॥ हरि ॐ॥
श्रीस्वस्तिक्षेम संवाद आपण बरेच दिवस करतो आजही करणार आहोत. त्याआधी एक छोटीशी गोष्ट. आपल्या प्रत्यक्षचं ब्रीदवाक्य काय आहे?
"तुटे वाद संवाद तो हितकारी"
माणसांचे एकमेकांशी वाद असतात. सहकार्यांशी असतात, भावाभावांमध्ये असतात, सासू-सुनेचे असतात, सीमेवरून असतात, भाषेवरून वाद असतात, राष्ट्राराष्ट्रांमध्ये वाद असतात. सगळ्यात महत्त्वाचा वाद मनाचा बुद्धीशी असणारा वाद. हा वाद सतत चालू असतो. जागं झाल्यापासून झोपेपर्यंत, सकाळपासून रात्रीपर्यंत. ह्यातलं बरोबर कोण? बर्याच वेळा बुद्धी बरोबर असते आणि मन चुकत असतं. तर काही वेळा मन बरोबर असतं आणि बुद्धी चुकत असते. मनाला ओढ असते आज १०८ वेळा जप करण्याची पण बुद्धी सांगते नको आज संध्याकाळी बाहेर जायचं आहे काम आहे, काम महत्त्वाचं आहे. पण बुद्धी हे सांगत नाही की आज सकाळी लवकर उठून जप कर, दुपारची झोप घेऊ नकोस आणि जप पूर्ण कर. बुद्धीचा एक भाग असा आहे जो माणसाला फसवतो. संत त्याला देहबुद्धी म्हणतात आणि विचारवंत त्याला स्वार्थीबुद्धी म्हणतात. ही बुद्धी देवाने मानवाला स्वत:चं कल्याण करायचं म्हणून दिली. पण आम्हाला आमचा खरा स्वार्थ कळला नाही तर काय उपयोग? मनाला ओढ असते देवाचं नाव घेण्याची आणि बुद्धी सांगते बायकोला फिरायला न्यायचं आहे. स्वार्थीबुद्धी सबब देत असते. ही सबब देणारी स्वार्थीबुद्धी मनाची प्रगती रोखते. मन आणि बुद्धीमध्ये हजारो कारणांसाठी सतत वाद चालू असतात.
‘कुमति निवार सुमति के संगी’ आणि आदिमातेच्या स्तोत्रामध्ये आपण काय म्हणतो ‘कुकर्म कुसंग कुबुद्धि कुदृष्टिविनाशिनी’ माझी व इतरांची कुबुद्धि निवारण कर. हा बुद्धीचा अंश मानवाला स्वत:च्या प्रगतीसाठी देवाने दिलेला असतो. मला हितकारक काय आहे हे कळण्यासाठी दिलेला असतो.
मनाचा आणि बुद्धीचा वाद तुटला पाहिजे. इथे संपला पाहिजे, थांबला पाहिजे असं म्हटलेलं नाहीए. एखादी गोष्ट तुटली म्हणजे संपली. तुटला म्हणजे संपूर्णपणे संपला.
माणसाच्या मनात १०० विचार असतात. त्या त्या माणसाचे problems त्याच्यासाठी मोठेच असतात. अशा वेळी निवड कशी करायची हे कळत नाही. १०० ठिकाणी १०० decision माणसाला रोज घ्यावे लागतात. मग दोनमधून एक, शंभरातून एक, हजारातून एक निवडताना मन-बुद्धीचा वाद होत असतो. जेव्हा उचित मिळतं तेव्हा हा वाद संपतो. कुठल्याही गोष्टीची उचितता फक्त सद्गुरुच देऊ शकतो. सद्गुरु तत्त्वाची व्याख्या काय आहे तर - ‘जो अंधाराचं रूपांतर प्रकाशात करतो तो सद्गुरु’ हेच गुरुतत्त्वाचं मुख्य कार्य आहे.इथे सद्गुरुतत्त्वाची अत्यंत महत्त्वाची ताकद आपण लक्षात घेतली पाहिजे. जो भूतकाळ मला सतावत असतो, जो भूतकाळ माझा भविष्यकाळ, वर्तमानकाळ घडवतो. तो संपूर्णच्या संपूर्ण भूतकाळ हे सद्गुरुतत्त्व भूतकाळात जाऊन repair करू शकते. हे घडतं कसं? हे सद्गुरु कशाप्रकारे घडवतो? ह्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. सद्गुरुने आमचा भूतकाळ दुरुस्त करावा असं वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे?
