|| हरि ॐ ||
सूचना : श्री मंगला चंडिका प्रपत्ती च्या वेळी उडीद वापरतात ते त्रिविक्रमासाठी.. उडीद ही त्रिविक्रमाची आवडती गोष्ट आहे. त्यामुळे त्यात काहीही बदल करता येणार नाही.
नंतर बापूंनी प्रथम शुभंकर स्तवन म्हणून प्रवचनाला सुरुवात केली.
कंठ कूप पाषाण पूजनाच्या वेळी केलेला गजर आपण सगळीकडे ऐकतो, सर्वांना हा गजर अतिशय आवडला आहे. आपल्याला हा गजर कुठून आला हे पण माहित असायला हवे. देवीची तीन स्तोत्रे आहेत...कवच, अर्गला व किलक ही देवीच्या सुक्ताशी जोडलेली असतात, चंडी पाठच्या आधी ही स्तोत्रे म्हटली जातात. ह्यातील कवच हे प्रजापती ब्रह्माने लिहिले आहे व मार्केंडेय ऋषींना सागितले. दुसरे अर्गला हे महाविष्णूने लिहिले आहे तर किलक हे परम शिवाने लिहिले आहे.
" जयंती मंगला काली..." हा गजर म्हणजे संस्कृत स्तोत्रातील २ रा श्लोक. हा गजर पण आहे व मंत्र सुद्धा. ह्यात खूप स्पष्टपणे त्या आदिमातेचे प्रेम, कारुण्य, वास्त्यल्य सांगितले गेले आहे. तिचे रहस्य म्हणजेच खरेखुरे ज्ञान सांगणारा हा गजर आहे .
ही तीनही स्तोत्रे सुंदर असली तरी तरी ती म्हणण्यासाठी पूर्णपणे शुद्ध आचरण, शुद्ध उच्चार, शुद्ध मन, शुद्ध भाव असणे आवश्यक असते. त्यामुळे ती म्हणायला जाऊ नका .
ह्या उत्सवाच्या आधी देवीची जेवढी सुंदर स्तोत्रे आहेत ती सर्व मी ( प.पू.बापू) स्वत: तुम्हाला प्राकृत भाषेत पुस्तिका रुपात उपलब्ध करून देईन .
ह्या गजरात देवीची एकूण ११ नावे आहेत जयंती, मंगला, काली.... ही नावे म्हणजे तिचे कृपा करण्याचे मार्ग आहेत .
१) जयंती : जी जिंकत आहे, जी जिंकलेली आहे अशी विजयी असणारी. वर्तमान काळामध्येच सदैव विजयी असणारी व वर्तमान काळातच विजय प्रदान करणारी अशी जयंती.
जयंती नाव महाविष्णुने प्रथम उच्चारले. ही जयंती म्हणजे वैजयंती , महाविष्णूच्या, विठ्ठलाच्या गळ्यातील माळ,जी चंडिकेनेच तिच्या लाडक्या पुत्राला दिली.
ही विजय प्रदान करते, स्वतः विजयी होऊनच. त्यामुळे कुठल्याही असुरांचे तिच्या पुढे काहीही चालत नाही. Ultimate विजयी तीच असते .
जो तिच्या पक्षात आहे तोच विजयी होऊ शकतो. इथे वर्तमान काळाचा संबंध म्हणजे सगुणाचे ध्यान.
"न करिता सगुणाच्या ध्याना, भक्तीभाव कदा प्रगटेना.." श्रीसाईसच्चरितात आपण ही ओवी वाचतो .
हेच सगुणाचे ध्यान माणसाचे व परमेश्वराचे नाते वर्तमान काळात घट्ट करते. म्हणून जयंती हे ध्यानाचे रूप आहे. ह्या ध्यानाच्या मार्गाची अधिष्ठात्री ही जयंती आहे. सगुणाचे ध्यान केल्यानेच ही आदिमाता आम्हाला विजयी ठेवते.
