॥ हरि ॐ॥
शिवरात्र प्रत्येक महिन्याला येते. आपल्या गुरुक्षेत्रम्मध्ये दर महिन्याच्या शिवरात्रीला महादुर्गेश्वराचं पूजन केलं जातं. हे आम्हाला किती जणांना माहीत असतं. आपण सगळ्या गप्पा मारतो मग अशा चांगल्या गोष्टींच्या गप्पा मारायला हव्यात. गुरुक्षेत्रम्मध्ये ह्या गोष्टींची माहिती दिली गेली पाहिजे. तिथल्या बोर्डवरची माहिती वाचायला हवी. एका तरी शिवरात्रीला ते पूजन आपण पहायला येतो का? आपल्या हाताशी सगळं आलयं उठून कुठे जावं लागत नाही, एवढी फी दिली तर पहिल्या रांगेत जायला मिळेल असं नाही आहे ना. गुरुक्षेत्रम्मध्ये प्रवेश घ्यायला मूल्य द्यावं लागतं का? शिवरात्रीत महादुर्गेश्वराचं पूजन महिन्यातून एकदा होतं, आम्ही येतो का?
महादुर्गेश्वर, सतत तीन दिवस त्या स्वयंभू शिवलिंगावर तीन दिवस सतत थंड पाण्याचा अभिषेक झाला नंतर थंड दूधाचा, एक लाख ओले भिजवलेले बेल अर्पण केले गेले. ज्यादिवशी पूजन झालं त्यादिवशी रात्री सगळं गरम लागायला लागलं. पानं जळलेली स्पष्ट दिसत होती. धूर निघत होता. जिथे पाण्याची धार सतत वाहत होती तिथे अग्नी येण्याची शक्यता नसते. मग हे कसं घडलं? हे फिजिक्सच्या नियमात बसत नाही. अशा शिवलिंगाचे पूजन दर शिवरात्रीला केलं जातं. एवढ्या रामनाम वह्या लिहून झाल्या की महादुर्गेश्वराचं पूजन करायला मिळणार. बापू तुम्ही काय काय करायला सांगता, अश्वत्थमारुती पूजन करा, हनुमान चलिसा म्हणा बापूंना काही काम नाही.
हिंदीत एक म्हण आहे, घर की मुर्गी डाल बराबर. आम्हाला easily मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही. इथे रुपयांची किंवा वह्यांची किंमत नाही. ५०० -७०० वह्या लिहिल्या म्हणून स्वयंभू लिंगाचे पूजन करायला मिळाले असं समजू नका. ही त्या चण्डिकाकुलाची कृपा आहे म्हणून आम्हाला स्वयंभू शिवलिंगाची पूजा करायला मिळते.
ज्या व्यक्तीने कांदा-लसूण कधी खाल्लेला नाही, परपुरुष-परस्त्रीला कधीही स्पर्श केलेला नाही, कधीही असत्य बोलले नाही अशाच व्यक्तीला फक्त दर्शन मिळू शकतं. आपल्याला हे मोठ्या आईच्या कृपेमुळे मिळालं आहे. हे लक्षात घ्या. ह्या स्वयंभू लिंगाची कथा आहे. हे शिवलिंग कोणत्या ऋषीच्या तपश्चर्येने मिळालेलं नाही.
हे शिवलिंग डॉ.शिवा फिरायला चालले होते श्री शैल येथे, तेव्हा त्याला मी सांगितलं होतं की स्वयंभू शिवलिंग कुठे मिळतं का ते बघा जरा म्हणून त्यांना सांगितलं. ते तिथे जाऊन सगळ्या दुकानांमध्ये जाऊन कुठे स्वयंभू शिवलिंग मिळतं का ह्याची चौकशी करू लागले. त्यांना माहीत नव्हतं की स्वयंभू शिवलिंग कशाला म्हणतात. ते कोठे विकत मिळेल? ते एका दुकानात चौकशी करत असताना त्या दुकानदाराने एका देवळाच्या पुजार्याकडे नेले त्यांनी विचारले कोणी मागवले आहे शिवलिंग? त्यावर डॉ.शिवांनी फोटो दाखवला आणि सांगितले की ह्यांनी स्वयंभू शिवलिंग मागवले आहे. पुजार्याने लगेच जाऊन ते स्वयंभू शिवलिंग आणून त्यांच्या हातात दिले त्या पुजार्याला वाटले असेल की ह्याला ह्याची वस्तू दिली नाही, तर तो चोरून घेऊन जाईल. ते शिवलिंग आणून त्यांनी माझ्याजवळ दिले, त्याची आपण स्थापना केली. स्वयंभू लिंग चार युगात एकदाच बनतं.
