॥ हरि ॐ॥
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा" २०१२ संपत आल. विश्वास किती वाढला आणि किती कमी झाला. वर्ष संपलं की वर्षाच्या सोबत अनेक गोष्टी जातात. माणूस संपला की त्यासोबत सगळ्या गोष्टी संपतात. मग सगळा खटाटोप का?
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा" पण कशासाठी? काय गरज आहे, गुरुची, विश्वासाची हा प्रश्न पडू शकतो. गुरुवर पुरता विश्वास का ठेवायचा? गुरु आहे म्हणून आम्ही हातावर ठेवून बसायचं का? गुरु असेल तर गरजेपुरताच ठेवायचा नां? आम्ही प्रत्येक गोष्ट गरजेपुरताच करत असतो. गरजेपेक्षा जास्त बोलण्याचं, खाण्याचं काम करतो अन्न आणि पैसा दोन्ही. काही जण मितभाषी असतात. पण बोलणं म्हणजे तोंडाने बोलणं नाही, वाणी म्हणजे मनाची वाणी. भारतीय धर्मात वाक् ही मनाशी संबंधित आहे. आम्ही मनाने किती बोलत असतो. तोंडाने दोन शद्ब बोलतो, तेव्हा मनाने लाख शब्द बोलत असतो. मन नेहमी बोलतच राहतं, कधी थांबत नाही. मनातले विचार कधीच थांबत नाहीत, मन थांबविण्याच्या प्रयत्नात मन अधिकच गुंतत.
आम्हांला नेहमी निर्णय घेताना मनात अनेक शंकांचे काहूर असतं. प्रत्येकजण समजतो, दुसरा माझ्यापेक्षा लकी आहे, माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे. देवळात गेल्यावर प्रत्येकाला प्रश्न असतो की, देव माझं ऐकतो का? आम्ही जे देवासमोर बोलतो ते मूर्ती ऐकते का? भौतिकदृष्ट्या मूर्तीला ऐकू जाणं शक्य नाही. त्याला सगळं कळतं हे आम्ही कधी बोलतो, जेव्हा त्याला एखादी गोष्ट कळावी अशी आमची इच्छा असते तेव्हा. जेव्हा माझ्यावर अडचण असते तेव्हा आम्ही म्हणतो देवाला सगळं दिसतं. पण आम्ही चुकतो तेव्हा देवाला सगळ दिसतं अशी आमची भावना नाही. जेव्हा आम्ही चुकतो आणि काही शिक्षाही होत नाही, तेव्हा आम्हाला वाटतं देवाला काही कळतं नाही. पण जेव्हा कळ लागते तेव्हा कळत देवाला सगळं दिसत. स्वत:ला कळ लागल्याशिवाय देवाला सगळं कळत हे कळत नाही. कळ, दु:ख, वेदना हे भगवंत देत नसतो. तो फक्त असुरांना सजा देतो, मानवांना नाही.
मनात जे विचारांचे काहूर उमटते त्यांनेच गोंधळ निर्माण होतो. प्रत्येकाच्या कुंडलिनीत नेहमी महाप्राण खेळत असतो, महाप्राण हनुमंत नेहमी रामनाम घेत असतो, म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात जाऊन हनुमंत रामनाम घेतो. हनुमंताने उच्चारलेलं रामनाम सुषुम्ना नाडीतच राहते. ते त्रिविध देहात येत नाही. ते त्रिविध देहात पसरण्यासाठी एकच दरवाजा उघडणे आवश्यक आहे, त्यासाठी एकच सोपा मार्ग आहे
"देवाचिया दारी उभा क्षणभरी । तेणें मुक्तीचारी साधियेल्या॥"
आमचं मन एक क्षणभर कुठल्याही गरजेशिवाय, मागणीशिवाय, विचारांशिवाय शांत व्ह्यायला हवं. असं जास्तीत जास्त एक सेकंद करायच, तेव्हाच रामनाम त्रिविध देहात संचारत.
तेणे मुक्ती चारी साधियेल्या - मनुष्याला चार मुक्तींची आवश्यकता असते -
१) अभावापासून २) व्याधींपासून ३) अशांततेपासून ४) भयापासूनमुक्ती ह्या चारी मुक्ती जास्तीत जास्त गरजेच्या आहेत.
