पदव्या आणि सन्मानांच्या पलीकडे
एखाद्या व्यक्तीची शैक्षणिक माहिती आपल्याला त्या व्यक्तीने मिळवलेल्या पदव्या, त्यांचा कार्यकाल आणि त्यांनी भूषवलेली पदे यांची माहिती देऊ शकतात; मात्र त्या जडणघडणीच्या वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव पूर्णपणे उलगडून दाखवू शकत नाहीत. बापूंच्या जीवनात व्याख्यान कक्ष, रुग्णालयातील वॉर्ड आणि वैद्यकीय जबाबदाऱ्या यांच्या पलीकडे असंख्य आनंददायी, कुतूहल जागवणारे, हृदयस्पर्शी आणि अनेकदा आश्चर्यचकित करणारे प्रसंग घडत होते ज्यातून बापूंच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे स्वरूप उलगडत गेले.
त्यांच्या वर्गमित्रांनी, सहकाऱ्यांनी, रुग्णांनी आणि विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या या प्रसंगांमधून पुढे लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारे त्यांचे पुढील गुण स्पष्टपणे दिसून आले - विलक्षण वैद्यकीय कौशल्य, तणावपूर्ण परिस्थितीतही अढळ राहणे, आपुलकीने आणि सहानुभूतीने ऐकून घेण्याची वृत्ती, गाढ भावनिक जिव्हाळा आणि जबाबदारी उचलण्याची स्वाभाविक तत्परता. त्यांच्यासोबत शिकलेल्या किंवा काम केलेल्या व्यक्ती अनेकदा आठवण काढतात की बापूंच्या केवळ उपस्थितीनेच गोंधळाच्या आणि संकटाच्या क्षणी स्पष्टता आणि स्थैर्य मिळत असे.
जगाला सद्गुरु अनिरुद्ध बापू म्हणून त्यांची ओळख होण्याच्या कितीतरी आधीपासूनच त्यांच्या आधार देण्याच्या वृत्तीची आणि अचूक मार्गदर्शनाची स्पष्ट झलक दिसत होती ज्याच्या अनुभव आज श्रद्धावान घेत आहेत. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमधील बापूंच्या या आठवणी आपल्याला त्यांच्या जीवनातील अशा एका अनमोल कालखंडाची झलक दाखवितात, जेव्हा विज्ञान, निरपेक्ष सेवा आणि सामर्थ्य यांचा सुंदर संगम त्यांच्या उपचारांमध्ये अनुभवायला मिळत होता.
एका वर्गमित्राच्या नजरेतून!
वैद्यकीय शिक्षण घेत असताना बापूंचा सहवास ज्यांना लाभला त्यापैकी एक म्हणजे बापूंचे जवळचे मित्र आणि सहकारी डॉ. केशव नर्सिकर. नायर हॉस्पिटलमध्ये बापूंबरोबर त्यांचेही शिक्षण झाले. डॉ. नर्सिकर म्हणतात, त्या सुरुवातीच्या काळातही बापूंचे प्रसन्न हास्य आणि असामान्य प्रगल्भता कोणाच्याही नजरेतून सुटू शकत नव्हती.
बापूंच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण भारदस्तपणा होता; त्यांचा वावर दिमाखदार असूनही ते प्रत्येकाला सहज जवळचे वाटत असत.विश्रांतीच्या वेळी, कॅन्टीनमध्ये, कॉमन रूममध्ये किंवा महाविद्यालयाच्या व्हरांड्यात बापू एकटे दिसणे दुर्मिळ होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असे अनोखे आकर्षण होते की, सर्व स्तरांतील विद्यार्थी सहजपणे त्यांच्याकडे ओढले जात असत. बापूंच्या व्यक्तिमत्त्वातील अद्भुत गुण त्यांच्या प्राध्यापकांच्याही नजरेत भरले होते. डॉ. शानभाग आणि प्रख्यात डॉ. व्ही. आर. जोशी या दोघांनाही बापूंच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचे आणि त्यांच्या अंगभूत सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक होते.
