॥ हरि ॐ ॥
सर्वप्रथम श्रीसाईसच्चरित पंचशील परीक्षा "पंचम" परीक्षेचा निकाल. एक सूचना इथे सांगायची आहे. आपल्या सूचनापेटीतून एक गोष्ट लक्षात आली की, काहीजण एकदा पंचशील परीक्षा झाल्यावर परत परत पहिल्यापासून पंचशील परीक्षेला बसतात. पंचम परीक्षेला आपल्याला जर्नल्स् लिहावे लागतात तर असे जे एकदा पंचम परीक्षा झाल्यावर परत पंचमीला बसतात त्यांना पुन्हा जर्नल्स् लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी हा नियम मी शिथिल केला आहे. पण पहिल्यांदा पंचमी परीक्षा देताना जरनल्स लिहिणं आवश्यक आहे.
आपण गुरुक्षेत्रम् मंत्राचा अभ्यास करीत आहोत. बीजमंत्राचा शेवटचा भाग, अंतिम चरण आपण बघत आहोत बरोबर, "सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं श्रीगुरुक्षेत्रम्"
आपण गुरु म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे काय? हे आतापर्यंत बघितले. आता सर्वसमर्थ सर्वार्थसमर्थ म्हणजे काय? हे बघायचे आहे. बघितल तर ह्याचा अर्थ अगदी सरळ सोपा आहे.
आम्ही व्यवहारात बोलतो की, अमुक वजन उचलायला तो समर्थ आहे, पण हा खूप क्षुल्लक अर्थ झाला. ह्याचा मूळ संस्कृत अर्थ काय? एखादी व्यक्ती, वस्तू, शक्ती, घटना किंवा वास्तू ही समर्थ कधी होते? ह्या पृथ्वीशी निगडित एक विश्व आहे, जे आपल्याला माहीत आहे. पृथ्वीच्या पलिकडे पण अनेक गोष्टी आहेत. पण जे आपल्याला माहीत आहे आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. जे मलाच(परमपूज्य बापू) माहीत नाही त्याविषयी मी तुम्हांला काय सांगणार? बरोबर.
आपल्याला भूक लागते, तहान लागते, हे माहीत आहे, बरोबर. आपल्याला थकवा येतो, नैराश्य येते हे माहीत आहे. आपल्याशिवाय ही दुसरी माणसं, पशू, पक्षी, सजीव निर्जीव वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत हे माहीत आहे. Right एवढं जरी तुम्हाला कळत असेल ना राजानों, तरी तुम्ही अध्यात्म जाणून घ्यायला समर्थ आहात, हे लक्षात ठेवा.
ह्या विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ हा पंचमहाभुतांनी बनलेला आहे. ही पंचमहाभुते सगळ्या दृश्य अदृश्य पदार्थांचे मूलस्थान आहेत.
आपण नुसता अग्नी बघतो. पण त्यामध्ये सुद्धा अग्नी महाभुताचे प्राबल्य असले तरी बाकी चार महाभुते आहेतच. ज्याअर्थी वायू तत्त्व आहे. जिथे अग्नी आहे, तिथे अवकाश आहे म्हणजे आकाशतत्त्व आहे. तो अग्नी स्थूल डोळ्यांना दिसतो, घनरुप आहे म्हणजे पृथ्वी तत्त्वही आहे. त्या अग्नीसाठी तेलाची-तूपाची आवश्यकता असते, म्हणजे जलतत्त्वही त्यात आहेच.
