॥ हरि ॐ॥
११ कोटी ही ‘ॐ हरिमर्कटाय स्वाहा।’ ह्या जपाची संख्या म्हणजे ह्या बँकेवर ज्याचा खरा विश्वास आहे, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शत्रूपासून संरक्षण होईल. अंजनामाता वहीची रचनाच अशी आहे. कुठल्याही प्रकारच्या शत्रुपासून संरक्षण करवून घ्यायची शक्ती हनुमन्तामध्ये आहे.
‘ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:।’ त्यानंतर कोणतं पद येतं? ‘ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’ आपण रामरसायनमध्ये आणि मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये ही कथा बघितली आहे की रामाला तिने कसा वर दिला, तिचा goal काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे.
‘ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:।’ दत्तात्रेय म्हणजे मूळ शुभ्र प्रकाश. परमात्मा म्हणजे ॐकार ह्याचा प्राण म्हणजे महाप्राण आणि रामाला वर देणारी एकमेव महिषासुरमर्दिनी. अंजनामाता म्हणजेच महाकुंडलिनी. आदिमातेचे सगळे अंश एकत्र येऊन बनलेलं स्वरूप अशी अंजनामाता सगळ्यांच्या शरीरात महाकुंडलिनी स्वरूपात असते. हा महाप्राण मज्जारज्जूमधून सगळ्या शरीरात फिरत असतो. ही अंजनामाता रामवरदायिनी बनते. हिने रामाला वर दिलेला आहे, ती रामाला मार्गदर्शन करते. ती अंजनामाता म्हणून आलेली असताना तिला रामाला वर देण्यासाठी वेगळा अवतार घेण्याची आवश्यकता का आहे? हे आपल्या आता पहायचं आहे. ही अंजनामाता हनुमन्ताला वाढवते, त्याला रामाचं कार्य समजावून सांगते, रामाची भेट कशी घडणार ते सांगते म्हणजेच राम-रावण युद्धाच्या वेळेस ही पृथ्वीतलावर वावरते आहे. राम उपासना करतो मग ती हा अवतार घेऊन प्रकटते असं का? हे आपल्याला ह्या मंत्रातून जाणून घ्यायचं आहे. ह्या मंत्रातील सर्वसामर्थ्य कसं पसरत चाललंय हे बघणं सौंदर्य आहे. तिची लीला बघणं आणि आनंद करणं ह्यात सौंदर्य आहे.
हा महाप्राण हनुमंत रामाचा दास म्हणून आला तो दासभूमिकेत आला व राहिला. तो रामाचं संरक्षण करतो, सीतेचं संरक्षण करतो, लक्ष्मणाचं संरक्षण करतो आणि हे सगळं करूनही तो त्याच्या दास या भूमिकेत स्थिर राहतो. ही अंजनामाताही तिच्या भूमिकेत स्थिर राहते. तिने तिचं महाकुंडलिनी हे स्वरूप स्थिर ठेवलंय. प्रत्येक देहातल्या महाप्राणाला सामर्थ्य देणं हेच तिचं काम असतं. म्हणून कोणी सांगितलं की महाकुंडलिनी जागृत करून देतो तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, कारण कुंडलिनी जागृत झाली तर त्याची स्पंदनं, त्यामुळे होणारे शरीरातले changes ब्रह्मर्षींनाही पेलवत नाहीत. ब्रह्मर्षी होणं सोप्प आहे, पण कुंडलिनी जागृत करणं कठीण आहे. ही महाकुंडलिनी सदैव मनुष्याच्या मूलाधार चक्राच्या खाली सुप्तावस्थेत वेटोळे घातलेल्या नागिणीप्रमाणे असते. फक्त तिच्या झोपलेल्या (निष्क्रिय) अवस्थेच्या अस्तित्वामुळेसुद्धा महाप्राण जागृत राहतो आणि त्याचे कार्य सुरू राहते. ती सुप्तावस्थेत असते म्हणजे ती त्यावेळी inactive असते. झोपण्याच्या वेळी सगळी ज्ञानेंद्रिय अंतर्मुख होतात. ती बाह्य गोष्टींपासून प्रेरित होत नाहीत, बाह्य गोष्टींना response देत नाहीत. महाकुंडलिनी ह्या अवस्थेत फक्त महाप्राणाशी संबंधित असते बाकी गोष्टींसाठी ती inactive असते. तिचं कार्य हे महाप्राणाशी संबंधित असतं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याच्या कार्यासाठी लागणारी प्रत्येक अवस्था निर्माण करणं हेच तिचं कार्य असतं.
