॥ हरि ॐ॥
ॐ मंत्राय नम: ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम: आपण बघितले. बघायचे झाले तर हे नाते बघायचे आहे. बघायचे झाले तर हे नाते विचित्र आहे. हनुमंत दास म्हणवून घेतो आणि सूक्ष्मस्तरावर परमात्म्याचा जेष्ठ बंधू आहे. त्याच्या संरक्षणासाठी तो दास्यत्व स्वीकारतो आणि तो रामाचा प्राणही आहे. हे समजून आम्हांला उपयोग काय? हा मंत्र आम्ही का म्हणायचा? अन्न खाण्याने भूक भागते, पाणी प्यायल्याने तहान भागते, विश्रांती घेतल्याने थकवा नाहीसा होतो, शाळेत अभ्यास केल्याने पास होतो, काय केल्याने काय मिळतं हे अनुभवाने माहीत झालेलं असतं. आतापर्यंत आपण ज्या माणसांना नावाने ओळखायचो त्यांची लिस्ट ७० व्या वर्षी केली, ९०व्या वर्षी केली तरी ती संपणार नाही, असं वाटणार की हा माणूस माहीत आहे पण ह्याचं नाव आज आठवत नाही. मला काय काय गोष्टी माहीत आहेत, ह्याची लिस्ट केली तरी ती वाढतच जाणार. पण जी गोष्ट ज्या क्षणाला आवश्यक आहे ती गोष्ट त्या क्षणाला जागृत होते. तहान लागल्यावर विचार करावा लागत नाही, पाणी प्यायचं हे माहीतच असतं. परीक्षेच्या वेळी रात्री डोळे बंद केल्यावर आठवतं की हे वाचायचं आहे, हे वाचायचं बाकी आहे.
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत ज्या क्षणाला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आठवतंच, १०० पैकी पाच तरी आठवतातच. ह्याला श्रद्धावानांसाठी अपवाद नाही. हे आयत्यावेळी आठवणं काय आहे?
माहेरी वीस वर्षे राहिलेली आणि सासरी ४० वर्षे राहिलेली मुलगी काही लागलं तरी तोंडाने "आई गं" च निघतं, सासूचं नाव तोंडावर येत नाही. दहा लोकं आहेत त्यातील तीन जणं चांगलं चित्र काढतात, तीन जणं थोडं कमी मार्कांचं चित्र काढतात, तीन जणं फेल झालेत आणि एकाला चित्र काढताच येत नाही.
ह्या सगळ्या गोष्टींमागे वेगळी शक्ती, चैतन्य असतं - हीच प्रतिभा. हिच्यामुळेच योग्य वेळी योग्य ती गोष्ट आठवते. ही आदिमातेची देणगी आहे. ती तिच्या नियमाप्रमाणे विश्व बनवते. एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीसारखी असता कामा नये हा तिचा सगळ्यात मोठा नियम आहे सृष्टी बनवतानाचा. अगदी जुळ्या भावंडांमध्येही काहीही सारखं नसतं. हे सगळं त्या प्रतिभेमुळे घडतं. मानवाची निर्मिती झाल्यावर आदिमाता त्याच्यात प्रतिभा भरते. ते काम तिचे पुत्रही करत नाहीत. आम्हाला बनवलंय परमात्म्याने पण प्रतिभाशक्ती आदिमाता देते. आदिमाता कमीत कमी एक लौकिक व एक दिव्य प्रतिभा देतेच. लौकिक प्रतिमा म्हणजे सायन्स, कला आणि दिव्य प्रतिभा म्हणजे श्रद्धावान बनायची प्रतिभा.
हे नातं समजून घेतल्याशिवाय जीवनाची प्रगती होऊ शकणार नाही. मी देवाचं नाव घेते, मी गणपती बसवला, मी गुरु केला - गुरु करायला त्याचं गुरुत्व काय तुम्ही निर्माण केलंय का? मी देवाला मानतो - सूर्याला मानणं आणि न मानणं ह्यावर सूर्याचं सूर्यत्व अवलंबून नाहीए. हा तुमचा दोष नाहिए, हा बेसिक understanding चा राडा आहे. मी काहीच करीत नाही. माझ्या सारख्या यत्किंचित माणसासाठी देवाने माझ्यावर एवढं लक्ष केंद्रित का करावं?