आपण जेव्हा नुसते जल बघतो. पण तेसुद्धा ह्या पंचमहाभुतांनींच बनलेले आहे, ह्याच प्रमाणे मानवी देहातील प्रत्येक कण, ऊर्जा हे ह्या पंचमहाभुतांनींच बनलेले आहे. ह्याचे प्रमाण कुणात कमी जास्त असेल. ह्या पंचमहाभुतांची जी प्रत्येक पदार्थातील टक्केवारी नेमून दिली आहे, ती तशीच राहिली तर कुठलाही पदार्थ क्षय होत नाही. प्रत्येक गोष्टीतील ह्या पंचमहाभुतांचे मूळ प्रमाण जोपर्यंत मर्यादेत असते, तोपर्यंत ती गोष्ट नष्ट होत नाही. गेल्या गुरुवारी विजेचे उदाहरण दिले होते. आकाशात जी वीज चमकते तीच आपण घरात लाईटच्या (बल्ब, ट्युबलाईट) रूपात बघतो. ही वीज कशामुळे उत्पन्न होते? पाण्यामुळे, म्हणजे ह्यात जलतत्त्व आहे, अवकाश आहे म्हणजे आकाशतत्त्व आहे, हिचा वरून खाली प्रवास आहे म्हणजे वायुतत्त्व आहे, ही कडाडते म्हणजे ह्यात अग्नीतत्त्वही आहे, डोळ्यांना दिसते म्हणजे स्थूल स्वरूप आहे म्हणजे ह्यात पृथ्वीतत्त्वही आहेच. विश्वातील प्रत्येक गोष्टीत जे हे पंचमहाभुतांचे प्रमाण असते, ते बिघडले की सर्व गोष्टी बिघडू लागतात. "समर्थ" म्हणजे काय? तर ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीत असणारे हे पंचमहाभुतांचे प्रमाण जराही न बिघडू देता, ते अधिकाअधिक तेज:पुंज करणे, शक्तिशाली करणे. ह्याचा अर्थ काय? तर समजा एक मुलगा शाळेत गेला त्याला पाच विषय आहेत. त्याने एका विषयाचा अभ्यासच नाही केला पण त्याच्या बाकीच्या चार विषयांचा अभ्यास खूप चांगला झाला आहे, तर तो परीक्षेत पास व्हायला समर्थ आहे का? नाही. तोच दुसरा मुलगा ज्याचा सर्व विषयांचा अभ्यास जेमतेम झाला आहे, ज्याला सर्व विषयांबद्दल आवश्यक ती माहिती आहे. तो मुलगा परिक्षेत पास होऊन पुढच्या इयत्तेत जायला समर्थ बनतो.
दुसरं उदाहरण बघू. घरात स्त्रिया अनेक पदार्थ बनवतात. सगळ्यात सोपा पदार्थ कोणता? काही जण भात सांगताहेत, काही चहा सांगत आहेत?
ह्या चहाच्या बाबतीत तुम्हांला एक ऋग्वेदमध्ये असतानाची गोष्ट सांगतो. नवरात्रीत मी सकाळी ब्राह्ममुहुर्तावर चण्डी होम करतो. एकदा नंदा दमली होती, त्यामुळे मीच तिला म्हणालो, "तू उठू नकोस मी चहा करून घेईन." सकाळी पाऊणे तीनला उठलो तेव्हा सासूबाईंनी विचारले, "चहा करून देऊ का?" मी म्हटले, "नको, मी करेन." कारण चहा तर सोपी गोष्ट आहे. मग चहासाठी एक कप पाणी ठेवले, साखर दोन चमचे घातली, पावडर किती घालायची समजेना मग चहा पावडर दोन चमचे घातली, दूधपण घातले. पाच-दहा मिनिटांनी बघितले तर चांगले बुडबुडे येत होते. आधी कधी चहा केला नव्हता त्यामुळे बुडबुडे चहा गरम करताना येतात की नाही ते माहीतही नव्हते. तो ओतून घेतला, कसाबसा त्यातला दोन घोट पिऊ शकलो. पिताना वाटले काहीतरी नक्कीच गडबड झाली. दुसर्या मिनिटाला सारा बाहेर. नंतर कळलं, ती चहाची पावडर नव्हती तर शिकेकाईची पावडर होती. केस साफ होण्याऐवजी पोट साफ झालं होतं.
इथे आमच्या शाळेतल्या एका सरांचे वाक्य आठवते ते नेहमी म्हणायचे, "पहिली नाही होत पास, आणि लागलाय अकारावीच्या गणिताचा ध्यास." अशी काहीशी आपली स्थिती नेहमी असते.
आपण कशाबद्दल बोलत होतो? तर सर्वसमर्थ म्हणजे काय? बरोबर. चहा करणे हे बघताना अतिशय सोपी गोष्ट वाटते. त्यात आपण योग्य प्रमाणात चहापावडर टाकली, साखर टाकली आणि उकळवला बरोबर. पण जर तिथे विस्तवच नसेल तर चहा होईल का?
तसेच मी जर पाच वेगवेगळ्या चुली ठेवल्या, एकावर दूध, एकावर पाणी, एकावर साखर, एकावर चहापावडर ठेवून मग एकत्र केलं, तर चहा होईल का? त्याचप्रमाणे मी चहा केला पण गाळला नाही तर चालेल का? चहा करणे हे किती सोपी गोष्ट वाटते पण हे करतानासुद्धा आपल्या मनात किती प्रश्न येत असतात. किती जणांसाठी चहा करायचा? कुठल्या कपबशीतून चहा द्यायचा? पाहुणे आले असतील तर त्यांन चहासोबत काय द्यायचे? समजा चहा बशीत सांडला तर तो पाहुण्यांना तसाच देणे योग्य आहे का? त्यात आलेली व्यक्ती चहाच पीत नसेल तर अजून problem.