आजचं जीवन धावपळीचं आहे, ह्या परिस्थितीत वेळात वेळ काढून चांगल्या गोष्टी करायला हव्यात. मग संकटात हाक मारायची गरज लागत नाही. ९९% वेळा संकट असं येतं की हाक मारायलाही वेळ नसतो. म्हणून आपण आपल्याकडून चुकायचं नाही. २४ मिनिटं त्यांना पहा, २४ मिनिट तुम्ही त्यांच्याकडे पाहताय म्हणजे तुम्ही त्यांची काळजी घेत नाही, ते २४ तास तुमची काळजी घेत असतात. चण्डिकाकुल तुमच्यावर उपकार म्हणून हे करत नाही. तुमच्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून करतंय. आपण ह्या प्रेमाला जागलं पाहिजे. हे प्रेमाचं नातं आहे. आई मुका घेताना जर बाळ चावलं तर आई एक फटका मारते ना बाळाला. आईचा फटका हे बाळासाठी Tonic असतं. आईने मुका घेतल्यावर बाळ चावले तर आई फटके मारते, मग आपण कितीवेळा तिच्या बोटाला चावत असतो. ती देते का आपल्याला फटका? बापूंवर विश्वास असेल तर थोडातरी प्रयास करा.
त्रिविक्रम हे हरिहराचं एकत्रित स्वरूप आहे. उपनिषदामधून त्रिविक्रमाची कृपा आपल्याला कळतेय. तो शिवशंकर, किरातरुद्र, महादुर्गेश्वर तिघांना एकच स्तोत्र का म्हणायचं? ह्यातला शिव कोण? आपल्याला कळत नाही तर शांतपणे जगा. तुम्हाला उदाहरण देतो हा समोर वैभव कर्णिक आहे, त्याचे वडील अजित कर्णिक, त्याचा मुलगा उत्कर्ष कर्णिक तिघेही हॅप्पी होम मध्ये तिसर्या मजल्यावर एकाच flat मध्ये राहतात. म्हणून तिघे एकच आहेत का? शिव हे आडनाव आहे. परमशिव, नित्यशिव, सदाशिव. ह्या सगळ्याच्या पलीकडे महादुर्गेश्वर आहे. जो स्त्रीरूपाने महिषासूरमर्दिनी आहे तोच पुरुष रूपाने महादुर्गेश्वर आहे. जो अत्रि आहे तीच अनसूया आहे. हे शिवलिंग ultimate शिवलिंग आहे. संपूर्ण चंडिकाकुल त्यात सामावलेलं आहे. आपल्या हाताशी जी गोष्ट आहे तिच्यापासून वंचित का राहायचं? शिवरात्रीचं पूजन पाहण्यासाठी इतर देवळांमध्ये जे restriction पाळावे लागतात, त्यापैकी कुठलंही restriction इथे पाळावं लागत नाही मग हे पूजन पहायला एकदा तरी यायला हवं. हे सगळं अनुभवायला हवं.
हे शिवपंचाक्षरी स्तोत्र नंदीऋषीने लिहिलंय. नंदी तीन आहेत एक प्रात:नंदी, दुसरा मध्यान्हनंदी, तिसरा सायंनंदी. हे श्रेष्ठ ऋषी आहेत. ब्रम्हर्षी आहेत. हे स्तोत्र सुंदर आहे, हे मनुष्याची श्रद्धा वाढवतं. आपण आपली श्रद्धा वाढावी म्हणून प्रार्थना करतो का? आज स्वतिक्षेम संवादामध्ये मनापासून चण्डिकाकुलाला सांगा माझी श्रद्धा वाढती राहू द्या. मनापासून सांगा, आई आमची श्रद्धा वाढती राहू देत. तुमच्या श्रद्धेला चण्डिकाकुल श्रध्दा पुरवेल. आता आपण स्वस्तिक्षेम संवाद करूया.