अनेक विद्यार्थी आपली नेमून दिलेली कामे पूर्ण करून निघून जात असत; बापू मात्र गंभीर आजारी रुग्णांच्या शेजारी तासनतास वॉर्डमध्येच थांबत. अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये ते विशेष दक्षता घेत असत आणि चिंताग्रस्त नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना आधार देत असत. अत्यंत संयमाने आणि करुणेने त्यांची भीती आणि अनिश्चितता याचा भार ते हलका करत असत.
पदव्युत्तर शिक्षणाच्या काळातील त्यांच्या वर्गमित्रांना आठवते की, एम.डी. (मेडिसिन) चे शिक्षण घेत असताना ही बांधिलकी आणि कर्मनिष्ठेची भावना बापूंमध्ये अधिक दृढ झाली होती. दिवसातून जवळपास अठरा तास अभ्यास करत असताना बापू ज्ञानार्जनासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देत असत. जिथे बहुतांश विद्यार्थी प्रत्येक विषयासाठी एकच क्रमिक पुस्तक समजून घेण्यासाठी धडपडत असत, तिथे बापू प्रत्येक सुचवलेल्या संदर्भग्रंथाचा सखोल अभ्यास करून अत्यंत स्पष्टतेने आणि संदर्भांसहित त्यांची सांगड घालत.
त्यांची रोगाचे निदान करण्यांची त्यांची असामान्य क्षमता हे त्यांच्या अथक अभ्यासाचे आणि शिस्तबद्ध प्रयत्नांचे स्वाभाविकपणे प्राप्त झालेले फलित होते. हॉस्पीटलमधील नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांशी त्यांचे असलेले प्रेमळ संबंधही तितकेच स्मरणीय होते. सिस्टर पुरोहित आणि सिस्टर पांडजी यांसारख्या परिचारिकांना आजही आठवते की, बापूंच्या उपस्थितीमुळे वॉर्डमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि आश्वासकता नांदत असे. बापू ड्युटीवर असताना प्रत्येकाला एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवत असे.
डॉ. नर्सिकर बापूंच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पैलूवर प्रकाश टाकतात. मेडिसिनमध्ये एम.डी. पूर्ण केल्यानंतरही बापूंनी मानवतेची अधिक सेवा करण्याच्या उद्देशाने आयुर्वेदाचा अभ्यास केला. डॉ. नर्सिकर यांच्या मते, अशा प्रकारचा निर्णय केवळ सर्वांच्या कल्याणाची मनापासून काळजी असलेली व्यक्तीच घेऊ शकते.
विनोद आणि तारुण्याच्या मैत्रीने भरलेल्या महाविद्यालयीन जीवनातील हलक्याफुलक्या वातावरणातही, बापूंनी सभ्यतेच्या एक दर्जा राखला होता. ते मनमोकळेपणाने हसत, मित्रांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आणि मित्रांच्या सहवासाचा आनंद घेत; मात्र शालीनतेच्या मर्यादा कधीही ओलांडू देत नसत. संभाषणाचा सूर असभ्यतेकडे किंवा थिल्लरपणाकडे वळला, तर बापू तो हळुवारपणे दुसरीकडे वळवत; आणि गरज पडल्यास आपली नाराजी ठामपणे व्यक्त करत. मर्यादामार्गाची तत्त्व ग्रंथांमधून किंवा प्रवचनांतून मांडण्याच्या खूप आधीपासूनच बापू त्यांच्या दैनंदिन आचरणात ती तत्त्वं सहजपणे जगत होते आणि पाळत होते.
