॥ हरि ॐ ॥
ॐ मन्त्राय नम: गुरुक्षेत्रम मंत्राचा पहिला भाग बीजमन्त्र आपण बघितला.
प्रत्येक मनुष्याकडे अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे बीज असते त्यामधून चांगले बीज निवडण्याचे कार्य हा बीजमन्त्र करत असतो.
प्रत्येक मनुष्यामध्ये मग तो कितीही पापी असो की पुण्यवान परमात्म्याने त्याच्याकडील सगळी चांगली बीजे त्या मनुष्याला दिलेली असतात. जी इतर काही वाईट बीजे असतात ती प्रत्येकाच्या आधीच्या पाप-पुण्यानुसार, कर्मानुसार येत असतात. वाईट बीजे परमात्मा कधीच देत नाही. त्याने मानवास कर्मस्वातंत्र्य मात्र दिले आहे.
काहीजण मला (परमपूज्य बापू) सांगतात, तुम्ही म्हणता तो परमात्मा अतिशय प्रेमळ आहे व त्याची आई पण तेवढीच दयाळू आहे त्यांना सगळंच कळतं मग आम्ही प्रार्थना का करावी? इथे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे प्रार्थना करावी की नाही ह्या इच्छेचे कर्मस्वातंत्र्य तुम्हाला आहे त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या प्रार्थनेनुसार फळ देण्याचे कर्मस्वातंत्र्य त्याला आहे. तो कृपाळू आहे, तो कृपा करायलाच बसला आहे. प्रार्थना करणे हा आमच्या कर्मस्वातंत्र्याचा एक भाग आहे. चांगली बीजं तुमच्या देहातील, मनातील वाढवायची कशी हे "तो" बघत असतो. त्याची जबाबदारी "तो" घेतो व तुमच्यामध्ये असणारी वाईट बीजे वाढणार नाहीत ह्याची काळजी हा बीज मन्त्र घेत असतो.
बर्याच जणांना माहीत असेल, शेतकरी पीक घेण्यापूर्वी नको ती बीजे काढण्यासाठी राब जाळतो. राब जाळताना पालापाचोळा, विषारी बीजे जाळली जातात ह्याचप्रमाणे आमच्या मनातील चुकीची, वाईट बीजे जाळण्याचे काम हा बीज मंत्र करत असतो.
बीज मंत्राच्या सुरुवातीला आपण ‘ऐं’,’ ‘र्हीं’, क्लीं अशी वेगवेगळी बीजं बघितली. ह्यातील प्रत्येक बीजाचे मानवी देहावरील कार्य वेगवेगळं असते व जिथे ही सर्व बीजे एकवटलेली आहेत ती जागा म्हणजे हा बीजमन्त्र.
आमच्या मनातील चुकीची बीजे जाळण्याचे काम बीजमन्त्र करत असतो. समजा एखाद्याला ‘ऐं’ व ‘र्हीं’ ह्या बीजांची वेगवेगळ्या प्रमाणात आवश्यकता आहे तर हे आपोआप आवश्यक तेवढे प्रमाण ह्या बीजमंत्रातून प्राप्त होत असते.
आपण रिमोट कंट्रोलने T.V. on करतो, तेव्हा काय होते? on केल्याबरोबर लगेच चित्र येते का? कॉम्प्युटर बघितला असेल सगळ्यांनी. आज कॉम्प्युटर येणे ही काळाची गरज आहे. अजून १० वर्षांनी कॉम्प्युटर न येणारा अशिक्षित समजला जाणार. कॉम्प्युटर on केल्यावर लगेच चित्र येते का? नाही. त्याची एक यंत्रप्रणाली आहे.अशाच प्रकारे प्रत्येक माणसासाठी जे आवश्यक आहे त्यानुसार कार्यप्रणाली बनविण्याचे काम बीजमन्त्र करत असतो.
पण समजा एखाद्याने चुकीच्या गोष्टी जाळण्यासाठी एवढा राब केला की १० वर्षे तिथे पीकच नाही येणार तर चालेल का?
म्हणजेच मानवी प्रयासांना व प्रयत्नांना मर्यादा असतात. परंतु जो कोणी हा बीजमन्त्र प्रेमाने उच्चारतो त्याची जी काही चांगली बीजे आहेत त्यांना हा परत जिवंत करतो व वाईट बीजांना नष्ट करतो.
ह्या बीजमन्त्रापुढे आपल्याला बघायचाय तो अंकुर मन्त्र. प्रत्येक बीजाला अंकुर यावा लागतो तरच त्याचा विकास घडू शकतो.