॥हरि ॐ॥
ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम: रामाची जेवढी मंदिर नाहीत तेवढी हनुमंताची आहेत. एवढा popular देव आहे. अनेक माता, बुवा आलेत पण हनुमंताला कोणी competitor असू शकत नाही. ओबड-धोबड मूर्ती असली तरी आपल्याला त्या मूर्तीकडे बघताना छान वाटतं, साफसफाई केलेली नसली तरी, वैदिक मंत्रानी त्याची पूजा केलेली नसली तरी ती हनुमंताची मूर्ती आपल्याला आवडत असते. हनुमंत जयंती साजरी करतात. लंका दहनाचा उत्सव साजरा करतो. रामाची रामनवमी, गणपती गणेश चतुर्थी, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, शंकराची महाशिवरात्र साजरी करतो. पण हनुमंताची हनुमान जयंती, हनुमान पौर्णिमा आम्हांला खास लक्षात राहत नाही. असं खास नसतानाही प्रत्येकाला हनुमंताशी जवळीक असते. का? कारण सोप्प आहे. कारण हनुमंत हा विश्वाचा महाप्राण आहे. ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:. प्रत्येक वस्तूची रचना व अस्तित्व टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य, ते विकास करून टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य म्हणजे महाप्राण हनुमंत.
तुम्ही जन्माला आलात की हा महाप्राण जागृत होतो. जागृत महाप्राण आणि अजागृत महाप्राण कसा कळणार? समुद्राच्या काठावर येईपर्यंत हनुमंताला त्याच्या ताकदीचं, सामर्थ्याचं विस्मरण झालंय ऋषींच्या शापामुळे. प्रत्येक वानर आपआपल्या ताकदीचे प्रमाण सांगतो मी एवढी उडी मारू शकतो, मी तेवढी उडी मारू शकतो. अंगद सांगतो मी समुद्र पार जाऊ शकेन पण परत येऊ शकणार नाही. हनुमंताला त्याचं सामर्थ्य माहीत नाही तो अजागृत आहे त्याला जांबुवंत जागृत करतो.
मनुष्य ज्याक्षणी ८४ लक्ष योनी फिरत मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्यातील अजागृत हनुमन्ताला हा जांबुवंत जागृत करतो. मनुष्यामध्ये जागृत महाप्राण त्याच्या विकासाला बळ पुरविणारा आहे. बाकी योनीत हनुमंत अजागृत अवस्थेत असतो. प्रत्येक मनुष्यामध्ये महाकुंडलिनी व महाप्राण ह्यांचं अस्तित्व असतंच. महाकुंडलिनी निद्रिस्त अवस्थेत असते तर हनुमंत जागृत अवस्थेत (महाप्राण). विशुद्ध चक्राच्या पाकळ्या शुद्ध झाल्यावर ती जागृत होते.
हा सदैव जागृत आहेच. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ह्या बलाला ओळखते, अनुभवते कारण ती अनामिक ताकद आहे. ही आपोआप होणारी गोष्ट आहे. त्यासाठी काही करावं लागत नाही.
हा रामाचा प्राण आहे, विश्वाचा महाप्राण आहे. हा माझा महाप्राण आहे. जर तुम्हाला तुम्ही जिवंत आहात ह्याची खात्री आहे, ज्याअर्थी पंचप्राण आहेत त्याअर्थी त्यांचा boss असणारा महाप्राण असणारच.
तो ज्याक्षणी आज्ञा करतो त्याक्षणी पंचप्राण देह सोडतो. बाकी कुठला देव असो वा नसो हा हनुमंत माझ्या देहात आहेच. माझ्या शरीरामध्ये चण्डिकाकुलाचा एक जबरदस्त प्रतिनिधी कायम वास्तव्य करून आहे. म्हणून मला चण्डिकाकुलाशी संपर्क साधण्यासाठी कुठल्याही एजन्ट, बुवाची गरज नाही. मी मनुष्य आहे आणि मी जिवंत आहे हे एवढेच दोन पुरावे पुरेसे आहेत तुम्हाला खात्रीसाठी की तुमच्यात हनुमंत आहे.
