॥ हरि ॐ ॥
ॐ मंत्राय नम: मध्ये श्रीगुरुक्षेत्र-बीज मंत्र आपण बघितला. पुढे सुरू होतोय तो अंकुरमंत्र.
प्रत्येकाने स्वंयपाक करो अथवा नको पण कधी कडधान्य भिजत घातलेले बघितलेले असते. त्याला काही ठराविक काळाने मोड येतात. एकदा एक प्रयोग करा. एकच पावटा घ्यायचा तो भिजत घालायचा त्याला मोड येताना बघा. कधी येतो मोड दुसर्या दिवशी. पण ह्याची सुरुवात कधी होते? कोणाला माहीत आहे का? साधारण कडधान्ये १२ तास भिजत ठेवावी लागतात. बरोबर त्यातले सहा तास तुम्हांला माफ. तुम्ही मोड कसे येतात ते सुरुवातीचे सहा तास नाही बघितले तरी चालेल. पण नंतरचे सहा तास बघत रहा. तुम्ही म्हणाल बापू काहीतरीच काय? झोप लागेल आम्हाला. फारच कठीण आहे. सहा तास बघत राहणे. ठीक आहे मग एक कळी घ्या. ती उमलताना कशी उमलते हे बघत रहा.
हे पण कठीण असेल तर अर्धी उमललेली कळी घ्या. किती वेळ लागेल तिला उमलायला? जास्तीत जास्त दोन तास बरोबर. कळी हातात धरायची आणि तिच्याकडे बघत रहा.
आपण कडधान्यांना मोड आलेले बघतो, कळीचे फुलात रूपांतर झालेले बघतो. पण ह्या बीजातून अंकुर येतो कसा? कळी उमलते कशी? हे अनुभवावे लागते. आपल्या स्वत:कडेच बघा. आपल्या मनात एखादा चांगला किंवा वाईट विचार येतो. त्या विचाराला अंकुर येतो कुठून? तो वाढतो कसा? ते कळत नाही. माझे वजन समजा ४०० किलो आहे व डॉक्टरांनी ते ६० किलो करायला सांगितले मग आजपासून मी dieting करणार हा विचार माझ्या मनात आला हे बीज आहे. मग ह्याचा अंकुर म्हणजे काय?
तुम्ही म्हणाल पाण्यात कडधान्य घातलं तर अंकुर दिसू शकतो, पण बीज जमिनीत असेल तर त्याचा अंकुर कसा दिसणार? गेल्यावेळेला आपण बघितले मन म्हणजे क्षेत्र आहे. म्हणजेच शेतजमीन आहे. मग अशा ह्या मनातले बीज आम्हाला कसे दिसणार ?
मला सांगा तुम्ही जी भाषा बोलता ही तुम्ही बनवलेली असते का? तुम्ही स्त्रिया नेहमी गॅसच्या शेगडीवर जेवण बनवता, पण ही गॅसची शेगडी कशाने बनते ह्याची theory इथे बसलेल्या कुणी स्त्रिया शिकल्या आहेत का? नाही.
आजच्या काळात सगळ्या लोकांच्या हातात मोबाईल असतात. मी लहान असताना त्या काळात घरात एकच फोन असायचा तोसुद्धा ५-६ महिने बंद असायचा. आज तुम्ही जे एवढे सगळे फोन वापरता त्याची सगळी theory तुम्ही शिकला आहात का? नाही.
म्हणजेच, आपण जी गोष्ट वापरतो त्यामध्ये आपण काय शिकतो तर माझ्यासाठी काय आवश्यक आहे ते.
प्रत्येक मनुष्याने जर ठरवलं की प्रत्येक गोष्ट मी अनुभवणार आणि मगच करणार तर ते शक्य आहे का? असे घडू शकत नाही.
एखादी स्त्री जेव्हा म्हणते मी चिकन केले तेव्हा ते आधी कोणी तरी केलेले असते, म्हणूनच ती करू शकते ना.
एक लक्षात ठेवा, जगात कुठलीही गोष्ट नवीन नाही. There is no inventions only discoveries. आपण जे काही करतो, जे काही आपल्याला मिळते ते आपण निर्माण केलेले नसते. म्हणून जेव्हा आम्ही मी केले असे म्हणतो तेव्हा ते मी केलेले नसते. ते आधी कुणीतरी केले त्याच्या अनुभवामुळे किंवा मी कुठेतरी शिकल्यामुळे मी करु शकतो.
समजा तुम्हांला सायकल चालवता येते आणि जर तुम्हांला बैलगाडी चालवायला दिली तर? तुम्हांला जमेल का? नाही. प्रत्येक गोष्टींचे technique वेगळे असते.
