळ्या वेळात ते गारंबीचा बापू, अश्रूंची झाली फुले आणि रायगडाला जेव्हा जाग येते यांसारख्या गाजलेल्या मराठी नाटकांमधील प्रसंग उत्साहाने सादर करत असत.
शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेनंतर एखादा औपचारिक कार्यक्रम आयोजित केलेला नसे, अशा वेळी शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी आमंत्रित करत. संपूर्ण शाळेसमोर उभे राहून ते विविध विषयांवर विलक्षण आत्मविश्वासाने, स्पष्टतेने आणि उत्स्फूर्तपणे भाषण करत. त्यांच्या वयाच्या विद्यार्थ्यासाठी ही एक असामान्य क्षमता होती.
कुमार कला केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय स्पर्धांमध्ये शाळेला मिळालेल्या यशामध्ये त्यांच्या सहभागाचा सिंहाचा वाटा होता. वक्तृत्व, निबंधलेखन किंवा नाट्य, कोणतेही क्षेत्र असो, बापूंनी सातत्याने आपल्या शाळेला नावलौकिक मिळवून देण्यात सातत्याने योगदान दिले.
डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आणि पुढे होणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया तेथे रचला गेला.
करुणेतून रुजलेले नेतृत्व
जर शैक्षणिक यशातून बापूंच्या क्षमता दिसून येत होत्या, तर लोकांसोबतच्या त्यांच्या वागणुकीतून त्यांचे चारित्र्य प्रकट होत होते.
शाळेची फी माफी
बापूंनी शालेय जीवनातील एका प्रसंगाने त्यांच्या वर्गमित्रांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
ते पाचवीत असताना वर्गशिक्षकांनी वर्ग प्रतिनिधीला (मॉनिटरला) शाळेची फी माफ केली जाईल, असे जाहीर केले. अनिरुद्ध बापूंनी त्वरित ही सवलत नाकारली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील एका वर्गमैत्रिणीकडे निर्देश करून त्यांनी ही सवलत तिला देण्यात यावी, अशी विनंती केली. त्याचबरोबर, आपले वडील डॉक्टर असल्याने आपली फी भरण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण वर्ग आश्चर्यचकित झाला.
ही एक साधी कृती होती; परंतु त्यातून बापूंमध्ये असलेली न्याय आणि सहानुभूतीची अशी एक उपजत जाणीव दिसून आली जी पाठ्यपुस्तकांमधून शिकवली जाऊ शकत नाही.
शाळेची सहल
त्यांनी इतरांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासाचे दर्शन घडवणारा आणखी एक प्रसंग आहे.
एका दुर्दैवी अपघातानंतर शाळेने अनेक वर्षे सहली आयोजित करणे थांबवले होते. इतिहासाचे शिक्षक श्री. जी. डी. पाटील सरांनी ही परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक पालकांनी आपल्या मुलांना सहलीला पाठवण्यास संकोच केला. मात्र, अनिरुद्ध बापूही सहलीला येणार असल्याचे समजताच अनेक कुटुंबांनी आपला निर्णय बदलला.
हा विश्वास बापूंच्या कोणत्याही पदामुळे किंवा अधिकारामुळे निर्माण झालेला नव्हता. तेव्हा ते केवळ एक विद्यार्थी होते. उलट, त्यांच्या वर्तनातून, जबाबदारीच्या जाणिवेतून आणि प्रगल्भतेतून त्यांनी तो विश्वास कमावला होता.
अनिरुद्ध बापूंच्या बाबतीत नेतृत्वगुण हे कोणत्याही पदामुळे नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून स्वाभाविकपणे निर्माण झाले होते.
त्यांना ओळखणाऱ्यांच्या शब्दांत
अनेक वर्षांनंतर अनिरुद्ध बापूंच्या अनेक शिक्षकांनी आणि वर्गमित्रांनी ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकात त्यांच्या आठवणी सांगितल्या. जरी प्रत्येकाला वेगवेगळे प्रसंग आठवत असले, तरी त्यांच्या आठवणींमधून बापूंची उभी राहिलेली प्रतिमा मात्र आश्चर्यकारकरित्या एकसारखी होती.
