॥ हरि ॐ॥
ॐ मंत्राय नम: बरेच महिने लोटले मध्येच बापू येतो मध्येच नाही येत. गुरुक्षेत्रम् मंत्र चालू आहे. कुठे होतो आपण? अंकुर मन्त्र बरोबर. सुरुवातच काय तर - ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:।
इथे आम्ही आत्मा म्हणजे काय? हा मोठा प्रश्न असतो. जुन्या गावात कुठला तरी आत्मा राहतो, हे आपल्या परिचयाचं वाक्य आहे. सगळ्यांचा आत्मा एकच आहे म्हणजे काय? बापूंनी सांगितले रामात्मा म्हणजे आत्म्याचा आत्मा. रामाचा आत्मा दत्तात्रेय मग दत्तात्रेयाचा आत्मा कोण?
आधी आत्मा म्हणजे काय? हे डोक्यात शिरायला कठीण असते. ज्यांनी पुरुषार्थ ग्रंथ वाचला आहे त्यांना माहीत असेल, आत्मा म्हणजे कोण? प्राण, आत्मा ह्यात फरक आहे. समजा एखादा मनुष्य बेशुद्ध अवस्थेत आहे, बोलू शकत नाही, मन काम करत असलं तरी त्याची जाणीव इतरांना नाही. सुख-दु:ख कळतं, भावना कळतात ते मन.
मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा घरचे म्हणतात ती व्यक्ती गेली, पण देह तर तिथेच असतो. म्हणजे सामान्य मनुष्याला माहीत असतं की देह म्हणजे प्राण नाही. देह जिवंत ठेवणारी गोष्ट म्हणजे प्राण. प्राण गेले तर देह आपल्या व्यक्तीचा असला तरी तिथे आपली व्यक्ती नसते. देह आणि प्राण म्हणजे आत्मा. मृत्यूनंतर प्राणासोबत मन (लिंगदेह-प्रत्येकाच्या आंगठ्याच्या आकाराची आकृती ) बाहेर पडतो. मन हे देहाशी बांधलेलं, प्राणांशी बांधलेलं आहे. मन व प्राण ह्या एकत्र गोष्टी आहेत. प्राण व मन ह्यांचा अन्योन्य संबंध आहे. देहाचा मनाशी संबंध आहे, पण देह व मन ह्यांचा अन्योन्य संबंध नाही. प्राण आहे तरच मन आहे. प्राण व मन आहे पण देह असेलच असं नाही. देहातून अन्नाद्वारे मन तयार होतं व ते प्राणाशी बांधलेलं असतं.
जेव्हा एखाद्या मनुष्याचा प्राण बाहेर पडतो, आपण काय म्हणतो प्राण गेले, आत्मा गेला असे म्हणत नाही. कारण आत्मा जाण्याच्या खुणा नसतात, प्राण जाण्याच्या खुणा आहेत जसे श्वास बंद होणे, अंग गार पडणे. प्राण येण्याच्या पण खुणा आहेत. आत्म्याच्या येण्या-जाण्याच्या खुणा नसतात. ज्याच्या खुणा-पुरावा नाही ती गोष्ट आहे हे कसं सांगणार. पाऊस पडतो, पाणी खाली पडतंय म्हणजे ढग आहेत. अध्यात्म सांगतं आत्मा न इति न इति.
आत्मा म्हणजे साधी गोष्ट आहे. ज्या आदिमातेने विश्व उत्पन्न करताना जे original मटेरिअल वापरलं ते म्हणजे ब्रह्म. ब्रह्म एकतर क्रियाशील किंवा क्रियाशून्य असतं. आदीमाता हे विश्व घडवताना निर्जीव-सजीव आकारात येताना, ह्या ब्रह्माचे वेगवेगळे आकार घडत जातात त्यांच्या संकल्पाने.
ह्या क्रियाशील ब्रह्माचा origional पदार्थ मनुष्य देहामध्ये आहे. जे active ब्रह्म मनुष्याला दिलं जातं, त्याला आत्मा म्हणतात. संपूर्ण विश्व ज्या मूळ पदार्थापासून घडवलं जाते तो पदार्थ जसाच्या तसा त्याचा अंश मनुष्य देहामध्ये टाकला जातो ती गोष्ट म्हणजे आत्मा.
ह्याची फक्त उपस्थिती आवश्यक आहे. हा आत्मा सगळं काही करतो. ह्यात सत्व, तमो, रजो हे गुण येतात. कारण ही पृथ्वी तीन गुणांनी बनलेली आहे. सत्त्व गुण म्हणजे चांगलं पवित्र, तमोगुण म्हणजे वाईट, रजोगुण म्हणजे कधी चांगलं-कधी वाईट. मनुष्याच्या पहिल्या जन्मात आत्मा आला तेव्हा सत्त्वगुणाशी निगडित असतो तो जीवात्मा. आत्म्याच्या अस्तित्वाने सगळं घडतं म्हणजे काय?