‘ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’
ह्यात ‘रामवरदायिनी’ आहे मग गुरुतत्त्वाचा संबंध कुठे येतो? हा प्रश्न प्रेमाने विचारला असेल तर बरोबर आहे. स्कंद चिन्ह आपल्याला माहीत आहे. हे शक्ती त्रिकोण आणि शिव त्रिकोण ह्या दोन त्रिकोणांनी बनलेलं आहे. ह्या चिन्हात सहा त्रिकोण आहेत. ह्या सहा त्रिकोणांच्यामध्ये षट्कोन आहे. ही जागा म्हणजे ‘श्रीगुरुक्षेत्रम्’. ह्या षट्कोनाच्या बाजूने सहा त्रिकोण आणि तीन डमरू आहेत. म्हणजे ‘श्रीगुरुक्षेत्रम्’ तीन डमरूंच्या मध्ये आहे. ह्यातील एक डमरू परमशिवाचा आहे, एक किरातरुद्राचा आणि एक महादुर्गेश्वराचा आहे. ह्या तीन डमरूंनी मिळून ‘श्रीगुरुक्षेत्रम्’ तयार होतं. हे तीनही डमरू अशा रचनेत आलेत की आपोआप ‘श्रीगुरुक्षेत्रम्’ तयार होतं. परमशिव, किरातरुद्र आणि महादुर्गेश्वर हे तिघेही शिवच आहेत. तिघांच्या डमरूचा आवाज एकच आहे. प्रत्येकाच्या हृदयात हा डमरू आहे. हृदयाचा लबडब लबडब आवाज हाच डमरूचा मूळ ध्वनी आहे. प्रजापती ब्रह्मा उत्पत्ती करतो, महाविष्णू स्थिती देतो, आणि परमशिव लय करतो. परमशिव प्रत्येक क्षणाचा, युगाचा, दुर्गुणांचा लय करतो. कुठलीही गोष्ट तोडायची किंवा पूर्णपणे बदलायची असेल तर तिथे परमशिवाचा हस्तक्षेप असणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला लय करताना तो कुठलीही गोष्ट नष्ट करत नाही तर रुपांतरित करतो. भूतकाळातील चूक नष्ट होणार नाही ती रुपांतरित होईल. लयासाठी हा परमशिव तांडव सुरू करतो तेव्हा तो डमरू वाजवतो. पार्वती लास्य करते, जे आनंद आणि सुख देणारं आहे. तेव्हासुद्धा शिव डमरू वाजवतो. म्हणजेच शिवाचा डमरू हे जिवंतपणाचं, रसरशीतपणाचं लक्षण आहे. तांडव आणि लास्य दोन्ही वेळेला डमरू वाजतो. जीवन चालू असताना डमरू वाजत असतो. तो वाजायचा थांबला की सगळं संपलं असं नाही. श्रद्धावानाला मृत्यू नसतो. त्याचं रूपांतर होत असतं. त्या मधल्या काळात पृथ्वीवर नसताना काय होतं? तर प्रत्येक जीवात्म्याला शिक्षण दिलं जातं पुढल्या जन्मी चांगलं होण्यासाठी. हे ज्ञान जिथे दिलं जातं त्याला परलोक म्हणतात. ‘शिवम् ज्ञानोपदेष्ठम्’ हा शिवच ज्ञान देत असतो म्हणून तो स्मशानाचा राजा आहे. आम्ही भुताला भिऊन स्मशानात रामनाम घेत असतो पण तिथे शिव असतो. अधिक चांगलं ज्ञान परमात्म्याचं शिवरुप देतं. प्रगतीसाठी आवश्यक असणारं ज्ञान, जिवंतपणा, रसरशीतपणा डमरू देतो.