त्यांच्या शिक्षिका माननीय प्रभा पराडकर यांनी आठवते की, बापूंनी अभ्यास, नाटक, वक्तृत्व आणि सांस्कृतिक उपक्रम अशा प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले; परंतु या यशाचा आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. त्या अनेकदा इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उदाहरणातून शिकण्यास प्रोत्साहित करत आणि यश हे नेहमी प्रामाणिक प्रयत्न आणि शिस्त यांचे फलित असते, याची त्यांना आठवण करून देत.
त्यांच्या वर्गमैत्रीण शुभदा भांगले यांना बापूंचे मराठी भाषेवरील असाधारण प्रभुत्व, साहित्य आणि नाटकावरील प्रेम तसेच प्रेक्षकांचे लक्ष सहजपणे वेधून घेण्याची त्यांची क्षमता आठवत होती. मात्र, त्यांच्या मनात सर्वाधिक ठसलेली गोष्ट बापूंची प्रतिभा नव्हती, तर शाळेची फी माफीच्या प्रसंगातून दिसून आलेली त्यांची करुणा होती.
इतिहासाचे शिक्षक श्री. जी. डी. पाटील यांना त्यांच्या लहान वयातच पालकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांनी दाखवलेली जबाबदारीची जाणीव आठवते.
आणखी एक वर्गमैत्रीण, बकुल मर्चंट यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत सोप्या शब्दांत सारांश सांगितला. प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सुखवस्तू कुटुंबातील असूनही अनिरुद्ध बापूंनी कधीही गर्व किंवा श्रेष्ठत्वाची भावना दाखवली नाही. शिक्षक, वर्गमित्र, प्रयोगशाळेतील सहाय्यक, शाळेतील कर्मचारी, ग्रंथपाल किंवा कॅन्टीनमधील कर्मचारी सर्वांशी ते समान आपुलकीने आणि आदराने वागत. त्यांच्या नम्रतेमुळे प्रत्येकाला त्यांच्याशी बोलता येत असे, त्यांच्याबरोबर मिसळता येत असे; आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाचे प्रेम त्यांनी मिळवले.
वेगवेगळ्या व्यक्तींनी सांगितलेल्या या आठवणी असल्या, तरी त्या सर्व मिळून तरुणवयातील अनिरुद्धांचे एक अत्यंत सुसंगत चित्र उभे करतात.
बापूंचे हे गुण अधूनमधून प्रकट होणारे सद्गुण नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक बनले होते.
आरंभीचा पाया
आज मागे वळून पाहताना, बालपणीचे हे अनुभव केवळ स्वतंत्र प्रसंग किंवा आठवणी वाटत नाहीत, तर एका अधिक व्यापक जीवनकथेच्या सुरुवातीचे अध्याय असल्याचे जाणवतात.
बापूंच्या आजींनी जोपासलेली शिस्त, बापूंच्या वडिलांनी आपल्या आचरणातून दाखवलेली निःस्वार्थ सेवेची वृत्ती, बापूंच्या आईची अढळ श्रद्धा आणि आधीच्या पिढ्यांकडून मिळालेला समृद्ध आध्यात्मिक वारसाया सर्वांचा आविष्कार त्या तरुण विद्यार्थ्यामध्ये झाला; ज्याने केवळ केवळ वर्गातच नव्हे तर चारित्र्यातही उत्कृष्ट कामगिरी केली.
त्यांची जिज्ञासा पुढे त्यांना वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाकडे घेऊन गेली. स्वतंत्रपणे विचार करण्याची त्यांची क्षमता त्यांच्या लेखनाला आणि प्रवचनांना आकार देणार होती. समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांप्रती असलेली त्यांची आस्था पुढे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात, सामाजिक उपक्रमांत आणि आध्यात्मिक कार्यात दिसून येणार होती.
