॥ हरि ॐ ॥
रामनाम बँकेला आठ वर्ष झालीत. ह्या आठ वर्षात आपण किती वह्या लिहिल्या हा आपण विचार करायलाच पाहिजे. ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम: । आपण श्रीगुरुक्षेत्रम् मन्त्र पहात चाललो आहोत. आज ह्या मन्त्रातील मातेचे algorithms बघतो आहोत. मागच्यावेळी मातृकापूजन बघितलं अनेकांनी ते आनंदाने केलंही.
हा उत्साह मनुष्यामध्ये जीवनाच्या गती देत राहतो. संपत्ती असली आणि उत्साह नसेल तर काही होत नाही. हा उत्साह आणायचा कुठून? आज आपण बघतो सगळीकडे अशक्तपणा वाटतो, weakness वाटतो. शरीरातला ९०% अशक्तपणा हा मानसिक असतो. काही जण दोन लूज मोशन झाले की, पूर येऊन गेल्यासारखे बसतात. सर्दी-खोकला-ताप सगळ्यानांच येत असतो. हे सगळे मनाचे खेळ आहेत. आम्ही स्वत:ला किती जपतो. जरा काही झालं तर चेहरा असा असतो की जणू काही कॅन्सरच झालाय जसा.
मनात-प्राणात उत्साह नाही तर शरीरात येणार कसा? मिक्सरचा वापर करूनसुद्धा तीन जणांचा स्वयंपाक केल्यावर बाई दमते. आम्ही दमतो, दमलोत, थकतो. तरुण मुलं अभ्यास करून थकतात. हल्ली मुलांना साईटवरचा job नको असतो, office based job हवा असतो, साईटवर ऊन लागतं म्हणून. आम्हीच स्वत:चे लाड करून घेतो. ऑफिसमध्ये आठ तास काम करतो, लोकलचा प्रवास करतो म्हणून आम्ही थकतो. वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच गुडघेदुखी, स्पॉन्डिलाईसिस, कंबरदुखी होते. चाळीसाव्या वर्षीच सांधेदुखी होते. हल्ली बाळतंपणाच्या वेळी मुली सांगतात की सिझरिंग करा. डिलिव्हरी हे आरोग्य आहे ह्याचा आम्ही विचारच करत नाही. जेवणाची वेळ एक-दोन तास पुढे गेली की हात-पाय थरथरतात, डोकं दुखायला लागतं. कुठल्याही नॉर्मल माणसाचं शरीर ७२ तास उपाशी राहिलं तरी हायपर होऊ शकत नाही. मग असं का होतं? stamina नाही म्हणून. मग आम्ही डॉक्टरकडे जाऊन injections, औषधं घेतो असं का होतं? खास मित्राला भेटायला जायचं पण रविवार आहे, आरामात उठायचं मग बोरीवली-दादर-चेंबूर असा प्रवास करत जाण्यापेक्षा मित्राला कळवू मावशी वारली? का? रविवार म्हटला की, बारा वाजता उठायचं, आदल्या दिवशी रात्री ११.०० ते १२.०० वाजता झोपून जायचं, मग पेपर- नाश्ता बाहेरून मागवायचा. बाहेर जेवायला जाणं पॉश वाटतं. जे घरी अवघ्या दहा रूपयात मिळतं ते बाहेर ४०० रूपये खर्च करून खातो. बर्याच वेळा जेवण करू की नको ह्याच्यावरून इथून हे मागवूया-तिथून ते मागवूया. जास्तीत-जास्त कुकरला भात लावला जातो. मग झोप, आणि परत संध्याकाळी बाहेर जेवायला जायचं.
दिवाळीत कुठे किल्ला केलेला दिसत नाही. आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो मग कसा बांधणार किल्ला बांधायचा असेल तर तो कसाही बांधता येतो. रांगोळी पण काढता येत नाही. कंदील आम्ही बनवणार नाही. फराळातला एक पदार्थ घरी करायचा आणि बाकी सगळं बाहेरून मागवायचं.
