॥ हरि ॐ ॥
२००९ पासून आपण माघी गणपतीचा उत्सव करतोय. ह्याचं महत्त्व बघितलंय. ब्रह्मणस्पती कोण ते बघितलय. ब्रह्मणस्पती हा किरातरुद्र आणि शिवगंगागौरीचा पुत्र आहे, तर गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र आहे. दोन स्तरावर वेगवेगळे असले तरी दोन्ही एकच आहेत.
आपल्याला माहीत आहे की, कुठल्याही मंगलकार्याची सुरुवात गणपतीच्या स्तवनाने होते. आपल्या शरीरात एकूण नऊ चक्र असतात. त्यातील दोन सुप्त आणि सात जागृत चक्रं असतात. त्या चक्रातील सुरुवातीच्या चक्राला आरंभ चक्र म्हणतात जे मूळ चक्र आहे त्यालाच आपण मूलाधार चक्र म्हणतो. आपल्या प्रत्येक कार्याची सुरूवात या चक्राच्या अधिष्ठानामुळे होते त्या मूलाधार चक्राचा स्वामी गणपती आहे म्हणून प्रत्येक पूजेच्या आरंभी तो असलाच पाहिजे.
डाव्या सोंडेचा गणपती सौम्य असतो, उजव्या सोंडेचा गणपती नवसाला लगेच पावतो पण कडक असतो. ह्यासाठी आम्हाला घाबरायचं कारण काय? हे आमच्या मनात वर्षानुवर्षे फिक्स केलंय, कायम कोरलेलं नाकारण्याची आम्हाला भीती वाटत असते. आमच्या मनातल्या भीत्या आम्हाला काढून टाकायच्या आहेत.
घाबरायचं काहीच कारण नाही. तुमच्या वयाच्या २५ व्या वर्षी तुमचं लग्न झालं, नंतर २७-२८ व्या वर्षी बाळ झालं, वयाच्या ५० व्या वर्षी तुम्ही आजी-आजोबा झालात, तुमची मुलं आई-बाबा झाली, तुम्ही आजी-आजोबा झालात हे मान्य करायला जड जातं का? ह्यात एक व्यक्ती कुमार/कुमारी - श्री/सौ - बाबा/आई - आजोबा/आई ह्या नात्यांतून, ह्या transformation मधून जाताना भीती वाटते का? नाही. आपण या transformation मधून सहज जातो.
मग उजव्या सोंडेचा गणपती (सव्य गणपती), डाव्या सोंडेचा गणपती अशी भीती बाळगायची आवश्यकता नाही. ही भीती तांत्रिक मार्गाने उपासना करणार्यांना वाटते, कारण तांत्रिक मार्गाने उपासना करताना प्रत्येक गोष्ट technically, नियमाप्रमाणे करणे आवश्यक असते, तिथे चूक करून चालत नाही.
आम्हाला भीती बाळगायची गरज नाही, कारण आम्ही तांत्रिक मार्गाने उपासना करत नाही. आम्ही तांत्रिक मार्गाने उपासना करीत नसलो तर technically गोष्टींची आवश्यकता नसते. शिस्त पाळा, काटेकोरपणा नको. भाव महत्त्वाचा. ‘भाव तोचि देव’ प्रत्येक गोष्ट भावाने, प्रेमाने करायची.
एकनाथ - एकच नाथ असेल तर मनुष्य अनाथ नसतो. अनेक नाथ असतील तर अनाथ. समजा एका वर्गात ५० मुलं आहेत, त्या प्रत्येक मुलाला शिकवायला ५० शिक्षक ठेवलेत. त्यांना कुठलाही subject कधीही शिकवण्याचं वेळेचं बंधन नाही, असं झालं तर काय होईल? ५० विद्यार्थ्यांना कोणी काहीच शिकवू शकणार नाही. एक नाथ असेल तर सगळ सोपं होतं, अनेक नाथ असतील तर आपल्यालाही कळणार नाही कोणाला हाक मारायची? ३३ कोटी देव आहेत, अशा वेळी हाक कोणाला मारायची? ओ कोण देणार?
इथे एक गोष्ट सांगतो, एका बोटीवर एक ख्रिश्चन, एक मुसलमान, आणि एक हिंदू असतो. बोट बुडायला लागल्यावर ख्रिश्चन येशूला हाक मारतो, येशू येतो आणि त्याला वाचवतो, मुसलमान अल्लाला हाक मारतो, अल्ला येतो आणि त्याला वाचवतो, हिंदूला कळत नाही कोणाला हाक मारायची, कुलदेवतेला मारू की गावदेवतेला, विष्णूला मारू की शिवाला मारू, गोंधळून जातो. बोट अगदी बुडणार तेव्हा तो गणपतीला हाक मारतो. गणपती प्रगटतो आणि त्याला बुडवतो, म्हणतो- तू दरवर्षी मला बुडवतोस, आता तू बूड. ह्यातला विनोदाचा भाग बाजूला राहू द्या. अनेक नाथ असल्यामुळे, आम्हाला कोणाला हाक मारायची हे कळत नाही. साईसच्चरितात सांगितलं आहे, ‘आपला बाप तो आपला बाप’. ती जी एक मोठी आई आहे तिचा एक पुत्र जो तुमचा बाप आहे. तो एकच माझा आहे हे नीट समजलं की हाक मारायचीसुद्धा आवश्यकता लागत नाही.