असाच प्रश्न एकदा भक्त समुदायात फिरणार्या नारदाला पडला. हा महाविष्णू प्रत्येक माणसाच्या बारीक-सारीक गोष्टींमध्ये लक्ष पुरवतो, अगदी क्षुद्र माणसाच्या चिंतेतदेखील महाविष्णू का असतो? नारद महाविष्णूला विचारतो, "तू हे का करतोस?" महाविष्णू त्याला सांगतो, "नारदा हे मी तुला नंतर सांगीन. आधी माझा एक भक्त आहे राजा उदयवर्मा लढाईला जात आहे, त्याचा सगळा वृत्तांत तू मला दे." नारद म्हणतो, "मी का म्हणून जाऊ?" महाविष्णू सांगतो, "तो नेहमी नारायण हा जप करत असतो." नारद खूश होतो आणि सूक्ष्मरूपात जाऊन तिथे पोहचतो.
राजा उदयवर्मा लढाईसाठी निघत होता, त्याच्या राण्या त्याला ओवाळतात. राजा लढाईसाठी निघताना, एक दासी औक्षणाचं तबक घेऊन जात असते, ती अडखळून पडते आणि तबकात असणारे सगळे रंग राजाच्या वस्त्रावर पडतात. राजा चिडतो, दासीच्या अंगावर ओरडून, तिला तशीच विव्हळत टाकून राजा लढाईसाठी निघून जातो. नारदाला हे आवडत नाही.
राजा लढाईला जातो, पण राजाचा आयुधाने भरलेला खास रथ वेळेवर न पोहचल्याने राजा लढाई हरतो आणि राजाला बंदी बनविले जाते. नारद जाऊन महाविष्णूला विचारतो, "हे असे का घडले?" महाविष्णू सांगतो, "नारदा तूच शोधून काढ." नारद म्हणतो, "ज्याअर्थी तू मला शोधायला सांगत आहेस, त्याअर्थी ह्या गोष्टीमध्ये काही गोम आहे."
नारद गुप्त वेषात फिरतो. तो राजाचा जो रथ निघणार होता तिथे जातो, तेव्हा त्याला कळते की जो रथ शस्त्र घेऊन निघाला होता त्याची धावपट्टी आयत्यावेळी नीट बसत नव्हती, त्यामुळे रथ वेळेवर पोहोचू शकला नाही. मग तो राजाच्या रथाची धावपट्टी बसवणार्या लोहाराकडे येतो. तेव्हा त्याला कळते की, लोहाराकडे धावपट्टी ठोकण्यासाठी जी हातोडी लागते ती त्याच्याजवळ नव्हती, ती हातोडी तो घरी विसरला होता, ती हातोडी आणण्यासाठी त्याने एका माणसाला पाठविले होते. नारदाच्या लोहाराच्या घरी जातो तेव्हा त्याला कळते की, लोहाराच्या बायकोने ती हातोडी आपल्या शेजारच्या एका माणसाला दिली होती. म्हणून नारद शेजारच्या माणसाकडे जातो. तिथे त्याला कळते की, त्या माणसाला ग्रामवैद्याकडे जाण्यासाठी घाई होती, म्हणून त्याच्या बैलगाडीची धावपट्टी नीट करण्यासाठी त्याने हातोडी घेतली होती, त्या माणसाला ग्रामवैद्याकडे कामासाठी जाण्याची इमर्जन्सी होती. तो वेळेत पोहचला नाही तर, त्याचे काम ग्रामवैद्याने कोणाला तरी दुसर्याला दिले असते. ग्रामवैद्याकडे तातडीचे काम असेल तरच तो असा निरोप पाठवतो. नारद ग्रामवैद्याकडे जातो, तिथे त्याला कळते की ग्रामवैद्याकडे वर्षानुवर्षे काम करणारी स्त्री त्याला आईसारखी असते, तिची मुलगी पडली होती तिला जर वेळेवर औषध उपचार केले गेले नसते तर तिचे प्राण जाण्याची शक्यता होती. ही मुलगी म्हणजेच ती सकाळची दासी होती.