"देवाचिया दारी उभा क्षणभरी । तेणें मुक्तीचारी साधियेल्या॥"
उभा क्षणभरी - उभा म्हणजे गीतेत श्लोक आहे - "तस्मात उद्देष्ट्य कौन्तेय:" युद्धासाठी उभा रहा.
भगवंताच्या दारात भगवंताला पाहत पाहत मनापासून त्याच्या नामात, रुपात गुंतून जाणं. ह्या क्षणभर गुंतण्यातूनच ओज मिळू शकत. जे काही आपल्याला मिळत ते ओजापासून मिळत असतं. हा ओज धातू रामनामाने प्रचंड भरलेला आहे. पण झाडावर फळ आहे, पण ते फळ आमच्या हातात येत नाहीए. हे रामनाम सगळं काही देणारं आहे. सुषुम्ना नाडी म्हणजे ज्यात सरस्वती गुप्त झाली ती. सुषुम्ना म्हणजे गुप्त सरस्वती वाणी. आमच्या शरीरातील वाणीचा मार्ग जो आम्हाला ओज पुरवतो तो मुक्त नसतो, म्हणून प्रार्थना करताना आमचं लक्ष लागत नसतं. आम्हाला हनुमंत घेत असणारे रामनाम ऐकू यावे ह्यासाठीच चण्डिकाकुलाचा सगळा खटाटोप असतो.
"अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥"
एका माणसासाठी सगळा संसार म्हणजे त्याचं आयुष्य, आणि तिन्हीं लोक म्हणजे त्रिविध देह. आम्ही कायम हे चुकतं, ते चुकतं, हे होत नाही, ते होत नाही हेच करत बसणार का? जसे जोतिष्याकडे जाता तसे देवाकडे जाऊ नका. गरजेपुरता देव ही गोष्ट सोडून द्या. ज्योतिषी सल्ला देऊ शकतो, नशिब बदलवू शकत नाही. नशिब कोण बदलवू शकत? - एक तर तुम्ही तुमच्या प्रयासाने, नाहीतर चण्डिकाकुल व चण्डिका मातेने पाठवलेला तिचा पुत्र.
एखाद्याला ऑक्सिजन लावायचा असेल तर, एक सिलेंडर १००० रुपये देऊन घेऊन यावा लागतो, जो ऑक्सिजन फुकटचा त्या देवाने दिलायं त्याची किंमत नसते.
चष्म्याचा नंबर काढायला, फ्रेम, काच घ्यायला पैसे द्यावे लागतात, पण देवाने दृष्टी दिलीय तुम्हांला त्यासाठी तो चार्ज लावत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे देव गरजेपुरता ह्या संकल्पनेतून बाहेर पडाल. देव गरजेपुरता धरायचा नसतो कारण ऑक्सिजन गरजेपुरता घेऊन चालत नाही.आम्ही न मागताही त्याने काय-काय दिलयं आणि देतोय, त्याला काय गरज आहे. त्याने प्रत्येक परिस्थितीत आधार दिला, त्याला काय गरज आहे? त्याच्यासाठी युगानुयुगे चाललेला हा खेळ आहे, पण तरीही त्याला प्रत्येकामध्ये इन्टरेस्ट आहे. त्या परमात्म्याला सद्गुरुला तुमच्या प्रत्येकात इन्टरेस्ट आहे. सगळ्या जगाने तुम्हाला लाथाडलं, तरी तो तुम्हांला लाथाडणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रत्येकावर तो प्रेम करतो. जे मागितल्याशिवाय मिळतं त्याची आम्हांला किंमत नसते म्हणून आम्ही देवापासून लांब जात राहतो.