आपली ही जी पृथ्वी आहे तिचं नाव वसुंधरा आहे. अशाच अनेक पृथ्व्या आहेत. जेव्हा तुम्ही एक जन्म ह्या वसुंधरेवर घेता त्याचप्रमाणे इतर सहा पृथ्वींवरही तुमचा जन्म झालेला असतो. म्हणजे तुमच्यातला प्रत्येकजण एकाच वेळी सात ठिकाणी आहे. उदाहरण बघूया. हे सीईओ आहेत सुनिलसिंह मंत्री हे इथेही आहेत आणि आणखी सहा पृथ्वींवरही आहेत. कुठे चोवीस वर्षाचे, कुठे ८२ वर्षाचे, कुठे एका ठिकाणी पायलट आहेत. तुमच्यातला प्रत्येक जण सात ठिकाणी आहे आणि तुम्ही प्रत्येक जण एकमेकांशी जोडलेले असता. जेव्हा तुम्ही एका वसुंधरेवर जन्म घेता त्याचवेळी इतर सहा ठिकाणीही तुमचं अस्तित्व असतं. ही तुमची सातही अस्तित्वं maintain केली जातात. तुम्ही एका ठिकाणी मेलात तरी दुसर्या ठिकाणी तुमचा जन्म होतो. त्यामुळे एकदा युग सुरू झालं की कोणी मरत नाही. तो इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी जन्म घेतोच आणि सात हा अंक maintain राहतो.
स्कंद चिन्हातील सहा टोकं, ह्यातला प्रत्येक बिन्दू इतर पृथ्वींवरच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. फक्त ही वसुंधरा पृथ्वीच गुरुक्षेत्रम्शी जोडलेली आहे. तुम्ही इथे भूतकाळात केलेली चूक इतर ठिकाणांहून दुरूस्त केली जाते. उदाहरण बघूया तुम्ही ह्या वसुंधरा पृथ्वीवर वयाच्या २४ व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचे दीड लाख रुपये चोरलेत. ही तुमच्या भूतकाळातील चुकीची दुरुस्ती कशी केली जाते, तर जिथे तुमचं वय २४ वर्ष आहे तिथे तुमच्याकडून दीड लाख रुपये त्या व्यक्तीला दिले जातात.
गुरुक्षेत्रमशी जोडणारी फक्त ही एकच पृथ्वी आहे. म्हणून तो प्रत्यक्षपणे इथे अवतरतो. इतर ठिकाणी त्याचं चरित्र कुठेही नसतं. ही एकमेव पृथ्वी अशी आहे की जिथे तो जन्म घेतो, काम करतो. इतर ठिकाणी तो फक्त चिंतनातून दर्शन देतो.
हे भाग्याचं लक्षण आहे की आपला जन्म ह्या वसुंधरा पृथ्वीवर झाला. ह्या वसुंधरेवर तुम्ही जन्माला आला आहात म्हणजे तुम्ही एकदा तरी त्याला मनापासून हाक मारली आहे, त्याचं होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्याचं प्रेम unconditional आहे, ते मिळविण्यासाठी एकच अट आहे की त्याच्यावर unconditional विश्वास ठेवायचा. Unconditional विश्वास म्हणजे -
‘एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ।’
His love is unconditional हे जाणणं. त्याचं प्रेम कुठल्याही कारणाशिवाय आहे हे जाणून विश्वास टाकला की बाकीच्या सहा connection मध्ये जे बदल घडवायचेत ते तो घडवतो.
बघा परीक्षेत सात प्रश्न आहेत. पण वसुंधरा पृथ्वीचा प्रश्न ९४ मार्क्सचा आहे मग बाकीचे सहा मार्क्स मिळवणं किती सोपं आहे.
त्याने त्याच्या आईच्या नियमानुसार तुम्हाला कर्मस्वातंत्र्य दिलंय. पण त्याला आणि त्याच्या आईला माहीत आहे की तुम्ही चुकता. हे इतर सहा ठिकाणचे जन्म तो प्रयोगशाळा म्हणून वापरतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा संध्या असू शकतील अशी arrangement तो करतो. तीन डमरूंच्यामध्ये स्कंद चिन्हात गुरुक्षेत्रम् असल्यामुळे हे स्थूल, सूक्ष्म, तरल ह्या तीनही पातळींवरही कार्य करतं. गुरुनाम हेच खरं सूक्ष्म पातळीवरील गुरुक्षेत्रम् आहे. ह्या नामाची रचना चण्डिका आईने अशी केलेली असते की ती त्याकाळासाठी जी स्पंदनं आवश्यक आहेत ती स्पंदनं त्या नामात असतात. आपण गुरुक्षेत्रम् मन्त्र म्हणतो तेव्हा आपण गुरुक्षेत्रम्मध्येच असतो. तुम्हाला तुमची काळजी एक टक्का आहे, तर त्याला तुमची काळजी लाख टक्के आहे. म्हणून याने सहा connections तयार केलेत. हे connections जोडण्यासाठी चण्डिकाकुलावर प्रेम करा. ‘एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा’ ह्या वाटेने पुढे जात रहा आणि गुरुक्षेत्रम् मन्त्र जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा.