म्हणूनच भक्ती वाढवण्यासाठी त्या त्या देवतेचा ध्यान मंत्र अतिशय महत्वाचा असतो. सगुण ध्यान म्हणजे समोर इष्ट देवतेचा फोटो ठेवून त्याच्या कडे बघता बघता त्याचे गुण गायन करणे.
अधिष्ठात्री म्हणजे आधार. सहजपणे खात्रीशीर यश देणारा रस्ता. माझे सगुणाचे ध्यान यशस्वी पणे पूर्ण होण्यासाठी पुरवणारी उर्जा म्हणजे जयंती नाव.
जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून परमात्म्याचे सगुण ध्यान करण्याचा प्रयास कराल, तेव्हा त्यातील बेस्ट तुम्हाला मिळावे, ह्यासाठी हा गजर मी (प.पू.बापू ) तुम्हाला दिला आहे. हा गजर करताना कमीत कमी ११ पट फायदा प्रत्येकाला मिळणार आहे. पुण्य वाढण्यासाठी पण व पाप कमी होण्यासाठी सुद्धा.
ज्या अर्थी आपला कलियुगात जन्म झाला आहे त्याअर्थी आपल्या पापाचे गाठोडे पुण्यापेक्षा जास्तच आहे.
म्हणून बिभीषणाची प्रार्थना आपल्यासाठी महत्त्वाची आहे,
"पापोsहं पापकर्माsहं पापात्मा पापसंभवः। त्राहि मां आदिमाते सर्वपापहरा भव॥".
सगुण ध्यानाचा मार्ग म्हणजेच जयंती मार्ग
२) मंगला : स्वतः मंगलमय असणारी व सर्वांचे मंगलच करणारी ती मंगला .
"सर्व मंगल मांगल्यै शिवे सर्वार्थ साधिके.." हिने केलेला महिषासुराचा वध हा त्याच्यासाठी मंगलच होता. असुरांना मारतानाही ही मंगलच असते कारण त्यात असुरांचेही मंगलच असते व विश्वाचेही मंगलच असते.
जेव्हा आपण ध्यान करतो, फोटोकडे बघतो तेव्हा प्रेमाने बघा, स्तोत्रे म्हणा. आपण आईची महाशक्ती म्हणून नाही तर आई म्हणूनच उपासना करायची आहे. जे शक्ती म्हणून उपासना करतात ते वाम मार्गावर जातात ते ह्या चंडिकेला उपयोगाची वास्तू समजतात.
म्हणूनच नेहमी मातरौपासना करा. ही माझ्या देवाची आई ह्या भावानेच तिच्याकडे बघा तेव्हा ती मंगला रूपाने तुमच्याकडे बघेल.
ध्यान स्मरण म्हणजेच मंगला. आई पुत्राचे नाते स्मरण ठेवले की तुमची ती आजी होते आणि आजी नेहमीच नातवंडांचे लाड करते. म्हणूनच हिची कधी शक्ती म्हणून उपासना न करता ही माझ्या परमात्म्याची माता ह्या रूपानेच उपासना करा.
आदिमाता कधीही बोकड किंवा रेडा ह्याचे बळी स्वीकारत नाही. जर कोणाच्या घरात बळी देण्याची प्रथा असेल व तुम्हाला नातेवाईकांचा विरोध चुकवता येत नसेल तर नंतर जुईनगरला जावून एक दत्त याग किंवा दोन व्यंकटेश याग प्रायश्चित म्हणून करावा.
आई जेवढी सौम्य तेवढीच उग्र आहे. ज्या क्षणी तुम्ही तिची फक्त शक्ती म्हणून उपासना करता तेव्हा तुमचे अनिरुद्ध बापुशी नाते असू शकत नाही. तर जेव्हा आई मानून उपासना करता तेव्हा जरी तुम्ही बापूला मानत नसाल तरी बापू तुमची काळजी घेईल .
जो कोणी परमात्म्याचे शब्द मानतो तो परमात्म्याचे बाळ बनतो मग आपोआपच त्या आदिमातेचेही बाळ बनतो. म्हणून तिच्या कुठल्याही रुपाची उपासना करताना आई मानूनच करा .