रामाला उपासनेची गरज आहे हे ती जाणते पण अंजनामाता स्वरूपात रामाला मदत करत नाही, त्याच्यासाठी ती दुसरा अवतार घेते. चण्डिकाकुलाचा प्रत्येक सदस्य जे रूप घेतात त्याच्या मर्यादा ते पाळतात. रूप आले की मर्यादा आली. पृथ्वी, जल, अग्नि ह्यांना रूप आहे हे कुठेतरी सुरू होतात आणि कुठे तरी संपतात. पण ह्यांच्या आधी असणारे वायू आणि आकाश ह्यांना रूप नाही त्यामुळे त्यांना मर्यादा नाही. रुपाच्या आधी मर्यादा नसतात. ह्या जगातील प्रत्येक गोष्ट ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे.
चण्डिकाकुलातील विशिष्ट व्यक्ती जे रूप घेऊन अवतरते त्यानुसार त्याचे गुणधर्म असतात. पण तरीही त्यांचे मूळ गुणधर्म त्यांच्या मूळ रूपाशी तुटलेले नसतात. त्यांचं मूळ रूप त्यांच्या मूळ गुणांशी बांधलेलं असतं. जेव्हा राम, कृष्ण, साई येतो तेव्हा त्यांचे तिथले connection तुटलेले नसते. मग हे ओळखायचे कसे?
घरातील स्त्री स्वयंपाक घरात जेवण बनवत असते. तिला भूक लागत नाही पण बाहेर बसणार्या व्यक्तीची भूक त्या जेवणाच्या वासाने प्रदिप्त होते. त्या वासाने इतरांच्या भूका खवळतात पण त्या स्त्रीला भूक लागत नाही. कारण स्वयंपाक घरात ती स्त्री ‘हे जेवण मी माझ्या प्रिय व्यक्तींसाठी बनवते आहे, माझ्या मुलांसाठी माझ्या पतीसाठी हे जेवण बनवतेय’ ह्या भावनेने जेवण बनवत असते. त्यामुळे तिचा जीव त्या जेवणात अडकत नाही. तिचा आनंद ते जेवणार्या तिच्या माणसांच्या आनंदामध्ये असतो. तिच्या ह्या प्रेमामुळे जेवणाला चव येते. हे मूठभर प्रेम महत्वाचं. हे मूठभर प्रेम टाकायचा प्रकार मोठा असतो. बाकीच्यांनी खाल्लं की ती तृप्त होते. इतरांना वाढण्यातला आनंदाने तिला भूक उरत नाही. संपलं तर संपू देत, संपेपर्यंत ती वाढत रहाते. तिने जे जेवण करायचं कार्य select केलंय ते स्वत: आपल्या माणसांना जेवण बनवून वाढण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी असतं. त्याक्षणी ती केवळ माता, पत्नी आहे, ती स्वत: भोक्ता या भुमिकेत अजिबात येत नाही. हे सगळ आपोआप घडतं.
एकच पुरुष त्याच्या आईला मिठी मारताना, बायकोला आलिंगन देताना, आणि मुलीला मिठी मारताना क्रिया एकच असली तरी त्याच्या भावना वेगवेगळ्या असतात. त्याची भूमिका आपोआप बदलली जाते हे सगळं आपोआप घडतं. ते आणावं लागत नाही. हे प्रेमाचं रूप. त्यामुळे हनुमन्त आहे तिथे अंजनामाता आहेच.