प्रत्येक गोष्ट शिकायची ठरवलं तर हे शिकू की ते शिकू अशी द्विधा मन:स्थिती होईल.
पूर्वी आमच्यावेळी एका inter science नंतर ठराविक शिक्षणाच्या branch असायच्या. आता शिक्षणसंस्थांचे एवढे option असतात की नक्की काय करावे, कुठे admission घ्यावी हे कळत नाही. जेवढे choice जास्त तेवढं confusion जास्त.
आधी फक्त MBBS एके MBBS असायचे. मधल्या काळात फक्त engineer साठी admission घेतल्या जायच्या आता CA एके CA करायचा अट्टहास असतो. अशावेळी पालकांनी विचार करायला हवा की, माझ्या मुलांना हे शिक्षण झेपणार आहे का?
कशाला मुलांवर ठराविक शिक्षणाचाच तुमचा हट्ट लादता? बाकीचे जे इतर शिक्षण घेतात ते काय फालतू आहेत? ते काय नीट जगू शकत नाहीत का?
पण आम्ही आमच्या गोष्टी सतत मुलांवर लादत असतो. हल्ली तर मुलांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांचाच अभ्यास जास्त असतो. पण असे करून तुम्ही मुलांना परावलंबी बनवता हे लक्षात घ्या.
बरेच पालक सांगताना दिसतात की आमची मुलगी अभ्यासात हुशार आहे, भरतनाट्यम् पण शिकते, computer चा स्पेशल class करते, रांगोळीच्या क्लासला जाते, भरतकाम शिकते, कुकींग शिकते. आता मला सांगा त्या मुलीने नक्कीच काहीतरी पाप केले असेल म्हणून एवढ्या गोष्टी पालक करायला लावतात.
मुलांच्या बाबतीत पण तेच. बापाच्या ज्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात, त्या सर्व त्यांना वाटते मुलाने पूर्ण कराव्यात. पण आपल्या इच्छा मुलावर लादताना मुलाचा स्वभाव, त्याची प्रकृती, त्याला झेपेल की नाही ह्याचा जराही विचार पालक करत नाहीत. मुलगा नेहमी करिअरच्या भीतीखाली एवढा गाडला जातो की मार्क कमी पडले म्हणजे काहीतरी मोठे पाप झाले.
मुलावर अभ्यासाचा भार टाकताना त्याच्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष करतो. मुलाचे स्नायू बळकट असतात, त्यांना व्यायामाची आवश्यकता असते.
मुलगा असो वा मुलगी त्यांना व्यायाम आलाच पाहिजे. पण आम्ही ते मुलांनी करावे, ह्यासाठी कधी मागे लागत नाही. आम्ही फक्त बौद्धिक विकास करायला बघतो पण विकास कशातून होतो, तर अनुभवातून.
जर असे नसते तर medical च्या शिक्षणानंतर internship हे practical training देणारे अनुभव देणारे वर्ष अभ्यासक्रमात नसते.
बुद्धी ही अनुभवातून तयार होत असते. अनुभव नसेल तर बुद्धी संकुचित होते. जो मनुष्य विद्यार्थी म्ह्णून संपला तो संपला. म्हणूनच मानवाच्या आयुष्यात शोधक वृत्ती व संग्राहक वृत्ती हवी. जे चांगलं आहे ते शोधत राहायचे व जे चांगले आहे ते साठवायचे, त्याची जोपासना करायची, मग ते थोडं जरी असेल तरी चालेल, हळूहळू तेच चांगलं वाढवत न्यायचे. ही शोधक वृत्ती व संग्राहक वृत्ती कशी आत्मसात करायची हे प्रत्येकाने आपापल्या जीवनानुसार ठरवायचे.
आपलं जीवन सतत बदलत असते. आमच्यावर येणारी संकटे बदलत असतात. ह्या सतत बदलत राहणार्या जीवनात आम्ही बदललो नाही, तर आम्ही टिकणार नाही.
आपली मुलं जरी त्यांच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेली, तरी रात्री मुलं घरी आल्यावर ते कुठल्या व्यसनाच्या आहारी नाहीत ना गेले हे वास घेऊन बघितलेच पाहिजे. ह्यासाठी आपला मुलगा किती वाजता घरी आला हे पाहण्यासाठी आई-वडील रात्री जागे राहिले पाहिजेत. ज्या घरात आई-बाबा मुलं येईपर्यंत जागे राहतात त्या घरी मुलं आपोआप वेळच्यावेळी परत येतात.