जिव्हाळा आणि खंबीरपणा, स्नेहभाव आणि निर्मळता अशा बापूंच्या स्वभावातील दुर्मिळ गुणसंगमामुळे त्यांच्या समवयस्कांमध्येही त्यांच्याविषयी विलक्षण आदर निर्माण झाला होता. डॉ. नर्सिकर शेवटी एक साधे, पण अर्थपूर्ण निरीक्षण नोंदवतात:
तेव्हा बापू आमच्यासाठी जसा आधार आणि आश्रय होते, तसाच आजही आहेत.”
एक प्रभावी कथाकथनकार
डॉ. केशव नर्सिकर बापूंच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणखी एका लक्षवेधी पैलूची आठवण करून देतात, ज्याच्यांशी आज प्रत्येक श्रद्धावान सहजपणे परिचित आहे. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर हॉस्पिटलमधील त्यांच्या एमबीबीएसच्या वर्षांमध्ये, कॉलेजचे मराठी वाङ्मय मंडळ नियमितपणे साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असे. त्यामध्ये बापू केवळ एक प्रेक्षक म्हणून सहभागी होत नसत; तर ते अत्यंत उत्साहाने कथाकथन तसेच इतर साहित्यिक उपक्रमांमध्ये आपले सक्रीय योगदानही देत.
डॉ. नर्सिकर बापूंच्या रंगमंचावरील उपस्थितीची तुलना एका निष्णात घोडेस्वाराशी अतिशय सुंदरपणे करतात, जो घोड्यावर स्वार होताच एका चपळ घोड्याला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणतो. अगदी त्याचप्रमाणे, रंगमंचावर पाऊल ठेवताच बापू एका आत्मविश्वासपूर्ण कटाक्षाने संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असत. सभागृहात शांतता पसरत असे आणि वातावरण क्षणार्धात बदलून जात असे. आज जे लोक बापूंच्या प्रवचनांना उपस्थित राहतात, त्यांना बापूंमध्ये तोच नैसर्गिक आणि भारावून टाकणारा आविष्कार जाणवतो.
तारुण्याचा उत्साह, वैद्यक शास्त्राची भलीमोठी पुस्तके, वॉर्डमधील प्रदीर्घ काम आणि परीक्षेची कठोर व थकवणारी तयारी या सर्वांमध्येही, बापूंचे अंतःकरण जगन्मातेच्या चरणकमलांवरील दृढ भक्तीत ठामपणे स्थिरावलेले होते.
करुणेचा आश्वासक स्पर्श
एम.डी. (मेडिसिन) पदवी मिळवून प्रख्यात संधिवाततज्ज्ञ झाल्यानंतरही डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी हे त्यांना जवळून ओळखणाऱ्यांसाठी पूर्वीसारखेच प्रेमळ आणि सहजपणे भेटू शकणारे “मित्र” राहिले. परब कुटुंबासाठी ते केवळ औषधे लिहून देणारे डॉक्टर नव्हते; ते आश्वासक आणि विश्वासाचा आधार होते. त्यांच्या स्मरणात एक प्रसंग कायमचा कोरला गेला आहे. कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले, तेव्हा डॉ. अनिरुद्ध स्वतः त्या दिवंगत व्यक्तीच्या मृतदेहाच्या शेजारी रुग्णवाहिकेत बसले आणि त्यांच्या घरी गेले.
कुटुंबीयांना त्या व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता येईल याची त्यांनी व्यवस्था केली. शोकाकुल नातेवाईकांना त्यांचे निधन का अटळ होते, हे त्यांनी संयमाने समजावून सांगितले आणि अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत संपूर्ण व्यवस्थेवर ते स्वतः लक्ष ठेवून होते. त्या दुःखाच्या क्षणी बापूच त्यांचा एकमेव आधार बनले.