तुलसीदासजी म्हणतात -
और देवता चित्त न धरई । हनुमत सेइ सर्ब सुख करई॥
एक हनुमंत धरून ठेवला तरी अख्खं चण्डिकाकुल तुमच्याशी बांधलं जातं म्हणून कधीच स्वत:ला दयनीय, फालतू, दुर्देवी समजू नका, चण्डिकाकुलाला मानत असाल तर. जे चण्डिकाकुलाला मानत नाहीत त्यांच्या देहातही हनुमंत असतो पण तो अजागृत अवस्थेत असतो. हनुमंत जागृत झाल्यावर समुद्र ओलांडतो आपल्या जीवनात, मनात किती राक्षस रहात असतात. आपल्याला लंका cross करावी लागत नाही. हनुमंत आपल्याकडे येतो. मनुष्याच्या मनात हनुमंत शिरला की तो बिभीषणला भेटतो, त्याचं कल्याण करण्यासाठी, रामाची साक्ष पटवून देण्यासाठी श्रद्धावानांना भेटतो.
मग श्रद्धाहीनांना का भेटतो? रावणाला का भेटतो? त्याची लंका जाळण्यासाठी. श्रद्धावानांना भेटतो त्यांचं कल्याण करण्यासाठी आणि श्रद्धाहीनांना भेटतो त्यांची लंका जाळण्यासाठी. बिभीषण किती पुण्यवान आहे, पापी आहे हे रामाने किंवा हनुमंताने मोजलेले नाही. बिभीषण स्वत: कबूल करतो की मी राक्षस योनीतला आहे. रावणाला मारायला एकटा राम, हनुमंत ती जानकीच पुरेशी आहे बिभीषणाची गरज नाही. सीतेचे वर्णन दयनीय अवस्थेत केलं जातं. पण तिची ताकद लक्षात घ्या. ह्या त्रिकुटाचा plan काय आहे.
ती एकटी आहे पण रावण तिच्या केसालासुद्धा स्पर्श करू शकला नाही. तिला पळवून नेतानाही रावणाने फक्त वायूच्या भ्रमणात उचलून नेले पण तो तिला स्पर्श करु शकला नाही. हीने काय केले- बिभीषणाला फोडला, त्याच्या मेव्हणीला त्रिजटेला फोडली, हनुमंताला लंकेचा सगळा नकाशा सांगितला. जर ती हतबल, बिचारी असती तर ती हे सगळं करु शकली असती का? रावण राण्यांना घेऊन आला तरी ती सांगते राम सूर्य आहे आणि तू काजव्या सारखा आहेस. काय हिंमत आहे तिची. काजव्याचा प्रकाश ढुंगणाभोवती (अशी म्हण आहे) तुझी हीच लायकी आहे मेल्या, अशी जहाल निर्भत्सना जानकी रावणाची त्याच्या सर्व राण्यांसमोर करते.
हनुमंत जसा येतो श्रद्धावानाला भेटतो, श्रद्धाहीनांचा नाश करतो. श्रद्धावानाला मदत करण्यासाठी हे चण्डिकाकुल तयार आहे त्यासाठी परिश्रम करायला, दु:ख सोसायला, एकमेकांचा विरह सहन करायला ही परमात्मत्रयी तयार आहे.
कृष्ण जन्मापासून शेवटपर्यंत लढतच राहिला. कोणासाठी? आमच्यासाठी. बाबा जळक्या काड्यांचा संग्रह करतात. त्यांनी उकिरड्यावर बाग उगवली. जळलेल्या काड्या म्हणजे जिचा काहीही उपयोग नाही, तिची क्षमता, ताकद सगळी जळून गेलेली आहे. जिच्या उर्वरित जीवनाचा भाग मृतवत झालेला आहे. जी कानात घालून खाजवण्यासाठी देखील उपयोगी नाही अशा काड्यांचा बाबा संग्रह करत होते.