आपण प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवं की, खरंच आम्ही एवढे दुबळे, अशक्त आहोत का? खाताना कसा व्यायाम व्यवस्थित होतो. तेव्हा हात दुखतो का? आमच्या इथे बाईची complaint होती की, कोपर दुखतंय, तरी पाऊण तास त्या जेवत होत्या. जेव्हा कोपर दुखायचं असतं तेव्हाच ते दुखतं.
आपली ही परिस्थिती का होते? कामाच्या वेळी सासूची कंबर दुखते, सुनेला ताप येतो असं का? अशाच रितीने आपण जीवन जगणार आहोत का? नोकरी, लग्न ह्याव्यतिरिक्त आणखी काय मिळवलं आपण? काय प्रगती केली? प्रमोशन मिळालं. मी अमूक झालो. मग एक दिवस फुग्याला टाचणी बसते. ५८ वर्षानंतर retirement मिळाल्यावर दुसर्या दिवशीपासून कोणीही विचारत नाही.
आपण आपल्या जीवनाचा काय विकास केला? आपण प्रयत्नपूर्वक आपल्या एका तरी चांगल्या गुणाचा अधिक विकास करण्यासाठी, तो गुण वाढविण्यासाठी अपरंपार श्रम घेतलेत का? ही एक गोष्ट झाली.
दुसरी गोष्ट - माझ्या जीवनात लहानपणी जी स्वप्न पाहिली होती त्यातलं एक तरी पूर्ण होण्यासाठी योजना तयार केली का?
तिसरी गोष्ट - मी कोणातरी माणसाला जो नातेवाईक, मित्र नाहीए त्याला केवळ माणुसकीच्या खातर सहाय्य केलयं का? जी व्यक्ती माझी कोणी नातेवाईक, मित्र लागत नाही त्या व्यक्तीसाठी आम्ही शरीरं झिजवलयं का?
ह्या तीनही गोष्टी आम्ही केल्यात का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या देवाने माझं एवढं केलं ह्या देवासाठी आम्ही काय केलंय का? तो देवच आमच्यासाठी सगळं काही करत असतो, तोच सगळं देत असतो, आम्ही त्याच्यासाठी काय करणार? पण तुम्हाला माहीत पाहिजे की, देवाला काय हवंय ते. देवाला तुमच्याकडून ह्या तीन गोष्टी हव्या असतात. हा चण्डिकापुत्र ह्याच तीन गोष्टी मागत असतो. हा ज्ञानेश्वरच महाविष्णू आहे, हा आम्हाला सांगतो - अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।
हे करण्यासाठी लागणारी उर्जा, उत्साह नाहीए. त्यात अनेक संकटं, मोह येतात, कधी आम्ही चुकतो तर कधी इतर चुकत असतात. ज्याला काम करायचयं त्याला कुठलीच अडचण येत नाही. ज्याला करायचं नाही त्याला शेकडो अडचणी उभ्या राहत असतात. ज्याला काम करायचयं तो अडचणींवर मात करून काम करतोच.
उत्साहाला संस्कृत शब्द आहे - मन्यु. मन्यु म्हणजे जिवंत, रसरशीत, स्निग्ध उत्साह. हा उत्साह मिळतो दोन गोष्टींतून. हा उत्साह चण्डिकाकुल आणि गुरुक्षेत्रम्कडून मिळतो. उत्साह म्हणजे तुमची क्षमता, सक्षमता किंवा सामर्थ्य नाही. तर उत्साह म्हणजे तुमच्या शरीरातील प्राणांच्या प्रत्येक क्रियेला मनाची आणि बुद्धीची उचित साथ मिळवून देऊन कार्य संपन्न करणारी शक्ती. ह्यात शरीर, प्राण, मन, बुद्धी पण आलीच. ह्या सगळ्यांकडून व्यवस्थित काम करवून घेणारी शक्ती म्हणजे उत्साह.
ही शक्ती सद्गुरु नामस्मरण, चण्डिकाकुल, गुरुक्षेत्रम्, गुरुक्षेत्रम् मन्त्र, बेसिकली भगवंताच्या नामस्मरणातून, मन्त्रातून मिळतो. भगवंतावरच्या विश्वासावरून मिळतो.
