॥ हरी ॐ॥
आपण गुरु म्हणजे काय? हे समजून घेतलं, क्षेत्रम् बद्द्ल आपण बोललो होतो का? कुणाला आठवते आहे का? मी expect करत नाही की सगळं तुम्हाला आठवेल, फक्त गुरुक्षेत्रम् मंत्राबद्दल बोललो एवढं आठवलं तरी पुरे झालं.
क्षेत्र ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे area आणि दुसरा म्हणजे शेत. क्षेत्रम् म्हणजे काय तर गुरुचे शेत. बघा शेती करताना ज्याचे शेत असते तोच पेरणी करेल असे नाही. कधी-कधी दुसर्याला contract दिले जाते. पण इथे असे नाही. गुरुच्या शेतात शेती करणारा खमक्या आहे, तो कुणालाच त्याच्याशिवाय शेती करायला chance देणार नाही.
हे गुरुचे क्षेत्र आहे कुठे? आपण व्यवहारात म्हणतो हे त्याचे क्षेत्र आहे म्हणजे काय तर प्रत्येकाला व्यवसायानुसार कुणाचे अभिनय क्षेत्र असते, कुणाचे वैद्यकीय क्षेत्र असते. प्रत्येकाचे क्षेत्र हे वेगवेगळे असते.
पण इथेही एक गोष्ट महत्त्वाची आहे, जरी दहा जणांचे एकच क्षेत्र असले तरी त्यात सगळेच expert नसतात. अभिनय क्षेत्रात आपण बघतो बरेच जण असतात पण त्यातील सगळेच expert असतात का? नाही. म्हणजे इथे काय आवश्यक असतं? तर कौशल्य.
म्हणून क्षेत्राचा अर्थ काय होतो? कर्मभूमी. मग आता गुरुचे शेत म्हणजे काय? गुरुची कर्मभूमी म्हणजे काय? हे आपल्याला बघायचे आहे.
आपण वारंवार बोलताना ऐकतो, "कर्मात काय लिहिले माहीत नाही." "पोराने काय कर्म केले आहे माहीत नाही", "कर्म" शब्द बर्याच वेगवेगळ्या अर्थाने वापरला जात असला तरी, जास्त करुन कर्म म्हणजे "नशीब" ह्या अर्थाने तो प्रचलित असतो.
काही जणांना कपाळावर हात मारुन घेण्याची सवय असते. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कपाळावर हात मारण्याचे ताबडतोब थांबवा. त्याचे कारण मी पुढे सांगेन.
कर्म म्हणजे दोन गोष्टी येतात त्यातील १)क्रिया ( कर्म करतो ती क्रिया व कौश्ल्य)
व २) नशीब. ह्या जन्माच्या क्रियेतून पुढचे नशीब किंवा गतजन्माच्या क्रियेतून पुढील जन्मांचे नशीब ठरत असते. अशा ह्या नशीबावर खूप काही अवलंबून असेलही पण -
"एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ! परि हरि कृपे त्याचा नाश आहे !"
कितीही कठीण किंवा वाईट प्रारब्ध असले तरी हरिकृपेने त्याचा नाश होतो.
कर्मावर उतारा कर्म हाच असतो. कर्माची treatment कर्म हीच असते.
पण ह्यासाठी आधी काहीतरी करता तर आले पाहिजे. एखाद्या स्त्रीने कधी स्वयंपाकघरात प्रवेशच केला नसेल तर ती श्रीखंड कशी बनवू शकेल. एखाद्याला फोटोग्राफी करायची आहे, पण कॅमेरा कसा धरायचा हेच माहीत नसेल तर तो फोटोग्राफी कसा करेल?
म्हणजेच, कर्म हा मनुष्य सहजतेने शिकत जातो, परंतु कर्माचे कौशल्य प्रयासानेच मिळत असते. लहान मुले बोलायला, चालायला सहजतेने शिकतात पण त्याचे skill त्यांना शाळेत जाऊनच develop करावे लागते. कर्म करणे ही सहज गोष्ट आहे पण कौशल्यासाठी मात्र प्रयास आवश्यक असतात.