तुम्ही मनापासून चांगल्याला चांगल म्हणता, मनातल्या मनात चुकलेलं कबूल करता तोपर्यंत मी तुमचा आहे. आमच्याकडे बाकी काही नसेल पण आमच्याकडे आमच्या बापूंच प्रेम निश्चितच आहे. ह्या प्रेमामुळेच मी हा ग्रंथ तुम्हाला अर्पण केलाय. हया आधीचे ग्रंथ मी आईच्या, दत्तगुरुंच्या चरणी अपर्ण केलेत. पण आज हा ग्रंथ तुम्हाला मी अर्पण करत आहे. हा ग्रंथ तुम्ही ज्या स्थितीत आहात, त्या स्थितीत तुम्हाला हवा असणारा ऑक्सिजन आहे, तुम्हाला ताकद देणारा उर्जेचा स्त्रोत आहे, मार्ग दाखवणारा आधार आहे, अन्न-पाणी आहे. तुम्हाला काहीही करायच नाही हे वाचताना, सगळं आपोआप घडणार आहे. ह्याच्या प्रत्येक शद्बात, प्रत्येक ओळीत मंत्र आहे. ह्याचा एकच शद्ब, एकच अध्याय त्या क्षणाला जी काही आवश्यकता आहे, ती पूर्ण करणारा आहे. आम्हाला कोणापुढे हाथ पसरावे लागणार नाहीत. हे उपनिषद तुमच्याकडे असेल तर, तुम्ही कधी दलदलीत पडणार नाही, पडलात तर तिथे असणारी मगर तुम्हाला स्वत:च्या पाठीवर बसवून बाहेर काढेल.
मनापासून माझ्या आईवर प्रेम करा, वर्षानुवर्षे बापूंचे शद्ब ऐकून विसरणार असू तर उपयोग काय?
आज निर्धार करा - हा ग्रंथ माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा खजिना आहे. चारी मुक्ती आपोआप तुमच्याकडे असतील. ही महन्मंगल गोष्ट आहे, हा खजिना आहे जो कधीच संपणार नाही. ह्यात सगळं काही आहे - पैसा, अन्न, वस्त्र, ऑक्सिजन, औषध सगळं काही आहे. हा खजिना प्रत्येक गोष्ट देऊ शकतो. ही अशी संधी आहे, की जी आयुष्य जगताना व आपल्या मुळ देशा जाताना ताठ मानेने जाल, वावरालं. गाढवा-डुकरांसारखे नाही तर, धैर्यवान, शूर, संपन्न, ताकदवान अशा सुदैवी माणासाप्रमाणे आयुष्य जगाल. हे संपूर्ण मातृवात्सल्य उपनिषद् तुमच्यासाठी अर्पण करतोय. जेव्हा हे हातात धराल तेव्हा विचार करा -
"हे उपनिषद् बापूंनी माझ्यासाठी दिलयं, मला अर्पण केलयं. का अर्पण केलयं because Bapu Loves You. "
आज हा ग्रंथ तुम्हांला अर्पण करत आहे. त्यासाठी आता इकडे पूजन केले जाईल. ते पूजन प्रथम महाधर्मवर्मन् योगिंद्रसिंह पूजन करतील. नंतर मी(परमपूज्य बापू), नंदा, सुचित ह्या ग्रंथराजात विलिन करताना जे काही उचित आहे ते ते देणार आहे.
त्यानंतर उपनिषदाचे पूजन करण्यात आले. त्यावेळी तीन मंत्र म्ह्टले -
१) ॐ सकलसर्वभूषितां श्रीविद्यादेवीं नमामि।
२) त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्।
ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥
ह्या दोन्हीं मंत्रांतून हे उपनिषद् सिद्ध झालयं. दुसरा मंत्र चांगल्या इंद्राला पुढे नेणारा आहे व शुक्राचार्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडणारा आहे.
३) नम: सर्वशुभंकरे । नम: ब्रह्मत्रिपुरसुन्दरि। शरण्ये चण्डिके दुर्गे प्रसीद परमेश्वरि॥
हा तिसरा मंत्र ह्या उपनिषदातून सिद्ध झालाय.
सत्ययुगात ह्या तीनही गोष्टी होत्या, त्यामुळे भय नव्हते, त्रेतायुगात ह्यातील कुठल्याही दोन गोष्टी होत्या, द्वापार युगात ह्यातील एक गोष्ट होती. पण कलियुगात ह्यातील एकही गोष्ट नसते म्हणून आम्ही खितपत पडतो. ह्या सत्ययुगापासूनच्या तिन्हीं गोष्टी कली हिरावून घेतो, नाहीतर प्रारब्ध हिरावून घेते. सत्ययुगात जे होते ते आज कलियुगात मिळाले आहे. आयुष्यात काही सुटलं तरी आईचे पाय सोडू नका. तिचे पाय धरलेले असले की काहीही सुटत, तुटत नाही, दुखत नाही, हे लक्षात ठेवा.
दरवर्षी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण देतो. पण आज मी इथे तुम्हांला प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक जन्मासाठी प्रत्येक क्षणासाठी शुभेच्छा देत आहे.
॥ हरि ॐ ॥