आमच्यासाठी आमचा देव किती मोठा आहे हे कसं ठरतं? जेवढा तुमचा विश्वास त्याच्या शतगुणे तुमचा देव तुमच्यासाठी मोठा असतो. आमचा विश्वास शून्य असेल तर १०० X ० = ०. देवाकडून काही मिळवायचं असेल तर आम्हाला विश्वास असायला हवा. हा विश्वास जर शून्य असेल तर कठीण आहे. भगवंतावरचा, चण्डिकाकुलावरचा विश्वास हाच उत्साहाची निर्मिती करणारा आहे. आज विश्वास १०० ग्रॅम आहे, अडचण आली की तो कमी होतो. अशा वेळेला करायचं काय? विश्वास वर-खाली, ठेचकाळत असेल तर मनात, शरीरात उत्साह निर्माण कसा होणार? मग बापू विश्वास वाढवायचा कसा? विष्णुसहस्त्र नामावली, राधा सहस्त्रनामावली मधून आपण शिकलोत. दिवसा प्रार्थना करतो, स्वत:साठी दिवस चांगला जावा म्हणून. रात्री प्रार्थना करतो स्वत:साठीच. तशीच कधी परमेश्वराची भक्ती वाढवी म्हणून आपण प्रार्थना कधीच करत नाही. प्रार्थना केल्याशिवाय विश्वास वाढणार नाही. पण ह्या गोष्टी वेदाच्या काळातल्या होत्या. प्रार्थना केली की आम्ही सुधारू. तरी कलियुग येतच का? विश्वास हा कधी एकदम high असतो, तर कधी low. त्यामुळे उत्साह निर्माण होत नाही. उत्साह निर्माण झाला नाही तर अभ्युदय होणार नाही, कलियुगापासून लांब राहता येणार नाही. त्यामुळे कलियुगातील सगळी दु:खं भोगावी लागली की परत देवाला दोष देत राहणार आणि विश्वास खाली येणार.
ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. त्यासाठीच ‘श्रीश्वासम्’ ही आगळी-वेगळी अद्भुत गोष्ट आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘श्रीश्वासम्’ अनुभवायचा आहे. प्रत्येक चांगलं कार्य करण्यासाठी उत्साह हवा असतो. जेवण, नोकरी, बिझनेस, आध्यात्मिक प्रगती हे सगळं करण्यासाठी शरीरात, मन, बुद्धी, प्राणात stamina असावा लागतो. ज्यांना हे हवं असेल त्यांच्यासाठी दर गुरुवारी श्रीस्वतिक्षेम् संवादानंतर ‘श्रीश्वासम्’ असेल. ‘श्रीश्वासम्’ हे अतिशय बहारदारपणे, दिमाखात, प्रचंडपणे अनुभवायचं आहे. जानेवारी महिन्यात हे होणार हे नक्की. तारीख fix झाली की तुम्हाला सांगेन.
ह्या ‘श्रीश्वासम्’ साठी मी एक व्रत घेतोय. जेणेकरून ज्याला हा श्रीश्वासम् हवाय त्याला मिळावा म्हणून. ह्या व्रताच्या काळात मी दर गुरुवारी येणारच आहे. पण बाकीच्या events पासून लांब जाणार आहे. कारण श्रीश्वासम्साठी मला माझी तयारी करायची आहे. मला प्रत्येकासाठी असे चॅनल open करायचे आहे. असे चॅनेल की ज्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार, स्थितीनुसार वापरता यायला पाहिजे. ही माझी साधना, उपासना आहे.
मागे तपश्चर्येच्या काळात अनेकांनी विचारलं होतं, बापू ह्या तपश्चर्येच्या काळात आम्ही काय करू शकतो? तसंच ह्या व्रताच्या काळात ‘श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत-नामावली:’ जेवढे वेळा वाचता येईल तितक्यांदा प्रेमाने वाचायची. कुठलाही नियम धरू नका. हि अष्टोत्तरशतनामावली म्हणून झाली की आईजवळ प्रार्थना करायची, आई, ही शिवगंगागौरी नामावली मी वाचतो/वाचते आहे हिच्यामुळे माझा जो चॅनल बापूंना बनवायचा आहे त्याच्यासाठी ह्याचा उपयोग करून घे.