शाळा म्हणजे काय? तर शाळा ही तुम्हांला काम चांगल्या रितीने करायला तीन प्रकारे शिकवते -
१) जे तुम्ही करु शकता ते अधिक चांगल्या रितीने शिकविणे
२) जे तुम्हांला करता येत नाही ते करायला शिकविणे
३) जे केल्याने हानी होऊ शकते, त्याबद्दल सावधान करणे
शाळा आली की शिक्षक आलाच. हेमाडपंत सांगतात, "काय गोड गुरुची शाळा"
जर तुमचा शिक्षक साधा असेल तर ती गोड शाळा होणार नाही. शाळेच्या बाबतीत शिक्षकांनी चुकांसाठी दिलेला मार, मित्र, मैत्रिणी सोबतचे क्षण सगळे आठवत असते पण तरीही तुम्ही ती शाळा सोडून पुढे कॉलेजमध्ये जाताच ना? जर ती शाळा गोड असती तर ती तुम्ही सोडली असती का? खरं गोड काय? तर जे कायमचे गोड आहे ते. जे आज गोड आहे, उद्या गोड आहे, कालही गोडच होते, तेच खरे गोड.
"मधुराधिपते अखिलं मधुरं!"
म्हणून फक्त गुरुची शाळाच गोड आहे तुम्ही शाळेत जाता कशासाठी? आज ज्या तीन गोष्टी बघितल्या त्यासाठीच. ह्या तीन गोष्टी प्रत्येक क्षणाला आपल्याला जीवनात उतरवायच्या असतील तर त्यासाठी गुरुच्या शाळेत असणे आवश्यक आहे.
गुरुचे क्षेत्र म्हणजेच गुरुची शाळा पण गुरु काय सगळ्यांसाठीच शाळा बांधू शकणार नाही. त्यासाठी काय पाहिजे? तर जागा पाहिजे.
सद्गुरुकडे प्रत्येकाची line वेगळी त्यामुळे गुरुच्या शाळेची देखील प्रत्येकासाठी जागा वेगळी. तुम्ही जिथे जागा द्याल तिथे तो शाळा बांधणार, गुरुकुल बांधणार. गुरुला शाळा बांधण्यासाठी द्यावे लागते ते म्हणजे तुमचे मन. मनातील थोडीशी जागा गुरुला द्यायची.
मानवाचे मन अफाट असते. त्यात खड्डेही खूप असतात म्हणून त्याला सांगायचे, "तुला पाहिजे ती जागा तू निवड व पाहिजे तेवढी जागा तू घे." आम्हाला मग टेन्शन येते, गुरुने भलतीच जागा घेतली तर? तुमच्या मनात तुमच्या बायकोसाठी, तुमच्या आई-वडिलांसाठी, तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या शत्रुंसाठी वेगवेगळ्या जागा असतात.
गुरु तुमच्या मनातील कुठली जागा निवडेल? तर जी जागा तुम्ही कोणालाही दिली नाही ती. अशी रिकामी जागा गुरुला हवी असते. केवढी जागा गुरुला हवी असते? तर तुमच्या कपाळाची size आहे तेवढी. अशी जागा एकतर तुम्ही द्यायची किंवा त्याला निवडायला सांगायची.
पण एकदा गुरुला दिलेली जागा ज्याक्षणी तुम्ही दुसर्यांना द्यायचा विचार करता तेव्हा त्याचक्षणी गुरु ती जागा सोडून देतो. एवढा हा सरळमार्गी भाडेकरू आहे. तुम्हाला देण्यासाठीच तो तुमच्या जागेत येऊन राहत असतो. तो तुम्हाला शिकवितो, पगारही घेत नाही वर तुमचा नफा करुन देतो. असा सर्वार्थाने तुमचा फायदा करून देणारा तो एकच.
समजा तुम्ही एखाद्या दगडाला मनापासून गुरु मानले तर त्या दगडाची जागा तुमच्या मनात सद्गुरुच घेईल. पण इथे भाव मात्र खरा हवा.
खरा भक्त कुठेही असला अगदी वाळवंटात, जंगलात किंवा खोट्याबुवाकडे जरी असला तरी गुरु त्याला सांभाळतोच.
आपले कपाळ म्हणजेच विधीलिखित नशीब. म्हणजेच आपल्या नशिबा एवढी जागा गुरु मागत असतो. अशी जागा मागणारा त्याच्यासारखा तो एकच. आम्ही म्हणतो, आमचं नशीब फुटकं आहे, असं असलं तरी तुमच्या नशिबावर शाळा कोण बांधतो, तुमचा सद्गुरु. एकदा का तु्मच्या नशिबावर येऊन सद्गुरु थांबला की मग भीती कसली ?
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा !!’
साईसच्चरितातील चार मित्र व एक वणजारी ह्यांची कथा आपल्याला माहित आहे. चौघे जंगलात सगळीकडे फिरतात व परत आधीच्याच स्थानावर येतात, पण त्यांच्यातील एकालाच अक्कल येते. पुन्हा पुन्हा चूका करून फिरून आपण त्याच स्थानावर येतो तेव्हा आपण २५%च सुधारलेले असतो.