आणि चहा करणारी व्यक्तीच जर नवीन असेल, तिने आधी कधी चहाच केला नसेल तर मोठाच problem. आमची माई घरात कधी जास्त लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर सांगायची, पाच मुठी मसाला टाक, दोन मुठी मीठ टाक. असा नुसता मारा असायचा. पण पदार्थाची चव मात्र best असायची.
तर आपण चहाच्याबाबतीत बघत होतो. एक चहा करणे आपण किती फालतू गोष्ट मानतो. पण लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट फालतू नसते. घरात राहणार्या स्त्रियांना नेहमी वाटते, आम्ही काहीच करत नाही, त्यामुळे त्या स्वत:ला फालतू समजू लागतात. ही पूर्णत: चुकीची समजूत आहे. घरी राहून गोष्टी करणं सोपी गोष्ट नाही. माझ्या आईने कधी नोकरी नव्हती केली, पण व्यवहारात ती एकदम परफेक्ट होती. चहा करण्याचा अनुभव घेतलेला असतो म्हणून ती गोष्ट सोपी वाटते. ज्या गोष्टींचा आपण नेहमी अनुभव घेत राहतो, त्या आपल्या परिचयाच्या होत जातात. त्यामुळे मग त्या आपल्याला फालतू वाटू लागतात. पण त्या फालतू नसतात, हे लक्षात ठेवा.
ऑफिसमधला क्लार्क नेहमी म्हणताना आपण बघतो की, "मॅनेजरला काय खुर्चीत बसून ऑर्डर करायच्या असतात." पण त्या मॅनेजरच्या खुर्चीत बसल्यावर त्याची किती कामं असतात, हे कळू शकते.
आम्ही आमच्या मनात प्रत्येक गोष्टीसाठी "अमुक गोष्ट सोपी, अमुक गोष्ट कठीण" अशाप्रकारचे वेगवेगळे कम्पार्टमेंट बनवत असतो. प्रत्येक गोष्टीबाबत आपण स्वत:ला कुठे ना कुठे कमी समजत असतो. प्रत्येक मनुष्याला एक किंवा हजारो गोष्टींत वाटत असते की, मी ह्यात कमकुवत आहे, weak आहे, लाचार आहे, आणि हीच गोष्ट मनुष्याचा नाश करत असते.
तुमचे पूर्व प्रारब्ध, तुमचे शत्रुसुद्धा जिथे तुमचे पाय खेचू शकणार नाहीत, तिथे तुमची स्वत:ला कमी लेखण्याची भावना तुम्हाला खाली खेचते.
समजा कुणाला वाटत असेल की, मी अतिशय फालतू आहे, तर असे वाटणे ही गोष्टसुद्धा फालतू नाही, हे लक्षात घ्या. कारण अशा वाटण्यामागेसुद्धा तुमच्या प्रारब्धाचा ५०% वाटा असेल, तर तुम्ही ज्या वातावरणात वाढता त्याचा ५०% वाटा असतो.
ह्या जाणिवेला भरून काढण्यासाठी मनुष्य आधार शोधत असतो. पण आधारसुद्धा पंचभौतिक असायला हवा म्हणजे कसा तर? आधार देणारी व्यक्ती ही प्रेमळही असली पाहिजे, कनवाळूही असली पाहिजे, तसेच तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नये म्हणून ती शिस्तप्रियही असली पाहिजे व तिला तुमच्यासाठी वेळही देता आला पाहिजे. ती तुमच्यासाठी available ही असली पाहिजे.
समजा तुमच्यावर संकट आले व तुम्हांला सगळ्या बाबतीत मदत करू शकणारा तुमचा भाऊ आहे. पण तो जपानला राहत असेल तर तो तुमच्या space मध्ये तुमच्या संकटाच्यावेळी येऊ शकत नाही. तो तिथे available होऊ शकत नाही.