हे केवळ कर्तव्यापोटी केलेले एखादे असामान्य कृत्य नव्हते. तर तो त्यांच्या मूळ स्वभावाचा एक सहज आविष्कार होता. त्यांच्या मते, एका डॉक्टरची जबाबदारी केवळ रोगाचे निदान करणे किंवा रुग्णालयातून सुट्टी देणे ह्यावर संपत नाही; तर ती मानवी जीवनातील अत्यंत नाजूक क्षणांपर्यंत विस्तारलेली असते, जिथे करुणा आणि भक्कम आधार दिला जातो. वॉर्ड इन्चार्ज दमयंती पवार आठवण सांगतात की, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये डॉ. अनिरुद्ध जोशी येताच तिथले वातावरणच बदलून जायचे.
स्वच्छ पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान केलेले आणि चेहऱ्यावर स्मितहास्य असलेले बापू प्रत्येक बेडजवळ जात आणि रुग्णाची स्वतः चौकशी करत. त्यांच्या करुणेत कोणताही भेदभाव नव्हता; रुग्णाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर काहीही असो. बापूंच्या उपचारात किंवा काळजी घेण्यात कोणताही भेदभाव नसे; प्रत्येक रुग्णावर ते समान आपुलकीने आणि काळजीपूर्वक उपचार करीत असत. बापूंच्या ओपीडी (OPD) कक्षाबाहेर लांबच लांब रांगा लागणे हे एक नित्याचेच दृश्य होते.
काही अपरिहार्य कारणामुळे बापूंना येण्यास उशीर झाला, तरीही रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी संयमाने त्यांची वाट पाहणे पसंत करत. अनेक जण असे म्हणत की, कोणतेही औषध देण्यापूर्वीच त्यांच्या स्मितहास्याने आमचे अर्धे आजार बरे होतात.
शिस्तीबाबत कठोर, पण स्वभावाने प्रेमळ
सिस्टर दमयंती पवार पुढे आठवण सांगताना म्हणतात की, बापू प्रत्येकाला प्रेमाने "राजा" असे संबोधत असत - मग तो वॉर्ड बॉय असो, सफाई कामगार असो किंवा रुग्ण असो. त्या एका शब्दामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण होत असे. त्याच वेळी, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचे कठोर निकष ते कायम राखत.
कोणत्याही व्यक्तीच्या पदाची पर्वा न करता निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा कधीही सहन केला जात नसे. मग तो सफाई कर्मचारी असो किंवा उच्चपदस्थ अधिकारी, सर्वांसाठी समान नियम लागू होते. त्यांनी कधीही आपला संयम गमावला नाही, परंतु चुकीच्या गोष्टींना कधीही पाठीशी घातले नाही. सिस्टर-इन-चार्ज मनीषा कांबळी यांना आठवते की, एक सफाई कर्मचारी जो त्याच्या उद्धट आणि रागीट स्वभावासाठी ओळखला जात असे, तो बापूंच्या उपस्थितीत शांत होत असे व त्याच्यामधील हा बदल सर्वांना जाणवत असे.
त्या व्यक्तीने स्वतःच कबूल केले होते की केवळ बापूंना पाहिल्यानेच त्याला शांत आणि हलके वाटत असे. साध्या आणि मनमिळाऊ स्वभावाचे, उंच व धिप्पाड बांध्याचे आणि सदैव हसतमुख असणारे हे डॉक्टर ज्युनिअर डॉक्टरांना ज्या आपुलकीने शिकवत, त्याची सिस्टर कांबळी आठवण सांगतात. ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अत्यंत स्पष्टपणे देत आणि विद्यार्थ्यांना अनेकदा असे वाटत असे की त्यांचे बोलणे अविरतपणे ऐकत राहावे. ज्युनिअर डॉक्टर अनेकदा म्हणत, "हे लेक्चरर आपल्यापैकीच एक आहेत." वॉर्डमध्ये जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण होत, तेव्हा कर्मचारी साहजिकच सगळ्यात आधी बापूंकडे जात असत.