समजा वर्गात १०० मुलं आहेत. मधली सुट्टी झाली की काय करतात मुलं? नाचतात, खेळतात बरोबर. एकदा का मधली सुट्टी संपल्याची घंटा वाजली की सगळी मुलं आपोआप वर्गात येऊन बसतात. वर्ग म्हणजे देह, गडबड करणारी मुलं म्हणजे मन, घंटा म्हणजे प्राण. त्या वर्गाची वर्गशिक्षिका वर्गात येऊन बसली की मस्ती थांबते व ती निघून गेली की मस्ती सुरू होते. शिक्षिकेच्या उपस्थितीमुळे मात्र फरक पडतो.
सिग्नलला पोलीस कॉन्स्टेबल उभा नसेल तर red signal ला पण आपण गाडी पुढे नेतो. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीने फरक पडतो.
मस्ती केली तर शिक्षिका मारेल, सिग्नल क्रॉस केला तर कॉन्स्टेबल पकडेल पैसे भरावेत लागतील.
इथे शिक्षिका व कॉन्स्टेबल ह्यांची उपस्थिती म्हणजे भय. आत्मा भय उत्पन्न करत नाही. आत्मा जाणीव उत्पन्न करतो. आत्मा आणि जाणीव, दत्तगुरु आणि चण्डिका हे अभिन्न आहेत. चण्डिकेचे मूळ रुप म्हणजे जाणीव. आत्म्याच्या उपस्थितीमुळे आपोआप जाणीव उत्पन्न होते. संवेदना वेगळी, ती तात्पुरती असते. जाणीव ही कितीही खोल जाऊ शकते, विस्तारीत होऊ शकते.
हवा नसेल तर श्वास घेता येणार नाही. हवा आहे ही जाणीव आहे. पण प्रत्यक्ष active जाणीव नाही. आपण नकळत श्वास घेत असतो. जेव्हा श्वास घेताना अडथळा येतो तेव्हा हवेची जाणीव होते.
बाहेरची हवा म्हणजे आत्मा (दत्तगुरु), नाकातून आत शिरलेली हवा म्हणजे प्राण (हनुमंत) बाहेरून हवा आत घेण्याची क्रिया म्हणजे चण्डिका.
दत्तगुरु-दत्तात्रेय ह्यांच्यातील फरक आम्हांला कळत नाही असे बरेच जण म्हणतात.
समजा Mrs. X चे वडील वारले त्यांनी पुन्हा Mrs. X च्या पोटी जन्म घेतला, तर आजोबा नातू झाला म्हणून "आई" म्हणण्याऐवजी "ए बेबी" म्हणून हाक मारणार का?
तिच्या पोटी जन्म घेऊन तिचा पुत्र झाला. मूळ स्वरूप दत्तगुरु आहे. मायेच्या प्रकाशात तेच दिगंबर आहेत.
त्यांची तोंडं मोजायची म्हटलं तर जन्म कमी पडेल. वेदांनी सांगितलंय सहस्त्रशीर्ष म्हणजे अनंत.
दत्तगुरु नावाचे आजोबा चण्डिका नावाच्या पोटी जन्माला आलेत, ते दुसर्या जन्मी दत्तात्रेय झालेत ते दोघे एकच आहेत.
ग्रंथ वाचून मला किती येतं, मी किती ज्ञानी झालो असे ज्याला वाटत असेल, त्याने ग्रंथ वाचणे थांबवले पाहिजे. ग्रंथ वाचनाचं basic त्याने तुमचं मन स्थिर झालं का? मनुष्याचं पहिलं ध्येय मन स्थिर आणि समर्थ झालं पाहिजे. आमच्या जीवनात दु:ख का येतात, आमच्या हातून चुका का घडतात? कारण आमचं मन स्थिर नसतं. मनाचं स्थैर्य, सामर्थ्य आवश्यक आहे. एक तास जरी गुरुच्या, आदिमातेच्या चेहर्याकडे बघत बसलात, तरी तुम्हाला शंभर तासाच्या शंभर पट ज्ञान मिळेल कसं? हा तुमचा प्रांत नाही. हे कसं होईल हा तुमचा प्रांत नाही, ही विषमता का? हा निसर्ग आहे. स्त्री-स्त्री आहे, पुरुष-पुरुष आहे. आपआपल्या जन्माच्या मर्यादा असतात आपण त्या पाळायच्या असतात.
ज्याने हे शरीर बनवलं तो डॉक्टर आहे की इंजिनिअर आहे? स्ट्रक्चर तयार केलं म्हणून इंजिनिअर, आकार दिला म्हणून शिल्पकार, चांगल्या डिझाइन तयार केल्या म्हणून चित्रकार, शरीर तयार केलं म्हणून वैद्य. कोण आहे तो?