आम्ही आमच्या कमकुवतपणासाठी, weakness साठी सहाय्य शोधत राहतो. मग हे सहाय्य कधी पुस्तकरूपाने असेल, कधी पैशाच्या रूपाने असेल पण त्याने समर्थता येते का? नाही. समर्थता कधी येते? जेव्हा ती वस्तू ही पांचमहाभौतिकरित्या संतुलित असते, तेव्हाच तो आधार तुम्हांला देताना तुमच्यातील पांचभौतिक गोष्टींचे संतुलन राखणारा हवा. त्याशिवाय तो आधार, आधारच ठरत नाही. आजारावर दिले जाणारे औषध जर असे संतुलन राखणारे नसेल तर ते औषध देखील औषध ठरत नाही. औषधांचे side-effect का होतात? कारण प्रत्येकाच्या कार्यशक्तीला मर्यादा असतात.
ज्याच्या कार्यशक्तीला मर्यादा नाही व मर्यादा नसूनही जो संतुलित आहे व available पण आहे, आणि आधार देण्यासाठी त्याला कुठल्याही condition ची सुद्धा गरज नाही असा तो एकमेव परमात्मा असतो.
एखाद्या ठिकाणी आग लागली तर तिथे लोकांना वाचविण्यासाठीसुद्धा साधनांची आवश्यकता असते. पण तो जो एक आहे त्याला अगदी आग लागली असली तरी कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही व आग विझवायची पण गरज नाही. असा तो एकमेव सर्वसमर्थ आहे. अशा ह्या सर्वसमर्थ परमात्म्याच्याद्वारे, ह्या एकाच्याच माध्यमातून आमचे चण्डिकाकुलाशी contact होऊ शकते, जे सर्वार्थसमर्थ आहे.
पंचमहाभुतांना संतुलित ठेवणारा असा हा परमात्मा म्हणजेच सर्वसमर्थ व स्कंदचिन्ह (चण्डिकाकुलाचे स्थान) म्हणजेच सर्वार्थसमर्थ. सर्वार्थसमर्थ म्हणजे काय? तर प्रत्येक भक्ताचा परमात्म्याशी पूर्वीच्या जन्मांतील, आताच्या जन्मातील व पुढच्या जन्मातील असणारा संबंध सांभाळणारा, त्यामागची गणितं सांभाळणारा. हा परमात्मा भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आहे. हा एक मागितले तर त्याच्या चारपट देत असतो व देताना इतर कुठलाही विचार करत नाही, हे त्याच्या आईला त्या विश्वमाऊलीला माहीत होतं.
त्या चण्डिकेला माहीत आहे, जेव्हा आपला लेक त्याच्या भक्तांसाठी partiality करतो तेव्हा सृष्टीनियमांत असंतुलन घडते अशावेळी देखील त्याचा पुरुषार्थ जी सांभाळते त्या माय चण्डिकेचे क्षेत्र म्हणजेच सर्वार्थसमर्थ.
"तो" म्हणतो "भक्ताधीन हे ब्रीद माझे" ह्या त्याच्या ब्रीद वाक्यामुळे भक्तांच्या प्रेमापोटी त्यांचा सर्व त्रास "तो" स्वत:वर घेतो आणि मुलाला त्रास होत असेल तर ते आईला कसे आवडेल? म्हणूनच भक्तांच्या प्रेमाला भुलणार्या "त्या"चा पुरुषार्थ सांभाळण्याचे काम त्याचे दादा, वहिनी, आई करतात.
मग ह्याचा अर्थ आम्ही प्रथम आमचे नाते त्या देवीसिंहाशी जोडायचे, मग किरातरुद्राशी जोडायचे मग शिवगंगागौरीशी जोडायचे अशा क्रमाने जायचे का? नाही. तर मी जीवनात सगळं करत असताना प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी currency म्हणजे हा मंत्र आहे. हा विश्वास कधी तुटू द्यायचा नाही. जेव्हा ज्याची आवश्यकता असते, त्यानुसार दत्तात्रेयांचे, हनुमंताचे सामर्थ्य आम्हांला ह्या मंत्रामधून मिळत असते.
ह्या चण्डिकाकुलात दत्तात्रेय आहे, हनुमंत आहे, परमात्मा आहे, चण्डिका आई आहे, किरातरुद्र, शिवगंगागौरी आहे. इथे एकाला नमस्कार केला नाही किंवा नमस्कार करायला विसरलो तर काहीजण परत परत सगळ्यांना वेगवेगळा नमस्कार करतात असे करण्याची राजांनो खरंच आवश्यकता नाही.
३२ व्या अध्यायात आपण बघितले. चौघांपैकी एकच शहाणा असतो जो वणजायाने दिलेली चतकोर भाकर खातो. गुरुने "येतोस का?" विचारल्यावर "येतो" म्हणून सांगतो. गुरुने उलटे टांगूनही आनंदात आहे असे म्हणतो.