बर्याच वेळा संकट येतं, तेव्हा हाक मारण्यासाठीही वेळ मिळालेला नसतो. रात्री प्रवासाला गाडीतून जाताय, गाडीतल्या सगळ्या लोकांचा डोळा लागलाय, ड्रायव्हरचाही डोळा लागतो आणि गाडीचा अॅक्सिडेंट होतो, पण गाडीतली सगळी माणसं वाचतात कोणी हाक मारलेली असते त्यावेळी? रात्री झोपेत हृदयात टुक होतं, पण काहीही होत नाही तेव्हा हाक मारण्यासाठीही वेळ मिळालेला नसतो.
आपला देव कसा असला पाहिजे. जो आमच्यावर एवढं प्रेम करतो की त्याला हाक नाही मारली तरी देखील तो धावत येईलच म्हणून आम्हाला एकनाथच स्वीकारावा लागतो. तुम्ही हजारोंना माना पण आपला बाप तो आपला बाप.
अष्टविनायकाच्या अष्टठिकाणी जायला काहीच हरकत नाही. शनि-शिंगणापूरला जाणेही योग्यच आहे, मंदिरात जा, प्रसाद घरी आणा, पण त्या मूर्तीच्या पावित्र्याच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. अष्टविनायकाचं दर्शन दीड दिवसात आटपतात. एक गाडी करायची सगळी देवदर्शन आटपायची.
आपण रांगेला भक्तिगंगा म्हणतो. रांगेत उभे असताना पण आपलं लक्ष त्याच्याकडे असले पाहिजे. जाताना तो क्षणभर दिसला तरी खूप आहे, जो पर्यंत रांगेत उभं राहिल्यापासून ते दर्शन घेईपर्यंतचा वेळ त्याच्याशी एकरूप व्हायला हवं. पण आपण काय करतो एखादी मैत्रीण दिसली की घुसायचे. भक्तिगंगेत उभे राहताना लक्ष अनेक वेळा दुसरीकडे जाईल पण मध्येमध्ये तरी त्याची आठवण व्हायला हवी. आपली जेव्हा ७२ वेळा नाडीचे ठोके पडतात तेव्हा आपण १८ वेळा श्वास घेतो. म्हणजेच काय ७२ वेळा इतर विचार आले तरी १८ वेळा किमान त्याचं नाम मुखात येऊ देत, त्याचे विचार येऊ देत. म्हणजे २० टक्के देवाचं नाव येऊ देत. पण आपण तेवढा वेळ तरी देतो का? आपण १ टक्के सुद्धा देत नाही. मी पापी आहे. मी देवाचं काही करत नाही, अरे देवाचं करणारे तुम्ही कोण? तुम्ही देवाला उत्पन्न केलं की देवाने तुम्हाला उत्पन्न केलंय? त्या आदिमातेने जग उत्पन्न केलं, तेव्हा कोणी पुण्य, पूजन, केलं होतं? कोणी प्रार्थना केली होती? तिची इच्छा आणि तिच्या इच्छेप्रमाणे कार्य करणारा तिचा पुत्र ह्यांच्यामुळे आम्ही उत्पन्न झालोत. त्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहेच. मी कधी नाव घ्यायचं विसरलो तरी, त्याचं प्रेम कधी कमी होत नाही. एक सेकंदही त्याची आम्हाला आठवण झाली नाही तरी तो समोर आल्यावर त्याच्याकडे लक्ष जायला हवे.
तुम्ही बाकी काहीही म्हणा पण त्याचं माझ्यावर प्रेम नाही असं कधीही म्हणू नका. मी कसाही असेन, मी जसा आहे तसा त्याला आवडतोच. त्याने माझ्यासाठी जो प्लॅन केलाय, माझं जीवन सुरळीत होण्यासाठी, तो प्लॅन माझ्या जीवनात उतरावा म्हणून मला त्याचं नामस्मरण, गुणसंकीर्तन करायला हवं. त्याने माझ्यावर प्रेम करावं म्हणून आपल्याला काहीही करावं लागत नाही.
‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ कुंभार कुठल्या मातीला आकार देतो, ओल्या मातीला. जेव्हा तो मातीचा गोळा भिजलेला असेल तेव्हाच त्याला आकार देता येतो. तो आकार केव्हा देऊ शकेल, आपण ओले असू तेव्हाच. म्हणून सांगतो रुक्ष बनू नका. पाणी धरून ठेवायचं म्हणजे काय - तो माझ्यावर खूप-खूप प्रेम करतो. मी कसाही असेन तरी तो माझ्यावर प्रेम करतो. हे कधीही विसरू नका. हे मनात एकदा घट्ट धरून ठेवलं की तुमचं जीवन सुरळीत व्हावं म्हणून तुमच्यासाठी त्याने केलेला प्लॅन सुरळीतपणे तुमच्या जीवनात सुरू होतो.
त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आज स्वतिक्षेम संवाद करताना, एकच विश्वासाने सांगा की, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते कधीच कमी होणार नाही. लोकांच्या मतांवर अवलंबून राहू नका. फक्त त्याचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट असणारच आहे. बाकी सगळं बाजूला ठेवा. आजपासून हा विश्वास ठेवा. हा विश्वास ज्याने ठेवला त्याने मला शिव्या घातल्या, लाथ मारली तरी तो मला कधीच नावडता होणार नाही. माझं प्रॉमिस आहे.
॥ हरि ॐ॥