प्रत्येक समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत बापू त्यांना संयमाने मार्गदर्शन करत असत. असे एखादे इंजेक्शन ज्याने वेदना होतील ते देणे आवश्यक असेल, तर ते देणे का आवश्यक आहे हे बापू स्वतः रुग्णाला समजावून सांगत. जर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असेल, तर ते शांतपणे संपूर्ण प्रक्रिया सविस्तर सांगत आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील भीती दूर करत असत. सिस्टर कांबळी यांच्या मते, डॉ. अनिरुद्धांनी उपचारांच्या तीन मुख्य स्तंभांवर भर दिला:
- १. स्वच्छता
- २. योग्य पोषण
- ३. करुणा (सहानुभूती)
बापू अनेकदा म्हणत :
"औषधांनी आजार बरा होतोच, पण करुणेने (सहानुभूतीने) अर्धा आजार बरा होतो."
अनेक जण प्रेमाने आणि आत्मविश्वासाने म्हणत :
“ते माझे डॉक्टर आहेत आणि ते माझी खूप चांगली काळजी घेतात.”
जीवन घडवणारे शिक्षक
एम.बी.बी.एस. आणि एम.डी. पूर्ण करून नायर हॉस्पीटलच्या Rheumatology (संधीवात-शास्त्र) डिपार्टमेंट मध्ये सेवा करत असतानाही डॉ. अनिरुद्ध यांनी अध्यापनाप्रती असलेली विलक्षण बांधिलकी कायम ठेवली. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या डॉ. आनंद कोरे यांना एम.बी.बी.एस. च्या अंतिम वर्षी विद्यार्थ्यांवर डॉ. अनिरुद्ध यांच्या व्याख्यानांचा झालेला गाढ प्रभाव आठवतो.
त्यांच्या नोट्सची विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असे आणि बापूंनी समजावून सांगितल्यावर Harrison's Principles of Internal Medicine सारखे अवघड पुस्तकही सहज आकलन होण्यासारखे वाटत असे. त्यांचे वर्ग नेहमीच खचाखच भरलेले असत, कारण त्यांचे शिकवणे हे फक्त पुस्तकी ज्ञान देणे नसून अनुभवजन्य ज्ञानावर त्यांचा भर असे ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत मोलाचे होते.
आधुनिक शैक्षणिक साधने सर्रासपणे उपलब्ध होण्याच्या कितीतरी आधीपासूनच, बापू आवश्यकतेनुसार वैद्यकीय परिस्थिती आणि वैद्यकीय संकल्पनांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून दाखवत असत. त्यामुळे कठीण विषय स्पष्ट आणि सहज लक्षात राहणाऱ्या पाठांमध्ये रूपांतरित होत असे. ते केवळ व्यवसाय म्हणून अध्यापन करत नव्हते, तर ते त्यांच्यासाठी एक व्रत होते. बापूंची विलक्षण बुद्धिमत्ता, अफाट शारीरिक क्षमता आणि असामान्य निरीक्षणशक्ती पाहून विद्यार्थी प्रभावित होत असत.
काळाच्या ओघात, त्या विद्यार्थ्यांच्या या आदराचे रूपांतर पूर्ण विश्वासात झाले. अनेक जण केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर आपल्या वैयक्तिक जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांमध्येही बापूंचे मार्गदर्शन घेऊ लागले.
वैद्यकीय प्रावीण्य आणि तत्रज्ञानाबाबत असलेली काळाच्या पुढील दृष्टी
नायर रुग्णालयातील त्यांच्या कार्यकाळात, डॉ. अनिरुद्धांच्या वैद्यकीय प्रावीण्याची सर्वत्र दखल घेतली जात असे. त्यांच्या विशेष कौतुकास्पद प्रावीण्यांपैकी एक म्हणजे इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) चे अचूक विश्लेषण करण्यातील त्यांचे प्रभुत्व. अत्यंत गुंतागुंतीच्या ईसीजी (ECG) चे काही सेकंदातच स्पष्टपणे आणि अचूकपणे विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता पाहून सहकारी आणि वरिष्ठ अनेकदा थक्क होत. हृदयविकाराशी संबंधित गंभीर आणि आणीबाणीच्या प्रसंगी, त्यांच्या अचूक आणि निर्णायक निदानांना अत्यंतमहत्त्व दिले जात असे.
