|| हरि ॐ ||
"जयंती मंगला काली.." हा गजर आपण बघत आहोत.
काली म्हणजे unconditional love. सगुण, ध्यान. स्मरण अश्या वाटेने जाता जाता आपण कालीपर्यंत पोचलो .
आईच्या गर्भातला अंधकार म्हणेजच कालीचे रूप आपण बघितले. हा अंधकार म्हणजे खरी अजाणता आहे. गर्भात बाळाला ओढ असते ती आईच्या हृदयाच्या स्पंदनाची..ह्या स्पंदनाने, प्रेमाने बाळाचे आणि आईच नाते जोडले गेले असते आणि अश्या ह्या अंधकाराच्या रूपाला आंपण घाबरतो.
आपण प्रसन्नोत्सव करणार आहोत त्यात महाकालीची पूजा करणार आहोत. ते महाकालीचे रूप पाहून घाबरून जाऊ नका. महाकालीचे ते रूप सर्व अशुभ गोष्टींचा नाश करणारे आहे .
काली म्हणजेच निरव शांतता. कसलाच स्पंद, आवाज नाही अशी अवस्था. विश्व निर्माण होण्यापूर्वीची अवस्था म्हणजेच काली. निरव शांततेला मनुष्य खूप घाबरतो. परंतु ही निरव शांतता जेव्हा सत्त्व गुण रूपाने युक्त असते, म्हणजेच परमेश्वराच्या स्वरुपात बेभान होण्याची जी अवस्था असते ती अवस्था म्हणजे काली. अशी अवस्था जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा ती भद्रकाली म्हणून कार्यरत होते.
भद्रकाली ही कालीचीच उत्क्रांत अवस्था आहे. उ.दा. १० वर्षाचे मुल जेव्हा २० वर्षाचे होते तेव्हा ते मुल १० वर्षापेक्षा वेगळे असते परंतु मूलतः एकच असते. अश्याच प्रकारे कालीच्याही दोन अवस्था आहेत.
१) भद्रकाली २) उग्र काली.
ह्या दोन्ही अवस्था भक्ताच्या उपासनेनुसार ठरत असतात. जेव्हा सत्त्व मार्गाने चंडिकेची उपासना केली जाते तेव्हा ती भद्रकाली रूपाने कार्य करते तर जेव्हा तांत्रिक मार्गाने तिची उपासना केली जाते तेव्हा ती उग्रकाली म्हणून तुमच्या जीवनात येते .
भद्रकाली म्हणजे कल्याण करणारी काली तर उग्र काली म्हणजे संहार करणारी काली.
कालीला आपल्या जीवनात भद्रकाली बनवायचे की उग्रकाली ते कालीवर नाही तर तुमच्या उपासनेवर ठरत असते. पंच "म" कारांनी कालीची उपासना केली जाते. हे पंच "म" कार तांत्रिक व वैदिक असे दोन प्रकारचे असतात. हे पंच "म" कार म्हणजे मद्य, मांस, मैथुन, मुद्रा व मत्स्य.
तांत्रिक "म" करतील मद्य म्हणजे दारू, मांस म्हणजे मटण, मत्स्य म्हणेज मासा, मैथुन, मुद्रा म्हणजे स्वपत्नी नसलेल्या स्त्रीसोबत समागम करत उपासना करणे, हा बीभत्स प्रकार आहे.
जे चूक आहे ते चूकच आहे त्याला मी (प.पू.बापू) कधीही आयुष्यात बरोबर म्हटले नाही.
आपण ॐ म्हणताना हवा आत घेतो ,परंतु ही तांत्रिक मंडळी ॐ म्हणताना हवा बाहेर टाकतात व उपासनेच्या स्थानी स्वस्तिक उलटा काढतात. ह्यांच्या उपासनेमुळे भूत, प्रेत, पिशाच्च खुश होतात. आणि अश्या तांत्रीकांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपली कामे भराभर होतात, पण चुकीच्या मार्गाने आणि त्यावेळी ती काली माझ्या जीवनात उग्र संहार करणारी बनते.