हे जे मानवासाठी आपोआप घडतं मग त्या आदिमातेसाठी का नाही घडणार. जी भूमिका ज्या वेळेस करायची असते तेव्हा त्या रूपाचे गुण आपोआप त्यात येतात. त्या आपलेपणाच्या, प्रेमाच्या रूपाने सगळं घडत असतं. हनुमन्ताला जन्म देण्यासाठी ती अंजनामाता म्हणून येते. जिथे हनुमन्त आहे तिथे अंजनामाता आहेच, हनुमन्त कधीही आईशिवाय राहत नाही. राम रणांगणावर ती आदिमाता महिषासुरमर्दिनी स्वरूपात प्रकटते. ती आणि अंजनामाता एकच आहेत. त्या एकच असून त्या दोन्हीकडे कार्य करतात. हीच तिची लीला.
समजा घरामध्ये गणपती आहे, त्याचवेळी मुलांची परीक्षा आहे, महत्त्वाचा interview आहे, नोकरीत overtime करावा लागतोय अशावेळी संपूर्ण घर गांगरून जाते. मग priority कशाला द्यायची? महत्त्वाचे काय ते ठरवले जाते. प्रश्न निर्माण झाले की priority ठरवली जाते आणि त्यानंतर सगळ्या गोष्टींची रचना केली जाते, घटनांची मांडणी केली जाते. महत्वाचं काय ते पहायचं, आवडतं काय ते पहायचं, प्राधान्य कशाला द्यायचं हे प्राधान्य क्रम ठरवतो. हे जे प्राधान्य ठरवलं जातं तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात.
आदिमाता प्राधान्य ठरवण्याची तिची खुबी एकच आहे. तिने ज्या कार्यासाठी तिच्या पुत्रांना पाठवलेलं असतं ते कार्य अधिकाअधिक कसं चांगल होईल हे बघणं. हनुमन्त दास म्हणून आला तिच्या आज्ञेमुळे, राम राजा म्हणून आला आणि वनवासाला गेला तिच्या आज्ञेमुळे. हनुमन्तासाठी माता म्हणून आलेली अंजनामाता रामासाठी वेगळ्या रूपात प्रकटते. तिचं कार्य ती तिच्या रूपातच मर्यादित ठेवते. राम-परशुराम, कृष्ण-परशुराम, साई-परशुराम एकाच वेळेस होते. एकाच वेळी हिचे दोन अवतार ती घेते. आदिमाता आपल्या प्रत्येक पुत्रासाठी तिचे वेगवेगळे रूप धारण करते. हनुमन्तासाठी अंजनामाता असणारी तीच रामासाठी रामवरदायिनी बनून येते. हनुमन्त जो पुत्र आहे, त्याची माता म्हणून ती योगिनीस्वरूप आहे. राम राजा म्हणून आला त्यासाठी आदिमाता त्याच वेळेस वेगळं रूप घेते. त्याच वेळेस तपश्चर्येला बसणार्या परशुरामाजवळही ती असतेच. पुत्र म्हणजे अपत्य. ती तिच्या पुत्रासाठी वेगळं वेगळं रूप धारण करते. ह्याचं सुंदर उदाहरण म्हणजे रक्तदन्तिका अवतार.