गुरुक्षेत्रम् तीन डमरूंच्या एकत्रित ध्वनीने बनलेलं आहे. म्हणून गुरुक्षेत्रम् मन्त्राचे तीन भाग आहेत. १) बीजमन्त्र २) अंकुरमन्त्र आणि ३) उन्मीलनमन्त्र
तुम्ही ह्या वसुंधरा पृथ्वीवर जन्म घेतला आहे म्हणजे तुम्ही वाईट, दुर्दैवी नाही आहात. इथेच तुमचा भूतकाळ बदलला जाऊ शकतो. कुठलीही चूक करा, पण ‘मी अंबज्ञ आहे’ हे विसरण्याची चूक करू नका. राग आहे, शोक आहे, तुम्ही रडता आहात, तुम्ही लढता आहात तरीही ‘मी अंबज्ञ आहे’ हे विसरू नका. ह्या शद्बात संपूर्ण ताकद आहे. हा शद्ब कसा तयार झाला ते सांगतो. जेव्हा हे तीन डमरू एकाच वेळेस वाजतात. परमशिव, किरातरुद्र आणि महादुर्गेश्वर ह्यांचा स्थूल, सूक्ष्म, तरल पातळीवरचा डमरू एकत्र वाजतो तेव्हा जो ध्वनी निर्माण होतो तो ध्वनी म्हणजे ‘अंबज्ञ’. जेव्हा तुम्ही इथे ‘मी अंबज्ञ आहे’ म्हणता, गुरुक्षेत्रम् मन्त्र म्हणता तेव्हा इतर सहा ठिकाणी तुम्ही नास्तिक असलात तरी त्याची स्पंदनं तिथे तिथे जाऊन पोहचतात आणि त्यांनाही बळ प्राप्त होते.
‘मी अंबज्ञ आहे’ आणि ‘गुरुक्षेत्रम् मन्त्र’ हृदयात साठवून ठेवा. हे connection घट्ट जोडायचं आहे. ‘श्रीश्वास’ ही अशी गोष्ट आहे जी इतर सहा ठिकाणच्या अस्तित्वाशी तुम्हाला जोडेल आणि तुमच्या समग्र अस्तित्त्वाचं connection त्याच्या अस्तित्वाशी जुळवून देईल.
भूतकाळसुद्धा बदलला जाऊ शकतो. एक चूक घडली आणि आयुष्याचा नाश झाला हे शक्य नाही. कारण तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही. फक्त एक गोष्ट शक्य नाही. ती म्हणजे साईनाथांच वचन -
‘शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी ।’
हा एकच अपवाद आहे पण तो अपवादही नियम सिद्ध करणाराच आहे. पण त्यासाठी त्याच्यावर प्रेम करा. तो आमच्यावर निरतिशय प्रेम करतो. आम्ही माणसांची, स्वत:ची खात्री देऊ शकत नाही पण त्याची खात्री देऊ शकतो. आम्हाला खात्री हवी की, त्याची आई जेवढं त्याच्यावर प्रेम करते, तेवढंच प्रेम तो आमच्यावर करतो. मी आणि सहा जण (इतर पृथ्वींवरील अस्तित्व) हे सहा जण त्यानेच आमच्या मदतीसाठी तयार केले आहेत. तो ह्या सात जणांना खांद्यावर घेणार आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा’.
तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही. तुम्हाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय आहेत मलाही तसेच आहेत. तरीही तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक आहे. तुमचा सेकंद आणि तुमची शेकडो वर्ष ह्यामध्ये काळप्रवाह आहे. त्यात तुम्हाला पोहता येत नाही. हा काळाचा प्रवाह माझ्यापासून सुरू होतो आणि माझ्याकडे येऊनच संपतो.
॥ हरि ॐ ॥