माझ जीवन फुकट गेलं आहे, फुकट चाललं आहे असं ज्यांना वाटतं, हा साई अशा लोकांचा संग्रह करतो. ज्यांना कोणी विचारत नाही, ज्यांची कोण दखल घेत नाही. अशांचा साई संग्रह करतो. म्हणून तो स्पष्टपणे वचन देतो -
मजसी शरण आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी॥
तुमची सगळी ताकद निघून गेलीय, तुम्ही काहीही करू शकणार नाही, तुम्ही निरुपयोगी झालात तरी हा साई तुमचा संग्रह करेल. हा साई उकिरड्यावर बाग फुलवतो. आम्ही आमच्या जीवनाचा उकिरडा केला असेल, उकिरडा म्हणजे अशी जागा जिथे डुक्कर-कुत्री फिरतात, कचरा करतात ती जागा. साई तुमच्या उकिरडा झालेल्या जीवनाची बाग फुलवेल.
तुम्ही एकदा "आओ साई" म्हणा. तो तुमच्या शिरधीत येईल. शिलधी म्हणजे मस्तकाचा मागचा भाग जिथे महाप्राण हनुमंत बसून तपश्चर्या करत असतो. भक्ताने एकदा का "आओ साई" म्हटलं, बाबा या माझ्या शिलधीत या, माझ्या जीवनात या, की बाबा आलेच तुमच्या जीवनात. फक्त एकदा "आओ साई" म्हणा. म्हाळसापती बाबांना ऒळखत होता का? नाही. त्याने फक्त "आओ साई" म्हटलं, तो साई आला आणि तेथेच राहिला. एकदा का "आओ साई" मनापासून, प्रेमाने म्हटलं की बाबा तुमच्या जीवनात येऊन बाग फुलवणारच आहेत, तुम्ही बाबांना ओळखत नसलात तरी.
तुम्ही तुमच्या जीवनाचा उकिरडा केला असेल तरी मी तुमच्या जीवनात बाग फुलवेन. माझ्या हातात एकदा का तुमची काडी आली (जळकी असली तरीही) तुमचं जीवन व्यर्थ होऊ शकत नाही.
बाबा कुठल्याही उकिरड्याच्या जागेला बाग बनवू शकतो. पण ह्या बागेसाठी त्याला कच्चाच घडा लागतो. पक्का घडा म्हणजे ज्ञानी चालत नाही. ह्या बागेसाठी बाबा दररोज नवीन दोन घडे वापरायचे. आज चूक झाली घडा फुटला उद्या नवीन. बाबा तुमच्यासाठी रोज नवीन घडा वापरायला तयार आहेत. दररोज नवीन दोन घडे वापरतील. तुम्ही कितीही बिनकामाचे असलात तरी "आओ साई" म्हटलं की बाबा तुमचा संग्रह करायला तयार आहेत.
तुम्ही जळून गेलेली काडी असाल, सत्यानाश झालेला असेल, जीवनाचा उकिरडा झालेला असेल तरीही सर्व बदलणारच. तो महाप्राण तुमच्या जीवनात आहे. हनुमंत चण्डिकाकुल हे असं आहे. तो महाप्राण आमच्या शरीरात आहे. फक्त आम्हाला ह्याचं अस्तित्व ओळखायला हवं. आज आपण ओळखलयं ते मानायला हवं, सगळ्या भीत्या टाकून द्या. मात्र त्यासाठी तुमचा हनुमंत रामाचा भक्त असायला हवा. तुम्ही त्याला रामाचा भक्त केला नसेल तर तो रामाला भेटण्याआधीचा हनुमंत असेल. म्हणून परमात्म्याची भक्ती करणं आवश्यक आहे.
जगायची गुरुकिल्ली म्हणजे महाकाली, आपली Bodyguard. हनुमंत आईची पूजा करताना म्हणतो तू प्राणसंरक्षक महाकाली आहेस,
प्राणसंरक्षक महाकाली
मनसंरक्षक महालक्ष्मी
प्रज्ञासंरक्षक महासरस्वती
ही महाकाली महाप्राणाच्या प्राणांचं रक्षण करणारी माता आहे. ह्या तिघींचं एकत्रित स्वरूप म्हणजेच आदिमाता. तिला अनसूया, गायत्री, महिषासुरमर्दिनी, वेदांप्रमाणे अदिती म्हणा ती एकच आहे. महाकाली जराही उग्र नाहीये, तिचं प्राणरक्षक स्वरूप डोळ्यासमोर आणून आपण गुरुमंत्र म्हणूया.
॥ हरि ॐ॥