आई जेव्हा बाळंत होते, तिचे मूल जेव्हा उदरातून बाहेर येते तेव्हा प्रचंड वेदना (आनंद निर्माण करणारी) असतात. एकाचवेळी अतिशय strong force व त्याचवेळी नाजूकपणा. बाळाला अत्यंत नाजूकपणे अख्खंच्या अख्खं बाहेर पडायचंय. हा रक्तदन्तिकेचा ह्या विश्वामधला एक सुंदर आविष्कार आहे. हे मूळ वात्सल्य आहे. प्रत्येक बाळ जन्माला येताना असणारी मातेची अवस्था, बाळ जन्माला येते ती process म्हणजेच रक्तदन्तिका. आपल्या प्रत्येकाच्या जन्माबरोबर रक्तदन्तिकेने एक एक अवतार घेतलेला असतो. म्हणून तिचं मंदिर कुठेही बांधत नाहीत. प्रत्येकाचा देह हे त्या रक्तदन्तिकेचे मंदिर आहे. तुमचा संपूर्ण देह हा त्या आदिमातेचं मंदिर आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे, पंथाचे असलात तरी तुमच्या प्रत्येकाच्या जन्माबरोबर ती रक्तदन्तिका जन्म घेतेच. म्हणून मी कोणी फालतू मनुष्य नाही. मी कितीही पापी असलो, कसाही असलो तरी माझ्या शरीरात रक्तदन्तिकेचं मंदिर आहे. म्हणून घाबरायचं कारण नाही, रक्तदन्तिकेचं मंदिर माझ्या शरीरात आहे तर मी हे केलं नाही पाहिजे, ते केलं नाही पाहिजे असं काही करायची आवश्यकता नाही. आपल्या सगळ्यांच्या अंगात रक्त खेळतच असतं. रक्तदन्तिका श्वासाने दानवांना खेचून आणते आणि कराल दाढांनी चावून चावून खाते. आपण श्वास घेताना ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर फेकतो रक्त शुद्ध करण्यासाठी. तुम्ही कितीही नाकारलं तरी प्रत्येकाच्या शरीरात रक्तदन्तिकेचं मंदिर असतंच. कोणीही असं म्हणू शकत नाही की मी देवाला पाहिलं नाही, कारण तुमच्या जन्माच्या वेळेस आदिमातेने अवतार घेतला होता आणि तुमच्या देहाचं तिने मंदिर केलयं. तुम्हाला कळतं की नाही कळत ह्याला महत्त्व नाहीये. परिणाम काय होतात ह्याला महत्त्व आहे. त्सुनामी आली कोणाला काय कळलं, सगळं वाहून गेलं पण दुसर्या मजल्यावरती मुलगी होती ती वाचलीच नं.
माझं जीवन हे निराधार कधीच नाही. माझा देह कसाही असो हे माझ्या आदिमातेचं मंदिर आहे, मातृत्वाचे मंदिर तर माझं जीवन हे आदिमातेचं मंदिर व्हायला हवं ह्या चण्डिकाकुलाचं गुरुक्षेत्रम् व्हायला हवं,म्हणजेच सद्गुरुचं क्षेत्र म्हणजे शेत व्हायला हवं.
आज आपण श्रीस्वस्तिक्षेम संवाद करताना प्रत्येकाने आपल्या नाभीवर उजवा हात ठेवायचा, हात उलटा ठेवा, सुलटा ठेवा, बोट ठेवा कसंही ठेवा. मंत्र म्हणताना रक्तदन्तिकेचं स्वरुप आठवायचं. रक्तदन्तिका पाहली नसेल कोणी तर देवीचं कुठलंही रूप आठवा जे रक्तवर्णाचं आहे. तुम्ही काहीही बोला, बोलू नका पण ते रूप एकदा तरी आठवा. जे इथे उपस्थित नाही आहेत, किंवा तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना पण सांगा. पण ते घरी श्रीस्वस्तिक्षेम संवाद करू शकणार नाहीत. त्याऐवजी गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणायचा. आजपासून सात दिवस म्हणजे पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्ही तुमच्या नाभीवर उजवा हात ठेवून गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणा आणि मंत्र म्हणताना, त्या आदिमातेचं रक्तदन्तिकेचं स्वरूप आठवा, अतिशय उग्र आणि अतिशय प्रेमळ स्वरूप. ते पाहिलं नसेल तर आदिमातेचं कुठलही रूप आठवा. हे तुम्ही एकदा केलं तरी चालेल, परत परत केलं तरीही चालेल. रक्तदन्तिकेचा आपल्या नाभीशी संबंध असतो. नाभीजवळ असणारं मणिपूरचक्र हे आदिमातेचं प्रभाव केन्द्र आहे. म्हणून तिला मणिपूरनिवासिनी म्हणतात. तुमच्या subconcious mind मध्ये अंतर्मनात त्या आदिमातेची जाणीव जागृत होईल व तुमच्या सातही चक्रांना कमीत कमी ५०% चालना मिळेल.
॥ हरि ॐ॥