परंतु जेव्हा हे पंच "म" कार मी वैदिक मार्गाने उपासना करण्यासाठी वापरतो तेव्हा तीच काली भद्रकाली म्हणून माझ्या जीवनात प्रवेश करते.
वैदिक "म"कारातील १) मद्यचा अर्थ मधु म्हणजेच मध. मधुचेच प्राकृत मद्य केले गेले. मधूचा दुसरा अर्थ आपल्या सहस्त्रार चक्रातून गळत असलेला मध. म्हणजेच भक्तीत रममाण होण्याची अवस्था. मद म्हणजे भक्तीत तल्लीन होणे. २) मांस म्हणजे तुमच्या मनातील प्राण्याचा बळी देणे जेणे करून तो पुन्हा उत्पन्न होणार नाही. ३) मस्त्य म्हणजे मीन क्रिया (मीन म्हणजे मासा) अनुलोम - विलोम ह्या प्राणायामाच्या क्रीयांनाच मीन क्रिया म्हटले जाते . ४) मुद्रा म्हणेज आसन, न्यास, नृत्यातील मुद्रा. पवित्र आसन घालणे, देवीच्या वरदहस्त, अधोहस्त अश्या पवित्र मुद्रांचे ध्यान करणे . ५) मैथुन म्हणजे मैथुन केंद्र ज्याला पराक्रमाचे केंद्र म्हटले जाते. म्हणजेच दृढ नियमाचे पालन करणे आम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठून उपासना करू , परमात्म्याचा शब्द पाळण्याचा प्रयास करू हा ही पराक्रमच आहे.
वैदिक "म"कारांनी उपासना करणे म्हणजे परमेश्वराशी सामिप्य जोडून ठेवणे.
उग्रकालीचे स्वरूप हे आमच्या चुकीच्या वागण्यामुळेच निर्माण होते. म्हणूनच कधीही ज्योतिष , तांत्रिकांच्या मार्गाने जाऊ नका. त्यांच्या उपासना ते कधीही उघडपणे करत नाहीत. अश्या लोकांचा सहवासही आपल्याला नको.
कधी घरात चुकून देवीसमोर दारू देण्याची प्रथा असेल व तुम्हाला विरोध करता येत नसेल तर मागे सांगितल्याप्रमाणे जुईनगरला जावून एक दत्त याग किंवा दोन व्यंकटेश याग करावेत.
जेव्हा मनुष्य देवाशी कृतघ्न बनतो तेव्हा ही काली उग्रकाली बनते हे लक्षात ठेवा. ती रामवरदायिनी चंडिका रामासाठी भद्रकाली म्हणून तर रावणासाठी ती उग्रकाली म्हणूनच प्रगटली.
वाईट (तांत्रिक) पंच "म" कार उपासना व देवाशी कृतघ्नपणा ह्या दोन गोष्टींमुळेच ती काली उग्रकाली म्हणून जीवनात येत असते.
महाकाली व कालीत फरक आहे. काली ही उग्र काली रूप धारण करते तर महाकाली सगळे शांत करते. विश्वाच्या उत्पत्ती पूर्वीची शांतता म्हणजे महाकाली व प्रलयानंतरची शांतता म्हणजेही महाकालीच.
जो अतिशय प्रेमाने तीला आई म्हणून हाक मारतो त्याला तिच्या रूपाचे कधीच भय वाटत नाही.
इथे उत्सवात जे महाकालीचे रूप उभे राहणार आहे ती मूर्ती घडली आहे. मातृवात्सल्यविंदानममध्ये महाकालीचे जे वर्णन आहे अगदी तसेच रूप इथे उत्सवात असणार आहे. ही शक्ती स्वरूप असली तरीही आमच्यासाठी आमची आईच आहे म्हणून हिला कधीच आदिशक्ती म्हणू नका, नेहमी आदिमाताच म्हणा. हिला शक्ती म्हणून फक्त तो परमात्माच म्हणू शकतो पण तो ही तिला आई म्हणूनच हाक मारतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे .
|| हरि ॐ ||