आपल्या घरात कांदे-बटाटे जास्त दिवस राहिले तर त्यांना अंकुर आलेला दिसतो. कुठल्याही बी मधून जर वृक्ष वाढवायचा असेल तर आधी त्याला अंकुर यावा लागतो. ही अंकुर येण्याची प्रक्रिया प्रत्येक वस्तूच्या क्षमतेनुसार वेगवेगळी असते.
कडधान्ये आपण भिजत घातली तरच त्याला कोंब फुटतो. पण तेच कांदा-बटाटा भिजत न घालताही त्याला कोंब फुटत असतो. म्हणजेच प्रत्येक बीजाची कोंब फुटण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे.
ह्याचप्रमाणे, आपल्या मनामध्येसुद्धा जे बीज असते त्यातून अंकुर फुटण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. जेव्हा तो प्रजापती ब्रह्मा तुम्हांला बनवतो तेव्हा तुम्हांला तो एकच बनवतो, तुमच्यासारखा कुणीही हुबेहूब (ditto) बनवत नाही. कुठलीही व्यक्ती आतापर्यंत म्हणजे अगदी सृष्टी उत्पत्तीपासूनच्या पहिल्या माणसापासून ते आतापर्यंत हुबेहुब दुसर्या व्यक्तीसारखी सापडणार नाही. एकाच माणसाचे ३७२ जन्म घेतले तरी त्याच internal आणि external structure वेगवेगळं असतं. तो परमात्मा प्रत्येक मनुष्यासाठी नवीन साचा बनवत असतो व एकदा का मनुष्य बनला की तो साचा तो फोडून टाकतो. म्हणून मी नेहमी सांगतो की, "सद्गुरुकडे प्रत्येकाची रांग वेगळी वेगळी असते"
म्हणूनच प्रत्येकाच्या मनातील बीज, त्यासाठी लागणारी जमीन, त्यासाठी लागणारे खत-पाणी हे वेगवेगळे असते. हे ओळखूनच गुरुक्षेत्रम मन्त्राचा अंकुरमन्त्र निर्माण केला आहे.
हा अंकुरमंत्र आमच्या मनातील जी चांगली बीजे आहेत ज्यातून अंकुर फुटू शकतो, त्यांना ताबडतोब अंकुर फोडतो. परंतु, त्याचवेळी हा अंकुरमन्त्र तुमच्या मनातील, तुमच्या प्रारब्धातल्या वाईट बीजांना अंकुर फुटू देणार नाही. तुमच्या वाईट बीजांमुळे जी काही हानी होऊ शकते ते थांबविण्याचे काम हा अंकुर मन्त्र करत असतो.
म्हणूनच गेल्या जन्मात आम्ही डाकू असलो, वेश्या असलो तरीदेखील त्या वाईट प्रारब्धाला अंकुर न फुटू देण्याची काळजी हा अंकुर मन्त्र घेत असतो.
पण त्यासाठी -
"एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा"
आपण भाताचा अंकुर जमीन भेदून बाहेर आलेला बघतो, पण तोच अंकुर उलटा जमिनीत पेरुन बघा, पेरता येईल का? नाही येत. अंकुर अत्यंत नजूक असतो.
म्हणजेच कडक अशी जमीन भेदून बाहेर येण्यासाठी त्या अंकुराला किती मोठी energy लागत असेल? त्या लहानश्या कोंबात एवढी कडक जमीन भेदून वर येण्याची ताकद "तो" निर्माण करत असतो व हीच ताकद तुम्हाला अंकुर मन्त्र देतो.
कल्पना करा तुम्ही एक बीज आहात व त्यातून अंकुर फुटून तुम्हांला वर यायचे आहे. त्या कडक बीजाला व जमिनीला छेदण्यासाठी ताकद लागेल ना. माझ्या जीवनातील अंधार छेदून, नशिबाचा खडक छेदून, प्रारब्धाचा कडा भेदून मला बाहेर यायचे आहे, त्यासाठी तेवढीच प्रचंड ताकद लागणार ना. जेवढी ताकद बीजाचा अंकुर बाहेर येण्यासाठी लागते तेवढीच ताकद तुमच्या मनाला प्रारब्धाच्या अंधारातून बाहेर यायला लागते व ही ताकद म्हणजेच प्रयासांची ताकद.
आपण नेहमी म्हणतो, मी प्रयत्न करेन. प्रयत्न म्हणजे "I will try" पण जेव्हा खरोखरच करायचे असते तेव्हा काय म्हटले जाते, "I will put all my efforts" म्हणजेच प्रयास. ज्याला definate शिस्त व सातत्य आहे तो प्रयास. प्रयासातूनच पुरुषार्थ घडतो. अंकुर मन्त्र आम्हाला आमच्या नशिबाला भेदण्याची ताकद देतो.
