॥ हरि ॐ॥
महाशिवरात्रीचा दिवस, हा नंदीपक्ष ह्यामधील शिवाची उपासना. भारतीयांचं अतिशय जवळचं नातं जोडलेल असतं शिवाशी, पार्वतीशी, त्यांच्या दोन बाळांशी, नंदीशी.
शिवरात्र, देवीच्या बाबतीतसुद्धा नवरात्री व शिवाच्या बाबतीत शिवरात्री. रात्रीच का? उपवास तर आपण सकाळी करतो.
रात्र आणि अंधार ह्याच्या मधला फरक ओळखायला शिका. रात्र म्हणजे अंधार नव्हे, आणि अंधार म्हणजे रात्र नव्हे. तुम्ही तुमच्या खोलीची खिडकी दारं बंद केली तर अंधार झाला, रात्र झाली का? रात्री दिवे लावलेत, सगळीकडे उजेड आहे पण म्हणून बाहेर रात्र नाही असं नाही होत.
रात्र व अंधार एकरूप नाहीयेत. रात्र झाल्यावर अंधाराची भीती वाटते हे दोघे एक नाहीत हे कळलं तर ५० टक्के भीती निघून जाते.
रात्रीला तीन भागात विभागले आहे - १) मोहरात्री २) कालरात्री ३) महाकालरात्री ही तीनही आदिमातेचीच नावं आहेत. ब्रह्मदेवाने मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये स्तोत्रात वर्णन केले आहे.
रात्र आणि देवीत्व ह्यांचा संबंध आहे. रात्री-अरात्री ह्याचा अत्रिशी संबंध आहे. रात्र म्हणजे शांती, थकलेल्या जीवाला मिळणारा आराम, जोमाने नवीन काम करण्यासाठी क्षणभर घेतलेला हॉल्ट, नवनिर्मितीची तयारी.
दिवसभर एखाद्याला जेवायला घातलं, पण रात्री झोपू दिलं नाही, तर काय परिस्थिती होईल? दोन-तीन दिवसांनी तो म्हणेल जेवायला नको पण झोपायला द्या. एवढी ह्या झोपेची, विश्रांतीची मनुष्याला गरज आहे. केवळ इंधन पुरवून चालत नाही. तुम्ही नुसतं इंधन पुरवलं आणि गाडी सतत चालूच ठेवली तर गाडी बिघडणार नाही का? रात्र म्हणजे नवनिर्मितीसाठी जुनी मरगळ काढावी लागते हे सगळं करावं लागतं ते म्हणजे रात्र.
शिवरात्र का? आपल्या शरीरात नऊ चक्र असतात. त्यातील सात जागृतावस्थेत असतात आणि दोन सुप्तावस्थेत असतात. हृदयाच्या जागी जे अनाहत चक्र असते त्याचा स्वामी परमशिव आहे. जोपर्यंत त्या परमशिवाचा डमरू वाजतोय तोपर्यंत मनुष्य जिवंत असतो. मनुष्याच्या देहाच्या हृदयातील लबडब आवाज म्हणजेच शिवाच्या डमरूचा ध्वनी.
डमरू झोप न घेता चालत असतो. हा परमशिव लबडब ह्या ध्वनीच्या वेळेस जागा आहे. डमरूच्या दोन स्पंदनामधला जो काळ आहे, जी जागा आहे ती जागा म्हणजे चिंतनशील, ध्यानस्थ शिव आहे. तो कोणाचं ध्यानं करतोय? ज्याच्या शरीरात ध्वनी वाजतोय त्याचं. ह्या जागेत तो निद्रिस्त, बेशुद्धावस्थेत नाहीये. तुम्ही जितक्यांदा परमेश्वराचं स्मरण करता, त्याचं गुणगाण करता त्यापेक्षा जास्त परमेश्वर तुमचं ध्यान करतो. म्हणून मी एवढं पठण केलं, एवढा जप केला हा अहंकार सोडा. तुम्ही त्याचं नाव घ्या अगर नका घेऊ, तो दर मिनिटाला ७२ वेळा तुमचं ध्यान करत असतो. तो प्रत्येकाच्या आत आहे, त्यामुळे त्याला तुमची प्रत्येक गोष्ट कळत असते. ह्याची भीती बाळगायची नाही. तो प्रेमाने ध्यान करतो, जसं एखादी आई आपल्या बाळाचं ध्यान करते तसं.
त्या रात्रीमध्ये तुमच्याकडून सगळी माहिती घेतो, ह्या क्षणाला हे घडलं, तर ह्याच्या पुढच्या क्षणाला काय घडेल, ह्याचं तो प्लानिंग करत असतो. तुमच्यासाठी शिवाची रात्र आहे तुमच्या भविष्याची योजना तो करतो म्हणून शिवरात्रीला शिवाची उपासना करायला हवी.
जो परमात्मा आपली ७२ वेळा आठवण ठेवतो, ७२ वेळा ध्यान करतो त्याचं वर्षातून एका महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यान करायला काय हरकत आहे? बेलाचं पान म्हणजे दोन हस्त आणि एक मस्तक वालुकेश्वराला वहायचं पण हे मी आधी सांगूनसुद्धा कोणी लक्षात घेत नाही. तुम्ही कोणाचे हात किंवा मस्तक अर्पण करू शकत नाही म्हणून कोणाकडूनही बेल घेऊन अर्पण करू नका. बेल नसतील तर देवाला दोन्ही हात आणि मस्तक तुझ्या चरणी अर्पण करतो म्हणून सांगा.
हस्त म्हणजे कर्मेन्द्रिय म्हणजे प्रत्येक कर्म आणि मस्तक म्हणजे ज्ञान माहीत असलेलं आणि नसलेलं मी तुझ्या चरणी वाहतो तुला जे द्यायचं ते दे असं सांगा. तो तुम्हाला त्यातून चांगलं तेच देणार म्हणून आपलं कर्म आणि आपलं ज्ञान म्हणजे अनुभव त्याच्या चरणी अर्पण करायचं.
हे बेलाचं पान म्हणजे माझं मस्तक आणि माझे दोन हात आहेत, म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव आणि कर्म मी तुझ्या चरणी वाहतो. त्यातून तू जे द्यायचं ते दे.
हे बेल वालुकेश्वराला वाहताना श्रीस्वतिक्षेम् संवाद होणारच आहे. तुम्ही जेव्हा लिंगाभोवती बेल वाहणार आहात तेव्हा आपोआप सर्व होणारच आहे.
॥ हरि ॐ॥