ह्यासाठी मुलांचे संगोपन करण्याची वृत्ती पालकांमध्ये असायला ह्वी. हे कधी होईल जेव्हा आम्ही स्वत:ला विद्यार्थी दशेत ठेवू तेव्हाच. कारण जग हे सतत बदलत असते. एखाद्या वृद्ध आजारी अगदी मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीच्या शरीरात पण नवीन पेशी बनतच असतात.
अशा ह्या सतत बदलणार्या जगात मानवासाठी भक्कम आधार कुठला? तर एकच. ह्या जगात कधीही न बदलणारी गोष्ट म्हणजे माझी (परमपूज्य बापू) आई आणि म्हणूनच तिचे कुल तिचा परिवार पण कधीही बदलत नाही आणि बदलणार पण नाही. ह्यासाठीच हा आधार आम्ही घट्ट धरून ठेवायला पाहिजे.
समजा तुम्हांला एखाद्या वाळवंटात नेऊन सोडलं. तुम्ही नक्की कुठे आहात हे तुम्हाला माहीत नाही. अशावेळी तुमच्याकडे एखादे होकायंत्र असेल किंवा आत्ताच्या मोबाईलमध्ये GPS असते, त्यावरून तुम्हांला दिशा कळू शकेल. पण ह्या गोष्टी मानवनिर्मित आहेत. त्या बंद पडू शकतात. पण तरीदेखील सूर्य त्याची दिशा कधीच बदलत नाही. जरी दुसरे काहीच साधन नसेल तर सूर्य दिशा सांगण्याचे काम करणारच कारण सूर्य-चंद्र हे मानवनिर्मित नाहीत. जीवन एवढं सोप आहे. किती जणांनी कुंभार बघितला आहे? खरा नाही तरी पिक्चरमध्ये बघितलाच असणार. "विठ्ठला तू वेडा कुंभार" खरोखरच तो विठ्ठल वेडा कुंभार आहे.
तुम्ही बघितलं असेल कुंभार त्याच्या चाकावर मडक्याला आकार देत असतो. पण तो आकार देताना मध्येच तुम्ही बोट लावत राहिलात काही वस्तू लावत राहिलात तर त्याप्रमाणे त्या मडक्याचा आकार बदलतो.
आमच्या जीवनातसुद्धा आमचा आकार असा बदलत जातो, तसे आम्ही बदलतो हा आकार कोण बदलत असतो तर आमच्या आजूबाजूची परिस्थिती, आमच्या भवतालची माणसे. मग जसा shape (आकार) मला माझ्या जीवनाला द्यायचा होता तसा मी देऊ शकलो का? ह्याचे उत्तर जर तुमचे negative असेल तरी दु:खी होण्याचे काहीच कारण नाही.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझं वय १६ असो की ९६ असो माझ्याकडे जर माझा बापू आहे आणि गुरुक्षेत्र मंत्र आहे तर हा वेडा कुंभार तुमच्या जीवनाला shape (आकार) देणारच. हा काही त्यासाठी पैसे घेत नाही. पण ह्यासाठी त्याला आमंत्रण मात्र द्यावे लागते.
मग हे कसे घडणार? माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती माझे जीवन घडवत असते. लहानपणी आई-वडील नवीन घडवतात, मग शिक्षक घडवतात, नंतर नवरा-बायको एकमेकांचे जीवन घडवत असतात. सगळे मिळून मला बनवतात. मग मी काय केलं?
संतांची गोष्ट वेगळी. ते त्यांचे जीवन घडवू शकतात. पण आपण सामान्य माणसं आहोत. इथे कुणी संत असेल तर मला सांगा. मी त्याचे पाय पकडतो. पण मी (परमपूज्य बापू) एकदा का पाय पकडले तर सोडत नाही हे लक्षात ठेवा.
मी माझ्या आईचे पाय सोडवायचे म्हटले तरी सोडू शकत नाही. माझ्या गुरुने तर माझे हातच त्यांच्या पायावर ठेवून घेतले आहेत. सद्गुरुतत्त्व नेहमी मानवात जे वाईट बीज आहे त्याला मोड कसा येणार नाही त्याची काळजी घेत असते.
ह्या अंकुर मंत्रामुळे आमच्या आजूबाजूच्या वातावरणात, आमच्या मनोमय, प्राणमय देहातील जी काही चुकीची बीजे आहेत ती कधीच वाढू शकत नाहीत. मी अनेकवेळा सांगितले आहे की तुम्ही स्वत:ला दोष देण्याचे थांबवा. एकदाच तुम्ही ह्या आई चण्डिकेसमोर मनापासून क्षमा मागा. परत परत मी केवढा पापी, मी किती वाईट हे उगाळत बसू नका.
