अध्यात्माचे सर्वांत सोपे सत्य
अध्यात्म हा जगण्याचा अनुभव आहे, याविषयी सांगताना सद्गुरु अनिरुद्ध , श्रीमद्पुरुषार्थ (प्रथम खंड – सत्यप्रवेश) मध्ये लिहितात:
“आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य आपण परमेश्वराकरिता करत आहोत व परमेश्वराला प्रत्येक गोष्ट त्याच क्षणी कळत असते, हे लक्षात ठेवून जगणे म्हणजेच आध्यात्मिक जीवन; व हाच मार्ग खरेखुरे समाधान, शांती व नित्यप्रसन्नता देणारा असतो.”
या जाणिवेमुळे अध्यात्म केवळ उपासनेच्या ठिकाणांपुरते मर्यादित राहत नाही; उलट ते आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी, इतरांची सेवा करताना आणि जीवनातील प्रत्येक छोट्याश्या कृतीसोबतही आपल्याबरोबर राहते.
बापूंच्या मते, अध्यात्म म्हणजे जीवनापासून पलायन नव्हे; तर जीवन ध्येयपूर्ण, प्रेममय आणि अढळ श्रद्धेने जगण्यासाठी मिळणारे ईश्वरी सामर्थ्य होय.
अध्यात्म म्हणजे जीवनापासून पलायन नव्हे किंवा केवळ बौद्धिक तत्त्वज्ञानही नव्हे; हा जगण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्षण, प्रत्येक जबाबदारी आणि प्रत्येक नाते हे परमेश्वराशी अधिक जवळीक साधण्याची एक संधी बनते.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू श्रीमद्पुरुषार्थ (प्रथम खंड – सत्यप्रवेश) मध्ये अध्यात्म आणि सांसारिक जीवन यांच्यातील या सखोल नात्याचे अधिक विस्ताराने स्पष्टीकरण देतात:
“सन्मार्गाने व्यवहार करत राहणे व असा व्यवहार करता करता अंतर्मन हळूहळू परमेश्वरी मनाच्या प्रवेशासाठी मोकळे करत जाणे म्हणजेच अध्यात्म; व जीवनात अध्यात्म हे अंतिम ध्येय साकार करण्यासाठी देहोपयोगी क्रिया सन्मार्गाने चालविणे हाच व्यवहार.”
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांचा ठाम विश्वास आहे की, आध्यात्मिक जाणीव आणि प्रापंचिक भान या दोन्ही एकत्र असल्या पाहिजेत. आध्यात्मिक आणि सांसारिक जीवनातील हा समतोल त्यांच्या शिकवणुकीच्या केंद्रस्थानी आहे. ते लिहितात:

भक्ती : अध्यात्माचे हृदय
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू भक्तिमार्गाचा पुरस्कार करतात. प्रेममय भक्तीचा हा मार्ग परमेश्वराशी जवळीक साधण्याचा सर्वांत सहज आणि सोपा मार्ग असल्याचे ते सांगतात. कर्ममार्ग, योगमार्ग किंवा ज्ञानमार्गामध्ये अनेकदा कठोर शिस्त, सखोल शास्त्राध्ययन किंवा मन आणि इंद्रियांवर असाधारण नियंत्रण यांची आवश्यक असते; याउलट भक्तीची सुरुवात अशा गोष्टीने होते जी प्रत्येक मानवी हृदयात आधीपासूनच असते, ती म्हणजे प्रेम करण्याची क्षमता.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मते, भक्ती ही केवळ संत, विद्वान किंवा संन्याशांसाठी राखीव नाही. वय, शिक्षण, व्यवसाय किंवा परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येकजण हा भक्तीमार्ग स्वीकारू शकतो.
भक्तीची ही संकल्पना श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज (प्रथम खंड – सत्यप्रवेश) मध्ये सुंदरपणे व्यक्त झाली आहे. येथे बापूंनी भक्तीची व्याख्या पुढील शब्दांत केली आहे:
“‘भज्-सेवायाम्’ — ‘भज्’ या संस्कृत धातूचा अर्थच मुळी ‘प्रेमपूर्वक सेवा’ असा आहे. मी माझ्या परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने केलेली सेवा म्हणजे भक्ती. ह्याचाच अर्थ, भक्ती म्हणजे परमेश्वरावरील प्रेम आणि परमेश्वराच्याच, असंख्य वाईट प्रारब्धामुळे दुःखी असलेल्या लेकरांची सेवा.” (चरण ३३)
ते भक्तीच्या मर्माचे पुढे स्पष्टीकरण देतात:
“भक्ती म्हणजे अत्यंत प्रेमाने केलेले परमेश्वराचे स्मरण, दर्शन, गुणगायन, निःस्वार्थ सेवा, आणि सत्य, प्रेम व आनंद या परमेश्वरी तत्त्वांना आपल्या जीवनात आणण्यासाठी केलेले सर्व परिश्रम.” (चरण ३७)