आता महाविष्णू नारदाला विचारले, "तुला ह्यातून काय कळले ते सांग." नारद म्हणाला, " प्रत्येक घटना दुसर्या घटनेशी जोडलेलीच असते." महाविष्णू नारदाला विचारतो, "त्याआधीचे काही कळले का?" नारद म्हणतो, "नाही". मग महाविष्णू व नारद राजाच्या शस्त्रशाळेत येतात. तिथे येऊन बघतात तर, सगळे काम ठप्प झालेले असते. कारण शस्त्रांसाठी लागणारे खिळे ज्या भट्टीमध्ये तयार केले जात होते ती भट्टी रात्रभर चालू राहिल्यामुळे सगळे लोखंड वितळले होते, त्यामुळे पुढचे कामही ठप्प झाले होते. महाविष्णू नारदाला सांगतो, "खिळ्यासारखी लहानशी गोष्टसुद्धा उपलब्ध झाली नाही तरी सगळ्यांचे काम अडू शकते. एक दासी तिच्याकडे योग्य वेळी लक्ष दिलं असतं, राजवैद्याला बोलावून तिच्यावर उपचार केले असते तर रथ वेळेवर पोहचला असता आणि राजा लढाई हरला नसता. म्हणून लक्षात ठेव मानवासाठीसुद्धा कोणीही कधी कमी नसतं. जेवढं महत्त्व माप धरून तलवार तयार करणार्याला, तेवढचं धार काढणार्याला, जेवढं expert ला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व खिळे बनविणार्याला आहे. म्हणून मला माहीत आहे माझ्यासाठी प्रत्येक मनुष्य महत्त्वाचा आहे. म्हणून माझ्या कार्यात प्रत्येक मनुष्याला महत्त्व आहे."
तुम्हाला ह्यातून काय कळलं? ह्याचा अर्थ लक्षात ठेवायचा. जर तुम्ही परमेश्वराच्या शस्त्रागारात असाल, तर तुम्ही कधीही कमी महत्त्वाचे असू शकत नाही. त्याला तुम्हाला सैतानापासून वाचवायचं असतं तेव्हा तुम्हालाच तो शस्त्र बनवतो. त्याचे शस्त्र ही तुम्हीच आहात आणि त्यासाठी लागणारे खिळेही तुम्हीच आहात. तुम्हाला १०० टक्के मार्क्स देण्यासाठी तो प्रयास करत असतो, तो कमीत कमी तुम्हाला passing मार्क्स देतोच. आम्हाला जी भीती वाटते ती खोटी चुकीची असते, कारण आमच्या मनात चुकीचं समीकरण असतं. आम्हाला वाटतं, आम्ही कमी आहोत. देवाने तुम्हाला निवडलंय. माझ्या सद्गुरुने मला निवडलंय, माझ्या आदिमातेने मला निवडलंय हा ठाम विश्वास हवा. साईसच्चरितात बाबा सांगतात की, "माझी इच्छा नसली तर शिरडीला येण्यासाठी कोणीही दाराचा उंबरठा ओलांडू शकणार नाही."
आम्ही नंबर लावत जातो - बापूने ह्याच्याकडे बघितलं, हा volunteer आहे, मी नाही आहे, हा रेड बॅचवाला आहे, हा ब्ल्यू बॅचवाला आहे, हा चौकोनी बॅचवाला आहे, आमच्याकडे बापू का लक्ष देतील? आम्ही काय केलं नाही. कोणीच काहीच करत नाही. मी लग्न केलं, मला मुलं झालीत - मूल होण्यासाठी जी शक्ती लागते तो एकच पुरवतो, त्याची इच्छा असेल तर तुम्हाला मूल होणार हे लक्षात ठेवा. आम्ही करतो हा भाव टाकून द्या. मी घास गिळतो - गिळण्याची ताकद तो देतो. एवढा आपला विश्वास असायलाच पाहिजे, की मग self confidence, positive thinking आपोआप येणार.
त्याने त्याला select केलं, मला केलं नाही ही तुमच्यामधली भांडणं आहेत, त्यात देवाला आणू नका. माझ्या कुठल्या quality मध्ये मी देवाला आवडतो ह्याचा विचार करू नका. त्याचं तुमच्यावरचं प्रेम unconditional आहे. अकारण आहे. ते स्विकारयचं की नाही हे तुमच्या हातात आहे. मी त्याला निवडलेलं नाही, त्याने मला निवडलं आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. हे सत्य जोपर्यंत आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनात येणारी दु:खं आम्ही घालवून लावू शकणार नाही, कारण त्याची कृपा आम्हाला स्वीकारता येत नाही. आम्ही जे करतोय ते सगळं तोच करवून घेतोय हे लक्षांत ठेवा.
साईसच्चरितातील पुंडलीक रावांची नारळाची गोष्ट आपण बघतो. साईनाथ म्हणतात, "पुण्यास काय फक्त अभिमान, पापाचाही अभिमान धरू नकोस. हा माझा सद्गुरु आहे एवढंच accept कर. मग मी हे चांगलं केलं, हे पाप केलं हा अहंकार आपोआप जाईल."
मी माझ्या कामापुरतंच परमेश्वराला स्वीकारलं असेन, तर तो तुमच्या पापाची जबाबदारी स्वीकारत नाही. भगवंताने मला निवडलेलं आहे, तो परमात्मा, ती आदिमाता माझ्यावर खूप प्रेम करते. ते प्रेम मला स्वीकारायचं आहे. आणि त्यासाठी पूजन, अर्चन, स्तवन करणं हे विविध मार्ग आहेत त्याचं प्रेम स्वीकारण्याचे. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तो करतो.
