या वेबसाइटवर काय मिळेल?
एका साध्या भक्तासाठी याचे उत्तर अगदी सोपे आहे—
इथे तुम्हाला तुमचे बापू भेटतील.
ही वेबसाइट प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात एक अत्यंत प्रेमळ आणि आश्वासक जाणीव जागवते—
“बापू माझ्यावर प्रेम करतात... आणि बापू सदैव माझ्यासाठी आहेत.”
आपण कुठेही असलो आणि जीवनात कोणत्याही परिस्थितीतून जात असलो—सुखात असो वा संघर्षात, आनंदात असो वा दुःखात—या वेबसाइटवर आपण पुन्हा पुन्हा बापूंना भेटू शकतो आणि प्रत्येक वेळी बापूंना नव्याने अनुभवू शकतो.
थोडक्यात, ही वेबसाइट केवळ पाहण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. ही वेबसाइट तुमची आहे... आणि प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात उमटणारी भावना— “ही वेबसाइट म्हणजे माझे स्वतःचे बापू... जणू खास माझ्यासाठीच!”
अनिरुद्ध स्पर्श
ही वेबसाइट म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाला बापूंच्या प्रेमाशी आणि त्यांच्या शिकवणीशी जोडणारा एक मार्गदर्शक दीप! या वेबसाइटवर असलेल्या प्रत्येक गोष्टीत सद्गुरु अनिरुद्धांचा स्पर्श आहे. त्यांचे नाम, रूप, गुण, लीला आणि धाम यांचा अनुभव देणारा हा एक आगळावेगळा उत्सव आहे.
ही वेबसाइट म्हणजे अध्यात्माचा अमूल्य ठेवा आहे, जो आपल्याला प्रेमाची ऊब आणि आधार देतो. आयुष्यात कधी टीकेमुळे मन दुखावते, माणसांच्या वागण्यातील दुटप्पीपणा अस्वस्थ करतो, विश्वासघातामुळे विश्वास डळमळतो, तर कधी कौतुकामागचा खोटेपणाही जाणवू लागतो. अशा वेळी मनाचा समतोल ढळू लागतो आणि स्वतःवरचा विश्वासही कमी होऊ लागतो. तेव्हा ही वेबसाइट एखाद्या खऱ्या मित्रासारखी आपल्या सोबत उभी राहते—आपल्या अस्वस्थ विचारांना शांत करते, मनावरची वेदना हलकी करते आणि आपल्या श्रद्धेला पुन्हा बळ देते. कोणतीही अट न घालता, कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि पात्रतेचा कोणताही निकष न लावता, ही वेबसाइट मनाला सावरते, आधार देते आणि एका विश्वासू सोबतीप्रमाणे सदैव आपल्या सोबत राहते—आपल्याला उभारी देण्यासाठी, आपले रक्षण करण्यासाठी आणि जीवनाच्या वाटेवर योग्य दिशा दाखवण्यासाठी.
या वेबसाइटचा गाभा म्हणजे ‘अनिरुद्ध स्पर्श’—प्रत्येक श्रद्धावानापर्यंत पोहोचणारा सद्गुरूंचा प्रेमळ आणि चैतन्यमय स्पर्श.
ही केवळ एक वेबसाइट नाही; तर मनाला दिलासा आणि विसावा देणारी एक अनुभूती आहे—आईच्या कुशीत निश्चिंतपणे विसावलेल्या बाळाला लाभणाऱ्या मायेच्या उबेसारखी आणि काहीही अपेक्षा न ठेवता भरभरून देणाऱ्या बापूंच्या प्रेमळ आलिंगनासारखी!
ही वेबसाइट का?
जेव्हा तुमचे मन आनंदाने भरून येईल आणि तो आनंद कोणासोबत तरी वाटून घ्यावासा वाटेल, तेव्हा कोणताही मत्सर न करता तुमच्या आनंदात मनापासून सहभागी होणाऱ्या एका खऱ्या मित्रासारखी ही वेबसाइट तुमच्या सोबत असेल.
हेच ‘अनिरुद्ध-विश्व’ आपल्याला विश्वास देते की बापू आपल्यापासून कधीही दूर नाहीत आणि आपण कधीही एकटे नाही... म्हणजेच " मी तुला कधीच टाकणार नाही " ह्या बापूंच्या प्रेमळ आणि आश्वासक वचनाची प्रचिती देते. दैनंदिन जीवनाच्या धावपळीत आणि गोंगाटातही बापूंची प्रेमळ दृष्टी सदैव आपल्यावर आहे—प्रत्येक पावलावर आपल्याला मार्ग दाखवणारी, आपले रक्षण करणारी आणि प्रेमाने आपली काळजी घेणारी—याची जाणीव ही वेबसाइट आपल्याला सतत करून देते.
ही केवळ काही विधाने नाहीत; या वेबसाइटमध्ये आधार शोधणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानासाठी ही प्रेमाने दिलेली आश्वासक वचने आहेत..., जी एक सत्य पुन्हा पुन्हा मनावर बिंबवतात —बापू माझे आहेत; बापू माझ्यासाठी आहेत; बापू माझ्यासाठीच आहेत.....
कारण या वेबसाइटच्या प्रत्येक शब्दातून, प्रत्येक चित्रातून आणि प्रत्येक अनुभवातून जाणवते ते ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’.
ही वेबसाइट म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून... प्रत्यक्ष बापूच आहेत. म्हणजेच ...
इथे प्रेम-कृपा आहे, मायेचा सोहळा,
इथे नयनी भाव आहे, भक्तीचा सोहळा...