फिरुन त्याच ठिकाणी आल्यावर गुरुने दिलेला भाकरतुकडा खाल्ल्यावर गुरुने काय विचारले? , "येशील काय मज संगती?" इथे "ये’ म्हणून नाही सांगितले. हेच ते कर्मस्वातंत्र्य. जायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे. बाकीचे तिघे नाही गेले, फक्त साईनाथ गेले. गुरुने काय केले? साईनाथांना अलगद विहिरीत उलटे सोडले, नाका तोंडात पाणी जाणार नाही असे उलटे लटकवले. नंतर जेव्हा वर काढल्यावर विचारले, "कसे वाटले?" तेव्हा साईनाथांनी "आनंदात होतो" म्हणून सांगितले.
गुरुने उलटे टांगणे म्हणजे नक्की काय? आपण नेहमी म्हणत असतो, "सगळं सुलट्याचे उलटे झाले म्हणून." करायला जावे एक आणि झाले भलतेच.
गुरुकडे आल्यावर तो काय काम करतो? तर तुमच्या वाटेत काटे पसरतो. काटे का पसरतो? कारण तोच शिकवतो कट्यांवरून चालायला.
ज्याने गुरुला त्याच्या मनात जागा दिली आहे, त्याला तो हे काटे बाजूला सारुन चालायला शिकवतो व जेव्हा असे चालणे शक्य होत नाही तेव्हा तो त्या भक्ताला उचलून धरतो. हा काटे का पसरतो? तर त्याची इच्छा असते की, जे काही तुमच्या प्रारब्धात आहे ते काट्यावर निभावून जावे.
काटे कुठे टोचतात? तर पायाला व ते ही अगदी सूक्ष्म प्रमाणात. त्याचप्रमाणे सुरीही लागते, तीसुद्धा टोचतेच. बंदुकीची गोळीही लागू शकते. छोट्या काट्यांपेक्षा ह्याने होणारी इजा जास्त असते. अशा गोष्टी टाळण्यासाठी, की ज्याने तुम्ही अपंग होऊ शकाल, तुम्हांला injury होऊ शकेल, तो काटे पसरत असतो. हे काटे तो कसे पेरतो, तर तो तुमच्या त्वचेची क्षमता बघुनच. हे काटे टोचल्यावर त्याला बघायचे असते, की तुम्ही काय करता?
"काय रे हे साईनाथा!" म्हणता,की "वाचव रे साईनाथा" म्हणता, की .......साईनाथा **** म्हणून शिव्या घालता. जेव्हा तुमच्याकडून शिव्या येतात, तेव्हा लगेच तो त्याची जागा सोडतो. ही परीक्षा तो का घेतो? तर तुमचा अभ्यास झाला आहे की नाही हे बघण्यासाठी. त्याचे काटे टाकणे म्हणजे संकट नव्हे तर जे काही त्याने शिकवले ते तुम्हांला किती समजले हे बघून अधिक चांगले देण्यासाठी.
आमच्यावर प्रारब्धामुळे संकटे येतात. पण problem नाही कारण माझा सद्गुरु माझ्या संकटांपेक्षा मोठा आहे. पण जेव्हा संकटे येतात आणि मार्गही सापडत नाही, संकटांवर उपाय सापडत नाही म्हणजे आपण आपल्या मनाची गुरुला दिलेली जागा तेव्हा काढून घेतली. मग अशा वेळी गुरुला परत परत यायला सांगायचे. असे सांगितल्यावर तो दुप्पट जागा घेतो का? नाही.
खरं सौंदर्य आहे, आपण त्याला सांगायचे - माझे आख्खेच्या अख्खे मन तू घे, माझं न- मन (नमन) होऊ दे.
त्याने मागितलेली जागा आपण त्याला द्यायला शिकुया. आपल्या मनातील गुरुला दिलेली जागा म्हणजेच नशीब, गुरुक्षेत्रम् कसे होते ते आज आपल्याला बघायचे आहे.
आपण गुरुला वारंवार आपल्या मनातील जागा घ्यायला सांगितले पाहीजे , का ? तर आम्ही जी त्याला जागा देतो ती आम्हांलाही माहीत नसते की, आम्ही त्याच्याकडुन परत कितीवेळा काढुन घेत असतो .
आपली रोजची प्रार्थना करताना अनेक वेळा टाळाटाळ होत असते आता नको नंतर असे करत आपण करत नाही, हे गुरुला नक्कीच कळत असते. असे जर आपल्याकडुन परत परत घडत असेल तरी घाबरण्याचे कारण नाही.