"खरं सांगतो बाळांनों, गुरुक्षेत्रम् जर आमच्यासोबत असेल तर आमच्यासारखे श्रीमंत आणि समर्थ जगात दुसरे कुणीच नाही."
सत्ययुगात तेच मानव म्हणून जन्माला येऊ शकतात, ज्यांनी कलियुगात गुरुक्षेत्रम् मन्त्र स्वीकारला आहे. जे गुरुक्षेत्रम् मंत्रांने पावन झाले तेच सत्ययुगात मानव म्हणून जन्माला येऊ शकतात. अनेक कल्पानुकल्पे जरी गेली तरी माझी काळजी घ्यायला हा मंत्र समर्थ आहे, कारण हा मंत्र ज्याने दिला आहे "तो" आपला शब्द कधीही फिरवत नाही.
म्हणून एकदा का हा मंत्र घेतला की तुम्ही तुरुंगात पडलात म्हणून समजा. ज्याक्षणी तुम्ही हा मंत्र स्विकारला तेव्हा तुम्ही ह्याच्या बंधनात कायमचे अडकलात. समजा एखाद्या दारुड्याने देखील कधीतरी मनापासून एकदा तरी हा मंत्र स्विकारला असेल तरी त्याने अगदी २०० पापे केली, अगदी गटारात जरी गेला तरी तो गुरुक्षेत्रम्च्या बाहेर जाऊ शकणार नाही. आमच्यावर कितीही संकटे आली तरीही कुणीही आम्हांला गुरुक्षेत्रम्च्या बाहेर टाकू शकत नाही. प्रत्येक संकटावर, दु:खावर उपाय एकच तो म्हणजे गुरुक्षेत्रम् मंत्र. तुम्हांला आता ह्याच्या तुरुंगाबाहेर जायची इजाजत नाही. तुम्ही अगदी स्वत:हून बाहेर जायचे ठरवले तरी तुम्हांला पाच संधी दिल्या जातील तरीही नाही ऐकले तर पाच तडाखे दिले जातील तरीसुद्धा नाही ऐकले तर जेवढे तुमचे आयुष्य उरले आहे, तेवढे मिनिटे बाहेर जायला permission मिळेल. गुरुक्षेत्रम्मधून बाहेर पडल्यावर राडा झालाच म्हणून समजा. हे आपोआप कळेल तरीही तुम्ही शहाणे नाही झालात तर मात्र "इदं न मम" तुम्हाला चावी देऊन "जा बाबा" म्हणून सांगितले जाईल.
म्हणून गुरुक्षेत्रम् मंत्र सोबत जर असेल तर भीती बाळगायचे काहीच कारण नाही. मंत्र म्हणत असताना चूका होऊ शकतात म्हणून घाबरुन जाऊ नका. सगळे शिकलेले नसतात. तुकाराम, जनाबाई, चोखामेळा शिकले होते का? त्यांच्यासाठी तो आलाच ना.
गुरुक्षेत्रम् मंत्राची भीती वाटण्याची बिल्कुल गरज नाही. मंत्र म्हणताना चुकून दुसरा विचार मनात येऊन मंत्र म्हणण्याचा थांबला तरी, जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मी "तो" मंत्र तिथे पूर्ण करेन.
माझी आई सर्वार्थसमर्थ आहे. तिच्यामुळे मी तुम्हांला ही gurantee देऊ शकतो. ह्या गुरुक्षेत्रम्मध्ये कुणाला ठेवायचे, कुणाला काढायचे हे काम माझ्या आईने माझ्याकडे दिले आहे आणि ह्या कामात आतापर्यंत मी कधीच चूक केली नाही. पुढचं मला माहीत नाही. मी ज्योतिषी नाही. माझ्याकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे माझ्या आईचे प्रेम.
ह्या तुरुंगाचा पहारेकरी मीच होतो, ह्यापुढेही मीच असणार त्यामुळे निर्धास्त रहा. इथून बाहेर पडायचा प्रयत्न केलात तर डोक्यात दंडुका मीच घालणार, पळण्याचा प्रयत्न केलात तर, गळ्यात लोढणं मीच अडकवणार, तुमच्या डोक्यात कुणी काही घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोक्यात काठीही मीच घालणार.
आज आपण मंत्राचा पहिला भाग शिकलो. आज हा भाग आपला झालेला आहे.
॥ हरि ॐ ॥