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा - ह्याच विश्वासाने जगा.
चांगलं काम करताना चूक केली तरी तो संभाळतो. त्याला तुमच्या चुका, पापं माहीत असतात definately. तुम्ही जेवढ्या प्रमाणात त्याचं प्रेम स्विकारता, तेवढ्या प्रमाणात तो पापं नष्ट करतो. जर तो सर्व काही करू शकतो, तर मग हे का करू शकत नाही का? आदिमाता विश्व उत्पन्न करते, नष्ट करते. मग ती आमची पापं नष्ट करू शकत नाही का? हे कसे काय होऊ शकते? तो सर्व कर्तृत्ववान आहे हे लक्षात ठेवा. त्या आदिमातेसाठी पाप नष्ट करणं ही छोटीशी गोष्ट आहे. आदिमातेने, त्या परमात्म्याने मला निवडलंय आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे हा विश्वास ठामपणे विकास पावत नाही तोपर्यंत तुमच्याकडे सैतानाच्या राज्याचे लायन्सस असते. हा परमेश्वर जो आहे, हा माझ्यावर रागावलेला आहे, ह्याला मी आवडत नाही अशा negative भावना जोपर्यंत तुमच्या मनात आहेत, तोपर्यंत तुम्ही वृत्रासुराच्या प्रभावाला बळी पडता. चांगली माणसं असूनसुद्धा तुम्ही सैतानाच्या राज्यात जाता.
माझ्या हातून काहीही घडलं तरी ह्याचं माझ्यावर प्रेम आहेच तर तुम्ही कितीही महापापं केली तरी तुम्हाला वृत्रासूर खेचू शकत नाही. जे चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणतात ते वृत्रासुराच्या राज्यातले नागरिक असतात. तुम्ही चांगल्याला मनातल्या मनात जरी चांगलं म्हणालात तर तुम्ही वृत्रासुराच्या नाही, तर देवाच्या राज्यात राहता.
ह्या सद्गुरुचे, ह्या आदिमातेचे, ह्या चण्डिकाकुलाचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. हा विश्वास म्हणजे चण्डिकापुत्र परमात्मा आणि चण्डिका ह्यांच्यामधलं नातं म्हणजेच महाप्राण, हनुमंत. म्हणून हा महाप्राण दिव्य प्रकाश पण आहे आणि अग्नि पण आहे. हाच रामप्राणही आहे.
आमच्या जीवनात राम येतो म्हणजे आनंद येतो, हनुमंत येतो तिथे राम येतोच, हनुमंत नसेल तिथे राम येणार नाही. "ॐ रामात्मा श्रीहनुमंताय नम:।" हे म्हणत असताना, ‘मी कसाही असेन, मी पापी असेन, मी कुरूप असेन, पण मला माहीत आहे माझ्या चण्डिका आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे, निरंतर प्रेम आहे’ हा विश्वास दृढ होत जाणार.
"माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते." हे उपनिषदातील वाक्य आपल्याला सतत आठवले पाहिजे. आपण फक्त "अंबज्ञ " म्हणायचे. तुम्ही म्हणाल बापू हे वाक्य आदिमातेने परमात्म्यासाठी म्हटले आहे. ज्याक्षणी तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, त्याक्षणी तो तुमच्याकरिता तो हे वाक्य तुमच्या कानात उच्चारेल. एखाद्या मुलाने त्याच्या वडिलांच्या आईला पाहिलेले नाहीय, ती परलोकात आहे, पण तिचं तिच्या पुत्रावर प्रेम होतंच, तेच तो मला देतो.
त्याचं माझ्यावर प्रेम आहेच. माझं प्रेम कमी असलं तरी त्याचं प्रेम कमी होणार नाही. गुरुक्षेत्रम मंत्रात ही ऒळ म्हणताना तुमचा विश्वास अधिकाअधिक वाढतच जाणार. ह्यातून तुमचं जीवन सुंदरच होणार आहे. आज हा गुरुमंत्र म्हणताना लक्षात ठेवायचं, आजच्या गुरुवारपासून गुरुपौर्णिमेपर्यंतच्या प्रत्येक गुरुवारी गुरुक्षेत्रम मंत्र म्हणताना महाकाली प्रत्येकाच्यामागे येऊन, त्याची bodyguard बनून उभी राहणार आहे.
॥ हरि ॐ॥