ह्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे सकाळी उठल्यावर त्याच्या चरणांवर आपले कपाळ म्हणजे आपल्या नशिबाची जागा ठेवायची . आणि सांगायचे , " तुझ्या चरणांवर माझे कपाळ ठेवतो आहे म्हणजे हे क्षेत्र तुझे झाले . इथे मनातही तेव्हा तोच आदराचा व प्रेमाचा भाव असला पाहीजे . त्याच्याविषयी आत्यंतिक विश्वास असायला हवा. त्याशिवाय मार्ग सुटत नाही.
गुरुची कर्मभूमी कुठे असते? तर तुमच्या मनात. दुसर्याच्या मनाची कर्मभूमी तुम्हांला मदत करु शकत नाही. जर आम्ही त्याला जागा दिली नाही तर गुरुची कर्मभूमी आमच्यासाठी कुठेही असणार नाही.
सुचित दादा जेव्हा उपासना देतात तेव्हा आम्ही काय सांगतो ? नवरा किंवा मुले करणार नाहीत मग आम्ही केले तर चालेल का? मला सांगा नव~याऎवजी बायलो जेवली तर चालेल का ? नाही चालणार ..बरोबर
दुसरे आपल्याला मदत करु शकतात पण ते कर्ज असते लक्षात ठेवा. ज्याची गोष्ट त्यानेच केली पाहीजे .
गुरुचं कधी ऋण नसतं. मातृऋण पितृऋण असतं पण गुरुॠण कधीच नसतं. त्याचं कर्ज तो कोणावर ठेवत नाही. तो एकच असा आहे की जो कर्ज ठेवत नाही तर कर्ज देतो . कशासाठी तर तुमच्या कर्जाचा संचय कमी व्हावा म्हणुन , हे एकमेव सदगुरुच करु शकतो .
हे काटे तो का टाकतो? तुम्हाला कर्ज फेडता यावं म्हणून. जागा का मागतो तुम्हाला भाडं देता याव म्हणून. तोच कर्ज देतो आणि तोच फेडून घेतो.
गुरुचे चरण जिथे आहेत तेच गुरुक्षेत्रम्. मनाचा आम्ही दिलेला भाग म्हणजे गुरुक्षेत्रम्. मनाचा आम्ही जो भाग देतो तिथे आमचा सद्गुरु स्वत: उभा असतो .
गुरुआज्ञा पालन ज्या प्रमाणात करतो त्याप्रमाणात नशिबाच्या दुप्पट जागा सद्गुरु देत जातो. साईनाथांनी काही वाचायला सांगितलं आहे तर ते वाचताना त्यावर स्वत: साईनाथ उभा असतो. तुमच्या चांगल्या प्रारब्धासाठी तुम्ही चांगल बनावं म्हणून ही जागा वाढवण्याचे काम हा सद्गुरुराया करत असतो.
ही त्याची कर्मभूमी आहे, हा त्याचा धंदा आहे, हे त्याचे profession आहे, त्याचा छंद आहे, ही त्याची hobby आहे .हा त्याचा स्व- भाव आहे . त्याशिवाय तो राहुच शकत नाही .
क्षेत्र ह्याचा दुसरा अर्थ म्हणजे शेती. ह्यात ज्याचे शेत असते त्याचेच पीक असते जरी बीज इतर कुणीही पेरले असले तरी .
ज्याचे शेत त्याचे पीक - हा क्षेत्रबीज न्याय आहे.
पेराल तेच उगवेल अशी म्हण आहे. म्हणी अनुभवातून तयार होतात. सगळ्या भाषेत ही म्हण आहे. मनाची शेती तुम्ही करता तेव्हा गहू, तांदूळ कमी पेरता. द्राक्षे, धत्तुरा, नांरिंगी अशी नशिले विषारी पदार्थ जास्त पेरता. त्यांना उपटून टाकायची ताकद आमच्यात नसते .
ह्यासाठी मग आपण contract / सुपारी सद्गुरुला द्यायची असते. बापरे! स्वत:ची सुपारी द्यायची? मग संपलेच सगळे. तर असे नाही . सुपारीचा आताच्या काळात अतिशय चुकीचा अर्थ लावला जातो .
सुपारी देणे म्हणजे खर्या अर्थाने विडा उचलणे, मान्यता देणे. त्याला आपल्या शेताची सुपारी देणे म्हणजे काय तर , त्याला सांगणे, " पाहीजे ते तू पेर व पाहीजे तसे तू वापर, तू हेच लाव असे मी सांगायला येणार नाही. तू ते पिक विकून मला पैसे दे असं मी म्हणणार नाही. शेत तुझंच आहे. माझ्याकडून जे पेरलं गेलं आहे ते उपटून टाकायचं असेल तर टाक."