काही बाबतीत मी (प.पू.बापू) अतिशय कडवा आहे. मी म्हणतो म्हणून माझ्या आईची उपासना आई म्हणुनच व्हायला हवी, मला अटी चालत नाहीत .
ह्या इह लोकात फक्त माझ्याच (प.पू.बापू) terms चालतात. मी मर्यादा घालून दिली आहे.."पावित्र्य हेच प्रमाण". जर कोणी बापूंच्या नावावर खोटे पसरवत असेल तर बापू बसला आहे. बापूंशी नाते ठेवायचे असेल तर अट चालणार नाही आणि हा मार्ग म्हणजेच काली मार्ग.
३) काली : परमात्म्याशी व्यवहार बिनशर्त असला पाहिजे. अट चालणार नाही आणि काली म्हणजेच कुठलीही अट नाही.
महिषासूरमर्दिनीचा पहिला अवतार महाकाली. ब्रम्ह देवाच्या चुकीमुळे मधु- कैटभ निर्माण झाले. ह्या दोन वृत्ती म्हणजे मर्यादा तोडण्याची वृत्ती व मोहाची वृत्ती.
ह्या वृत्ती स्तुती व निंदा स्वरुपात आपल्या जीवनात येतात. स्तुतीने मनुष्य चढून जातो तर निंदेने पित्त खवळून उठते ह्यामुळे भक्ती मार्गावरून अध:पतन होते. हे मधु- कैटभ ब्रम्ह देवावार म्हणजे तुमच्या सृजनशील शक्तीवर, creativity power वर हल्ला करतात.
म्हणून देवाच्या कार्यात सहभाग घेताना unconditional सेवा व कार्य करता आले पाहिजे. स्तुती व निंदेच्या पलीकडचा मार्ग म्हणजे काली मार्ग. आम्हांला आईकडे प्रार्थना करायचा अधिकार आहे. अटी घालण्याचा नाही. आई ह्या तत्त्वाशी नाते जोडल्यावर कुठलीही अट घालण्याचा आपल्याला अधिकारच येत नाही .
गर्भाशयात सर्व बाजूंनी अंधारच असतो परंतु हा अंध:कार बाळाला protect करणारा असतो. हे अंधःकाराचे स्वरूप म्हणजे आईचे रूप. ह्याचा अर्थ काही जणांनी चुकीचा लावला व आईची उपासना म्हणजे अंधःकाराची उपासना असे पसरविले गेले. बाळाने जर गर्भात असताना आईला अटी घालण्याचा प्रयत्न केला तर abortion नक्की. म्हणूनच देवाला अटी घालण्याचे थांबवा.
अनेकदा घरातील व्यक्ती परत आली नाही तर देव पाण्यात ठेवले जातात ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. देवाला नकातोंड्डा पर्यंत बुडवून ठेवायचं अत्यंत अघोरी पद्धत, देवाला वेठीला धरून आपली कामं करून घ्यायची पद्धत. असे चुकून कधी तुमच्या हातून घडले असेल तर शांतपणे आज घरी गेल्यावर देवासमोर उभे राहून सांगा, " बापू माझे चुकले, मला माफ करा". काली मार्गामुळे क्षमा मिळते. जो अटी न घालता भक्ती करतो, तेव्हा ती आदिमाता व तिचे पुत्र त्यांच्या चुकासुद्धा पोटात घालतात. पुढचे नाव आहे भद्रकाली.
४) भद्रकाली : भद्र म्हणजे कल्याण आज फक्त अर्थ बघायचा आहे. जर मी अटी टाकल्या तर ही आदिमाता उग्र काली असते, जर अटी टाकल्या नाही तर भद्रकाली असते, म्हणजेच कल्याण करणारी असते.
ह्याच गजराच्या मार्गाने आपल्याला जायला हवे आणि आपण जाणारच आहोत.
|| हरि ॐ ||