चॅनल म्हणजे दोन गोष्टींना जोडणारा मार्ग. ज्यांना हा ‘श्रीश्वासम्’ हवा आहे, त्यांच्यासाठी हे चॅनल मी तयार करणार आहे. ज्यांना ही गोष्ट नको आहे, त्यांच्यासाठीही चॅनल तयार करणार पण त्याचा दरवाजा त्यांच्यासाठी बंद असणार आहे. पण माझी आई क्षमा आहे, ती मला क्षमा करायलाच लावणार पण, त्यासाठी तुम्हाला realization होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांना ही गोष्ट माहीतच नाही अशी असंख्य जनता आहे. त्यांच्यासाठी चॅनल उघडणं हे त्यांचा त्यांच्या देवावर किती विश्वास आहे ह्यावर अवलंबून असणार.
प्रत्येकाने अष्टोत्तरशतनामावली पहिल्या दिवसापासून बापू जो चॅनल माझ्यासाठी उघडा करताहेत तो मला जास्तीत जास्त वापरता आला पाहिजे म्हणून म्हणायची.
मी जेव्हा ‘श्रीश्वासम्’ वर बोलणार आहे त्याची माहिती देणार आहे त्याची तारीख आणि उत्सवाची तारीख अगोदरच दादांच्या Blog वर देण्यात येईल. आतापर्यंतची सगळी आईची सूत्र एकत्रित करणारी ही गोष्ट आहे. ज्यादिवशी बोलणार त्यादिवशी कानात प्राण आणून ऐका.
‘श्रीश्वासम्’ पहिल्या दिवशी होणार त्यादिवशी उत्सव असणार. ह्या उत्सवाच्या दिवसाची थीम काय आणि ड्रेस कोड काय असेल? एकच थीम आहे.
मूषक का बनवायचा? आजचा (दिनांक-०७/११/१३) अग्रलेख वाचला असेल त्यांना बघा विचार करून. काय होतं अग्रलेखामध्ये चार सिंहीणी, चार गाई, चार हरिणी आणि चार घोडी आहेत. त्यांच्यासोबत ‘दिव्य मूषक’ आहे. स्वत: आदिमाता श्रीविद्येने ह्या दिव्य मूषकाला ‘श्रद्धावानाचा श्वास’ म्हणून declare केलं आहे.
प्रत्येकाने उत्सवाच्या दिवशी येताना, ह्या दिवशी घरी सकाळी उठल्यावर एक तासात साध्या मातीचा, चिनी मातीचा उंदीर बनवायचा. एका तासात छोटे-छोटे कितीही उंदीर बनवा किंवा एक मोठा उंदीर बनवा. तो एक तास ही महत्त्वाची गोष्ट आहे. तो दिव्य मूषक प्रत्येकाने आपल्याबरोबर इथे घेऊन यायचा आहे. ही थीम फक्त पहिल्या दिवसासाठीच आहे. नंतरच्या गुरुवारी मूषक बनवून आणायचा नाही. इथे आणताना तुटला तरी त्याची जबाबदारी तुमची नाही. म्हणजे उत्सवाची थीम आहे - ‘दिव्य मूषक’
उत्सवाचा ड्रेस कोड आहे प्रत्येकाने त्यादिवशी स्वत:च्या हाताने धुतलेले कपडे घालायचे. त्या दिवशी घालायचे एक तरी वस्त्र स्वत:च्या हाताने धुतलेले हवे. ह्या वस्त्राला ‘धौत वस्त्र’ म्हणतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्सवाच्या दिवशी स्वत:ला available करून ठेवा. तेवढा उत्साह तरी त्याच्यासाठी राखून ठेवा.
॥ हरि ॐ ॥