हे शेत तुझं आहे, त्याचा मालक मी नाही. "
आमच्या मनाचे शेत कुठले ? तर बुद्धी जो विचार करते त्या विचारानुसार मन जे वागत असते ते म्हणजेच आमच्या मनाचे कार्य जे बुद्धीच्या अनुभवाने चालते तो भाग म्हणजे शेती.
बुद्धी जो विचार करते त्या विचारानुसार मन जसं वागतं त्याला मनाची शेती म्हणतात.
आता मानव म्हणून जन्माला आल्यावर आपला अनुभव तो केव्हढा असतो ? जिथे दोन तासा पूर्वीची, दोन दिवसांपूर्वीची आम्हांला नीट आठवण राहत नाही, तिथे आपल्या अनुभवाची शिदोरी ती काय? तुम्हांला जर आज सांगितलं तुम्ही दहावीत असताना तुमच्या वर्गात असणा~या मुलांची नावे लिहा तर तुम्हांला ती आठवणार आहेत का? परीक्षेसाठी सकाळी पाठ केलेली उत्तरे आपण संध्याकाळी परीक्षा झाल्यावर विसरतो !! आपली अक्कल ती किती असते ?
म्हणून आपल्या मनाची शेती आपल्याला त्याला देता आली पाहीजे. इथे , " राम दुवारे तुम रखवारे , होत न आग्या बिनु पयसा रे " हाच भाव आमचा असायला हवा. पण "तुला पाहीजे तशी ही शेती तू वापर" हे no objection certificate (NOC) गुरुला द्यायचे कसे ?
तर अतिशय श्रद्धेने रोज गुरुमंत्र म्हणेन. म्हणजेच गुरुला NOC देणे. ह्या मंत्राच्या महात्म्यात आपण सर्वसमर्थं सर्वार्थ समर्थं कसे ते बघितले, गुरु क्षेत्र म्हणजे काय? ते बघितले, गुरुक्षेत्रम् मंत्राचा फायदा बघितला.
ह्या संपूर्ण मंत्राची रचनाच विचित्र आहे . सर्व मानवांच्या पहिल्या जन्मापासुन (सत्ययुगा पासून) पुढे म्हणजे जगबुडी झाल्यानंतरच्या काळात सुद्धा NOC घेउन हा गुरुमंत्र तुमच्या जीवनात येईल .
ज्याने ज्याने हा गुरुमंत्र श्रद्धेने म्हटला त्याच्यासाठी तुमची ईच्छा असो वा नसो हा मंत्र तुमच्या लिंगदेहात कायमचा कोरला जातो. ह्या मंत्राचे बीज तुमच्या लिंग देहात कायमचे सुप्तावस्थेत असते त्यामुळे जेव्हा आवश्यकता असणार तेव्हा ते आपोआप प्रगट होणारच आहे .
एकदा का तुम्ही हा गुरुमंत्र मनापासुन स्वीकारला की ह्याचा stamp कायमचा तुमच्यावर बसला, तो कधीच पुसला जाणार नाही. अगदी कलीयुगाच्या अस्तानंतर सगळे नष्ट झाल्यानंतर पुन्हा नवीन युगाची सुरुवात होईल तेव्हाही हा मंत्र तुमच्या सोबत असणारच आहे .
आज अशी एक बँक तुमच्या हातात आली आहे की जी कधीच रिकामी होणार नाही. आज गुरुमंत्र म्हणताना आपला उजवा हात छातीवर ह्रुदयाच्या जागी ठेवून त्यावर cross असा आपला डावा हात ठेवायचा व गुरुमंत्र म्हणायच. हे असे का ?? तर मी ( प.पू.बापू) सांगितले म्हणून. त्याचा तुम्हांला कसा फायदा होणार हे सांगायला मी बांधील नाही .
जेव्हा कधी मन विषिण्ण होते, अतिशय खेद वाटतो, nervous वाटते, तेव्हा अश्या रितीने दोन हात ठेवुन गुरुमंत्र म्हणायचा. किती वेळा म्हणायचा? असे कुठलेही बंधन नाही . एकदा म्हणा, दोनदा म्हणा.
भीती किंवा काळजी करण्याऎवजी अश्या रितीने गुरुमंत्र म्हणा, मनावरचे सर्व मळभ दूर होईल .
॥ हरी ॐ॥