सद्गुरुचे पाय पकडून एकदा मनापासून क्षमा मागा त्याच्यासमोर आपली काही चूक नाही, असले मुखवटे घालू नका. आणि एकदा का त्याच्याकडे क्षमा मागितली की मग त्यातच अडकून स्वत:ला त्रास करून घेऊ नका. तुम्ही काय अनाथ आहात का? मी सांगितलंय का कधी की जा मरा, तुमचं तुम्ही भोगा.
मी कधी टाकलयं का तुम्हाला? मला पण कंटाळा येतो तुमचे तेच तेच स्वत:चे दोष, पापे ऐकून. कधीतरी मलासुद्धा चांगलं ऐकू द्या ना. माझेसुद्धा चांगले श्रवण घडू देत. तुमच्यात काय चांगले आहे, ते मला सांगा, मला ते ऐकायला आवडेल.
आता तुम्ही म्हणाल, मी तर सामान्य माणूस आहे, असे गेल्या वेळेला सांगितले. मग आम्ही बोललेलो तुम्हाला कसे कळणार बापू? तर हे सगळं मला कळतं ते माझ्या आईमुळे. मी फक्त लाऊडस्पिकर आहे. म्हणून जे काही चुकीचे तुमच्याकडून घडले असेल ते मनापासून फक्त एकदा सांगा.
गुरुपौर्णिमेला मी तुमच्याकडे काय मागितले? भेटवस्तू मागितल्या का? नाही. मी तुमचे अर्धे पाप मला द्या म्हणून सांगितले. खरंच सांगतो, मनापासून हे अर्धे पाप द्या आणि मोकळे व्हा तुमच्या ओझ्यापासून तुम्ही माझ्या ट्रेनमध्ये आता बसला आहात, आणि आता मग डोक्यावर ओझे का ठेवता?
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या मानवांचे पाप जरी तुम्ही एकत्र केले ना तरी माझा केसही वाकडा होणार नाही हे लक्षात ठेवा.
जर कोणाला पूर्ण गुरुक्षेत्र मंत्र म्हणता येत नसेल, कोणाला वेळ नसेल तर अशावेळी फक्त अंकुरमंत्र म्हटला तरी चालेल फक्तअंकुर मंत्र १०८ वेळा म्हटला तरी चालेल.
आपल्या प्रत्येकात पाप पुण्याची बीजे असतात. मग आम्ही पापाची बीजे का लावायची. मी तुमच्या पापाची भिक्षा मागायला आलोय ना तुमच्याकडे वाडगा घेऊन. पण तुम्हीच जर दार बंद ठेवलं तर मी काही करू शकत नाही.
तुम्ही मला पाप दिलंत तर त्या बदल्यात मी तुम्हाला पाप देत नाही पुण्यच देतो. कारण माझी आई ही क्षमेची मूर्ती आहे. जी रणदुर्गा आहे तीच मूर्तीमंत क्षमा आहे. म्हणूनच तुम्ही जी काही मला पापांची दक्षिणा देताय त्याबदल्यात मी तुम्हांला पुण्य देतोय.
जीवन अगदी सोप आहे, ते उगाचच कठीण करू नका. हा जो गुरुक्षेत्र मंत्र आहे तो मी आणि माझे नित्य गुरु याज्ञवल्क ह्यांनी माझ्या आईच्या साक्षीने प्रथम उच्चारला आहे. म्हणूनच मी खात्रीने सांगू शकतो की हाच एक मंत्र प्रत्येक युगात तारू शकतो. हाच खरा अभ्युदय मंत्र आहे.
आमचं जीवन उमलताना आम्ही कधी बघितलं नाही, कधी जीवन कुस्करले गेले कळले नाही. असं आमच्या बाबतीत कधी होणार नाही. आमचं जीवन फुकट जाणार नाही.
॥ हरि ॐ॥
आज गुरुमंत्र म्हणताना पहिले पद न घेता सुरुवात केली होती. ह्या श्रावण महिन्यात जो कोणी पूर्ण श्रद्धेने, सद्गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून हा मंत्र म्हणेल तेव्हा ते पहिले पद (ॐ श्री दत्तगुरुवे नम:) मी आपोआप त्यांच्यासोबत म्हणणार आहे. तुम्ही म्हणताना हा पूर्ण मंत्र म्हणू शकता. पण जर चुकून पहिले पद म्हणायचे राहिले तर ते मी म्हटलेले असेन तुमच्यासाठी तुम्ही जे तुमच्या नातेवाईकांनांही सांगू शकता. ह्या पुढे आपण अंकुरमंत्राचे एक एक पद बघणार आहोत.