ज्याच्यापासून काहीही बनते ते ब्रह्म. मग जो काहीही बनवू शकतो तो कोण? तो परमात्मा-परम आत्मा. परम म्हणजे केवळ मोठा असा अर्थ नाही. परम म्हणजे बनविणारा, control करणारा. परमात्म्याचं एक नाव आहे राम. राम हा परमात्मा आहे आणि दत्तात्रेय रामात्मा आहे. रामाचा आत्मा आहे. राम जेव्हा देह धारण करून येतो, तेव्हा त्याच्या सर्व जीवनासाठी आवश्यक तयारी दत्तात्रेय करतात. त्याचं जीवन कशा प्रकारे जाणार, त्याला कशी मदत मिळणार, त्याच्या जन्माच्या तयारीचं नियंत्रण करतात ते दत्तात्रेय.
परमात्मा जेव्हा भर्गलोकातून पृथ्वीवर अवतरित होतो, राम बनतो तेव्हा त्याच्या संपूर्ण अवतार कार्यासाठी जी जी setting लावावी लागते ती दत्तात्रेय लावतात. दत्तात्रेय म्हणजे हनुमंत. हे परमात्म्याचं अंकुरण आहे त्याच्याआधी त्याच्या जन्माचं बीज पेरणं, ते अंकुरण्यासाठी पावसाची तयारी करणं हे सगळं दत्तात्रेय करतात. परमात्म्याचा त्याच्या कार्यासाठीच सगळा वेळ जावा, इतर गोष्टीत त्याचा वेळ जाऊ नये हे सगळं दत्तात्रेय केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे सांभाळतात. रामाचं सगळं सूत्रसंचालन दत्तात्रेय करतात. परमात्म्याला त्याचं कार्य करण्याची मुभा दत्तात्रेयांकडून मिळते.
इथे दुसरी गोष्ट म्हणजे अत्रि-अनसूया, सवितृ-गायत्री, दुर्गेश्वर-दुर्गा एकच आहेत. अशा अत्रि-अनसूयेचा पुत्र दत्तात्रेय आहे. जेव्हा परमात्मा अवतरित होतो त्याला सहाय्य करणारी संस्था हीच आहे. अत्रि व अनसूया रूपानेच चण्डिका पृथ्वीवर स्थूल रूपात वावरलेले आहेत. ह्यांचा पुत्र दत्तात्रेय परमात्म्याच्या अवतारित कार्यात सूत्रसंचालक असतो.
तुम्हांला समजा इंग्लंडला जायचे आहे तर कोणाची मदत घ्याल? जो तिथे राहिला आहे त्याचीच. परमात्मा येतो, तेव्हा इतर कामात त्याचा वेळ जाऊ नये ह्याची काळजी दत्तात्रेय घेतात. दत्तात्रेय रामामध्येच आहे, म्हणजेच तिथे अनसूया आहेच, अत्रि आहेच. ह्या सर्वांचे पाठबळ आहे. एक रामनाम किती फायदेशीर आहे. आम्हांला प्रश्न पडतो की कोणाची पूजा करायची? हे confusion येतं आमच मन घाबरतं. कुठे तरी चूक झाली तर? ज्याक्षणी परमात्म्याचा अंकुर तुमच्या मनी फुटला म्हणजेच गुरुक्षेत्रम् मंत्र तुम्ही हृदयात धारण केला, आपलासा केला की हे confusion दूर होतं.
ह्याचा प्रथम पाद काय सांगतो. विच्चे म्हणजे दर्शन ते समर्पण, यज्ञ ते तपश्चर्या सगळं काही ह्यात आहे. सगळे दैवी उपचार ह्या एकातच आहेत. परमात्म्याला तुम्ही सद्गुरु मानला की ॐ ऐं र्हीम् क्लीम् चामुण्डायै विच्चे ह्या मार्गाने जेवढी दैवी शक्ती तुम्हांला आवश्यक आहे ते सगळं मिळतं. घरात पूजन करताना फालतू नियम, रूढीत अडकू नका, गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणणार्याला कुठलीही बाधा होऊ शकत नाही, कुठल्याही देवतेची पूजा करताना चूक झाली तरी त्याचे अवडंबर करू नका. आध्यात्मिक जीवन जगताना परमात्म्याला सद्गुरु मानून गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणत असाल तर कुठल्या देवतेच पूजन कसं करावं ह्यासाठी गावभर हिंडायची गरज नाही. ह्या मंत्राच्या बीजातच सगळं काही आहे. जे काही अंकुरतं ते बीजातूनच अंकुरतं.
शांत चित्ताने परमार्थ, प्रपंच करा. प्रेमाने देवाकडे बघायला शिका. देवाचा देव्हारा सजविण्यात, पूजा करणं ह्यात सौंदर्य आहे. मनाचे स्थैर्य व सामर्थ्य गुरुक्षेत्रम् मंत्रच देऊ शकतो. हा काय देऊ शकत नाही असे काहीच नाही.
॥ हरि ॐ॥