भारतात जेव्हा डिजिटल तंत्रज्ञान अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत, तेव्हा वैद्यकीय व्यवसायात संगणकाचा वापर करण्याची संधी मिळालेल्या सुरुवातीच्या वैद्यकीय व्यावसायिकांपैकी डॉ. अनिरुद्ध हे एक आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची त्यांची ही तयारी, त्यांची दूरदृष्टी दर्शवणारी होती—ज्यात पारंपरिक वैद्यकिय ज्ञान आणि वैज्ञानिक नवनिर्मिती यांचा सुंदर संगम होता.
वैद्यकीय क्षेत्रापलीकडील एक मार्गदर्शक
डॉ. हेमंत वडियार एक आठवण सांगतात की, ते आणि त्यांचे काही वर्गमित्र जनरल मेडिसिनच्या मार्गदर्शनासाठी एका अनुभवी आणि जाणकार शिक्षकाच्या शोधात होते. तेव्हा डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी त्यांना दर शनिवारी दुपारी शिकवण्यास सुरुवात केली. शैक्षणिक मार्गदर्शन म्हणून सुरू झालेल्या या प्रवासाचे रूपांतर लवकरच एका घनिष्ठ गुरू-शिष्यत्वाच्या नात्यात झाले. स्वतःहून पुढाकार घेत बापूंनी डॉ. वडियार यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी विशेष विषय निवडण्याबाबत मार्गदर्शन केले.
असे विचारपूर्वक केलेले मार्गदर्शन शैक्षणिक क्षेत्रात दुर्मिळच असते. डॉ. वडियार यांना एक अत्यंत वैयक्तिक अनुभवही आठवतो. जेव्हा त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा डॉ. अनिरुद्ध, त्यांच्या वरिष्ठ पदावर असताना, अत्यंत व्यस्त वेळापत्रक असूनही दररोज स्वतः त्यांच्यासाठी डबा घेऊन येत असत आणि त्यांना धीर देत त्यांच्यासोबत वेळ घालवत असत.
वैद्यकीय अंदाजानुसार त्यांच्या आईची पुढील दोन-तीन वर्षे जगण्याचीच शक्यता केवळ पन्नास टक्केच होती, तरीही बापूंच्या देखरेखीखाली त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यानंतर पुढील सतरा वर्षे त्यांनी उत्तम आरोग्य अनुभवले. डॉ. वडियार यांच्यासाठी बापू केवळ शिक्षक राहिले नाहीत. ते त्यांचे मित्र, तत्त्वज्ञ, सल्लागार, मार्गदर्शक आणि अखेरीस सद्गुरु झाले.
टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर रुग्णालयातील ती वर्षे ही डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांच्या व्यावसायिक जीवनातील केवळ एक पर्व नव्हते; ती वैद्यकीय प्रावीण्य आणि रुग्णांप्रती करुणामय सेवेसाठी असलेल्या त्यांच्या सखोल बांधिलकीचे प्रतिबिंब होती.
रुग्ण तपासण्यासाठी केलेली वॉर्डमधील प्रत्येक फेरी, प्रत्येक निदान, प्रत्येक व्याख्यान, रुग्णाशी बोललेला प्रत्येक दिलासादायक शब्द आणि निस्वार्थ सेवेची प्रत्येक कृती, या सर्वांमधून तीच असीम करुणा दिसून येत होती, जी आज लाखो श्रद्धावान सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या ठायी अनुभवतात. त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतून केवळ एका असामान्य डॉक्टर आणि शिक्षकाचेच नव्हे, तर स्वाभाविकपणे दुसऱ्यांसाठी जगणारे एक सहृदय व्यक्तिमत्त्वही उलगडते.