आता तुम्ही म्हणाल, समजा माझं बीज कडक खडकाखाली आहे, मग त्याला कोंब कसा येणार? पण ह्याची काळजी तुंम्हाला कशाला?
एखाद्या मनुष्याने सायकलच्या mechanism चा अगदी ३ वर्षे नीट सर्वांगाने अभ्यास केला तर त्याला सायकल चालवता येईल का? त्यासाठी आधी सायकल घेऊन चालवून बघा, २-४ वेळा पडा. हे प्रयास असतात.
दादा सांगतात १०८ वेळा जप करा. तेव्हा एक दिवस नीट जप केला जातो. दुसर्या दिवसापासून कधी तो एकदा १०८ वेळा पूर्ण होतोय इकडेच लक्ष असते. असं करू नका. जप करताना प्रेमाने करा.
जप करत असताना मन भटकू शकेल. पण खरा सद्गुरु तुमचं मन जिथे मला (परमपूज्य बापू) म्हणजे जो कोणी "तो" आहे त्याला ज्याठिकाणी हवे आहे, अश्याच ठिकाणी भटकवेल. त्यामुळे त्याचं काम त्याला करू द्या. त्याच्या कामात नाक खुपसू नका. आम्ही म्हणतो आमचं नशिबच फुटकं त्याला साईबाबा काय करणार? असा तुमचा साईबाबांवरचा विश्वास. हे तुम्ही बाबांचे गुणसंकीर्तन करता की दोषसंकीर्तन.
दामू अण्णांच्या कथेत - पत्र उघडायच्या आधीच बाबा म्हणतात, "काय म्हणतो तो दामू?" त्यावर माधवराव म्हणतात, "काय बाबा, तुम्हाला माहीत आहे तर कशाला वाचायला सांगता? बाबा सांगतात, "मला काही माहीत नाही, वाच तू पत्र." पत्र वाचल्यावर बाबा स्पष्ट सांगतात, "आहे त्यात सुखी रहावे, धंद्याच्या मागे लागू नये."
पुढे दामू अण्णा स्वत: शिरडीस येऊन परत बाबांना विचारतात तेव्हा बाबा त्यास म्हणतात, "आपून नहीं रे बापू किसीमें" इथे मात्र दामूअण्णा ऐकतात. ते अधम शिष्य नाहीत ते त्या धंद्यात पैसे गुंतवत नाहीत. पुढे त्याच्या मित्राला त्या धंद्यात तोटा येतो तेव्हा तो मित्र म्हणतो "तुझा साईच खरा दाणा " भक्त करुणा केवढी.
ह्याच दामू अण्णांची अजून एक गोष्ट आपण बघतो. ह्याची दोन लग्ने होतात. दुसर्या लग्नाला १२ वर्षे होऊनही मूल होत नाही तेव्हा बाबांकडे येतात. बाबा लक्ष देत नाहीत. दामू अण्णा मशिदीतच बसून असतात. तेव्हा माधवराव आंबे घेऊन येतात. त्यातील ४ आंबे बाबा दामूअण्णांना त्यांच्या धाकट्या बायकोला द्यायला सांगतात. नंतर तिला पुढे मुले होतात.
अशीच एक दुसर्या स्त्रीची कथा आहे. तिला सावत्र मुलगा असतो. स्वत:लाही मूल व्हावे, अशी तिची इच्छा असते. माधवरावांना ती भेटते. माधवराव म्हणतात, "नारळ, उदबत्ती घेऊन बस मशिदीत, खूण केली की वर ये." माधवरावांचे बाबांवर प्रचंड प्रेम. विषारी साप चावला तरी अन्य कुठेही न जाता ते बाबांकडेच फक्त धाव घेतात.
माधवराव बाबांच्या हातात नारळ देऊन सांगतात त्या स्त्रीच्या ओटीत घालायला सांगतात, तेव्हा बाबा म्हणतात, "अशी नारळ देऊन काय पोरं होतात." तेच दामूअण्णांच्या बाबतीत मूल व्हावं म्हणून आंबे दिले होते. रतनजी शेटना पहिल्या भेटीतच मूल होणार म्हणून सांगितले.
म्हणजेच प्रत्येकांसाठी त्याची वेगवेगळी यंत्रणा असते. कुणासाठी कुठली यंत्रणा कुठलं software वापरायचे हे तो ठरवत असतो. त्याचा तुम्ही विचार करु नका.
तुमच्या बीजाला कसा अंकुर आणायचा हे तो नीट जाणतो. कारण तोच ह्या मन्त्राचा उद्गाता आहे.
साईसच्चरित पंचशील परीक्षा आम्ही का द्यायची? कारण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा ह्या कथा आम्हांला अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आज प्रत्येक भाषेत साईसच्चरित उपलब्ध आहे. ही परीक्षा आमची भक्ती अधिक चांगली होण्यासाठी असते.
पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी मंदिरात कीर्तन व भजन करणे नित्यक्रमातला आवश्यक भाग असायचा. आज हे सर्व नाहिसे झाले आहे. दरवर्षी पूर्वी प्रत्येक तिथीप्रमाणे मग ती रामनवमी असो, आषाढी एकादशी असो त्या दिवसाच्या महात्म्यानुसार कीर्तने व्हायची ज्यांनी हीच दरवर्षी होणारी कीर्तने नव्याने ऐकली त्यांचे आयुष्य बदलले.
३२ व्या अध्यायात हेमाडपंत म्हणतात,
"साईमुखीचे आलाप पाप संताप हरिती"साईनाथ स्वत : सांगतात,
"कृतांताच्या दाढेतून । काढीन निजभक्तां ओढून ।
करिता मत्कथा श्रवण । रोगनिरसन होईल॥"
हे रोगनिरसन नुसते शरीराचे नाही तर मनाचेही होते. पण त्यासाठी आधी श्रद्धा असावी लागते व ही श्रद्धा वाढविण्यासाठी पण हा अंकुरमन्त्र मदत करणार आहे.
ह्या मंत्रातच सगळ्या शुध्दी केलेल्या आहेत त्यामुळे हा मंत्र म्हणण्यासाठी कुठल्याही शुध्दीची आवश्यकता नाही.
पाषाणालाही पाझर फोडण्याची ताकद ह्या मंत्रात आहे. पुढच्यावेळी आपण ह्या मंत्राचे पहिले पद बघणार आहोत. ’’ ॐ रामात्मा श्री दत्तात्रेयाय नम:’’ रामरक्षेच्यावेळी आपण राम म्हणजे काय ते बघितले, ग्रंथराजात दत्तात्रेयांविषयी बघितले, मग उरले काय? तर जे उरले आहे तेच आपल्याला पुढच्यावेळी बघायचे आहे.
माझी आई माझ्या लहानपणी नेहमी म्हणायची ’’हा चक्रमादित्य कधी काय करेल ते सांगता येणार नाही !!’’ मला आधीपासूनच वेडी माणसं फार आवडतात. प्रेम जर करायचे असेल तर प्रेमात वेडंच व्हायला पाहिजे अभ्यास करायचा तर अभ्यासाचं वेडंच लागायला पाहीजे.
देवावर प्रेम करायचे तर ती दिवानगी आलीच पाहिजे. वेडे म्हणजे रस्त्यावर फिरतात ते वेडे नव्हे तर हे वेडेपण म्हणजे शहाण्यातलं वेडेपण
मी सगळ्या पागलांचा बादशहा आहे. ह्याचे कारण माझी आई! तिचं वेड प्रेम. तिची क्षमा मला पागल करून टाकते.
आपण आज सर्वांनी प्रार्थना करूया, ’’ आमच्या मनातील पवित्र पागलपणाला अंकुर फुटू देत.’’
वेडात मराठे वीर दौडले सात’’ ह्या दिवानगीतच सगळं काही आहे. एक १६ वर्षाचा पोर शिवाजी, एक खास मित्र व आणखी १०-१२ पोरं सोबत घेऊन एक - एक करत तीन किल्ले काबीज करतो आणि त्याची आई ह्यासाठी त्याला परवानगी देते, हा वेडेपणा आपल्यात यायला हवा. साईसच्चरितात आपण असेच वेडे बघतो. हेमाडपंत काय सांगतात बाबांना,
मी तो आपुल्या पायांचा दास
नका करू मजला उदास
जोवरी या देही श्वास
निजकार्यांसी साधुनि घ्या
५२ वा अध्याय पूर्ण करण्याआधीच लेखणी व मस्तक साईचरणी अर्पण करुन स्वत:चे जीवन संपवणारे हेमाडपंत व त्याच कुळातील मीनावैनींनी ३२ लक्षणे बघितल्यावर आता त्याचा मोठेपणाही नको म्हणून तृप्त होऊन गेली. साधनाताई अतिशय श्रीमंत व प्रसिद्ध प्राध्यापिका पण सगळं ऐश्वर्य सोडून अनवाणी गोविद्यापिठम् मध्ये सगळीकडे फिरत असे. हा वेडेपणा नाहीतर काय?
हा पवित्र वेडेपणा आहे आणि हाच आपल्याला शिकायचा आहे. आता ज्यांना हा वेडेपणा मिळवायचा आहे त्यांनी माझ्यासोबत गुरुमन्त्र म्हणायचा व ज्यांना हा वेडेपणा नको आहे त्यांनी तोंड बंद ठेवायचे ok.
॥ हरि ॐ ॥